शासकीय विभागीय ग्रंथालयात ‘ग्रंथपाल दिन’साजरा
अमरावती, दि.12 (जिमाका) : भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त शासकीय विभागीय ग्रंथालयात आज ‘ग्रंथपाल दिन’ साजरा करण्यात आला.
ग्रंथपाल दिनाच्या औचित्याने विभागीय ग्रंथालयात ग्रंथालय शास्त्राशी संबंधित विविध पुस्तक व ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय विभागीय ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ.राजेश पाटील यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रंथापाल दिनाच्या औचित्याने ग्रंथालय शास्त्राची पाच सुत्रे आणि ग्रंथ व ग्रंथालयाच्या मानवी जीवनातील महत्वावर यावेळी प्रातिनिधीकपणे विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले व श्री.भुयार आणि डॉ. पाटील यांनीही विचार मांडले. ग्रंथालयातील समृद्ध ज्ञान भंडाराचा उपयोग करून स्वत:ला समृध्द करून एक चांगला विद्यार्थी बनण्याचा उपस्थितांनी यावेळी संकल्प घेतला.
00000
18 ऑगस्ट रोजी "पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा"
थेट मुलाखतीद्वारे बँकेमध्ये प्रशिक्षणाची संधी
अमरावती, दि. 12 (जिमाका) : संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विद्यार्थी विकास विभाग,कौशल्य विकास विभागीय आयुक्तालय अमरावती आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी निवडीसाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन अमरावती विद्यापीठ परिसर येथे 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात आदित्य अनधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., अभिनंदन को-ऑपरेटिव्ह बँक लि, जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि., महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स प्रा. लि., क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि. आणि श्रीराम फायनान्स लि अमरावती या कंपनी व बँकांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता उपस्थित सुशिक्षित तरुणांची मुलाखत घेऊन निवड करणार आहेत. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरी व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगाराची ही उत्तम संधी असून जास्तीत-जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. उमेदवारांना कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066/7620 560 125/898341 9799/8446158 297 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे सांगण्यात आले आहे.
00000
‘अमृत संवाद सेतु’ उपक्रमांतर्गत महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची
तहसील कार्यालयाला अभ्यास भेट
अमरावती, दि.12 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या ‘अमृत संवाद सेतु’ उपक्रमांतर्गत महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तहसील कार्यालय, अमरावती येथे भेट देऊन प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती जाणून घेतली.
या अभ्यास भेटी दरम्यान नायब तहसीलदार अशोक कालीवकर यांनी विद्यार्थिनींना तहसील कार्यालयातील विविध विभागांचे कार्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा तसेच विविध प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय दाखले व कागदपत्रांची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली.
शासकीय कार्यालयाची कार्यपद्धती,नागरिकांनी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे, शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच प्रशासनाशी प्रभावी संवाद याबाबत विद्यार्थिनींनी प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. श्री. कालीवकर यांनी ‘अमृत संवाद सेतु’ उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थिनींनी प्रशासन समजून घेण्याबरोबरच जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास अमृतचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश कथलकर तसेच महिला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शर्मिला देशमुख, प्रा. डॉ. गोपाल घुमटकर यांची उपस्थिती होती.
‘अमृत संवाद सेतु’च्या माध्यमातून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यातील संवादाची दरी कमी करून प्रशासनाची समज, नागरिकत्वाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तहसील अमरावतीला दिलेली ही भेट विद्यार्थिनींसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली.
००००
स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहात अर्ज करणे बंधनकारक; १५ सप्टेंबर अर्जाची अंतिम मुदत
अमरावती, दि.12 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये समाज कल्याण विभागाने महत्त्वाचा बदल केला असून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पात्र विद्यार्थ्यांना आता प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
विद्यार्थ्यांना https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यासच विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना स्वाधार योजनेचा तसेच शासकीय वस्तीगृह योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे भविष्यात कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज नोंदवावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आर.व्ही. जाधवर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती. तसेच ई-मेल आयडी: speldswo_amt@rediffmail.com
दू.क्र. 0721-2661261 वर संपर्क साधता येणार आहे.
०००००
'रानभाजी महोत्सवा'चे आज आयोजन ; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अमरावती, दि. 12 ( जिमाका): मानवी आरोग्यामध्ये रानभाज्यांचे असलेले महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी बळीराजा सभागृह, कृषी संकुल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विद्यापीठ रोड येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रानभाज्या जंगलात आणि शेताच्या बांधावर नैसर्गिकरित्या उगवतात. रानपालेभाज्या, फळभाज्या आणि कंदभाज्यांमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात.या भाज्यांवर कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांची किंवा बुरशीनाशकांची फवारणी केली जात नाही.
या महोत्सवात रानभाज्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे संवर्धन आणि विविध पाककृतींची (रेसिपी) सचित्र माहिती दिली जाणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांच्या आरोग्यदायी फायद्यांची माहिती देणे आणि रानभाज्यांसाठी थेट विक्री व्यवस्था (मार्केट चेन) निर्माण करून शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळवून देणे हा या महोत्सव आयोजनामागील उद्देश असल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांनी सांगितले आहे.
सन 2020-21 पासून दरवर्षी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हा रानभाजी महोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी अमरावती तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)




No comments:
Post a Comment