जिल्ह्यातील मतदार गणना अर्जांचे 99.98 टक्के वितरण पूर्ण;
डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात
अमरावती, दि.10 (जिमाका) : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) सुरु असून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९९.९८% गणना अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे व डिजिटायझेशनचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यातील एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांपैकी २५ लाख ४५ हजार १८३ मतदारांपर्यंत हे अर्ज पोहोचवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघांपैकी धामणगाव रेल्वे, बडनेरा, दर्यापूर, मोर्शी आणि अचलपूरमध्ये अर्ज वितरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. अमरावती (९९.९९टक्के), मेळघाट (९९.९९ टक्के) आणि तिवसा (९९.८६ टक्के) या मतदारसंघांमध्येही वितरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २१ लाख ८१ हजार ८९ गणना अर्ज गोळा करण्यात आले असून, गोळा झालेल्या सर्व अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे हे जिल्ह्यातील हे एकूण प्रमाण ८५.६८ टक्के आहे. धामणगावरेल्वे मतदार संघात डिजिटायझेशन ८६.८९ टक्के, बडनेरा ८२.६९ टक्के, अमरावती ७८.५८ टक्के, तिवसा ८३.३४ टक्के, दर्यापूर(अ.ज.) ९०.१६ टक्के, मेळघाट (अ.जा.) ८८.०१ टक्के, अचलपूर ८७.६७ टक्के,मोर्शी मतदार संघात ९०.६४% डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे.यानुसार १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेला येत्या १७ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी मतदार याद्यांची प्रारुप प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यानंतर २३ सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. २२ नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
000000
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षण
जिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग
अमरावती, दि.10 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने वकिलांसाठी 7 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे सुरु आहे.
अमरावती जिल्हयातील एकूण 47 वकील प्रशिक्षण घेत असून त्याचा फायदा पक्षकारांना व न्यायालयाला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता प्रथमेश पोपट, न्यायाधीश वरिष्ठ स्तर, बेलापुर, ठाणे सी. एन. ऑडरे यांच्या मार्फत प्रशिक्षणार्थी वकिलांना मध्यस्थीचे 40 तासांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष उदाहरणे, चर्चासत्रे, प्रश्नोत्तर सत्र, तसेच ध्यान, प्रत्यक्ष मध्यस्थी सत्र अनुकरणाचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणात वकिलांना मध्यस्थी प्रक्रियेबाबत सैद्धांतिक तसेच व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. मध्यस्थीची संकल्पना व महत्त्व, मध्यस्थाची भूमिका व जबाबदाऱ्या, पक्षकारांशी प्रभावी संवाद, वाटाघाटीची कौशल्ये, विवाद निराकरणाच्या विविध पद्धती, मध्यस्थीची प्रक्रिया तसेच मध्यस्थीतील व्यावहारिक बाबी याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
तत्पूर्वी, 7 ऑगस्ट रोजी या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष न्या. उज्वला एम. नंदेश्वर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी केले. जिल्हा न्यायाधीश- 1 ए. जी. जोशी,. अमरावती, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, के. आर. राजपुत, अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख आदी उपस्थिती होते.
000000
मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत https://hmasnew.mahait.org संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहात ऑफलाईन स्वरूपात 15 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती जिल्हा आणि विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यालयाने केले आहे.
वसतिगृह प्रवेश वर्ष 2026-27 नुसार 7 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची यादी 22 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ७२१-२६६१२६१ वर संपर्क साधता येणार आहे.
000000
क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृहात विद्यार्थीनींना प्रवेश घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त अमरावती येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतीगृह (125 जयंती) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थीनींना 15 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी उत्तपन्नाचा दाखला,मागील वर्षाची गुणपत्रिकेची छायाप्रत ,जात प्रमाणपत्र व बोनाफाईड सर्टिफीकेटची आवश्यकता असून वसतिगृहात मोफत निवास व भोजन व्यवस्था, स्टेशनरी भत्ता व ड्रेसकोड भत्ता, सहल आदी सुविधा पुरविण्यात येतात.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment