Tuesday, August 18, 2026

अमरावतीचे जागतिक तिरंदाज यशदीप भोगे यांना राज्य शासनाकडून 52 लाखांचा निधी


 

अमरावतीचे जागतिक तिरंदाज यशदीप भोगे यांना राज्य शासनाकडून 52 लाखांचा निधी

मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5 लाखांचा निधी

आशियाई स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पारितोषिक निधी मंजूर

 

अमरावती, दि.18 ( जिमाका) : शहरातील प्रसिद्ध जागतिक तिरंदाज यशदीप संजय भोगे यांच्या आशियाई तिरंजादी अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदकाची दखल घेत त्यांच्या या कामगिरीसाठी राज्य शासनाने 52 लाख 50 हजारांचा पारितोषिक निधी मंजूर केला आहे. त्यांचे मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5 लाख 25 हजरांचा पारितोषिक निधी आजच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला आहे.

 

ढाका (बांग्लादेश) येथे नोव्हेंबर 2025 मध्ये  झालेल्या आशियाई तिरंजादी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष रिकर्व्ह सांघिक प्रकारात  यशदीप भोगे, अतनु दास आणि राहुल या भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. भारताचे हे 18 वर्षांतील पहिले आशियाई सांघिक सुवर्णपदक ठरले. या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेत गौरव  वाढविणाऱ्या महाराष्ट्रातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याच्या योजनेंतर्गत आज यशदीप भोगे व मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांना पारितोषिक निधी मंजूर केला आहे.

 

धनुविर्द्या, पॅरा बॅडमिंटन, शूटींग, स्क्वॉश, क्रिकेट आणि पॅरा ॲथेलिटीक्स प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्रातील पदक प्राप्त 15 खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना  (15) एकूण 19 कोटी 41 लाख 50 हजारांचा निधी रोख रक्कम पारितोषिक म्हणून मंजूर केला असून  क्रीडा विभागाने तसा शासन निर्णय आज निर्गमीत केला आहे.  खेळाडूंच्या यादीत प्रसिद्ध  क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे , पॅरा ॲथेलिट्स दीलीप गावित यांचा समावेश आहे.

                                                          

00000

 

No comments:

Post a Comment

जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या 'मृद व जलसंधारण विभागा'तर्फे आयोजित केलेल्या भव्य 'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon) मध्ये सहभागी होण्याचं अभिनेते उदय नेने यांचं तुम्हाला खास आवाहन !

  जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या 'मृद व जलसंधारण विभागा'तर्फे आयोजित केलेल्या भव्य 'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon)...