Tuesday, November 3, 2026

DIO NEWS AMRAVATI 03.11.2026





 कर्ज पुनर्वित्त मोहिमेत अमरावती जिल्हा राज्यात प्रथम; कृषी कर्जवाटपातही अव्वल

अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कर्ज पुनर्वित्त मोहिमेत अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे तसेच बँकांच्या समन्वित सहभागामुळे जिल्ह्याच्या कर्ज पुनर्वित्त मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्याची कर्ज पुनर्वित्ताची प्रगती केवळ ८ टक्के होती. ती ऑक्टोबरअखेर ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्ह्याची कामगिरी लक्षणीय असून, बुलढाणा जिल्ह्यात ३३ टक्के, धुळे व अकोला जिल्ह्यांत प्रत्येकी ३१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात २१ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ टक्के, तर जालना जिल्ह्यात १४ टक्के कर्ज पुनर्वित्ताची नोंद झाली आहे.

कृषी कर्जवाटपाच्या बाबतीतही अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टाच्या ८१ टक्के कृषी कर्जवाटप पूर्ण केले असून, राज्याची सरासरी ५२ टक्के आहे. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्ह्याने अग्रस्थान प्राप्त केले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी बँक प्रतिनिधी व संबंधित यंत्रणांच्या बैठका घेऊन कर्ज पुनर्वित्त आणि पीक कर्जवाटपाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक निर्देश, बँकनिहाय कामगिरीचा पाठपुरावा आणि प्रशासकीय समन्वय यांवर विशेष भर देण्यात आला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोहिमेला गती मिळून जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या पाच बँकांचा गौरव करण्यात आला.

तसेच, उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेल्या शाखा व्यवस्थापकांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भंडारज शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. महेंद्र सपकाळ, बँक ऑफ महाराष्ट्र, लोणी टाकळी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. प्रफुल्ल शेंडे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, अंजनगाव सुर्जी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. सचिन कासबे यांचा समावेश आहे.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना बँकामार्फत पुन्हा कर्ज देण्यात येत आहे. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सक्षम आहेत. शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन रितसर कर्ज घेण्याची प्रक्रिया करावी. कर्ज मिळविण्यास अडचण आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा अग्रीण बँकेशी संपर्क साधावा.

-आशिष येरेकर

जिल्हाधिकारी, अमरावती

000000

सुरक्षित बचपन अभियानात 50 शाळांमध्ये जनजागृती

अमरावती, दि. 3 (जिमाका) : विधी सेवा प्राधिकरणातर्फे बालकांचे हक्क, संरक्षण आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी देशभरात ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्ह्यातील 50 हून अधिक शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले.

शहरात १० शाळांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. तसेच, जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये तालुका विधी सेवा समित्यांच्या माध्यमातून संबंधित तालुक्‍यांतील न्यायिक अधिकाऱ्यांनी विविध शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे घेतले. यात बालकांना त्यांचे मूलभूत हक्क, वैयक्तिक सुरक्षितता, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सायबर सुरक्षितता आणि बालशोषणापासून संरक्षण याबाबत जागरूकता करण्यात आली. शाळांमध्ये मार्गदर्शन सत्रे, संवादात्मक कार्यक्रम आणि व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यात बालकांचे हक्क व पास्को अधिनियम, बालकांची वैयक्तिक व डिजिटल सुरक्षितता, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, बालविवाह व बालशोषण प्रतिबंध तसेच बालकांचे सक्षमीकरण, आपत्कालीन मदत आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या बालस्नेही विधी सेवा योजनाबाबत माहिती देण्यात आली. कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार किंवा शोषण झाल्यास घाबरून न जाता विश्वासू व्यक्ती, शिक्षक किंवा संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.

अभियानासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा उज्वला नंदेश्वर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे आणि शासकीय विभागांनी सहभाग घेतला. परीक्षांच्या कालावधीमुळे हा कार्यक्रम आता दि. २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.

00000


दर्यापुरात नगर परिषदेच्या अत्याधुनिक अभ्यासिकेचा थाटात शुभारंभ; पहिल्याच दिवशी १८१ विद्यार्थ्यांची नोंदणी

 

अमरावती, दि. ३ (जिमाका):ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक अभ्यासासाठी शांत आणि अनुकूल वातावरण मिळावे, या उद्देशाने नगर परिषद दर्यापूरच्या वतीने सोमवार २ नोव्हेंबर रोजी एका अत्याधुनिक अभ्यासिकेचा थाटात शुभारंभ झाला.

 

 

       शहरातील प्रभाग क्र. ६, गांधीनगर मेन रोड, बनोसा येथे ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.या महत्त्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्पाचे उद्घाटन दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मंदाकिनी सुधाकरराव भारसाकळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, उपाध्यक्ष अहमद खाँ सादत खाँ, गटनेते रामेश्वर चव्हाण, नगरसेवक रोशन कट्यारमल, स्नेहाताई देशमुख, विजया शुक्ला, आरोग्य सभापती हबीब खान, नगरसेवक उद्धवराव नळकांडे, ईश्वर बुंदेले यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 

         दर्यापूर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका वरदान ठरणार असून, उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १८१ विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेमध्ये नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या उदंड प्रतिसादामुळे शहरात या उपक्रमाचे  कौतुक होत आहे.

 

      विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद सदैव कटिबद्ध आहे. या अभ्यासिकेमध्ये आगामी काळात आणखी अत्याधुनिक आणि विकासात्मक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा आणि अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी याप्रसंगी बोलताना केले.

०००००


फलोत्पादन विकास अभियानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

 

अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना लाभाची संधी

 

अमरावती दि. ३ (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२६-२७ करिता जिल्ह्यातील अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून विविध फलोत्पादन विषयक घटकांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin अर्ज सादर करण्याचे आवाहन,  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

             या अभियानांतर्गत विविध क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य आणि लाभ दिला जाणार आहे. यात मुख्यत्वे  क्षेत्र विस्तार घटकांतर्गत  पुष्पोत्पादन, हळद, मिरची लागवड, सुगंधी व औषधी वनस्पतींची लागवड, स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, पॅशन फ्रूट आणि किवी यांसारख्या पिकांचा समावेश. विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने आळिंबी (मशरूम) उत्पादन प्रकल्प, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, मधुमक्षिका पालन, सामूहिक व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण करण्यात येते. अभियानाच्या नियंत्रित शेती घटकांतर्गत  हरितगृह व शेडनेटगृह उभारणी, प्लॅस्टिक मल्चिंग, फळांना व फळांच्या घडांना आवरण घालणे तसेच तण नियंत्रक आच्छादन असे लाभ देण्यात येतात. फलोत्पादन यांत्रिकीकरणांतर्गत  २० एचपी पर्यंतचे ट्रॅक्टर, पॉवर टिलर व पीक संरक्षण उपकरणे पुरविण्यात येतात. काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी  फार्म गेट पॅक हाऊस, कांदाचाळ, शितगृह (कोल्ड स्टोरेज), शितवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आणि रायपनिंग चेंबर यांसारख्या आधुनिक सुविधा दिल्या जातात.

 

       या योजनेची निवड प्रक्रिया पूर्णपणे 'प्रथम अर्ज, प्रथम लाभ' या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र आणि फार्मर आयडी  असणे बंधनकारक आहे.योजनेचे विविध घटक, पात्रता, अटी व शर्ती याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित गावातील उपकृषि अधिकारी अथवा सहाय्यक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

०००००



 

मेळघाटातील महिलांच्या 'सौर चरख्यावर निर्मित शाल’ची राष्ट्रीयस्तरावर दखल

 

कलाकुसरीची विशेष शाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपूर्द

 

अमरावती दि. ३ (जिमाका):  जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल मेळघाट क्षेत्रातील महिला कारागिरांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याच्या साहाय्याने पारंपरिक,आधुनिक व पर्यावरण पुरकतेला कौशल्याचा साज चढवून तयार केलेली एक विशेष शाल सोमवारी २ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका गौरवपूर्ण समारंभात स्वागतस्वरुपात प्रदान करण्यात आली.हा प्रसंग म्हणजे मेळघाटातील आदिवासी महिलांचे कौशल्य व आत्मनिर्भरता अधोरेखित करणारा थेट राष्ट्रीस्तरावरील बहुमानच ठरला आहे.

 

                 दुर्गम व आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती असूनही मेळघाटच्या महिलांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली ही झेप कौतुकास्पद ठरत असून, त्यांच्या या हस्तकलेने देशाच्या पटलावर अमरावती जिल्ह्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे २ नोव्हेंबर रोजी ‘भारत रिन्युअल एनर्जी समिट २०२६’ या  गौरवपूर्ण आयोजनाच्या उद्घाटन सोहळ्यात स्वागत स्वरुपात मेळघाटातील खादी ग्रामोद्योगाच्या 'कुटीर' ब्रँडतर्फे तयार करण्यात आलेली आकर्षक नैसर्गिक पानांच्या ठश्यांची  सौर चरखा शाल पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांना केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा  मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते भेट करण्यात आली. २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या परिषदेत १३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, ४० हून अधिक मंत्री, धोरणकर्ते, उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.

 

      महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेला अमरावती विकेंद्रित सौर चरखा क्लस्टर हा ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी कस्तुरबा सोलर खादी महिला समिती या महिलांच्या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. संस्थेने मेळघाटातील ग्रामीण व आदिवासी महिलांना सौर चरख्याद्वारे सूतनिर्मिती, हातमागाद्वारे वस्त्रनिर्मिती तसेच वस्त्रांवरील विविध कलात्मक प्रक्रिया यांसाठी प्रोत्साहित करून त्यांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

 

         मेळघाटातील महिलांनी विशेष कलाकुसरीतून साकारलेली ही विशेष शाल म्हणजे पारंपरिक हस्तकला आणि आधुनिक नवोपक्रम, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक कारागिरांच्या आत्मनिर्भरतेचा एक उत्तम संगम आहे. दुर्गम भागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक आणि हरित ऊर्जेचा वापर करून महिलांनी हे सूत कताईचे काम केले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे केवळ कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत झाली नाही, तर खादी आणि हस्तकलेला एक आधुनिक, डिजिटल व शाश्वत स्वरूप मिळाले आहे.

 

     या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी कारागिरांचे कौशल्य आणि महिला बचत गटांच्या आर्थिक स्थैर्याला थेट प्रोत्साहन मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारी ही कामगिरी ठरली आहे. या विशेष शॉलच्या रूपाने पर्यावरण रक्षण आणि ग्रामविकासाचा एक अत्यंत मोलाचा संदेश देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचवला गेला आहे.

००००

१० वी आणि १२ वी परीक्षा आवेदनपत्रांसाठी मुदतवाढ

 

अमरावती दि. ३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांसाठी नियमित शुल्काने विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत विहित पध्दतीने शुल्क भरावयाचे आहे. 

 

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०२७ मध्ये  भरण्याबाबतच्या तारखा कळविण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने नियमित विद्यार्थी, तसेच पुनर्रिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेदवारे ट्रांसफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित शुल्काने सादर करावयाची असून त्यास ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आवेदनपत्रे www.mahahsscboard.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत विहित पध्दतीने शुल्क भरावयाचे आहे. तसेच ७ डिसेंबर २०२६ पर्यंत शुल्क पावती, विद्यार्थ्याच्या प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची आहे.

 

      सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी कॉलेज/स्कूल प्रोफाईल मध्ये कॉलेज/शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये लॉगइन मधून प्रिलिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रिलिस्ट ची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी लागणार आहे. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे. त्याप्रमाणे पडताळणी केल्याबाबत माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळाप्रमुख व प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

     उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र फेब्रुवारी- मार्च २०२७ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबत यापूर्वी सर्व विभागीय मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सर्व विभागीय मंडळांनी कार्यवाही करण्याचे कळविण्यात आले आहे.

 

     दुष्काळाच्या  पार्श्वभूमीवर  फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांसाठी विलंब व अतिविलंब शुल्क आकारणी न करता सर्व आवेदनपत्रे नियमित शुल्क आकारून स्वीकारण्यात येतील. तसेच आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

 

0000

 

प्रधानमंत्री पीक विमा योजना-रब्बी हंगाममध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे-  डॉ. प्रशांत नाईक

 

अमरावती दि. ३ : एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये अधिसूचित चार पिकांसाठी अमरावती विभागातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पीक विमा घेण्याचे आवाहन विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांनी केले आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत गहु (बागायत), हरभरा व रब्बी कांदा या पिकाकरिता १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सहभागी होता येणार असून उन्हाळी भुईमूग पिकाकरिता ३१ मार्च २०२७ पर्यंत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी https://pmfby.gov.in पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

 

             शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राज्य शासनाद्वारे उत्पादनावर आधारीत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२६ व रब्बी हंगाम २०२६-२७ या १ वर्षाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये गहू (बागायत), हरभरा, उन्हाळी भुईमुग व रब्बी कांदा ही ४ पिके या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकामार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.

 

            प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्याhttps://pmfby.gov.in या अधिकृत पोर्टलवर वर स्वत: शेतकऱ्यांना , बँक,  विमा कंपनीने नियुक्त केलेले एजेंट, क्रॉप इंन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) यांच्या मार्फत योजनेतील सहभाग नोंदविता येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांसाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ९ वा मजला, ऑफिस ए, नेक्सस वेस्टेंड, सेक्टर १, बिल्डिंग ए, सर्व्हे क्र.१६९/१, परिहार चौकाजवळ, डीपी रोड, औंध, पुणे ही कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. संपर्कासाठी supportagri@iffcotokio.co.in हा ईमेल देण्यात आला आहे.

 

अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड डी-३०१, तिसरा मजला, इस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट (मॅग्नेट मॉल), लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई. नियुक्त करण्यात आली असूनpmfby.maharshtra@hdfcergo.com या ईमेल वर संपर्क साधता येणार आहे. वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चौथा मजला, टॉवर क्र.७, कॉमरझोन आयटी पार्क, सम्राट अशोक पथ, येरवडा जेल रोड, पुणे ही कंपनी नियुक्त करण्यात आली असून bagichelp@bajajallianz.co.in या ईमेलवर संपर्क साधता येणार आहे.

 

               गहू पिकासाठी बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी ११२.५० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांसाठी अनुक्रमे ४५० व ४२५ रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. हरभरा पिकासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी १८० रुपये,अकोला जिल्ह्यासाठी ३४१.८० रुपये, वाशिमसाठी १७०.९० रुपये, अमरावतीसाठी ३६० तर यवतमाळसाठी ५४० रुपये  निश्चित करण्यात आले आहेत. रब्बी कांद्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी ४७५० रुपये, अकोला जिल्ह्यासाठी २१९ तर अमरावतीसाठी १६४० रुपये  निश्चित करण्यात आले आहेत. उन्हाळी भुईमूगासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी ६०९ रुपये, वाशिमसाठी १०१.५० रुपये,अमरावतीसाठी ४०६ तर यवतमाळसाठी ६०९ रुपये  निश्चित करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

०००००


मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

 

दावे व हरकती दाखल करण्यासाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदत

 

         अमरावती, दि. 3 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १३ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. तसेच नोटीस टप्पा, दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी प्रशांत नावगे यांनी कळविले आहे.

 

00000

विभागीय आयुक्तालयात

९ नोव्हेंबरला विभागीय लोकशाही दिन

 

            अमरावती, दि. 3 :  विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी  ९ नोव्हेंबर रोजी रोजी सकाळी ११ वाजता विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन अमरावती येथील  विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे, असे अपर आयुक्त संजय जाधव यांनी कळविले आहे.

 

       विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांचे तक्रार अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात १५ दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

00000

 

No comments:

Post a Comment

महात्माजोतीरावफुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विशेष.(भाग ९)

  महात्माजोतीरावफुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विशेष.(भाग ९) महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाद्वारे प्रकाशित 'महात्माजोतीराव फुले...