Thursday, August 27, 2026

DIO NEWS AMRAVATI 27.8.2026


                        शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अक्षय ऊर्जा दिन’ उत्साहात साजरा

 

अक्षय ऊर्जा संदेशासाठी विविध स्पर्धा, जनजागृती रॅली व ऊर्जा संवर्धनाची शपथ

 

अमरावती, दि. 27 (जिमाका)  : विद्यार्थ्यांमध्ये अक्षय ऊर्जेचे महत्त्व, ऊर्जा संवर्धन, पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाबाबत जागृती निर्माणकरण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (इएसए) आणि विद्युत अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात ‘अक्षय ऊर्जा दिन’ साजरा  झाला.

 

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, लघुचित्रफीत निर्मिती स्पर्धा आणि पोस्टर निर्मिती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर आपले ज्ञान, कल्पकता व सर्जनशीलता सादर केली. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रवीण कुमार वानखेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाढती ऊर्जेची गरज, पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील वाढता ताण, अक्षय ऊर्जेची भविष्यातील भूमिका तसेच या क्षेत्रातील रोजगार, संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकतेच्या विविध संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले, विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. एम. व्ही. जपे, प्राध्यापक समन्वयक डॉ. पी. पी. बेडेकर आदी  यावेळी उपस्थित होते.

 

महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देत अक्षय ऊर्जेचा अधिकाधिक वापर, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली तसेच विविध विभागांमध्ये जनजागृतीपर पोस्टर्स लावून ऊर्जा बचतीचा आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराचा संदेश दिला.

000000

1 सप्टेंबर रोजी ‘डाक अदालत’

 

 

सहा आठवडयात समस्येचे निराकरण न झालेल्या तक्रारी मांडता येणार

 

ख्‍

अमरावती, दि.27 (जिमाका) : अमरावती विभागातील स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु रजिस्टर पार्सल,बचत बँक व मनीऑर्डर आदी सहा आठवडयात निराकरण न झालेल्या तक्रांरींच्या समाधानासाठी येत्या 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती यांच्या कार्यालयात  सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

सहा आठवडयात निराकरण न झालेल्या व समाधानकारक उत्तर नमिळालेल्या तक्रारींची डाक अदालतीत दखल घेण्यात येणार आहे. या अदालतीत अर्ज सादर करताना तक्रारीचा सर्व तपशील, तक्रारीची  तारिख, ज्या अधिकाऱ्यांना तक्रार पाठविली त्यांचे नाव व हुद्दा आदींचा उल्लेख असावा. प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती-444602 या पत्त्यावर 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज पाठविण्यात यावे. वेळेत प्राप्त अर्जांचा विचार डाक अदालतील केला जाईल, असे प्रवर अधीक्ष डाकघर यांनी कळविले आहे.

000000








दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार

        -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्‍यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

 

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते.

 

श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली.

00000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 27.8.2026

                         शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अक्षय ऊर्जा दिन’ उत्साहात साजरा   अक्षय ऊर्जा संदेशासाठी विविध स्पर्धा, जनजागृती...