Wednesday, March 30, 2022

अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मंजूर - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकू

 



अंगणवाडी सेविकांना दिलासा; महिला व बालविकास मंत्र्यांच्या पाठपुराव्याने शासनाचा निर्णय

अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मंजूर

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ३०: राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना होणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

 

       अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, तसेच मदतनीस यांना एकरकमी लाभ मिळवून देण्यासाठी निधी मिळण्याबाबत प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत विशेष प्रयत्न करून शासन स्तरावर पाठपुरावा केला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली. 

 

     यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.

 

     अशा एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली निघून त्यांना लाभ मिळणे शक्य होणार आहे.

 

     अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची कार्यवाही महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.

00000

 

 

 


No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...