Friday, August 14, 2026

DIO NEWS AMRAVATI 14.8.2026


                                                     जिल्हा नियोजनचा निधी प्रत्यक्ष खर्च करावा

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि. 14 (जिमाका): जिल्हा नियोजनचा निधी यंत्रणांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा निधी प्रत्यक्ष कामावर खर्च करावा. यानंतरच्या आढाव्यामध्ये कामावरील प्रत्यक्ष खर्च किती झाला याबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

जिल्हा नियेाजन भवनात जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधववर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायळ आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, प्रत्येक यंत्रणांनी शासनाच्या निर्देशानुसार एमएचयुआयडी तयार करावा. यात कार्यालयांची मालमत्ता नोंदविण्यात यावी. त्यानंतरच यावर्षीचे निधी मागणी प्रस्ताव आणि प्रशासकीय मान्यता सादर कराव्यात. यामुळे कामांची दुबार नोंदणी होणार नाही, तसेच मालमत्तेवर आतापर्यंत झालेल्या खर्चाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच कार्यालयांची त्यांची बँक खाती सार्वजनिक बँकेत उघडावे. बँकखाते शासकीय बँकेत असल्याचे हमीपत्र सादर करावे.

 

जिल्हा नियोजनचा निधी खर्च होण्यासाठी यंत्रणांनी त्यांची प्रस्ताव 15 सप्टेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावीत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाचे प्रमाण वाटप केले आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क ठेऊन त्यांनी सूचविलेल्या कामांचा समावेश करावा. गेल्या वर्षी एक टक्के रक्कम वृक्षारोपणासाठी राखीव ठेवण्यात आला. नवीन बांधकामाच्या परिसरात वृक्षारोपण करणे आवश्यक आहे, त्यामुळे वृक्षारोपण होण्यासाठी काळजी घ्यावी. त्यासोबतच यंत्रणांनी मागणी केल्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा निधी खर्च करण्याची तसेच कामे गुणवत्तापूर्वक करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.

 

आकांक्षित तालुक्यांमध्ये जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे चिखलदरा आणि धारणी तालुक्याने प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटविला आहे. सर्व यंत्रणांनी यात योगदान दिल्याने जिल्ह्याने यश मिळविले आहे. यात आणखी सुधारणा करून देशात पहिल्या दहामध्ये स्थान पटकावावे, यासाठी प्रयत्न करावे, असे श्री. येरेकर आवाहन केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.8.2026

                                                                   जिल्हा नियोजनचा निधी प्रत्यक्ष खर्च करावा -जिल्हाधिकारी आशिष येरेकर   अमर...