पथ्रोट येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ‘कृषी कर्ज वितरण शिबीर’
संपन्न शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटींचे कृषी कर्ज वितरीत
अमरावती, दि. 18 (जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने सोमवार, 17 ऑगस्ट 2026 रोजी अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे ‘कृषी कर्ज वितरण शिबीर’ आयोजित करण्यात आले या शिबिरात शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे वितरण करण्यात आले. शिबिराला अचलपूर व अंजनगाव तालुक्यातील शेतकरी तसेच विविध बचत गटांशी संबंधित सुमारे 800 महिला सहभागी झाल्या.
पथ्रोट येथील प्रसन्न लॉनवर आयोजित या कार्यक्रमात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक पुरुषोत्तम मीणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पंचाले होत्या.अचलपूरच्या गटविकास अधिकारी कल्पना जायभाये, कोमल तायडे तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुनील पाण्डेय यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शेतकरी व बचत गटांच्या महिलांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, अशा प्रकारच्या आउटरीच कॅम्पच्या माध्यमातून बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले.
या शिबिरात शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे वितरण करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होऊन त्यांच्या कृषीविषयक उपक्रमांना चालना मिळणार आहे. अचलपूर व अंजनगाव तालुक्यातील शेतकरी तसेच विविध बचत गटांशी संबंधित सुमारे 800 महिला या शिबिरासाठी उपस्थित होत्या. शेतकरी व महिला बचत गटांना बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या विविध कृषी कर्ज योजना, वित्तीय सेवा तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांची माहिती देण्यात आली.
सुनील पाण्डेय यांनी प्रास्ताविकात सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच शेतकरी व बचत गटांना बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन निलेश वाघमारे यांनी केले,अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी तर आभार मानले. शेतकरी, बचत गटांच्या महिला, बँक अधिकारी व विविध विभागांच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे हे शिबिर यशस्वी ठरले.
000000
अमरावतीचे जागतिक तिरंदाज यशदीप भोगे यांना राज्य शासनाकडून 52 लाखांचा निधी
मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5 लाखांचा निधी
आशियाई स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पारितोषिक निधी मंजूर
अमरावती, दि. 18 ( जिमाका) : शहरातील प्रसिद्ध जागतिक तिरंदाज यशदीप संजय भोगे यांच्या आशियाई तिरंजादी अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदकाची दखल घेत त्यांच्या या कामगिरीसाठी राज्य शासनाने 52 लाख 50 हजारांचा पारितोषिक निधी मंजूर केला आहे. त्यांचे मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5 लाख 25 हजरांचा पारितोषिक निधी आजच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला आहे.
ढाका (बांग्लादेश) येथे नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या आशियाई तिरंजादी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष रिकर्व्ह सांघिक प्रकारात यशदीप भोगे, अतनु दास आणि राहुल या भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. भारताचे हे 18 वर्षांतील पहिले आशियाई सांघिक सुवर्णपदक ठरले. या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेत गौरव वाढविणाऱ्या महाराष्ट्रातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याच्या योजनेंतर्गत आज यशदीप भोगे व मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांना पारितोषिक निधी मंजूर केला आहे.
धनुविर्द्या, पॅरा बॅडमिंटन, शूटींग, स्क्वॉश, क्रिकेट आणि पॅरा ॲथेलिटीक्स प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्रातील पदक प्राप्त 15 खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना (15) एकूण 19 कोटी 41 लाख 50 हजारांचा निधी रोख रक्कम पारितोषिक म्हणून मंजूर केला असून क्रीडा विभागाने तसा शासन निर्णय आज निर्गमीत केला आहे. खेळाडूंच्या यादीत प्रसिद्ध क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे , पॅरा ॲथेलिट्स दीलीप गावित यांचा समावेश आहे.
00000
जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय लोकअदालत'
प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन
अमरावती, दि. 18 (विमाका): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, शनिवार 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात दाखल असलेली आणि दाखलपूर्व (प्री- लिटीगेशन)प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत.
या लोकअदालतीत पक्षकारांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. तसेच, यामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचा अंतिम निकाल त्याच दिवशी घेण्यात येणार आहे. यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.
नागरिकांनी आपले तडजोडपात्र प्रलंबित खटले ‘राष्ट्रीय लोकअदालती’ मध्ये ठेवून सामंजस्याने मिटवण्यासाठी संबंधित न्यायालयात त्वरित अर्ज करण्याचे आवाहन, अमरावती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर आणि सचिव संजय सहारे यांनी केले आहे. तसेच, दाखलपूर्व प्रकरणांबाबत नागरिकांनी आपल्या नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयाशी संपर्क साधावा आणि 12 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित 'राष्ट्रीय लोकअदालती'चा लाभ घ्यावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिक्षकांनी कळविले आहे.
००००
निवृत्तीवेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी शनिवारी विशेष मोहीम
अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी जीवन प्रमाणपत्र काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या सोयीसाठी शनिवार, दि. 22 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग योजना, तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना वर्षातून एकदा 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाने 'बेनीफिशरी सत्यापन ॲप' विकसित केले असून, अँड्रॉइड मोबाईलवरून लाभार्थी मोफत डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र काढू शकतात. याबाबत तहसिल कार्यालयात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 18 ऑगस्ट 2026 पर्यंत 3 लाख 55 हजार 484 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 3 हजार 706 लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला सादर केला आहे. अद्यापही 1 लाख 51 हजार 778 लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र काढणे बाकी आहे. तहसील कार्यालय, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत संगणक चालक यांच्यामार्फत हे प्रमाणपत्र मोफत काढून दिले जात आहे. तसेच सेतू व आपले सरकार केंद्रातून कमाल 50 रुपये देऊनही प्रमाणपत्र काढता येईल. वेळेत प्रमाणपत्र जमा न केल्यास डीबीटीद्वारे मिळणारे आर्थिक सहाय्य थांबण्याची शक्यता आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्वरित काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
00000
जलसंवर्धन जनजागृतीसाठी शुक्रवारी ‘महा वॉकेथॉन’अमरावती, दि. 18 (जिमाका) : मृद व जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित्त शुक्रवार, दि. 21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून या रॅलीला सुरवात होणार आहे.
पाण्याचे महत्त्व, जलसंधारण, मृद्संधारण तसेच भविष्यातील पाणी सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 9.30 यावेळेत ही रॅली काढण्यात येणार आहे. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पंचवटी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय, सिंचन सेवा भवन, या मार्गाने रॅली निघून श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येईल.
जलसंधारणाच्या चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी मृद व जलसंधारण विभागाचे अभियंता सुनिल जाधव यांनी केले आहे.
00000



No comments:
Post a Comment