Saturday, August 22, 2026

‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

 


‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त अमरावती महसूल विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांत एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम
अमरावती, दि. २२ ऑगस्ट २०२६ : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने अमरावती महसूल विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘ज्ञान माऊली’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अमरावती विभागाअंतर्गत अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक साहित्यनिर्मिती, अध्यात्मिक विचार आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक जीवनावर अमीट ठसा उमटविला. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्मज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. त्यांच्या समतावादी, मानवतावादी आणि भक्तिमार्गाच्या विचारांचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देत आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकार्याचा, अध्यात्मिक विचारांचा आणि संतपरंपरेतील योगदानाचा परिचय जनसामान्यांना करून देण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, संतविचार, भक्तीपरंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन रसिकांना घडणार आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, संतांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची जनमानसात व्यापक ओळख निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
अमरावती महसूल विभागातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आणि संतपरंपरेचा व्यापक प्रसार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून, अमरावती विभागाअंतर्गत अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

  ‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त अमरावती महसूल व...