स्वातंत्र्य दिनी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन
अमरावती, दि. 13 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता हा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.
स्वातंत्र्यदिन समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
0000000
मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा
अमरावती, दि. 13 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा शुक्रवार, दि. 14 आणि शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि मुक्काम करतील.
शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता अमरावती येथील जिल्हा परिषद मुलींची माध्यमिक शाळा येथे देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत व संचलन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार मालेगाव (जि. नाशिक) कडे प्रयाण करतील.
00000
३ लाख ३० हजार वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध
यादीतील सुधारणेसाठी बीएलओशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि.13 (जिमाका): विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात जिल्ह्यातील ३ लाख ३० हजार ४०१ मतदार वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावाची यादी amravati.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वगळलेल्या मतदारांच्या यादीत नाव असल्यास तातडीने बीएलओंशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गणना अर्जांचे वितरण व डिजिटायझेशनचे काम सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्रणालीवर ११ ऑगस्ट २०२६ रोजी ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. एसआयआर अंतर्गत जिल्ह्यातील २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांना गणनापत्रक वाटप करण्यात आले. त्यानुसार १ लाख ८ हजार १०९ मयत मतदार, १५ हजार ३०७ गैरहजर मतदार, १ लाख ५३ हजार ८३३ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, १ हजार २ इतर मतदार आणि ५२ हजार १५० यापूर्वीच नोंदणी झालेले मतदार मतदारयादीतून वगळण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्व नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी यादीचे अवलोकन करावे. पात्र मतदाराचे नाव पत्ता सापडला नसल्यास किंवा 'अनकलेक्टेड' वर्गवारीमध्ये समाविष्ट झाले असल्यास अथवा त्यांनी गणनापत्रक जमा केले नसल्यास, त्यांनी त्वरित संबंधित बीएलओशी संपर्क साधून गणनापत्रकात अचूक माहितीसह भरावी, तसेच गणना पत्रक जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
00000000
15 ते 21 ऑगस्टदरम्यान 'जलसंधारण सप्ताह'; विविध उपक्रमांचे आयोजन
21 ऑगस्टला 'वॉक फॉर वॉटर' वॉकेथॉनचे आयोजन ;
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जलसंधारणावर आधारित सर्वोत्कृष्ट 'रील्स' बनवणाऱ्यांना
25 हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके
अमरावती, दि.13 (जिमाका): जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ऑगस्ट रोजी ‘वॉक फॉर वॉटर -वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी मोठया संख्येत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. युवा पिढीच्या कल्पकतेला मंच उपलब्ध करून देत जलसंधारणावर आधारीत रील्ससाठी आकर्षक पारितोषिकही प्रदान करण्यात येणार आहेत.
मृद व जलसंधारण विभागामार्फत संपूर्ण राज्यात 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत 'जलसंधारण सप्ताह' राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील आयोजनाच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात जलसंधारण सप्ताह अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांची घोषणाही केली. या अंतर्गत ‘पाणी बचत’ आणि ‘जलसंधारणाचा व्यापक संदेश देण्या’साठी 21 ऑगस्ट रोजी 'वॉक फॉर वॉटर' ही विशेष वॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
युवा पिढीला या अभियानात जोडण्यासाठी आणि जलसंधारणाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया 'रील्स स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. जलसंधारणावर आधारित सर्वोत्कृष्ट रील्स तयार करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे 25 हजारांचे प्रथम पारितोषिक, 15 हजारांचे द्वितीय तर 10 हजारांचे तृतिय पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार असल्याचे श्री. येरेकर यांनी सांगितले.
जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवड, श्रमदान, जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये व वॉकेथॉनमध्ये हिरिरीने सहभागी होऊन जलसंधारण सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन श्री. येरेकर यांनी केले आहे.
महिला अधिकाऱ्यांसाठी 2 सप्टेंबरला ‘वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन’कार्यशाळेचे आयोजन
अमरावती, दि. 13 (जिमाका): जिल्ह्यातील गट 'अ' आणि गट 'ब' संवर्गातील महिला अधिकाऱ्यांसाठी 'वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन' विषयावर 2 सप्टेंबर 2026 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या निर्देशानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सर्व शासकीय कार्यालयांचे जिल्हा प्रमुख व विभागीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्त गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवंर्गातील महिला अधिकाऱ्यांचे नामनिर्देशन करावे असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक श्यामकांत मस्के यांनी केले आहे.
ही कार्यशाळा बुधवार 2 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेच्या योग्य नियोजनासाठी उपस्थितांची नावनोंदणी https://forms.gle/
000000
उत्कृष्ट ग्रंथालय आणि ‘ग्रंथमित्र’ पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि.13 (जिमाका): राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ आणि ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’- सन २०२५-२६ साठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते आणि सेवकांनी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, जनतेला दर्जेदार ग्रंथालयीन सेवा मिळाव्यात आणि वाचन संस्कृतीला अधिक प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी दिले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार हा राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासनमान्य ग्रंथालयांना त्यांच्या वर्गांनुसार (अ, ब, क, ड) रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरवले जाते. 'अ' वर्ग ग्रंथालयास रुपये १ लाख, 'ब' वर्ग ग्रंथालयास रुपये ७५ हजार, 'क' वर्ग ग्रंथालयास रुपये ५० हजार आणि 'ड' वर्ग ग्रंथालयास रुपये २५ हजारांची रोख रक्कम प्रदान करण्यात येते.
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार हा भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार असून एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना पुरस्कार स्वरूप प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येते. राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये २५ हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येते.
इच्छुकांनी आपले विहित नमुन्यातील संपूर्ण प्रस्ताव आवश्यक सर्व कागदपत्रांसह तीन प्रतीत आपल्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करता येणार आहे.
000000
सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 17 ऑगस्ट रोजी प्रथोट येथे
‘कृषी कर्ज वितरण शिबीरा’ चे आयोजन
अमरावती, दि.13 (जिमाका): शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बँकिंग सुविधा त्यांच्या दारी पोहचविण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील प्रसन्न लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे.
शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कृषी कर्ज योजना, बँकिंग सुविधा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने बँकच्या राष्ट्रव्यापी मेगा कृषि आउटरीच कॅम्पचा हा भाग आहे. या एकदिवशीय शिबीरामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज, कृषी मुदत कर्ज, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय तसेच इतर कृषी व ग्रामीण कर्ज योजनांबाबत बँकेच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालय मुंबई उप महाप्रबंधक पुरुषोत्तम मीणा अमरावतीचे क्षेत्रीय प्रबंधक सुनील पाण्डेय मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात पात्र शेतकऱ्यांकडून कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील आणि प्रलंबित कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यात येईल तसेच विविध बँकिंग व डिजिटल बँकिंग सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.याशिवाय शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकरी, कृषी उद्योजक, महिला बचत गट, एफपीओ तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी आले आहे.
००००००







No comments:
Post a Comment