Monday, May 20, 2024

जाधव पॅलेस येथे गुरुवारपासून ‘आंबा व मिलेट महोत्सव’; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

जाधव पॅलेस येथे गुरुवारपासून ‘आंबा व मिलेट महोत्सव;

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

          अमरावती, दि. 20 (जिमाका) : राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने गुरुवार, दि. 23 ते 26 मे 2024 रोजी चार दिवसीय आंबा व मिलेट महोत्सव जाधव पॅलेस, बडनेरा रोड, अमरावती येथे आयोजित केला आहे. या महोत्सवात आंबा व मिलेटचे प्रदर्शनी आणि विक्री करण्यात येणार आहे. नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांनी केले आहे.

 

                जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी. तसेच तृणधान्यांमध्ये असलेले पोषक घटक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून त्यांचा लाभ ग्राहकांना व्हावा यासाठी जाधव पॅलेस येथे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आंबा व मिलेट महोत्सव, प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विविध संस्था सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाकरीता उत्पादक व प्रक्रियादार यांचेकडून चांगला प्रतिसाद मिळत असून 40 स्टॉलचे बुकिंग झालेले आहे.

 

          आंबा महोत्सवाचे उद्घाटन प्रथम येणारे ग्राहक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवात शहरातील ग्राहकांना कोकणचा अस्सल हापूस आंबा, केशर आंबा, मिलेट ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई,राळा, भगर इत्यादी धान्य आणि त्यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बिस्कीट इत्यादी नाविन्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी या महोत्सवात मिळणार असल्याने या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                        0 00000

 

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु; 31 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु;

31 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 

             अमरावती, दि. 20 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी तालुकास्तरावर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरु करण्यात आले असून दि. 31 मेपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापन प्रशासन, विपणन प्रादेशिक व्यवस्थापक धारणी  एस. आर. महाजन यांनी केले आहे.

 

                आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी व्यवस्थापन प्रशासन, विपणन प्रादेशिक व्यवस्थापक धारणी कार्यालयामार्फत तालुक्यात धारणीमध्ये आदिवासी विकास महामंडळ मार्फत बैरागड, सावलीखेडा, साद्रावाडी, चाकर्दा, हरीसाल, धारणी तर चिखलदरा तालुकामध्ये आदिवासी विकास महामंडळ मार्फत चुरणी, गौलखेडा बाजार या आठ गावात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.

 

00000

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

             अमरावती, दि. 20 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

             सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून   दि. 21 मे ते 4 जून 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

दिव्यांग माला व पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार; दिव्यांग मालाचे एमपीएससीतील नेत्रदीपक यश सर्वांसाठी प्रेरणादायी - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 









दिव्यांग माला व पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार;

दिव्यांग मालाचे एमपीएससीतील नेत्रदीपक यश सर्वांसाठी प्रेरणादायी

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

          अमरावती, दि. 20 (जिमाका) : नुकताच राज्य लोकसेवा आयोगाच्या मंत्रालयात लिपीक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. एमपीएससी परीक्षेत कठोर परिश्रम घेत अनाथ व दिव्यांग माला पापळकर यांनी नेत्र दीपक यश मिळविले आहे. तिच्या या  यशाबद्दल आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते मालाचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.पापळकर यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचेही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

         जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, स्पर्धा परीक्षासंदर्भात बऱ्याच विद्यार्थांना भिती व शंका असतात. परंतु जन्मत:च दिव्यांग असलेल्या अनाथ मालाने जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज मोठ यश मिळविले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आपल्याला संधी मिळत  नाही, साधनांचा अभाव आहे, असं रडगाणे गाणाऱ्या अनेक युवकांसाठी दिव्यांग माला पापळकरचा आदर्श खरोखरच प्रेरणादायी आहे, असे गौरवद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

              माला ही जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत पोलिसांना सापडली होती. वझ्झर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात शंकरबाबा पापळकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचे माला अस नाव ठेवून तिला स्वतःचे नाव दिले. मालाला लहानपणीपासूनच शिकायची, पुस्तक वाचायची आवड होती. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर तिने येथील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथून दहावी आणि बारावी तसेच विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून कला शाखेची पदवी प्राप्त केली. मालाच्या शिक्षणासाठी प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तर स्पर्धा परीक्षेसाठी युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

                                                            00000

 

छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे 'शिवगर्जना’ महानाट्याचा अमरावतीकरांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 




छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे 'शिवगर्जना’

महानाट्याचा अमरावतीकरांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

            अमरावती, दि. 20 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्भुत जीवन चरित्राला प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी अमरावतीकरांना आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासह तीन दिवसीय या महानाटकाला उपस्थित राहून नव्या पिढीला शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्र अनुभवण्याची संधी द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

 

           राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या अध्यक्षतेखाली आज महसूल भवन येथे महानाटयाच्या आयोजनाबाबत बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकार अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, शिक्षणाधिकारी बुद्धभुषण सोनोने, तहसिलदार विजय लोखंडे, शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदी यावेळी उपस्थित होते.

 

          राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व अमरावती जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य प्रयोगाचे सादरीकरण होत आहे. या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी, या उद्देशाने महाराजांच्या जीवनावर आधारित महानाटयाचे सादरीकरण संभाव्य दि. 24, 25 व 26 मे 2024 रोजी सायन्स स्कोर मैदान येथे विनामूल्य करण्यात येणार आहे.

 

          आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 110 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत  . भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही  हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. 12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांनी या अविस्मरणीय महानाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

00000

 

Friday, May 17, 2024

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना

 

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना

 

               अमरावती, दि. 17 (जिमाका):  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने स्टॅन्ड अप इंडिया ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे.

 

               सन 2021-22 मध्ये 5 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून सन 2024-25 साठी किमान 10 प्रस्ताव मंजूरीचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेत नवउद्योजकांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्स्यातील जास्तीत जास्त 15 टक्के मार्जिन मनी शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेत राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते. योजनेचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

            या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती यांच्याकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

00000

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

 

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

             अमरावती, दि. 17 (जिमाका):  सहकार विभागाद्वारे 24 ते 26 मे 2024 या कालावधीत  सहकार विभागांतर्गत जी.डी.सी अँड ए व सी.एच.एम. परिक्षा गणेशदास राठी विद्यालय, पंचवटी चौक, मोर्शी रोड, अमरावती या केंद्रावर घेण्यात येणार आहे. परिक्षेला बसलेल्या परिक्षार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्रे पोष्टाव्दारे पाठविण्यात आलेली आहे. ज्या परिक्षार्थींचे नाव पात्र यादीमध्ये आहेत परंतु प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त झालेले नाही अशा परिक्षार्थ्यांनी पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्राईविंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट ओळखपत्र दाखवून परिक्षेस बसता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहाकारी संस्था, अमरावती सहकार संकुल, कांता नगर अमरावती येथे किंवा दुरध्वनी क्र. 0721-2661633 व मोबाईल क्र. 9370103913 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अे. एस. उल्हे यांनी केले आहे.

000000

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...