Tuesday, October 7, 2025

DIO NEWS AMRAVATI 07-10-2025


                                     जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन

अमरावती, दि. 07 (जिमाका) : महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक निलेश खटके उपस्थित होते. उपस्थितांनीही महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे

अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम

अमरावती, दि. 07 (जिमाका) : कौशल्य विकास विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे.

राज्यातील 400 पेक्षा अधिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये चालविण्यात येणाऱ्या नवयुगीन व पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पायाभूत सुविधांचा अधिकाधिक उपयोग करीत तेथे चालणाऱ्या नियमित वर्गाच्या आधी किंवा नंतर उपलब्ध होणाऱ्या वेळेत हे अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सदर अल्पमुदती अभ्यासक्रम प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 7 शासकीय तंत्र माध्यमिक शाळांमध्ये 128 अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांपैकी 93 अल्पमुदतीचे प्रशिक्षण दि. 8 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहेत. अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी शिकणारे, उत्तीर्ण झालेले युवक, युवती व महिलांनी नाममात्र 100 रूपये भरून नाव नोंदणी करावी लागणार आहे.

अल्पमुदतीचे रोजगारश्रम प्रशिक्षण योजनेत महिलांसाठी स्वतंत्र नवयुगीन अल्पमुदतीचे प्रशिक्षण सुध्दा उपलब्ध आहे. अधिक माहिती msbsvet.edu.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अत्यल्प शुल्कामध्ये प्रशिक्षण मिळत असल्यामुळे प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राम मुळे यांनी केले आहे.

000000

पंचायत समितीस्तरावर सोमवारी आरक्षण सोडत

अमरावती, दि. 07 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरीता सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्याबाबत कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भातकुली पंचायत समितीसाठी तहसिल कार्यालय, भातकुली जैन येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्व साधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यासाठी सोडत पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी विशेष सभा आयोजित केली आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

कृषी समृद्धी योजनेत फलोत्पादनासाठी अनुदान

*अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 7 (जिमाका): राज्यात फलोत्पादन पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. या अनुषंगाने, कृषी समृद्धी योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळपीक लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यात ड्रॅगनफ्रुटला 2 लाख 70 हजार रूपये प्रती हेक्टर, स्ट्रॉबेरीला 80 हजार प्रती हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. फुलपीक लागवडीत दांड्याची फुलेला 50 हजार प्रती हेक्टर, कंदवर्गीय फुलेला 1 लाख प्रती हेक्टर, सुटी फुलेला 20 हजार रूपये प्रती हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. मसाला पिके लागवडीत मिरचीला 20 हजार रूपये प्रती हेक्टर, आले, हळदला 80 हजार रूपये प्रती हेक्टर, औषधी व सुगंधी वनस्पतीला 60 हजार रूपये प्रती हेक्टर, संत्रा फळबाग पुनरुज्जीवनला 24 हजार रूपये प्रती हेक्टर अनुदान देण्यात येते. सामूहिक शेततळेला खर्च मापदंडाच्या 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, अळींबी उत्पादन प्रकल्प, हरितगृह व शेडनेट गृह, प्लास्टिक मल्चिंग, पॅकहाउस व कांदाचाळ यांना खर्च मापदंडाच्या 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. संकलन एकत्रीकरण केंद्र, पूर्व-शितकरण गृह व फिरते पूर्व-शितकरण गृह, शितखोली व सौरऊर्जा शितखोली, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, एकात्मिक शितसाखळी प्रकल्पांना खर्च मापदंडाच्या 35 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबिटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

'शी-बॉक्स' पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 07 (जिमाका): कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने 'शी-बॉक्स' हे ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे. आता या पोर्टलवर सर्व खाजगी आस्थापनांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार, ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी आहेत, तेथे अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे.

'शी-बॉक्स' पोर्टलमुळे महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवणे आणि त्याचा पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. तसेच, प्रशासनाला या तक्रारींवर वेळेत आणि प्रभावी कार्यवाही करणे शक्य होईल. सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी या निर्देशांचे पालन करून आपल्या संस्थेची 'शी-बॉक्स' पोर्टलवर त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले आहे.

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...