गंभीर नवजात बालकांना तातडीने दाखल करून मोफत उपचारांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
*आगीच्या घटनेनंतर उपाययोजना
अमरावती, दि. 29 : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. या दुर्घटनेमुळे अतिदक्षता वार्डचे मोठे नुकसान झाले असून, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नवजात बालकांच्या उपचारात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना निर्देश जारी केले आहेत.
जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या गंभीर नवजात बालक व बालरुग्णांना उपलब्ध अतिदक्षता विभागात बेडनुसार तातडीने दाखल करून जीवनावश्यक उपचार सुरू करावेत. केवळ पैशांअभावी किंवा आर्थिक कारणांमुळे कोणत्याही गंभीर रुग्णावर उपचार रोखू नयेत किंवा दाखल करण्यास नकार देऊ नये. प्रथम रुग्णाची स्थिती स्थिर करण्याला प्राधान्य द्यावे. तसेच पात्र रुग्णांना आयुष्मान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रुग्णालयांनी नातेवाईकांना सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहे.
सदर आदेशांचे उल्लंघन केल्यास किंवा उपचारात जाणीवपूर्वक विलंब, टाळाटाळ केल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन आणि जबाबदार व्यक्तींवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला पूर्ण सहकार्य करावे, तसेच नवजात रुग्णांच्या जीवितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आदेश देण्यात आले आहे.
0000

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा ; अमरावती समिती कार्यालय सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरू
अमरावती, दि.२९ (जिमाका) : जात वैधता प्रमाणपत्रातील अद्याप त्रुटींची पूर्तता केली नसेल अशा विद्यार्थ्यांना त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन करत प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती कार्यालय शनिवार २९ आणि रविवार ३० ऑगस्ट २०२६ या सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ सुरू ठेवण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी, वैद्यकीय, आयुष आणि कला शिक्षण) प्रवेश प्रक्रियेसाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटींची पूर्तता केलेली नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कार्यालय सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ सुरू ठेवण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी उशिराने अर्ज सादर केले आहेत. पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जांमधील त्रुटींबाबत समितीने वेळोवेळी एसएमएस, ई-मेल आणि पत्राद्वारे कळवले असूनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही.अर्जदारांची जबाबदारी प्रवेशाच्या तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) जाहीर करण्यात आल्या आहेत. वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यास होणाऱ्या नुकसानीला अर्जदार स्वतः जबाबदार राहतील. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि समितीला वेळेत निर्णय घेता यावा, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी त्वरित अमरावती समिती कार्यालयाशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन समितीच्या श्रीमती बोबडे यांनी केले आहे.
०००००
नीट -पीजी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरात आज जमावबंदी आदेश लागू
अमरावती दि. 29 (जिमाका): नीट- पीजी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात 30 ऑगस्ट रोजी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिला आहे.
राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे रविवार, 30 ऑगस्ट 2026 रोजी ' नीट -पीजी एंट्रान्स परीक्षा 2026' आयोजित करण्यात आली आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण 6 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार, अनुचित प्रकार किंवा शांतताभंग होऊ नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये पोलीस आयुक्तांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
हा जमावबंदी आदेश 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लागू राहील. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर त्रिज्येच्या आत अनधिकृत व्यक्तींना फिरण्यास सक्त मनाई आहे. केवळ परीक्षार्थी, परीक्षा कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि शासनमान्य व्यक्तींनाच प्रवेश असेल. परीक्षा संपल्यानंतर परीक्षार्थ्यांनी तत्काळ परिसर खाली करणे बंधनकारक आहे.
100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करण्यास बंदी आहे. मात्र, अपंग विद्यार्थी, परीक्षा समन्वयक-कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी-टेलिफोन बूथ, झेरॉक्स सेंटर्स, संगणक दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि फेरीवाले परीक्षा संपेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर 'भारतीय न्याय संहिता 2023' च्या कलम 223 व प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अमरावती शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment