Monday, August 31, 2026

DIO NEWS AMRAVATI 31.8.2026








अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बालकांच्या पालकांना 5 लाखांचा धनादेश प्रदान

 

     अमरावती, दि. 31 : जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याठिकाणचा अतिदक्षता विभाग हा गरजूंसाठी महत्वाचा असल्याने अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

     पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मुरके हॉस्पीटल आणि जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

 

     पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी, रूग्णालयातील आपत्कालीन वेळेत नवजात शिशूंचे जीव वाचविणे ही प्राथमिकता होती. 36 बालकांना तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाल्याने या सर्व बालकांची प्रकृती आज ठिक झाली आहे. तसेच घटनेनंतर जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य मंत्र्यांनी त्याच‍ दिवशी भेट देऊन चौकशी समितीची घोषणा केली आहे. आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

     जिल्हा स्त्री रूग्णालयाला गेल्या दोन वर्षात आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला. यावर्षी या रूग्णालयाचा कोणताही प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाकडे प्रलंबित नाही. रूग्णालयातील प्रस्तावांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीकडून छाननी केल्यानंतरच प्रस्ताव नियोजनकडे सादर केले जातात. येत्या कालावधीत अतिदक्षता कक्ष हा एम्सच्या मानकानुसार तयार करण्यात येईल. याठिकाणी जागतिक दर्जाचे उपकरणे बसविण्यात येतील. यात कोणतीही त्रृटी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निधीची करतरता भासू देणार नसल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

 

     यावेळी स्वप्नील बोरंगे, प्रफुल्ल चोपडे, गंगाराम बेठेकर या पालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच खासगी रूग्णालयांनी शिशूंवर मोफत उपचार केल्याबद्दल आभार मानले.

00000












पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस; जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी

 

अमरावती, दि. ३१ (जिमाका),:जिल्हा स्त्री रुग्णालयातील २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील बाधित बालकांची राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. त्यांनी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी) तसेच मुरके हॉस्पिटलला भेट देऊन उपचारधीन बालकांच्या आरोग्याची माहिती घेतली, तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त नवजात अतिदक्षता विभागाची पाहणी केली.

      पीडीएमसी आणि मुरके रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही नवजात बालकांची प्रकृती धोक्याबाहेर आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित बालकांवर विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बालकांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच, उपचाराधीन बालकांच्या माता-पित्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत "राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असा विश्वास दिला.

      त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी करून प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनेच्यावेळी जीवाची बाजी लावून नवजात बालकांना अतिदक्षता विभागातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या परिचारकांशी त्यांनी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.यावेळी रुग्णालयातील सुरक्षितता आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

      या पाहणी दौऱ्याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त राकेश ओला आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            ००००००




 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, ‘एसआयआर’मध्ये जिल्ह्यात 21 लाख 92 हजार 395 मतदार

3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळली ; 22 मतदान केंद्रांची वाढ

30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती नोंदवावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

            अमरावती, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत सोमवार, 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीनुसार 8 विधानसभा मतदार संघामध्ये एकूण  21 लाख 92 हजार 395 मतदारांची नोंद असून 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या प्रस्तावित मतदान केंद्र आणि समायोजनाअंती 2 हजार 682 वरून वाढून 2 हजार 704 झाली आहे. सर्व पात्र मतदारांनी आणि वगळण्यात आलेल्या मतदारांनी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

 

            भारत निवडणूक आयोगाद्वारे देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेचा तिसरा टप्पा  महाराष्ट्रासह 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशात राबविला जात आहे. या मोहिमेअंतर्गत ‘एकही पात्र नागरिक सुटणार नाही आणि एकही अपात्र नागरिक समाविष्ट होणार नाही.’ या उद्दिष्ट्याने अमरावती जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ)  25 लाख 45 हजार 677 मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष खातर जमा करण्यात आली आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याात आली आहे. यात जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदार संघात  11 लाख 24 हजार 83 पुरूष मतदार तर 10 लाख 68 हजार 251 महिला मतदार आणि 61 तृतीयपंथी मतदार असे एकूण 21 लाख 92 हजार 395 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मय्यत मतदार वगळता जिल्ह्यातील एकही पात्र मतदार यादीमध्ये येण्यापासून वंचित राहू नये. या उद्देशाने पात्र मतदारांना गणनापत्रक बीएलओकडे जमा करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर यादी  उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रक्रियेअंती 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीतून 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

 

जिल्ह्यात 21 लाख 92 हजार 395 मतदार

 

प्रारूप मतदार यादीमध्ये  धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात 1 लाख 38 हजार 465 पुरूष, तर 1 लाख 30 हजार 935 महिला मतदार आणि 1 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 69 हजार 401 मतदार नोंदण्यात आले आहेत. बडनेरा  विधानसभा मतदार संघात 1 लाख 56 हजार 831 पुरूष, तर 1 लाख 53 हजार 915 महिला मतदार आणि 32 तृतीयपंथी मतदार असे एकूण 3 लाख 10 हजार 778 मतदार नोंदण्यात आले आहेत.

अमरावती  विधानसभा मतदार संघात 1 लाख 51 हजार 82 पुरूष, तर 1 लाख 48 हजार 504 महिला मतदार आणि 18 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 99 हजार 604 मतदार नोंदण्यात आले आहेत. तिवसा  विधानसभा मतदार संघात 1 लाख 28 हजार 93 पुरूष, तर 1 लाख 19 हजार 186 महिला मतदार असे एकूण 2 लाख 47 हजार 279 मतदार नोंदण्यात आले आहेत.

 

 दर्यापूर  विधानसभा मतदार संघात 1 लाख 42 हजार 984 पुरूष, तर 1 लाख 32 हजार 865 महिला मतदार आणि 3 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 75 हजार 852 मतदार नोंदण्यात आले आहेत. मेळघाट  विधानसभा मतदार संघात 1 लाख 40 हजार 610 पुरूष, तर 1 लाख 33 हजार 112 महिला मतदार आणि 7 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 73 हजार 729 मतदार नोंदण्यात आले आहेत.

 

अचलपूर  विधानसभा मतदार संघात 1 लाख 31 हजार 215 पुरूष, तर 1 लाख 22 हजार 83 महिला मतदार असे एकूण 2 लाख 53 हजार 298 मतदार नोंदण्यात आले आहेत. मोर्शी  विधानसभा मतदार संघात 1 लाख 34 हजार 803 पुरूष, तर 1 लाख 27 हजार 651 महिला मतदार असे एकूण 2 लाख 62 हजार 454 मतदार नोंदण्यात आले आहेत.

 

3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळली

 

प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीतून 1 लाख 9 हजार 307 मय्यत, आढळून नआलेले 22 हजार 357, कायम स्तलांतरीत 1 लाख 64 हजार 513 आणि 978 इतर तसेच 56 हजार 142 आधिच नोंदलेले मतदार अशा एकूण 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातील 10 हजार 681 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 495, कायम स्तलांतरीत 23 हजार 694 आणि 84 इतर तसेच 4 हजार 483 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 40 हजार 437 मतदार वगळण्यात आले आहेत. बडनेरा  विधानसभा मतदार संघातील 23 हजार 667 मय्यत, आढळून नआलेले 3 हजार 523, कायम स्तलांतरीत 25 हजार 983 आणि 264 इतर तसेच 10 हजार 331 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 63 हजार 768 मतदार वगळण्यात आले आहेत.

 

अमरावती विधानसभा मतदार संघातील 18 हजार 920 मय्यत, आढळून नआलेले 9 हजार 249, कायम स्तलांतरीत 30 हजार 515 आणि 136 इतर तसेच 16 हजार 976 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 75 हजार 796 मतदार वगळण्यात आले आहेत. तिवसा विधानसभा मतदार संघातील 14 हजार 780 मय्यत, आढळून नआलेले 2 हजार 64, कायम स्तलांतरीत 23 हजार 732 आणि 87 इतर तसेच 7 हजार 659 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 48 हजार 322 मतदार वगळण्यात आले आहेत.

 

दर्यापूर विधानसभा मतदार संघातील 8 हजार 688 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 175, कायम स्तलांतरीत 17 हजार 865 आणि 117 इतर तसेच 2 हजार 331 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 30 हजार 176 मतदार वगळण्यात आले आहेत. मेळघाट विधानसभा मतदार संघातील 13 हजार 286 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 805, कायम स्तलांतरीत 12 हजार 455 आणि 127 इतर तसेच 6 हजार 350 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 34 हजार 23 मतदार वगळण्यात आले आहेत.

 

अचलपूर विधानसभा मतदार संघातील 10 हजार 210 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 462, कायम स्तलांतरीत 18 हजार 867 आणि 57 इतर तसेच 3 हजार 690 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 34 हजार 286 मतदार वगळण्यात आले आहेत. मोर्शी विधानसभा मतदार संघातील 9 हजार 75 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 584, कायम स्तलांतरीत 11 हजार 402 आणि 106 इतर तसेच 4 हजार 322 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 26 हजार 489 मतदार वगळण्यात आले आहेत.

 

 

 

जिल्ह्यात 22 मतदान केंद्रांची वाढ

 

 

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नवीन प्रस्तावित मतदान केंद्र व समायोजन मतदान केंद्र याद्वारे मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात आले आहे. यानुसार अस्तित्वात असलेल्या 2 हजार 682 मतदान केंद्रांची संख्या वाढून 2 हजार 704 झाली आहे. बडनेरा विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 345 वरून वाढून 354 झाली आहे. अमरावती  विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 322 वरून वाढून 328 झाली आहे. मेळघाट विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 356 वरून वाढून 363 झाली आहे.

 

 

30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती नोंदवण्याचे आवाहन

 

अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आणि वगळण्यात आलेल्या मतदारांनी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. 1 आक्टोबर 2026 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी फॉर्म क्रं. 6 भरून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

000000

आज ‘डाक अदालत

 

सहा आठवडयात समस्येचे निराकरण न झालेल्या तक्रारी मांडता येणार

 

       अमरावती, दि.31 (जिमाका) : अमरावती विभागातील स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु रजिस्टर पार्सल,बचत बँक व मनीऑर्डर आदी सहा आठवडयात निराकरण न झालेल्या तक्रांरींच्या समाधानासाठी मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती यांच्या कार्यालयात  सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

       सहा आठवडयात निराकरण न झालेल्या व समाधानकारक उत्तर नमिळालेल्या तक्रारींची डाक अदालतीत दखल घेण्यात येणार आहे. या अदालतीत अर्ज सादर करताना तक्रारीचा सर्व तपशील ,तक्रारीची  तारिख, ज्या अधिकाऱ्यांना तक्रार पाठविली त्यांचे नाव व हुद्दा आदींचा उल्लेख असावा.  वेळेत प्राप्त अर्जांचा विचार डाक अदालतील केला जाईल, असे प्रवर अधीक्ष डाकघर यांनी कळविले आहे.

00000000

ग्रामीण भागात  कलम 37 (1) (3) लागू

 

अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 1 सप्टेंबर 2026 ते  15 सप्टेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी संतोष काकडे  यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 31.8.2026

अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बालकांच्या पालकांना 5 लाखांचा धनादेश प्रदान        अमरावती, दि. 31 : ज...