Thursday, April 7, 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह विद्यार्थ्यांसाठी 11 ते 13 एप्रिलदरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी मोहिम

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

विद्यार्थ्यांसाठी 11 ते 13 एप्रिलदरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी मोहिम

 

अमरावती, दि. 7 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दि. 11 ते 13 एप्रिलदरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी मोहिम आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य तथा उपायुक्त जया राऊत यांनी दिली.

                        शिबीरांची ठिकाणे

मोहिमेत विविध महाविद्यालयांत दि. 11 ते 13 एप्रिलदरम्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 वा. अशी शिबिराची वेळ असेल. दि. 11 एप्रिल रोजी अचलपूर येथील जगदंबा महाविद्यालय, बडनेरा येथील आर. डी. वाय. के. महाविद्यालय व नांदगाव खंडेश्वर येथील राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, दि. 12 एप्रिल रोजी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख गर्ल्स पॉलिटेक्निक, दर्यापूर येथील प्रबोधन उच्च माध्यमिक विद्यालय व चांदूर रेल्वे येथील अशोक कला वाणिज्य महाविद्यालय येथे शिबिरे होतील.

अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार येथील जी. एस. टोम्पे कला वाणिज्य महाविद्यालय व मोर्शीच्या भारतीय महाविद्यालयात दि. 13 एप्रिल रोजी शिबिरे घेण्यात येतील.

                        अद्याप अर्ज न केलेल्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विद्यार्थी, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले विद्यार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. ज्यांनी अद्यापपर्यंत पडताळणीसाठी अर्ज सादर केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी पडताळणीचा परिपूर्ण ऑनलाईन अर्ज व आवश्यक मूळ कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती राऊत यांनी केले आहे.

                                                     000 

 

No comments:

Post a Comment