रा. सू. गवई स्मारकाचे उद्घाटन 30 ऑक्टोबरला नियोजित
उद्घाटनाच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करावीत – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 10 (जिमाका) : दादासाहेब उपाख्य रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन दि. 30 ऑक्टोबर रोजी नियोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने सर्व विभागांनी परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, तसेच वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामे प्राधान्याने करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
रा. सू. गवई स्मारकाच्या उद्घाटनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मुख्य अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी बांधकामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. बांधकाम पूर्ण झालेले असले तरी उद्घाटनाच्या अनुषंगाने कोणतेही काम अपूर्ण राहू नये, तसेच सर्व परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. स्मारकाच्या पाणी पुरवठा, वीज आणि स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, तसेच स्वच्छतेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. स्मारकाच्या प्रवेशद्वारावरून विजेची तार गेल्याने ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत शक्यता पडताळून पाहावी. तसेच संपूर्ण स्मारकामधील वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला असल्याची खात्री करावी.
स्मारकाच्या ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. जोडणीसाठी तातडीने प्रक्रिया करावी. स्मारकाची सुरक्षा ही महत्वाची आहे. यासाठी महापालिकेने सुरक्षा कर्मी नेमावेत. अग्निशमन यंत्रणा महत्वाची असून त्यांचेही ना हरकत प्रमाणपत्र तातडीने घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. स्मारकाच्या निमित्ताने नागरिकांसाठी सुविधा झाली असून अंतर्गत व्यवस्था राखण्यासाठी कंत्राटीतत्त्वावर तीन कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच स्मारकाच्या देखभाल दुरूस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
रा. सू. गवई स्मारकाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी आणि ना हरकत घेण्यात यावी. तसेच उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना श्री. येरेकर यांनी दिल्या.
00000
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी दौरा
अमरावती, दि. 10 (जिमाका): केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि गुरुकुंज मोझरी दौऱ्यावर येत आहे.
दौऱ्यानुसार, केंद्रीय मंत्री श्री. गडकरी हे दुपारी 12.25 वाजता चांदुर बाजार येथील संत श्री गुलाबराव महाराज भक्तीधाम येथे भेट देतील. दुपारी 12.50 वाजता श्री क्षेत्र माधान, ता. चांदूर बाजार येथे 'सक्षम' आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थानतर्फे आयोजित दिव्यांग व्यक्तींच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3.50 वाजता अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळातर्फे आयोजित गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 5.15 वाजता हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रस्थान करतील.
00000
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा
अमरावती, दि. 10 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता मिशन कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इमारत, अमरावती येथे कार्यालयीन कामकाज करतील. दुपारी 4.30 वाजता दर्यापूर विश्रामगृह येथे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी बैठक. दुपारी 5 वाजता दर्यापूर तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट व सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.
00000
शासनमान्य ग्रंथ यादीसाठी प्रकाशित ग्रंथ पाठविण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका): ग्रंथालयांनी खरेदीसाठी मार्गदर्शन ठरणारी ग्रंथ यादी तयार करण्यासाठी जिल्ह्यातील 2024 या वर्षातील प्रकाशित ग्रंथ पाठविण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील शासकीय, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती आणि खरेदीसाठी मार्गदर्शक ठरावी यासाठी ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेली वर्षनिहाय शासनमान्य ग्रंथांची यादी प्रकाशित करण्यात येते. या शासनमान्य ग्रंथ यादीसाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2024 या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत विनामुल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-४०० ००१ यांच्याकडे दि. 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पाठविण्यात यावीत. सन 2024 वर्षातील प्रकाशित ग्रंथ यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, यांनी कळविले आहे.
00000
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे जनतेला आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या जागा निश्चित करण्यासाठीची आरक्षण सोडत सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधीची परिशिष्ट-7 नुसारची सूचना 10 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसिलदार व पंचायत समिती कार्यालये तसेच स्थानिक वृत्तपत्रे व संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या जागांसाठीची आरक्षण सोडत दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे काढण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी 10.30 वाजता धारणी, चिखलदरा, अंजनगांव सुर्जी, चांदुर बाजार, वरुड, तिवसा, अमरावती, धामणगांव रेल्वे आणि नांदगांव खंडेश्वर या पंचायत समित्यांची आरक्षण सोडत संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये घेण्यात येईल. तर, दुपारी ३ वाजता दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, भातकुली आणि चांदुर रेल्वे या पंचायत समित्यांची सोडत संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये काढली जाईल. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या या आरक्षण सोडत कार्यक्रमास ज्या रहिवाशांना उपस्थित राहायचे आहे, त्यांनी वरील नमूद ठिकाणी व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
0000000
उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न
अमरावती, दि. 10 (जिमाका): उष्मालाट जनजागृती या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन एडीआरए इंडिया व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार नितीन खटके, आदित्य खंडारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, जिल्हा साथरोग आरोग्य अधिकारी श्री. अली, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे, क्षेत्रीय अधिकारी संतोष गिरी यावेळी उपस्थित होते.
उष्मालाट उपायोजना जनजागृती या प्रकल्पाबद्दल इमरान माजिद तर अध्ययनाबाबत माहिती श्रीमती ली यांनी दिली. अनिल भटकर यांनी येणारे दिवसांमध्ये उष्माघाताचे वाढते परिणाम व त्यावर उपाययोजना, कार्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज साळुंखे यांनीही उष्माघात या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघना क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रविकिरण मोरे तर आभार श्री. सोविक यांनी मानले.
00000
शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
* नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर अंतिम मुदत
अमरावती, दि. 10 (जिमाका) : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही यासाठी अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी हा कार्यक्रम राहणार आहे.
मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दि. ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नमुना १९ मध्ये आपला अर्ज सादर करावा. यासाठी मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम ३१ (४) नुसार प्रसिद्ध केलेल्या नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात येत आहे. सदर नोटीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व पंचायत समिती, सर्व नगर परिषद कार्यालयांच्या नोटीस बोर्ड आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यासंबंधीचा सर्व तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या amravatidivision.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
00000
कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा
अमरावती, दि. 10 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे मंगळवार, दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मशिदीजवळ, डेपो रोड, अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com
0000000
अमरावती पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाबाबत सोडत 13 ऑक्टोबरला
अमरावती, दि. 10 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत सभा दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या अधिसूचनेनुसार, सभापती पदाच्या आरक्षणाबाबत सदस्य आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
या निर्देशानुसार, आरक्षणाची सोडत घेण्यासाठीची विशेष सभा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे दुपारी 1 वाजता सुरू होईल. जिल्हा प्रशासनाने या सभेला संबंधित सर्व सदस्यांनी आणि इच्छुक व्यक्तींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment