राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अमरावती, दि 7 (जिमाका) : राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून अभिवादन केले.
0000000
जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट बंधनकारक
*आरोग्य यंत्रणेची उच्चस्तरीय बैठक:
अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षितता बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव सभागृहात उच्चस्तरीय बैठक पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी या बैठकीत महत्वाचे निर्देश दिले.
बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षिरसागर, कार्यकारी अभियंता (विद्युत) आणि जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गांधी यांनी दिले. यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच केवळ कागदोपत्री पूर्तता न करता प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने उपाययोजना करता याव्यात, यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात नियमितपणे 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वीज यंत्रणेतील बिघाडामुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी इलेक्ट्रिकल ऑडिटला विशेष प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले आहे. मुदतीत काम पूर्ण केले नसल्यास प्रशासनाकडून कारवाईचा इशाराही देण्यात आला. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही मोहीम गांभीर्याने राबवून रुग्णालयांची सुरक्षा यंत्रणा चोख ठेवावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000
‘आयुष्मान आरोग्य मंदिर’मधून सर्वंकष आरोग्य सेवा बळकट
*जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशिक्षणाला सुरवात
अमरावती, दि. 7 (जिमाका): राज्यातील ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ येथे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ प्रशिक्षण मोहीम राबवली जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. यातून सर्वकष आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली उजळणी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ग्रामीण आणि तळागाळातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सक्षम आणि लोकाभिमुख आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण होत आहे. दोन दिवसीय कार्यशाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांना तांत्रिक आणि प्रात्यक्षिक शिक्षण दिले जात आहे. यामध्ये 13 प्रकारच्या विविध आरोग्य सेवा आणि 14 प्रकारच्या तपासण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. यात गरोदर मातेची काळजी, सुरक्षित प्रसूती आणि बालकांचे वेळेवर लसीकरण, किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य समस्या आणि समुपदेशन, क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या आजारांवर नियंत्रण, मधुमेह, उच्च रक्तदाव आणि कर्करोग यांचे वेळेत निदान व व्यवस्थापन यासह मानसिक आरोग्य, वृद्धपकाळातील आरोग्य व उपशामक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, डोळे-नाक-कान-घसा व मौखिक आरोग्य तसेच योग व आयुष पद्धतींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र आणि रुग्णालय प्रशिक्षण केंद्र येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत हे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक सहभागी झाले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी आणि टीमच्या नियोजनामुळे या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी सांगितले.
000000
जिल्ह्यातील सीजीडब्ल्यूबी भूजल डेटा विषयावर कार्यशाळा
अमरावती, दि. 7 (जिमाका) : केंद्रीय भूजल बोर्ड (सीजीडब्ल्यूबी) मध्यक्षेत्र नागपूर आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण अमरावती कार्यालयाच्यावतीने ‘अमरावती जिल्ह्याती सीजीडब्ल्यूबी भूजल डेटा आणि राष्ट्रीय जलभृत मानचित्रण व व्यवस्थापन अभ्यासाचा प्रसार-उपयोग’ विषयावर बचत भवन येथे ३ सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे होते. सीजीडब्ल्यूबी मध्यक्षेत्र नागपूरच्या शास्त्रज्ञ श्रद्धा जैन यांनी, ‘अमरावती जिल्ह्यातील ‘नाक्विम’च्या निष्कर्षांवर’ तर याच संस्थेचे शास्त्रज्ञ हितेश रामटेके यांनी सीजीडब्ल्यूबीच्या भूजल पोर्टलबाबत सादरीकरण केले. याच कार्यशाळेत अमरावती जिल्ह्याचा नाक्विम व्यवस्थापन आराखडाही सामायीक करण्यात आला.
उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी भूजल डेटाच्या प्रसारासाठी सीजीडब्ल्यूबीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत जिल्हा पातळीवरील नियोजन व शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी उपलब्ध संसाधनाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे आपल्या उद्बोधनात सांगितले. कार्यशाळेला जीएसडीए,महानगर पालिका,जिल्हा परिषद लघुसिंचन,जलसंपदा विभाग,मजीप्रा,आरडब्ल्यूएसएस,जि
०००००
माहुली जहागीर ग्रामपंचायतीला २५ लाखांची बक्षिस रक्कम मंजूर
‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत अमरावती विभागात पटकावला होता पहिला क्रमांक
अमरावती, दि. 7 (जिमाका) : उत्कृष्ट कार्यकरत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’मध्ये अमरावती विभागात पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावणाऱ्या माहुली जहागीर ग्रामपंचयातीच्या सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करत आज ५० लाखांच्या एकूण बक्षीसातील उर्वरीत २५ लाखांची रक्कम वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
‘माझी वसुंधरा अभियान ४.०’मध्ये बक्षीस पटकाविणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त डीपीआर अंतर्गत माहुली जहागीर ग्रामपंचायतीच्या अहवालावर चर्चा करून उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीअंती ७ सप्टेंबर २०२६ पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने शासन निर्णयाद्वारे ही प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत ५ ते १० हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचातींच्या गटात अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या माहुली जहागीर ग्रामपंचायतीस एकूण बक्षीस रकमेच्या ५० टक्के म्हणजेच २५ लाखांची रक्कम यापूर्वीच वितरीत करण्यात आली आहे. आजच्या शासन निर्णयाद्वारे ग्रामपंचायतीच्या डीपीआरमधील कामांसाठी उर्वरीत २५ लाखांची रक्कम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीकडून शासनास सादर डिपीआरमध्ये ग्रामपंचयातीच्या दुतर्फा झाडे व कुंपन लावणे,वार्ड क्र.३ मध्ये झाडे लावणे,ग्रामपंचायतीवर ४ के.व्ही.क्षमतेचे सोलार उभारणे,गावासाठी पाणी पुरवठा होणाऱ्या विहिरीवर १० के.व्ही.क्षमतेचे सोलार उभारणे, गावात एलईडी दिवे बसवीणे, गावातील ८ही अंगणवाडयांमध्ये पावसाच्या पाण्याच्या संचयनाची व्यवस्था करणे आदी कामांचा अंतर्भाव आहे.
०००००
राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारात महाराष्ट्राचा गौरव
शहरांमध्ये अमरावती मनपा आणि नाशिक मनपा वॉर्ड क्रमांक सात देशात तृतीय
नवी दिल्ली, दि. ७ : शहरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार, तर नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ ला वॉर्डस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला आहे. अमरावतीला २५ लाख रुपये, तर नाशिकच्या वॉर्ड क्रमांक ७ ला ३० लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
नवी दिल्ली येथील इंदिरा पर्यावरण भवनातील गंगा सभागृहात आयोजित राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय हरित अधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाचे अध्यक्ष राजेश वर्मा, पर्यावरण सचिव तन्मय कुमार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमनदीप गर्ग यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमरावती मनपाची उल्लेखनीय कामगिरी
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ३ ते १० लाख लोकसंख्या गटात अमरावती शहराने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. यासाठी शहराला २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
नाशिकच्या वॉर्ड क्रमांक ७ चा राष्ट्रीय गौरव
वॉर्डस्तरीय स्वच्छ वायू सर्वेक्षणात ३० हजारांहून अधिक लोकसंख्या गटात नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ ने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वॉर्डला ३० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके, उपमहापौर विलास शिंदे, अमित रंजन यांच्यासह प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.
‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ मधील राज्यस्तरीय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील पुणे येथील वॉर्ड क्रमांक ४ व ७ आणि अमरावती येथील वॉर्ड क्रमांक १२ यांची निवड करण्यात आली आहे. या वॉर्डमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या वॉर्डना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
देशातील उत्कृष्ट शहरांचाही गौरव
१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात उत्तर प्रदेशातील लखनौने प्रथम, मध्य प्रदेशातील इंदूरने द्वितीय, तर जबलपूरने तृतीय क्रमांक मिळविला. ३ ते १० लाख लोकसंख्या गटात ओडिशातील राऊरकेला प्रथम, तर फिरोजाबाद आणि गुंटूर यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या गटात कलिंग नगर, अंगुल आणि तालचेर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.
राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकूण ५ कोटी २५ लाख रुपये, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वॉर्डना २ कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.
0000000





No comments:
Post a Comment