जलसंधारण जनजागृती अभियानात नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
21 ऑगस्ट रोजी साजरा होणार 'जलसंधारण दिन'
15 ऑगस्टपासून 'जलसंधारण सप्ताह'
अमरावती दि. 19 ( जिमाका): माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा होत आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय व मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताहाच्या औचित्याने जिल्ह्यात इंस्टाग्राम रिल स्पर्धा, ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’ सह विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जन्मदिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जात आहे.स्व सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात (1991-93) राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी केली. "पाणी अडवा, पाणी जिरवा" हा मूलमंत्र देऊन त्यांनी राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात केली. मोठ्या धरणांवर अवलंबून न राहता पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर दिला. माती नाला बांध, समतल चर, कंटूर बंडिंग, नाला बंडिंग अशा छोट्या संरचनांवर भर देऊन जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन केले. 1992 मध्ये त्यांनी स्वतंत्र जलसंधारण विभागाची स्थापना केली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळात लोकांना रोजगार निर्माण करून दिला आणि जलसाठे तयार केले.
जलसंधारण दिनाच्या औचित्याने राज्यात 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत 'जलसंधारण सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे तसेच 21 ऑगस्ट रोजी सकाळी ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातही या सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये जलसाक्षरतेसाठी जनजागृती आणि शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये आणि संस्था स्तरावर विशेष कार्यशाळा. प्रबोधन रॅली, चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्र स्वच्छता आणि श्रमदान करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि जलसंधारण प्रतिज्ञा घेण्यात येत आहे. मृद व जलसंधारण रचनांची दुरुस्ती आणि तपासणी आदी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
जलसंधारण सप्ताहासोबतच पाणी टंचाईवर दीर्घकालीन मात करण्यासाठी 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2026 दरम्यान विशेष अभियान चालवले जात आहे. यामध्ये बंधारे आणि पाझर तलावांची निर्मिती, सिमेंट नाला बांध बांधणे, विहीर पुनर्भरण आणि भूजल पुनर्भरण करणे, गाळ काढणे हे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. या अभियानात लोकसहभाग घेण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षण व क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे.
"पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!" आणि "जल वाचवा, भविष्य घडवा!" असा संदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
000000
एक पाऊल पाण्यासाठी: महा वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हा- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन’चे आयोजन
क्युआर कोडद्वारे सहभागासाठी नोंदणी
अमरावती, दि. 19 (जिमाका): जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमरावती शहरात शुक्रवारी, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले आहे. क्युआर कोड व अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना सहभागी होता येणार आहे. वॉकेथॉनद्वारे जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून नागरिकांना मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
‘एक पाऊल जलसंधारणासाठी, एक पाऊल शाश्वत भविष्यासाठी’ हा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने शनिवारी सकाळी 6 वाजता या ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन केले आहे. श्री.शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून या वॉकेथॉनला सुरुवात होणार असून पुढे गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सिंचन भवन असा मार्ग असणार आहे. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथेच वॉकेथॉनचा समारोप होणार आहे. जलसंधारणाच्या लोकचळवळीला बळ देण्यासाठी आयोजित या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि जलसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. क्युआर कोड व संकेतस्थळावर नोंदणी
महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटरमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या क्युआर कोडद्वारे किंवा https://register.mahaevent.co.
00000000
सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 21 ऑगस्ट रोजी अमरावती येथे
‘विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन
अमरावती, दि.19 (जिमाका): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.00 वाजता गाडगे बाबा महाराज हॉल, गाडगे नगर येथे विविध किरकोळ कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी ‘ विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये नागरिकांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध किरकोळ कर्ज योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, गोल्ड लोन, पर्सनल लोन तसेच मॉर्टगेज लोन यांचा समावेश आहे. ग्राहकांना बँकेच्या विविध कर्ज योजनांच्या अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच उपलब्ध व्याजदर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक सुनील पाण्डेय यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित राहून बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.
00000000
सार्वजनिक गणेशोत्सवातील वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घ्यावी
पूर्व परवानगी शिवाय वर्गणी गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षा
अमरावती, दि.19 (जिमाका): सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वगळून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे वर्गणी गोळा करण्याकरिता धर्मदाय उपआयुक्त किंवा सहायक धर्मदाय आयुक्त अमरावती यांची पूर्वपरवानगी घ्यावी, असे आवहन धर्मदाय सह आयुक्त दीपक खोचे यांनी केले आहे. पूर्व परवानगी शिवाय वर्गणी गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास तीन महिन्या पर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलीत रकमेच्या दीडपट द्रव्य दंडाची शिक्षा होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41-क नुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वगळून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे गणेशोत्सव कार्यक्रमासाठी रोख रकमेच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात पैसा,देणगी किंवा वर्गणी गोळा करण्याच्या पूर्वपरवानगीकरिता www.Charity.Maharashtra.gov.in
नियमाचे उल्लंघन करून पूर्व परवनगी न घेता वर्गणी गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास तीन महिन्या पर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलीत रकमेच्या दीडपट द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते असे धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
0000000

No comments:
Post a Comment