Wednesday, October 1, 2025

DIO NEWS AMRAVATI 01-10-2025

सामाजिक न्याय कार्यालयात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

अमरावती, दि. 1 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान अंतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे आज ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने 200 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम गावंडे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. दामोदर पवार, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव उमाळे, संत गाडगेबाबा अध्यासनचे अध्यक्ष डॉ. दिलीप काळे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभागाचे वित्त व लेखा सहायक संचालक डॉ. दिनेश मेटकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर, समाज कल्याण विभाग विशेष अधिकारी सचिन मोरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 21 लाख रूपयांचा निधी गोळा करणार आहे. तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीकडे ज्येष्ठ नागरिक संवेदनशिलपणे पाहत आहेत, ही आपल्या संस्कृतीचा भाग असल्याचे सांगितले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढील पिढीचे भवितव्य घडत असते. त्यामुळे ज्येष्ठ हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांच्या संपत्तीचे संरक्षण करणे, त्यांच्या आरोग्याच्या समस्या निकाली काढणे, वृद्धपकाळातील पेन्शनची प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तसेच आयुष्मान भारत कार्ड आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

श्री. जाधवर यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी आभार मानले.

00000

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

अमरावती, दि. 1 (जिमाका) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण निश्चिती, सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सोमवार, दि. 6 ऑक्टोबरपासून कार्यक्रम सुरू होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. सदस्य आरक्षण निश्चिती, सोडतीचा कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती जागा निश्चितीसाठी प्रस्ताव तयार करून दि. 6 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करतील. दि. 8 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देतील. दि. 10 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासह वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढणे यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी, तर तहसीलदार पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षण काढतील. दि. 14 ऑक्टोबर रोजी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी          आहे. दि. 27 ऑक्टोबर पर्यंत प्राप्त प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचनांच्या आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येईल. दि. 31 ऑक्टोबर पर्यंत प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करण्यात येईल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी कळविले आहे.

00000

                            रोजगार निर्मिती कार्यक्रमातील कर्ज प्रकरणे डिसेंबरपर्यंत निकाली काढावीत

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 1 (जिमाका): मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात गावपातळीवर रोजगार उभारण्यासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. याबाबतचे प्रस्ताव बँकांकडे पाठविण्यात येते. ही कर्ज प्रकरणे डिसेंबरपर्यंत निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हा नियोजन भवनात जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, खादी ग्रामोद्योगचे जिल्हा व्यवस्थापक प्रदिप चेचेरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील बँकांकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आढावा घेतला. जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग आणि कृषी विभागातर्फे उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येते. तसेच बँकांकडे कर्ज प्रकरणे दाखल करण्यात येतात. ही प्रकरणे नाकारताना संबंधित कार्यालयाला सूचना देण्यात यावी. प्रामुख्याने कागदपत्रांची पुर्तता करीत नसल्यास याबाबत माहिती देण्यात यावी.

विविध शासकीय यंत्रणांकडून बँकांना कर्ज प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. मात्र सिबिल स्कोअर आणि इतर कारणांमुळे कर्ज मंजुरीचे प्रमाण कमी आहे. तसेच बँकांकडून कर्ज मंजूरीची गतीही कमी आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत कर्ज प्रकरणांबाबत बँकेच्या नियमाप्रमाणे निर्णय घेण्यात यावा. या प्रक्रियेसाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी इतर शाखांमधून काही कालावधीसाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये कालमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन केले.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी भरपाई शासनाकडून होणार आहे. शेतकऱ्यांना मिळणारी ही मदतीची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र ही रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळती होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. असे प्रकार झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने असे प्रकार होणार नाहीत, याची प्रत्येक शाखेला सूचना देण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी बँकनिहाय कर्ज मंजुरीचा आढावा घेण्यात आला. पी. आर. पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील रोजगाराच्या संधीबाबत तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे सादरीकरण केले. यामुळे निश्चित केलेल्या भागात कोणत्या रोजगाराच्या संधी आहेत, याबाबत माहिती मिळणार आहे. याचा लाभ बँकांना कर्ज प्रकरणे मंजूर करताना, तसेच उद्योग उभारण्यास इच्छुकांना होणार आहे.

00000

  

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI विकसित

चुकीच्या खतांचा वापर टळणार; डिजिटल क्रांतीमुळे नफा वाढणार

            अमरावती, दि. 01 (जिमाका): शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने महाविस्तार AI हे अँप विकसित केले आहे. हे एक अत्याधुनिक अॅंप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॅंप शेतक-यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पध्दतींचे मार्गदर्शन करते.

महाविस्तार AI अॅंपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती. अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. अॅंपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अॅंपमधील AI तंत्रज्ञानमध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करून उपाय मिळवू शकतात.

महाविस्तार AI अॅंप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे. चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI अँप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल कांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

जिल्ह्यातील 25 शासकीय केंद्रांवर अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु;

त्वरित ऑनलाईन प्रवेश नोंदणी करा

            अमरावती, दि. 01 (जिमाका): राज्यात 'उद्योग 4.0' च्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी उपक्रम सुरू झाला आहे.  या अंतर्गंत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), शासकीय तंत्र माध्यमिक शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नवीन आणि लोकप्रिय अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.यानुसार, अमरावती जिल्ह्यात दिनांक 8 ऑक्टोबर 2025 पासून या 'न्यू एज' अभ्यासक्रमांना सुरुवात होत आहे.

अमरावतीतील 25 संस्था सज्ज औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या उद्देशाने, अमरावती जिल्ह्यातील एकूण 25 शासकीय संस्थांमधून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि 7 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्रांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांमुळे संबंधित क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राशी सुसंगत कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त करता येतील.इच्छुक उमेदवारांना या अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे.उमेदवारांनी सर्वप्रथम www.msbsvet.edu.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. वेबसाईटवरील 'ITI शॉर्ट टर्म ट्रेनिंग' या टॅबवर जाऊन आपला प्रवेश त्वरित नोंदवावा.

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. टी. मुळे यांनी या अल्पकालीन आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची मागणी मोठी असल्याने, सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेत प्रवेशाची नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील संबंधित प्रशिक्षण केंद्रांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

00000

वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 26 ऑक्टोबर अंतिम मुदत

अमरावती, दि. 01 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्याची संधी आहे. बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहांमध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहील. अर्जांची छाननी 27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान होईल, तर पहिली निवड यादी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 10 नोव्हेंबर असून, रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड करून ही यादी 13 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर 2025 असेल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मुलांनी (अग्रवाल टॉवर जवळ, कॉटन मार्केट रोड) आणि मुलींनी (राम लक्ष्मण संकुल, रामपूरी कॅम्प जवळ) संबंधित शासकीय वसतिगृहांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अधिक माहितीसाठी सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण ,अमरावती विभागाने केले आहे.

00000

                    ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाइन सादर करा;

अमरावती जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे आवाहन

अमरावती दि. 01 (जिमाका):  खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाने केले आहे.

अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजना विषयक सर्व सेवा आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योग आणि आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणे) कायद्यान्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.

सप्टेंबर 2025 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक कालावधीकरिता ई-आर-1 ची प्रणाली माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय,निमशासकीय,खाजगी उद्योजक,आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करण्याची  आहे. तसेच, त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे.

ऑनलाइन ई-आर-1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 उपलब्ध आहे. ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2025 आहे. या मुदतीत ई-आर-1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर विहित नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

 परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी  नवीन

वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन

अमरावती, दि. 01 (जिमाका): परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी  बुधवार, दि. 8 ऑक्टोबर 2025  रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी  देय असावा.

एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी   वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.

एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी केले आहे.

00000

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पांदण रस्ते रस्त्यांमुळे ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा

अमरावती, दि. 1 (जिमाका) : शेतीत ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या शेत-पांदण रस्त्यांची  कामांना अमरावती जिल्ह्यात गती मिळाली आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पांदण रस्ते योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 4203 कामांपैकी, 1 हजार 232 कामांनी प्रत्यक्षात बांधकाम सुरू केले आहे. ज्यामुळे शेतमाल वाहतूक आणि शेतीच्या कामांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील 4 हजार 203 विकासकामांना गती मिळाली आहे. शासनाने मंजूर केलेल्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने त्वरित कार्यवाही करत 3 हजार 90 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातील 449 कामे पूर्ण झाली असून, 1 हजार 232 कामे सध्या वेगाने सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. पूर्ण झालेल्या 449 कामांमुळे नागरिकांना थेट सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सुरू असलेली 1 हजार 232 कामे येत्या काही कालावधीत पूर्ण होवून जिल्ह्यातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल.

            अनेक पंचायत समित्यांनी विकासकामांना चांगली गती दिली आहे. वरुड पंचायत समितीने सर्वाधिक 140 कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. मोर्शी तालुक्यात 661 कामांपैकी 348 कामांना तांत्रिक मान्यता मिळून 202 कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. चांदूर बाजार मध्ये 504 पैकी 450 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सध्या 139 कामे वेगाने सुरू आहेत. प्रशासकीय यंत्रणा मंजूर कामांना तातडीने कार्यान्वित करीत आहे. उर्वरित 1 हजार 113 कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्याचे काम सुरू असून, लवकरच ही कामेही सुरू होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...