गुणवत्तेची कास धरा, मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकार्य
-उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
*अभिजात भाषा परिषदेला सुरवात
अमरावती, दि. 6 (जिमाका): सुमारे अडीच हजार वर्षांचा इतिहास मराठी भाषेला लाभला आहे. त्यामुळे मराठीत संशोधन होणे आवश्यक आहे. मराठीच्या विकासासाठी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने गुणवत्तेची कास धरावी. यासाठी विद्यापीठाला आवश्यक संपूर्ण सहकार्य देऊ, अशी ग्वाही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या 11 भाषांच्या प्रतिनिधींच्या परिषदेला सुरूवात झाली. यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बाराहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनिष जोशी, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुळकर्णी, मराठी भाषा विभागाचे सहसचिव अभय खांबोरकर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, जगामध्ये आज संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. संशोधनातून पेटंट आणि त्यातून रॉयल्टी मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आपणही यात मागे राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या कालावधीत केलेल्या प्रयत्नांमुळे जागतिक स्टार्टअपमध्ये भारताने अग्रस्थान पटकाविले आहे. जागतिक महासत्ता होण्यासाठी शिक्षण आणि संशोधनावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय आत्मसात करण्यासाठी या अभ्यासक्रमाचे शिक्षण मराठीतून देण्यात येत आहे. गेल्या सत्रात 67 टक्के तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली आहे. मातृभाषेत शिक्षण मिळाल्याने विषय कळण्यास मदत होत असल्यामुळे एका वर्षात तंत्रनिकेतनमधील प्रवेशाची संख्या दुप्पट झाली आहे.
मराठी विद्यापीठाचा विषय शासनाने गंभीरपणे घेतला आहे. आवश्यक तेवढ्या जागा भरण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच विद्यापीठाच्या बांधकामासाठी सर्व परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने आता अत्युच्च दर्जाची शिक्षण देणारी व्यवस्था उभारावी. अभ्यासक्रम शिकविणारे तज्ज्ञ आणि सुसज्ज ग्रंथालय उभारावे. तसेच स्वातंत्र्यानंतर नोंदी ठेवणे कमी झाल्याने स्पष्ट, मुद्देसूद नोंदीसाठी पुढाकार घ्यावा. नोंदीबाबत परिषदेमध्ये मंथन व्हावे. मराठीच्या भविष्यातील वाटचालीत ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे ही परिषद ऐतिहासिक ठरणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
डॉ. आवळगावकर यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या आयोजनामागील भूमिका सांगून मराठी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. श्री. कुळकर्णी यांनी भाषेमध्ये मोठे काम करण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे. अभिजात भाषेच्या संदर्भात पूर्वी केलेले काम आणि भविष्यातील योजनांची याठिकाणी एकत्रित चर्चा होणार असल्याचे सांगितले. श्री. जोशी यांनी परिषदेमधील चर्चेनुसार यूजीसी कार्य करणार असल्याचे सांगितले.
सुरवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.
पहिल्यांदाच भाषिनीचा 11 भाषांमध्ये उपयोग
अभिजात भाषा परिषदेत देशभरातील 11 भाषांचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. त्यांना त्यांच्या भाषेत कळावे, यासाठी भाषिनीचा उपयोग करण्यात येत आहे. एकाचवेळी 11 भाषांमध्ये वक्त्यांच्या भाषणानुसार तात्काळ भाषांतर करण्यात येत आहे. 11 प्रकारचे भाषांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाषिनी हे भारतीय भाषांचे भाषांतर करणारी यंत्रणा आहे. यामुळे वक्ता त्यांच्या मातृभाषेतून सादरीकरण करीत असताना श्रोत्यांना समोरील स्क्रीनवर त्यांच्या भाषेतील भाषांतर वाचण्याची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे उपस्थित सर्वांना वक्त्याचा विषय कळण्यास मदत झाली आहे.
000000
अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची
- मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत
अमरावती, दि. ६ : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील अभिजात भाषेचे महत्त्व अधोरेखित करावे लागणार आहे. त्यामुळे अमरावती येथील पहिली अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे, असे मत मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभिजात मराठी भाषा परिषद आयोजित करण्यात आली आहे . या परिषदेच्या निमित्ताने डॉ. सामंत यांनी भेट दिली. यावेळी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवळगावकर, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, मधुकर जोशी आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. सामंत म्हणाले, परिषदेच्या निमित्ताने देशभरातील विद्वान एकत्रित झालेले आहेत. त्यांच्या ज्ञानाने अभिजात भाषांना नवी दिशा मिळणार आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने 11 अभिजात भाषांचा संवाद होत आहे. अखंड भारतात विविध बोलीभाषा बोलल्या जातात. त्याचे रूपांतर बोलीभाषेत होते. असाच प्रकार कोकणी भाषेबाबत झालेला आहे. प्रत्येक भाषेचा सन्मान व्हावा, मातृभाषा ही अभिमानाची असून ती बोलता आली पाहिजे, भावना कळल्या पाहिजे.
अभिजात भाषा परिषद ही विद्यार्थ्यांसमोर होणे गरजेचे आहे. यातून त्यांना भाषेची ताकद कळली असती. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्ययन केंद्र स्थापन करून मराठी अजरामर झाली आहे. येत्या काळात विविध भाषांमध्ये चांगले साहित्य भाषांतरीत व्हावे, यासाठी अनुवाद समिती स्थापन करण्यात येणार आहे. आज तंजावर सारख्या भागात मराठीचे अस्तित्व आहे. त्यामुळे 400 वर्षानंतरही या ठिकाणी भाषेचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळेच मराठीला अग्रक्रम आहे. तंजावर सारख्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन बांधण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. तंजावर सारखी अस्मिता आपणही उभी केली पाहिजे. अभिजात भाषांचे कार्य अखंडपणे पुढे न्यावे, यासाठी कर्तव्य म्हणून चांगले नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
०००००
विरांगना
राणी दुर्गावती जयंतीदिनी 12 महिलांना कर्जमंजुरी
अमरावती, दि. 6 (जिमाका) : राणी दुर्गावती
जयंतीनिमित्त शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या धारणी शाखेने महिला सक्षमीकरण
योजनेंतर्गत पात्र 12 लाभार्थी महिलांना वैयक्तिक व्यावसायिक कर्ज मंजुरी आदेश परतवाडा
येथील कार्यक्रमात वाटप केले.
आदिवासी
विकास महामंडळाचे संचालक आमदार केवलराम काळे यांनी विरांगना राणी दुर्गावती यांनी अल्प
काळात अनेक योजना, धोरणाची अंमलबजावणी केली. विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.
त्याचप्रमाणे आदिवासी महिलांनी शबरी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन वैयक्तिक विकास
साधावा, हीच खरी प्रेरणा ठरेल, असे मत व्यक्त केले.
सुरवातीला विरांगना राणी दुर्गावती यांच्या
प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात राणी दुर्गावती यांच्या कार्य आणि धोरण, महिलांच्या
आर्थिक सक्षमीकरणावर प्रकाश टाकण्यात आला. शबरी महामंडळाच्या योजनांद्वारे महिलांना
स्वयंरोजगाराच्या संधी, कर्ज वितरणाद्वारे लघु उद्योग, व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय व
सेवाक्षेत्रात महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. यात 12 महिलांना प्रत्येकी दोन लाख
रुपयांचे कर्ज मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले.
शाखा व्यवस्थापक गणेश साखरे यांनी प्रास्ताविकातून
महामंडळाच्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रकल्प समन्वयक सचिन
देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
00000
No comments:
Post a Comment