Friday, January 30, 2026

DIO NEWS 30-01-2026

 बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान

*20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि ज्या संस्थांमध्ये ५१ टक्केपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त किंवा सदस्य आहेत, अशा संस्थांसाठी राज्य शासनाकडून मदत दिली जाणार आहे. बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयीसुविधांसाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र संस्थांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागवले आहेत. इच्छुक संस्थांनी प्रस्ताव २० फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहे. यासाठी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आणि नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत असणे आवश्यक आहे. संस्थेच्या विश्वस्त किंवा सदस्यांमध्ये बौद्ध समाजाचे प्रमाण ५१ टक्केपेक्षा जास्त असावे. या योजनेचा लाभ एका संस्थेला पाच वेळाच घेता येणार आहे.

या योजनेंतर्गत प्रामुख्याने स्वतःची इमारत असल्यास इमारतीचे किरकोळ नूतनीकरण व डागडुजी, शुद्ध पेयजल व्यवस्था, प्रसाधनगृह आणि स्वच्छतागृह उभारणी, ग्रंथालय, अभ्यासिका, संगणक कक्ष किंवा रिसर्च सेंटर अद्ययावत करणे, विपश्यना केंद्र किंवा प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण, फर्निचर, जनरेटर, इन्व्हर्टर, सोलर सुविधा आणि सुरक्षा कॅमेरे बसवणे, कार्यशाळा किंवा सभागृहाचे बांधकाम व सुशोभीकरण या सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे.

इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, अल्पसंख्याक कक्ष, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, अमरावती येथे दोन प्रतीत सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000000

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत

अमरावती, दि. 30 (जिमाका) : धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे सन 2025-26 या वर्षासाठी 'पारधी पॅकेज' अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या फक्त पारधी आणि फासे पारधी समाजातील पात्र लाभार्थ्यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पारधी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पाच मुख्य योजनांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यात लाभार्थ्यांना शेळ्यांचा गट घेण्यासाठी अर्थसहाय्य. स्वयंरोजगारासाठी ऑटो रिक्षा खरेदीकरिता मदत, संगणक व झेरॉक्स मशीन खरेदी करून तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य, पारधी समाजातील बचतगटांसाठी ट्रॅक्टर खरेदीची सुविधा, गरजू लाभार्थ्यांना व्यवसायासाठी ई-खटला खरेदीसाठी मदत देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी विविध तालुकानिहाय अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय, धारणी, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यासाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती कार्यालय, मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यासाठी उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध असतील.

प्राप्त अर्जांची संगणकीय यादी तयार करून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पात्र उमेदवारांची निवड 'ईश्वर चिठ्ठी' पद्धतीने केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, दिव्यांग, विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील विकास शाखा किंवा दुरध्वनी क्रमांक 07226-224217 यावर संपर्क साधावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी केले आहे.

00000

सोमवारी जिल्हा लोकशाही दिन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : फेब्रुवारी महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संबंधितांनी व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली

        अमरावती, दि. 30 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

             यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आदरांजली वाहिली.

00000

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-02-2026

  शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर *'आयएफएस', 'आयपीएस' अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अमरावती, दि. 3 (जिमाका) : स्पर्धा प...