Thursday, January 29, 2026

DIO NEWS 29-01-2026







                        जिल्हाधिकारी कार्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

            अमरावती, दि. 29 (जिमाका) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयात शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अजितदादा पवार हे शिस्तीप्रिय होते. त्यांचा वक्तशिरपणा सर्वांच्या परिचयाचा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळून मृतात्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी तातडीने निर्णय घेतला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील आणि प्रशासनातील एक मार्गदर्शक हरपला असल्याचे सांगितले.

             शासनाने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या राजकीय दुखवट्यामुळे कार्यालयातील सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

00000

भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया;

जिल्ह्यात आजपासून ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान

अमरावती, दि. 29 (जिमाका): कुष्ठरोगाविषयी समाजात असलेली भीती, अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर करून रुग्णांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी उद्या, 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात 'स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान' आणि 'कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान' राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून, त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

कुष्ठरोग हा पुरातन काळापासून अस्तित्वात असला, तरी आजही या आजाराबद्दल अनेक भ्रामक कल्पना समाजात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि कुष्ठरुग्णांना भारतीय संविधानाने दिलेल्या 'समानतेच्या अधिकाराची' जाणीव करून देण्यासाठी यंदा ‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

बहुविध औषधोपचार पद्धतीमुळे हा आजार शंभर टक्के बरा होतो. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये यावरील औषध मोफत उपलब्ध आहे. वेळेत उपचार घेतल्यास कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती पूर्णपणे टाळता येते. मात्र, निदानास उशीर झाल्यास रुग्णाच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक प्रगतीवरही परिणाम होतो.

या अभियानामध्ये नियमित सर्वेक्षणासोबतच समाजातील वंचित घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामध्ये वीटभट्टी कामगार, खाणकामगार, कारखान्यातील मजूर, कारागृहातील बंदी, तसेच आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांची विशेष तपासणी केली जाणार आहे. कुष्ठरोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता तातडीने शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा आणि उपचार पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

000000

लाडकी बहीण योजना: पात्र महिलांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी

अमरावती, दि. 29 (जिमाका): राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. ज्या पात्र महिलांनी ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करताना चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा महिलांचे लाभ सध्या तांत्रिक कारणास्तव बंद झाले आहेत. या त्रुटी सुधारण्यासाठी पात्र महिलांनी त्वरित आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले आहे.

या योजनेची प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले असून, 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देऊनही अनेक अर्ज प्रलंबित आहेत. योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्याचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे आणि ती महिला असावी. तसेच, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक नसावा. मात्र, अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना अनावधानाने चुकीची माहिती भरली गेल्यामुळे अनेक पात्र महिला या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. अशा महिलांची यादी आता प्रत्यक्ष पडताळणीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी व ग्रामीण) यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.

ज्या महिलांचा लाभ तांत्रिक कारणास्तव थांबला आहे, त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकेकडे स्वयंघोषणा पत्र भरून द्यावे. अंगणवाडी सेविका या अर्जांची यादी तयार करून ती बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करतील, जेणेकरून अर्जातील चुका दुरुस्त होऊन लाभ पुन्हा सुरू होईल. अधिक माहितीसाठी महिलांनी थेट बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000000

सोमठाणा खुर्द येथील पुनर्वसित ग्रामस्थांना घरमूल्यांकनाचा मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29  (जिमाका): मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत 2013-14 मध्ये पुनर्वसन झालेल्या आकोट वन्यजीव विभागातील मौजे सोमठाणा खुर्द येथील 112 घरमूल्यांकन धारकांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना घरमूल्यांकनाची दोन पट रक्कम देय असून, आवश्यक निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आकोट वन्यजीव विभाग,  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांनी दिली आहे.

मोबदला मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी पुढील कागदपत्रे आकोट वन्यजीव विभाग कार्यालयात सादर करावीत. यामध्ये 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, सुरू असलेल्या बँक खाते पुस्तकाची छायाप्रत, आधारकार्डची छायाप्रत, नमुना 8 ची छायाप्रत (मूळ लाभार्थी मृत असल्यास वारस प्रमाणपत्र व वारसांच्या बँक खात्याची प्रत)  ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थ्यांची सविस्तर यादी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सोमठाणा खुर्द येथील लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000000

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37  (1) व (3) लागू

अमरावती, दि. 12 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37  (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. दि. 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-02-2026

  शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर *'आयएफएस', 'आयपीएस' अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अमरावती, दि. 3 (जिमाका) : स्पर्धा प...