Friday, July 14, 2023

सलोखा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


सलोखा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 14 : राज्यात जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. विविध वाद संपुष्टात येवून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनाने ‘सलोखा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताशी संबंधित तलाठी व राजस्व  मंडळ अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधून सलोखा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

प्रलंबित प्रकरणांमध्ये मुख्यत: मालकी हक्काबाबत, शेत बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबत, रस्त्यांचे वाद, शेतजमीन मोजणीवरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतावरील अतिक्रमण, शेती वहीवाटीचे वाद, भावंडांमधील वाटणीचे वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमीनीचे वाद समाजामध्ये आहेत. शेतजमीनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालय व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी हे वाद वर्षानुवर्षे चालू आहेत. शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे. या वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्टात येताना दिसत नाही.

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांकडील आपआपसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य वाढीस लागण्यासाठी सलोखा योजना महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे तसेच दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये व नोंदणी फी 1 हजार रुपये आकारण्यात येईल. यासाठी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा, असे चांदुर रेल्वे तहसिलदार यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

उच्चस्तरीय टास्क फोर्स जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 #अमरावती विभागातील हितधारकांच्या सूचना व अभिप्राय ऐकूण घेत त्यांच्याशी चर्चा करणार.

  उच्चस्तरीय टास्क फोर्स  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 #अमरावती विभागातील हितधारकांच्य...