जिल्हा स्त्री रुग्णालयात विद्युतीकरण, अग्नीसूचक आणि अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे स्पष्टीकरण
अमरावती, दि. 28 (जिमाका) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता कक्षाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3.30 वाजता दुर्दैवी घटना घडली. या घटनेबाबत प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमावर वस्तुस्थितीशी विसंगत काही बातम्या प्रसारित झाल्या असून त्याची वस्तुस्थितीदर्शक माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती मुख्य अभियंता कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
एप्रिल व मे 2026 मध्येच सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर रुग्णालयातील अग्नीसूचक व अग्निशमन यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करून महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्याकडे फॉर्म-बी सादर करण्याकरता ई-निविदा पूर्ण झालेली होती. संबंधित फायर कंत्राटदारास 23 जून 2026 रोजीच कार्यारंभ करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. विभागाद्वारे आवश्यक कार्यवाही आधीच पूर्ण केलेली आहे त्यामुळे 37 दिवस पत्राकडे दुर्लक्ष केल्याची माहिती वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती मुख्य अभियंता कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आवश्यक यंत्रणा दुरुस्ती करून कंत्राटदाराने प्राथमिक फायर ऑडिट अहवाल 30 जून 2026 रोजी सादर केला. संपूर्ण यंत्रणा सुस्थितीत असल्याची शहानिशा करून 22 ऑगस्ट रोजी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती असे सांगून फायर ऑडिट झाले नसल्याची बाब वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
विद्युत संच मांडणीचा दर्जा योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार वीज संच मांडणी मधील सर्व सुरक्षा उपकरणे, संपूर्ण वायरिंग, स्विच गिअर हे भारतीय मानक ब्युरो मानांकित व उच्च दर्जाचीच आहेत तसेच रुग्णालयातील अतिदक्षता कक्ष व नवजात बालक कक्षात विद्युत विभागाद्वारे करण्यात आलेल्या विद्युत संच मांडणीत ओव्हर करंट व अर्थ फॉल प्रोटेक्शन करिता त्रिस्त्रीस्तरीय विद्युत सुरक्षा प्रणालीचा अवलंब करण्यात आला होता व ज्या व्हेंटिलेटर मध्ये स्पोट होऊन ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस संबंधित व्हेंटिलेटरची 32 ए क्षमतेची आरसीबीही ट्रीप झालेली होती असे सांगण्यात आले आहे. 30 जुलै 2026 रोजी रुग्णालयातील 61 अग्निशमन यंत्रणांचे रिफिलिंग करून रुग्णालयात पुन: स्थापित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागामार्फत जिल्हा स्त्री रुग्णालयात विद्युतीकरण, अग्नीसूचक आणि अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मे ते जुलै 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने या रुग्णालयाकडे ही यंत्रणा रीतसरपणे हस्तांतरित करण्यात आली आहे. हस्तांतरणाच्या वेळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी, फायर कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अधिकारी- कर्मचारी तथा रुग्णालयातील अधिकारी -कर्मचारी यांच्यासह संयुक्तपणे संपूर्ण यंत्रणेचे मॉक ड्रिल घेण्यात आले व आपत्कालीन परिस्थितीत ही यंत्रणा कशी हाताळायची याबाबत प्राथमिक सूचना देण्यात आल्या होत्या. संपूर्ण संच मांडणीची देखभाल व दुरुस्ती विषयक कामे विभागाद्वारे नियमितपणे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
00000000
No comments:
Post a Comment