Thursday, February 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27-02-2025

 

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

            अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. यावेळी संबंधितांनी व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000

कौशल्य विकास केंद्राचा आज ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

               अमरावती, दि. 26 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्यानुसार शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मदत करण्यात येते. यात आता प्रत्येक महिन्यात ‘जागेवरच निवड’ मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. एम्प्लायमेंटवर क्लिक करावे. जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन-इन करावे. आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडावे. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर बटनवर क्लिक करावे. त्यानंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या ॲप्‍शन बटनाच्या खाली व्ह्यू व अप्लाय बटन दिसेल. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा. आय ॲग्री हा पर्याय निवडा. शेवटी सक्सेसफुली अप्लाईड फॉर द जॉब असा मॅसेज दिसेल. यारितीने ऑनलाईन सहभाग नोंदवावा. रजिट्रेशन स्लिप पीडीएफची प्रिंट काढुन मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा ई-मेल amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा. तसेच 28 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : घरकुलांचे बांधकाम, मनरेगा किंवा अन्य कामे करताना ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरावर लाभार्थींची अडवणूक झाल्यास किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित गटविकास अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्यपुरस्कृत आवास योजनेतील घरकुले मंजूर झाली आहे. सर्व लाभार्थींना मंजूरपत्राचे वाटप करण्यात आले आहे. घरकूल बांधकामासाठी लाभार्थींना पहिल्या हप्ताचे वितरण झाले आहे. लाभार्थींकडून विहित कालावधीत घरकुले बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय यंत्रणेवर आहे. ग्रामविकास मंत्री यांनी आवास योजना, मनरेगा कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास संपर्क क्रंमांक 7978504317वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000








आरोग्य कर्मचाऱ्यांचे टेनिसबॉल क्रिकेट संपन्न

अमरावती, दि. 27 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे टेनिसबॉल क्रिकेट सामने घेण्यात आले. यात सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभागी नोंदविला.

छत्री तलाव येथील मैदानावर दि. 8 ते 23 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना सुपर स्पेशालिटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यात झाला. स्पर्धेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती यांनी विजेतेपद पटकालिले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने उपविजेतेपद पटकाविले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या हस्ते विजयी संघाचा कर्णधार रोशन बनारसे यांना विजयी चषक प्रदान करण्यात आला. नेत्र शल्य चिकित्सक डॉ. नम्रता सोनवणे यांच्या हस्ते उपविजयी संघाचा कर्णधार कैलाश जूनघरे यांना गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आर. एल. फसाटे यांच्याकडून चषक देण्यात आले. यात बेस्ट बॅट्समन - विशाल पवार, बेस्ट बॉलर - डॉ. शशांक, बेस्ट फिल्डर - नितीन पाटेकर, मॅन ऑफ सिरीज - डॉ. आशिष वाघमारे, मॅन ऑफ द मॅच फायनल - विशाल पवार यांना गौरविण्यात आले.

डॉ. दिलीप सोंदळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मैदानी खेळ खेळावे. खेळामुळे तणावमुक्त होण्यास मदत होते. डॉ. राठोड यांनी आभार मानले.

00000












सुधारित वृत्त

अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी 28 मोबाईल लॅब

- मंत्री नरहरी झिरवाळ

अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचा विभागीय आढावा

 

      अमरावती, दि. 27 (जिमाका) : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादेत करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिले.

 

      श्री. झिरवाळ यांनी आज अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी  सौरभ कटियार, अपर आयुक्त रामदास सिद्धभट्टी, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहआयुक्त सचिन केदारे, मिलिंद काळेश्वरकर, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रमोद पाटील, देवानंद वीर, गजानन हिरके, तहसीलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा काकडे उपस्थित होते.

 

      श्री. झिरवाळ म्हणाले, अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी लवकरच मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाची तपासणी करण्यास गती येईल. अन्न प्रशासन विभागाने अन्न परवाना आणि नोंदणीची तपासणी करावी. औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा वेळोवेळी तपासावा. त्यासोबतच दुधातील भेसळ रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात. दुधाच्या गुणवत्तेचे निकष ठरविण्यासाठी पशुपालकांकडील दुधाचे नमुने तपासण्यात यावे. पशुपालक ते दुधाची विक्री या साखळीमध्ये भेसळ होत असल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करावी. जनावरांच्या चाऱ्यातील विविधता  तपासावी. चाऱ्यामुळे दुधातील स्निग्धतेच्या प्रमाणात फरक पडत असल्यास उत्कृष्ट चाऱ्याच्या लागवडीवर भर देण्यात यावा. दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी. अन्न सुरक्षेसाठी अंगणवाडी सेविका, तसेच शाळेत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना फोस्टॅक या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

 

            समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या वसतिगृहांना 'हायजिन रेटिंग' प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्हा शासकीय रुग्णालय व पीडीएमसी, तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरांमध्ये ‘इट राईट कॅम्पस’ दर्जा मिळवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.             सौंदर्य प्रसाधनात वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या दर्जा तपासणीवर भर द्यावा. दैनंदिन वापरात असणाऱ्या महिलांच्या टिकल्या व धार्मिक कार्यात वापरण्यात येणारे कुंकू यांची गुणवत्ता योग्य राखली जाईल याची दक्षता घ्यावी. यासंदर्भातील उपायोजनांबाबत त्वरीत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

       समाज कल्याण विभागाने लाभार्थ्यांना थेट लाभ पोहोचवताना येणाऱ्या अडचणींवर त्वरीत कार्यवाही करावी. लाभार्थ्यांच्या मोबाईल आधारकार्डशी लिंक झाले नाहीत, यातील अडचणी तपासून लाभ मिळवून द्यावा. तसेच पारधी समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'पारधी कॅम्प' आयोजित करावा. विविध संस्थांच्या मदतीने पारधी वस्तीमध्ये जनजागृती करावी असे निर्देश दिले.

 

       मंत्री श्री. झिरवाळ यांनी बडनेरा येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

00000


No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...