भाषेला विशेष महत्व आहे, संरक्षण द्या
-डॉ. मनिषा जाधव
अमरावती, दि. 03 (जिमाका) : मातृभाषा ही संवादाचे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. सोबतच जगामध्ये असलेले ज्ञान प्राप्त करण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो, त्यामुळे भाषेला विशेष महत्व आहे, हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या भाषांना प्रत्येक नागरिकांने संरक्षण द्यावे, असे आवाहन मराठीच्या अभ्यासक डॉ. मनिषा जाधव यांनी केले.
जिल्हा नियोजन सभागृहात अभिजात मराठी भाषा दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी आदी उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाल्या, मराठी भाषेचा उगम प्राकृत भाषेतून झाला असून संस्कृतचा ओलावा लाभला आहे. त्यामुळे ती एक सुसंस्कृत भाषा ठरली आहे. दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास या भाषेला लाभला आहे. प्रत्येक कालखंडात उत्तम दर्जाचे मूळ साहित्य निर्माण झाले आहे. भविष्यात भाषेला टिकून राहावयाचे झाल्यास भाषेप्रती आत्मचेतना जागरूक ठेवणे गरजेचे आहे. राज्य कारभारात मराठीला राजभाषेचा दर्जा दिला आहे. यातून कार्यव्यवस्था उभी राहिली आहे.
भाषा तयार होण्यासाठी बोली भाषा महत्वाची आहे. अपभ्रंषामधून मैलागणीक विविध शब्द उगम पावले आहेत. ही शब्द दररोजच्या वापरात आल्याने रूळले आहेत. मराठीला दोन हजाराहून अधिक काळाचा इतिहास राहिला आहे. देवनागरी आणि मोडी भाषेतून असलेल्या या लिपीतून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बहिणाबाई यांनी उत्तम साहित्य निर्माण केले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार मराठीतून चालविला. मातृभाषेतून संकल्पना स्पष्ट झाल्यास जगातील कोणत्याही भाषेतून ज्ञानार्जन करण्यास अडचण येत नसल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, मराठीला समृद्ध वारसा लाभलेला असल्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीत सातत्याने अत्युच्च दर्जाचे साहित्य निर्माण झाले आहे. त्यासोबतच मराठी भाषा ही कालानुरूप प्रवाहित झाली आहे. वाचनसंस्कृती टिकल्यास लेखकांना प्रेरणा मिळणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेतील संशोधन कार्याला अनुदान मिळणार आहे. मराठीचा उगम झालेल्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ आहे. त्यामुळे मराठी भाषेतील सातत्य टिकवून ठेवण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
डॉ. मडावी यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षक अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी आभार मानले.
00000
नोकरी मिळाली, कुटुंबाची चिंता मिटली
*अनुकंपाधारकांनी व्यक्त केल्या भावना
अमरावती, दि. 3 (जिमाका) : शासकीय नोकरीत असलेल्या घरातील कर्त्याचा अचानक मृत्यू झाला. अचानक झालेल्या या आघाताने पूर्ण कुटुंबाला आर्थिक विवंचनेत टाकले. मात्र अनुकंपाधारकांसाठी असलेल्या सोयीमुळे घरातील एकाला नोकरी मिळाली. त्यामुळे आता कुटुंबाची चिंता मिटली आहे, अशा भावना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळालेल्यांनी व्यक्त केल्या आहे.
अमरावतीतील जनैद खानला आईच्या निधनामुळे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली आहे. शासनाने अनुकंपा तत्वावरील नोकरीचे धोरण राबविण्यास सुरवात केली असल्यामुळे त्याला जिल्हाधिकारी कार्यालयातून बोलावणे आहे. त्याला अनुकंपाधारकांनी दाखल करावयाचे कागदपत्रे यांची माहिती देण्यात आली. त्यानंतर दि. 1 ऑक्टोबर रोजी त्याची कागदपत्रे पडताळणी झाली. अवघ्या काही दिवसांत म्हणजेच दि. 4 ऑक्टोबर रोजी त्याला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. आईच्या निधनामुळे कुटुंबियांची जबाबदारी आपल्यावर आली होती. आता नोकरीमुळे भविष्य सुरक्षित झाले असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
प्रणाली दहातोंडे यांचे वडील सामान्य रूग्णालयात कार्यरत होते. त्यांचा 2015 मध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती हालावली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाधारकांकडून पसंतीक्रम घेण्यात आला. त्यानुसार प्रणाली दहातोंडेची नियुक्ती बांधकाम कामगार मंडळात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न मिटला असल्याने प्रणाली दहातोंडे यांनी सांगितले.
अमरावतीतील फॉरेस्ट कॉलनी येथील रहिवासी सुमित वाघाळे यांनी शासनाने तातडीचा उपक्रम म्हणून अनुकंपाधारकांची नियुक्ती करण्याचे स्वागत केले. सुमितचे वडील वन विभागात वनपाल म्हणून कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता. घरातील कर्त्या पुरूषाचा मृत्यू झाल्याने आर्थिक संतुलन बिघडले होते. शासनाने प्रदिर्घ कालावधीनंतर अनुकंपातत्वावरील नियुक्तीला गती दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरवठा निरीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे कुटुंब आणि लहान भावाचा सांभाळ करणे शक्य होणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे नियुक्ती मिळणे शक्य झाले असल्याने सुमित वाघाळे यांनी आभार व्यक्त केले.
मोर्शी येथील वैष्णवी दाभाडे हिचे वडील पोलिस दलात कार्यरत होते. त्यांचा 5 फेब्रुवारी 2017 रोजी मृत्यू झाला. कुटुंबात आई आणि बहिण होती. त्यांचा सांभाळ करणे कठिण काम होते. नोकरीची आवश्यकता असल्याने 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने पसंतीक्रम देण्यासाठी बोलाविले. अनुकंपाधारकांना तातडीने नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रयत्न केले. त्यामुळे आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी वैष्णवी दाभाडे हिने शासनाचे आभार मानले.
000000
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी मुदतवाढ
अमरावती, दि. 03 (जिमाका) : शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी जिल्ह्यातील युवकांना मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुकत प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा होणार आहे. यात जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर कौशल्य सादर करण्याची स्पर्धा होणार आहे.
जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सील, विविध औद्यागिक आस्थापना यांच्या सहकार्याने स्किल कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. सदर स्पर्धेमध्ये 50 क्षेत्रासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2004 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्युटींग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, अॅडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग, इंडस्ट्रीअल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मॅकेट्रॉनिक्स, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वॉटर टेक्नॉलॉजी, डेंटल प्रोस्टेथिक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.
शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेत सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्थांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in यावर दि. 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
000000
अमरावतीत 11 भारतीय अभिजात भाषा परिषद
अमरावती, दि. 03 (जिमाका) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान प्राप्त झाल्याच्या निमित्ताने राज्य शासनातर्फे 6 ते 7 ऑक्टोबर दरम्यान 11 भारतीय अभिजात भाषांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे ही परिषद होणार आहे.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून मराठी भाषा विद्यापीठ आणि मराठी भाषा विभागाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये होणार आहे. परिषदेसाठी 11 भारतीय अभिजात भाषांच्या 55 प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.
परिषदेच्या उद्घाटनाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, केंद्र शासनाचे उच्च शिक्षण सहसचिव मनमोहन कौर, म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थांचे संचालक डॉ. शैलेंद्र मोहन, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल उपस्थित राहणार आहे.
या परिषदेत अभिजात भाषांनी आजवर केलेल्या वाङ्मयीन आणि संशोधनात्मक कार्याविषयी चर्चा होईल. तसेच 11 भारतीय अभिजात भाषांचे भविष्यकालीन ध्येय धोरणाबाबत चिंतन करण्यात येईल. या अभिजात भाषांकडून पुढील पन्नास वर्षांच्या भविष्यकालीन योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. भारतीय भाषांचे मूल्यवर्धित होण्यासाठी ही परिषद अधिक महत्त्वाची ठरणार आहे. परिषदेत निमंत्रित अभिजात भाषा सदस्य आपआपल्या भाषेतूनच विषयाची मांडणी करतील. इतर सदस्यांना त्यांच्या भाषेतून ते कळू शकेल, असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवळगावकर यांनी दिली.
00000
हातभट्टी दारू विरोधात
विशेष मोहीम
अमरावती, दि. 3 (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात हातभट्टी
दारू विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत भरारी पथकाने दि. 2 व 3
ऑक्टोबर रोजी दोन मोठे छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धारवाडा, ता. तिवसा शिवारात दि. २ ऑक्टोबर रोजी वर्धा नदीकाठी हातभट्टी दारू
निर्मिती करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात जितेश रामू राठोड (वय ३९,
रा. जुनी शिदवाडी, तिवसा) या आरोपीकडून तब्बल २९२ लिटर गावठी हातभट्टी दारू आणि ३२८०
किलो मोहा सडवा असा एकूण 1 लाख 55 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोझरी येथे दि. ३ ऑक्टोबर रोजी भरारी पथकाने मोझरी शिवारात आड नदीकाठी कारवाई
केली. यात भीमराव खाटसरे (रा. मोझरी) आणि राजेंद्र पुंडलिकराव मुंढरे (वय ५५, रा. अनकवाडी)
यांच्याकडून ५७ लिटर हातभट्टी दारू आणि २७२५ किलो मोहा सडवा जप्त केला. याची किंमत
७२ हजार रुपये आहे.
या दोन्ही कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने २ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल
जप्त केला. यातील आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४१ नुसार गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत.
ही प्रभारी निरीक्षक
एस.पी. वायाळ, प्रभारी दुय्यम निरीक्षक आकाश जाधव यांच्या नेतृत्वात पार पाडली. या
कारवाईत जवान एस. एस. पेंढारकर, आर.पी. मोकळकर, पी. आर. भोरे, के. एम. मातकर, महिला
जवान व्ही. बी. पारखी, डी. डी. मानकर यांनी चा सहभाग घेतला.
00000
दिव्यांग मुलांसाठी
सोमवारी विशेष निदान शिबिर
अमरावती, दि. 3 (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षा समावेशित
शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांसाठी सोमवार,
दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष दिव्यांगत्व निदान
शिबिर आयोजित करण्यात आले आहे. न्याय समिती, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार
या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात शारीरिक आणि बौद्धिक विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या मुलांची तपासणी
करून त्यांना युनिक डिसअॅबिलिटी आयडी कार्ड वितरित केले जाणार आहे. या कार्डमुळे दिव्यांग
व्यक्तींना विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेता येणार आहे. शिबिरात येण्यापूर्वी
संबंधित बालकाची ऑनलाईन अर्ज भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिरात येताना आधार कार्ड
आणि इतर वैद्यकीय कागदपत्रे सोबत आणावीत. या शिबिरात दिव्यांग मुलांसाठी असलेल्या विविध
शासकीय योजनांची माहिती देखील जाणार आहे.
शिबिरापासून गरजू
आणि पात्र बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित अंगणवाडी सेविका आणि विशेष
शिक्षिकांनी घ्यावी, तसेच या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.
0000
जन्मजात अंध माला होणार महसूल सहायक पदावर रुजू
*आज मिळणार नियुक्ती पत्र
*भारतातील पहिलीच घटना
अमरावती, दि. 3 (जिमाका) : वझर येथील दिव्यांग बेवारस बालगृहातील जन्मजात अंध असलेली माला शंकर पापडकर महसूल सहायक पदावर रुजू होणार आहे. तिला नागपूर येथील कवीवर्य सुरेश भट्ट सभागृहात महसूल सहायक पदाचे नियुक्ती पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
जन्मजात अंध व बेवारस मुलगी जिद्द, परिश्रम आणि सततच्या सरावाने जवळच्या व्यक्तीनी दिलेल्या साथीमुळे शासकीय पदी नियुक्त होत आहे. अशा प्रकारची ही भारतात पहिला घटना असावी. यामुळे मालाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत सापडलेली माला आज महसूल सहायक पदावर पोहचली आहे. माला शंकरबाबा पापळकर यांची ही एक विलक्षण आणि प्रेरणादायी कहाणी आहे.
अंध व बेवारस असलेल्या मालाला अमरावतीच्या वझर येथील दिव्यांग बेवारस बालगृहात आणण्यात आले. जिथे तिच्या जीवनात प्रकाश झाला तो म्हणजे पद्मश्री कर्मयोगी शंकरबाबा पापळकर यांच्यामुळे. त्यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. तिचे नाव 'माला' ठेवले. तिला केवळ आश्रयच नाही, तर ओळखही दिली. शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड आणि शंकरबाबांचा आधाराळे माला शिकत गेली. ब्रेल लिपीतून दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही झाले.
जगण्यातील प्रत्येक पायरीवर मालासाठी कर्मयोगी शंकरबाबा पापळकर यांची साथ होती. अपंगत्वाच्या मर्यादा झुगारून तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१९ पासून तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. यात तिने २०२३ मध्ये एमपीएससी 'ग्रुप सी' मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. जन्मजात अंथ आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातील ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे हा क्षण सुवर्णाक्षरात लिहिला जाणार आहे.
00000
No comments:
Post a Comment