देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे-
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात केले आवाहन
40 कोटीतून मेळघाटातील दुर्गम भागातील 22 गावांमध्ये वीज पोचली
अमरावती, दि. 21 ( जिमाका): महाराष्ट्र व देशातील अभियंत्याची देशाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका राहिली आहे. आता 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. अंधारात राहणाऱ्या मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागात अभियंत्यांच्या मेहनतीमुळे वीज पोचली असून अंतिम 22 गावांमध्ये 40 कोटी निधीतून सोलर लाईन टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील अभियंता भवनात दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अमरावती सेंटरच्या वतीने आयोजित '41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात' ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे आणि प्रवीण तायडे, दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कोठारी आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री .बावनकुळे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत अभियंत्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र व देशाच्या उर्जा क्षेत्र विकासातही अभियंत्यांनी महत्वाची भूमिका वठविली आहे. दीर्घकाळ अंधारात असलेल्या एलिफंटा येथील ऐतिहासिक घारापुरी लेण्यांमध्ये 7 किमीच्या समुद्रातून केबल प्लेट टाकून राज्य शासनाच्या महावितरण आणि पारेषण कंपन्यांच्या अभियंत्यांनी अभूतपूर्व कार्य केले आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना प्रांरभिक अंमलबजवणी काळात अभियंत्यांच्या योगदानामुळे मिळालेल्या यशावर त्यांनी प्रकाश टाकला.
मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागातील अंधारात राहणाऱ्या 300 गांवामध्ये वीज पोचविण्यात अभियंत्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.यातील शेवटच्या 22 गावांमध्ये 40 कोटींच्या निधीतून सोलर लाईनच्या माध्यमातून वीज पोचविण्योच शिवधनुष्यही अभियंत्यांनी उचलल्याचे त्यांनी सांगितले. सौर पंपाद्वारे वीज उपलब्ध करून देण्यात महारष्ट्राने देशात अग्रस्थान मिळविले आहे व त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. अभियंत्यांनी विकसित भारताचे लक्ष पूर्ण करण्यातही महत्वाचे योगदान द्यावे असेही ते म्हणाले.
विद्युत क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे संचालक राजेंद्र पवार, एनआयटी इटानगरचे (अरुणाचल प्रदेश) संचालक डॉ. मोहन आवारे आणि मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रताप पवार या अभियंत्यांचा इमिनंट इंजिनियर पुरस्काराने तर डॉ एस. हेमवती, डॉ.एस.जयंती आणि प्रियम जैन या अभियंत्यांचा यंग इंजिनिअर पुरस्काराने गौरव करण्यात आला. तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून इंजिनियर फिटनेस सेंटरचे उद्घाटन झाले. दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे संयोजक आनंद जवंजाळ यांनी प्रास्ताविक केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता व हरित तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी देशात विद्युत निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्याच्या उद्देशाने या दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
०००००००
शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती, दि. 21 (जिमाका) : ईद-ए-मिलाद,नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी, दहीहंडी, कावड यात्रा व इतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून सदर आदेश दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत मेळावे, मिरवणुका आयोजित करण्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लेखी परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी करण्यात आली आहे. शासकीय- निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, अंत्ययात्रा, शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना हे आदेश लागू राहणार नाहीत. या आदेशाचा भंग करणाऱ्यां विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्तालयाने कळविले आहे.
000000
‘महा वॉकेथॉन’मध्ये युवकांचा उत्साहात सहभाग
*71 हजार रूपयांच्या बक्षीसाचे लकी ड्रॉद्वारे वितरण
अमरावती, दि. 21 (जिमाका) : नागरिकांमध्ये जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आज शहरात ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’ उपक्रम पार पडला. सकाळी शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र येत युवकांनी वॉकेथॉनमध्ये उत्साहात सहभाग घेतला. यावेळी लकी ड्रॉद्वारे दहा सहभागींना पारितोषिके देण्यात आली.
जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश वॉकेथॉनमधून देण्यात आला. या वॉकेथॉनला श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून सुरुवात झाली. विभागीय आयुक्त नयना गुंडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हषवर्धन देशमुख यांनी वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधिक्षक अभियंता दिलीप निपाने, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, श्री. पाटील, जलसंधारणाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, श्रीकांत उमप, सोनाली काकडे, मुख्याधिकारी विकास खंडारे, शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य गावंडे आदी उपस्थित होते. सुरवातीला विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आली. तसेच उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली.
पंचवटी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सिंचन भवन या मार्गे वॉकेथॉन शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर पाहोचली. याठिकाणी वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला, तसेच वॉकेथॉनमध्ये सहभागींना पारितोषिके वितरीत करण्यात आली. यात प्रथम तनुजा मेश्राम, द्वितीय कस्तुरी बहुरूपी, तृतीय आयुष मुंढे, तर राजू मुंढे, अंजू कासदेकर, आचल वानखडे, विंजोथ केनॉय, खुशी नवखार, प्रचिती पाटील, अविनाश साऊरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
या उपक्रमात प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सहभागींसाठी महावॉकेथॉन झुंबाचे आयोजन करण्यात आले.
0000000
युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
मेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी
अमरावती, दि. 21 (जिमाका) : युवा पिढीला कृत्रिम बुद्धीमत्ता आधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध कौशल्य आत्मसात करता यावे तसेच त्यांना गती असणाऱ्या क्षेत्रात पुढे घेवून जाण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. मेळघाट महोत्सवात युवाकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवराष्ट्र युथ फाऊंडेशनच्या वतीने येथील सायन्स कोर मैदानावर आयोजित तीन दिवशीय ‘अमरावती युवा महोत्सवा’चे आज उद्घाटन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे आणि प्रवीण तायडे, नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील, ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, युवा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींची प्रतिभा, सर्जनशिलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडणार आहे. अमरावती व विदर्भाच्या मातीचे संस्कार त्यांच्या सादरीकरणातून दिसून येतील. यासोबतच ज्ञान, तंत्रज्ञान व कल्पकतेच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या उभारणीतही हे युवा आपले योगदान देणार आहेत. राज्य शासनाने एआय बेस तंत्रज्ञानावर भर दिला असून युवकांना या क्षेत्रात पुढे जाण्याकरिता पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. अमरावती व राज्यातील युवकांनी यादृष्टीने पुढाकार घ्यावा त्यास राज्यशासन पूर्ण सहकार्य करेल असे सांगत एआयच्या सद्उपयोगावर भर देत दुरुपयोगापासून लांब रहावे असेही त्यांनी सांगितले. येत्या 25 डिसेंबर रोजी चिखलदरा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मेळघाट महोत्सवात युवाकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यकरण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील यांनी प्रास्ताविक केले. 23 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवामध्ये दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 दरम्यान शिक्षणतज्ञांचे व्याख्यान, युथ पार्लमेंट, गरबा नाईट, स्टार्टअप एक्सगो स्पर्धा, अमरावती गॉट टॅलेंट आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
००००००
पालकमंत्र्यांनी दाखविली नवीन वाहनांना हिरवी झेंडी
अमरावती, दि. 21 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन नविन वाहनांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी आमदार प्रविण पोटे, प्रविण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलिस आयुक्त राकेश ओला आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने आज तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना वितरीत करण्यात आली आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी विश्रामगृह येथे वाहनांना हिरवी झेंडी दाखविली. तसेच संबंधितांना वाहने सुपूर्द केली.
000000
जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांची जयंती साजरी
अमरावती, दि. 21 (जिमाका) : जलक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000000
रविवारी राखी मेल सुविधा उपलब्ध राहणार
अमरावती, दि. 21 (जिमाका): राखी पर्वानिमित्त नागरिकांना राखी मेल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रविवार, दि. 23 ऑगस्ट रोजी अमरावती विभागातील निवडक डाक कार्यालयात सुविधा उपलब्ध राहणार आहे.
अमरावती मुख्य डाकघर, परतवाडा मुख्य डाकघर, अमरावती उपकॅम्प डाकघर, अचलपूर उप डाकघर, बडनेरा उप डाकघर, अंजनगाव उप डाकघर, चांदूर रेल्वे उप डाकघर, चांदूर बाजार उप डाकघर, धामणगाव रेल्वे उप डाकघर, धारणी उप डाकघर, मोर्शी उप डाकघर, व्हीएमव्ही उप डाक, रूख्मिणी नगर उप डाकघर, शिवाजीनगर उप डाकघर, राजापेठ उप डाकघर, वरूड उप डाकघर, साईनगर उप डाकघर, वलगाव उप डाकघर तसेच दर्यापूर उप डाकघर या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध राहणार आहे, असे अमरावती विभागाचे प्रवर डाक अधीक्षक श्री. गेडाम यांनी कळविले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment