कर्जमाफीची रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 11 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नवीन पीक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या शेतीविषयक खर्चासाठी वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून कर्ज खात्याची आवश्यक कार्यवाही पूर्ण करून नवीन पीक कर्जासाठी अर्ज करावा. पात्रता व बँकेच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनीही त्वरित कार्यवाही करावी असे अशी सूचना श्री. हेडाऊ यांनी केली आहे.
पात्र लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परताव्यांचे वितरण सुरु
अमरावती, दि. 11 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांकरिता आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्पीय तरतूदीचा निधी प्राप्त झाला असून अमरावती जिल्ह्यासह राज्यातील पात्र लाभार्थी आणि उद्योजकांचे प्रलंबित व्याज परताव्यांचे वितरण सुरु करण्यात आले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने व्याज परताव्याची प्रकरणे निकाली काढण्यासाठी वर्ष २०२६-२७ करिता ७५० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली . याअंतर्गत व्याज परताव्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महामंडळाने शासनाकडे ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यानुसार ३ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमीत करुन ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे २१ कोटींच्या व्याज परताव्याची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. उर्वरित पात्र व प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक कार्यवाही सुरु असून लवकरच व्याज परताव्याची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे, अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.
स्वाधार योजनेच्या नुतनीकरणासाठी १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
अमरावती, दि. 11 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सन २०२५-२६ या वर्षात लाभ घेतलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जाचे ऑनलाईन नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी समाज कल्याण विभागाच्या https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण अमरावतीचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
नूतनीकरण अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आणि चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी अर्ज नूतनीकरण केला होता किंवा प्रथम वर्षाकरिता नवीन अर्ज सादर करून लाभ मिळवला होता, ते सर्व विद्यार्थी या नूतनीकरणासाठी पात्र आहेत.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आणि तपासणीसूचीनुसार आवश्यक सर्व कागदपत्रे १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. नूतनीकरण अर्ज वेळेत सादर न केल्यास विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात असे सांगण्यात आले आहे.
आमझरी व खटकली परिसरात पर्यटनसंकुल उभारण्याचे आयुक्त लीना बनसोड निर्देश
ग्रामस्थ व होम-स्टे लाभार्थ्यांशी साधला संवाद
अमरावती, दि. 11 (जिमाका): चिखलदरा तालुक्यातील आमझरी व खटकली या गावात पर्यटन विकासासाठी मोठ्या संधी असून स्थानिक आदिवासी समाजाला नव्या रोजगाराच्या मार्ग उपलब्ध करून देण्याच्या हेतूने येथे पर्यटन संकुल उभरण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्त व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिले.
येथील वनविभागाच्या आमझरी संकुलात आयोजित संवाद बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.या बैठकीला प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, सह आयुक्त दिगंबर चव्हाण, उपायुक्त संतोष ठुबे, उपायुक्त विनिता सोनवणे, उपायुक्त शशिकला अहिरराव, शबरी महामंडळाचे शाखा व्यवस्थापक गणेश साखरे, वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर आणि विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक व पर्यटन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
स्थानिकांनी पारंपरिक व उत्स्फूर्त पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केले आणि आदिवासी बांधवांनी संवाद सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.बैठकीत लीना बनसोड यांनी सांगितले की शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन योजना राबवल्या जात आहेत.आमझरी व खटकली भागातील नैसर्गिक सौंदर्याचे संवर्धन करताना स्थानिक संस्कृती, परंपरा आणि आदिवासी खाद्यपरंपरेला जागतिक पातळीवर ओळख देण्याचे काम आदिवासी विकास विभाग करीत आहे. त्यांनी या परिसरासाठी एक सर्वसमावेशक व आकर्षक टुरिस्ट प्लॅन तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आणि पर्यटकांना भेट देण्यासारख्या स्थळांचे, अनुभवांचे व मार्गनिदर्शनाचा संपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
पर्यटकांना स्थानिक आदिवासी खाद्यसंस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देता यावा, यासाठी पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींचे अधिकृत दस्तऐवजीकरण करणे आणि त्यामुळे स्थानिक महिलांना व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा योजनेचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यावरण रक्षणसोबत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर नियमावली लागू करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. पर्यटकांनी कचरा करू नये यासाठी आचारसंहिता तयार करण्यात येईल व परिसरातील नियमित साफसफाई व्यवस्था राबवली जाईल,असे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची माहिती देऊन पर्यटनाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे.
आदिवासिंची पारंपरिक कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हस्तकला यांद्वारे पर्यटनाला अधिक प्रभावी बनवण्याचे उपक्रम राबवले जातील. पर्यटनविकासात रस्ते व कनेक्टिव्हिटीचे महत्त्व लक्षात घेऊन या भागातील रस्ते विकासावर व संबंधित पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत उपस्थित स्थानिक नागरिक व होम-स्टे लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल सकारात्मकता व्यक्त केली आणि स्थानिक पातळीवर सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. पुढील टप्प्यांबद्दल व अंमलबजावणीच्या तांत्रिक बाबींबाबत संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तपशीलवार नियोजन केले जाईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
00000
नवीन सेवार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचर्णीच्या निराकरणासाठी
जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष शिबिर
अमरावती, दि. 11 (जिमाका): नवीन सेवार्थ प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात 12 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान विशेष तांत्रिक मार्गदर्शन व समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये कामकाज करताना डाटा मायग्रेशन प्रणालीचा वापर तसेच विविध प्रक्रियांच्या अंमलबजावणीशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण वेळेत होऊन कामकाज सुरळीतपणे सुरू राहावे, या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाशी संबंधित तांत्रिक अडचणींची आवश्यक माहिती व तपशील सोबत घेऊन तसेच स्वतःचा लॅपटॉप सोबत घेऊन शिबिरास उपस्थित राहावे.
शिबिरामध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व आवश्यक तांत्रिक सहकार्य उपलब्ध होणार आहे. सर्व संबंधितांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपल्या कार्यालयाशी संबंधित तात्रिक अडचणींचे वेळेत निराकरण करून घ्यावे व नवीन सेवार्य प्रणालीतील कामकाज सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी केले आहे.
0000000
जुनी सेवार्थ प्रणाली २० ऑगस्टपासून बंद होणार;डाटा मायग्रेशन व पायलट बील प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 11 (जिमाका) : लेखा व कोषागारे संचालक कार्यालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जुनी सेवार्थ प्रणाली येत्या २० ऑगस्टला बंद करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी (डीडीओ) आपल्या कार्यालयाशी संबंधित आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
00000
नवीन सेवार्थ प्रणालीच्या प्रभावी व सुरळीत
अंमलबजावणीसाठी संबंधित कार्यालयांची डाटा मायग्रेशन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व डीडीओंनी आपल्या कार्यालयाची डाटा मायग्रेशन प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करून घ्यावी. ही प्रक्रिया करताना कोणतीही तांत्रिक अडचण अथवा समस्या उद्भवल्यास त्या प्रलंबित न ठेवता कोषागार कार्यालयातील संबंधित तज्ज्ञांकडून तत्काळ मार्गदर्शन घेऊन सोडवून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
जुनी सेवार्थ प्रणाली बंद होण्यापूर्वी संबंधित कार्यालयांनी पायलट बील सादर करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये कामकाज सुरळीतपणे सुरू होण्यासाठी आवश्यक ती तयारी करून ठेवावी. २० ऑगस्ट २०२६ नंतर जुनी सेवार्थ प्रणाली उपलब्ध राहणार नसल्याने, आवश्यक असलेली कोणतीही कार्यवाही प्रलंबित राहणार नाही, याची सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. अंतिम मुदतीपूर्वी सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधितानी परस्पर समन्वयाने काम करावे. नवीन सेवार्थ प्रणालीच्या अंमलबजावणी दरम्यान कामकाजात कोणताही व्यत्यय येऊ नये आणि वेतनासह संबंधित आर्थिक कामकाज सुरळीतपणे पार पडावे, यासाठी सर्व संबंधितांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन, वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी केले आहे.
0000000



.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)



No comments:
Post a Comment