प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांचे ज्ञानसाहित्य जतन व्हावे
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती, दि. 11 : प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज यांनी विस्तृत साहित्य विवेचन केलेले आहे. त्यांनी 130 पुस्तकाच्या माध्यमातून समाजाच्या विविध भागावर सूक्ष्म पद्धतीने प्रकाश टाकला आहे. त्यांचे ज्ञान हे नवीन पिढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करून जतन करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
माधान, ता चांदूरबाजार येथे समदृष्टी, क्षमताविकास आणि संशोधन मंडळ आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थान तर्फे दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संत गुलाबराव महाराज यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, सक्षमचे अध्यक्ष विजयसिंह मोहता, संत गुलाबराव महाराज संस्थानचे अध्यक्ष अरविंद मोहोड, सचिव साहेबराव मोहोड, जयप्रकाश गिल्डा आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. गडकरी म्हणाले, बालपणापासून अंध असलेल्या संत गुलाबराव महाराजांनी जगाला आश्चर्यचकित करेल अशी साहित्य निर्मिती केली आहे. जन्माने अंध असले तरी त्यांनी कोणतीही अडचणीवर मात करीत आत्मविश्वासाने उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली. त्यांच्या साहित्य निर्मितीमुळे माधान ही संदेश देणारी भूमी झाली आहे. त्यांच्या जीवनातून अडचणींवर मात करून समाजासाठी ज्ञानाचे भांडार निर्माण होते हे सिद्ध केले आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. आज ज्ञानेश्वरीने ज्ञानाचे भांडार आणि अभ्यासक निर्माण केले आहे. त्याच प्रकारचे अभ्यासक निर्माण करण्याची क्षमता प्रज्ञाचक्षुच्या ज्ञानात निर्माण झाली आहे.
समाजाची भौतिक प्रगती होणे आवश्यक आहे. पण समाज स्वस्थपणे जगण्यासाठी दिशा देण्याचे कार्य ज्ञानामध्ये आहे. यासाठी संतांनी दिलेले ज्ञान जतन करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे ज्ञान जपले पाहिजे. ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञानाचे परिवर्तन झाल्यास यातून समृद्धी निर्माण होते. चांदूरबाजार आणि परिसरामध्ये संत्र्याच्या उत्पन्नातही स्पेन आणि इजराइलच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. ज्ञानाचा उपयोग परिवर्तनामुळे कशा पद्धतीने शक्य झाले आहे, याचे उदाहरण यातून दिसून आलेले आहे. त्यामुळे प्रज्ञाचक्षूंच्या 130 पुस्तकांचे जतन संस्थांनकडून व्हावे. यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करावा. नवीन तंत्रज्ञानाने त्यांचे ज्ञान पिढ्यानपिढ्या समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीला श्री. गडकरी यांनी चांदूरबाजार येथील संत श्री गुलाबराव महाराज संस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले. संस्थांच्या वतीने श्री. गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते पहिला ज्ञानेशकन्या पुरस्कार अमरावती येथील दृष्टीबाधित संघाला प्रदान करण्यात आला. सक्षम च्यावतीने दिव्यांग बांधवांना दृष्टीकाठीचे वाटप करण्यात आले. सक्षमच्या दुसऱ्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
०००००
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मौन श्रद्धांजली अर्पण
अमरावती, दि. ११ (जिमाका) : गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उपस्थित होते. यावेळी गुरुकुंज मोझरी आश्रम परिसरात मान्यवरांसह भव्य जनसमुदयामार्फत स्वयंसंचलित मौन बाळगून शांततेत अत्यंत श्रद्धेय भावनेने मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सामुदायिक प्रार्थना, ध्यान तसेच आरती केली.
खासदार डॉ अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे, गजानन लेवटे, प्रताप अडसड, नवनीत राणा, प्रवीण पोटे-पाटील, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जनार्दन बोथे गुरुजी, पुष्पाताई बोंडे, दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मौन श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम स्थळी तबला, पेटी शंखनाद या पारंपारिक वाद्यांसह सर्वधर्मीयांच्या प्रार्थना सामूहिक रित्या म्हणण्यात आल्या. डॉ. तिवारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवनपट यावेळी कथन केला.
मौन श्रद्धांजली कार्यक्रमासाठी देशभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून देश-विदेशातील नागरिकही उपस्थित होते. पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त येथे मोठी यात्रा भरलेली असून गावागावातून दिंड्या कार्यक्रम स्थळी आल्या होत्या.
00000
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा
अमरावती, ११ : राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांचा १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार श्री. पटेल हे १२ ऑक्टोबर रोजी रायपूर येथे पिक उत्पादन खर्च योजनेतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बांबू लागवड कार्यशाळा आणि बांबू लागवड आढावा बैठकीस उपस्थित राहतील.
00000
शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 11 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 14 ऑक्टोबर ते दि. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment