Tuesday, September 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08.09.2026


 4 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा जेरबंद केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू

 

मृत्यूचे प्राथमिक कारण समोर; अंतिम अहवालाची प्रतीक्षा

 

 

अमरावती, दि. 8 (जिमाका) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार नागरिकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर वन विभागाने जेरबंद केले होते. परंतु, सोमवारी (७ सप्टेंबर )सायंकाळी या वाघिणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर 'कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर' मुळे (हृदय व श्वासोच्छवास बंद पडल्याने) वाघिणीचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून मृत्यूचे नेमके व अचूक कारण स्पष्ट होण्यासाठी वाघिणीच्या अवयवांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती, अमरावती प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी दिली आहे.

 

     या वाघिणीला शिरजगाव कसबा परिसरात जेरबंद करण्यात आले होते.

चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी आणि शिरजगाव कसबा परिसरात या वाघिणीने २४ तासांत दोन जणांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण होते. वन विभागाच्या विशेष पथकाने ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास शिरजगाव कसबा परिसरात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)  च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुंगीचे औषध  देऊन या वाघिणीला यशस्वीरीत्या जेरबंद केले होते.

 

          प्रमाणभूत प्रचलित कार्यपद्धतीनुसार वाघिणीला बेशुद्ध केल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूकडून तिच्यावर तातडीने पुढील औषधोपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, वाघिणीने या उपचारांना पुरेसा प्रतिसाद दिला नाही.परिणामी, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

            मंगळवारी, ८ सप्टेंबर २०२६ रोजी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने एनटीसीएच्या नियमावलीनुसार मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालानुसार, प्रथमदर्शनी वाघिणीच्या मृत्यूचे कारण 'कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर' (हृदय व श्वासोच्छवास बंद पडणे) असल्याचे समोर आले आहे.

 

             वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी मारण्यात आलेला डार्ट आणि औषधाच्या तीव्रतेबाबत विविध प्रसारमाध्यमांवर तसेच वृत्तपत्रांमध्ये उलटसुलट चर्चा व तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने स्पष्ट केले आहे की, मृत्यूचे नेमके व अचूक कारण स्पष्ट व्हावे यासाठी वाघिणीच्या अवयवांचे नमुने 'हिस्टोपॅथॉलॉजी' आणि 'टॉक्सिकॉलॉजी' चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहेत. या प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतरच वाघिणीच्या मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट होईल, असे उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी सांगितले आहे.

००००००


17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद

 

विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

 

 

अमरावती, दि. 8 (जिमाका) : भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स येत्या १७ सप्टेंबर रोजी अमरावती येथे येणार आहे. या भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहेत.

 

            राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या कार्यक्रमांतर्गत स्टास्क फोर्स १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथे  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संवाद साधणार आहेत. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.

                  amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय पाठवू शकतात.

 

            टास्क फोर्स येत्या १२ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यातील ६ महसुली विभागाला भेट देणार असून  या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.                                                                

0000000


रोजगाराची संधी असलेल्या प्रशिक्षणाचे नियोजन करावे

 

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

 

अमरावती, दि. 8 (जिमाका) : युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील युवकांना टुरीझम हॉस्पीटॅलीटी आणि होम केअरटेकर यासारख्या क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी निर्माण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज कौशल्य विकास विभागाची बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर उपस्थित होत्या. बैठकीत जिल्ह्यात येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाबाबत माहिती देण्यात आली.

 

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यात लवादा येथे बांबूचे प्रशिक्षण देण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते. यादृष्टीनेही विचार करण्यात यावा, अशी सूचना केली. तसेच इतर राज्यातून प्रामुखने हॉटेल क्षेत्रात युवक पुढे येत आहे. एका राज्यातून प्रशिक्षण घेऊन हे युवक इतर राज्यात रोजगार करीत आहे. यासारखा प्रयोग जिल्ह्यातही व्हावा. राज्यातील मोठ्या शहरात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर या प्रशिक्षणाची बॅच सुरू करावी.

 

 

संत गाडगेबाबत अमरावती विद्यापीठ ईव्ही वाहनांच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. याठिकाणी ईव्हीचे प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात यावी. युवकांना कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे, तसेच प्रशिक्षणानंतर रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. येत्या 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 15 ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात येणार आहे. यात अनुभव असलेल्या युवकांना सामावून घ्यावे. तसेच खासगी कंपन्यांकडून रोजगार देताना अनुभव असलेल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

 

 

यावेळी किमान कौशल्य योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदींचा आढावा घेण्यात आला.

000000

15 ठिकाणी ‘पंडित  दिनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’


पंतप्रधानांच्या जन्म दिनाच्या औचित्याने 29 सप्टेंबर रोजी आयोजन


 

         अमरावती, दि. 8 (जिमाका)  : कौशल्य ,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने 29 सप्टेंबर रोजी राज्यात 500 ठिकाणी ‘पंडित  दिनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत अमरावती जिल्ह्यात तालुका मुख्यालयासह एकूण 15 ठिकाणी हे आयोजन होणार आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवार आणि नियोक्त्यांसाठी ऑनलाईन  नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. 


             ‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत अमरावती शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि एम.आय.डी.सी. स्किल सेंटर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. वरुड येथील स्व. माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय,अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,चांदूरबाजार येथील गो.सी.टोम्पे कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, अचलपूर येथील जगदंबा महाविद्यालय,चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालय,मोर्शी येथील भारतीय महाविद्यालय,तिसवा येथील वाय.डी.व्ही.डी. कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,चिखलदरा येथील सिपना महाविद्यालय,धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालय,दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालय,नांदगाव खंडेश्वर येथील विनायक महाविद्यालय,धामनगाव रेल्वे येथील श्रीराम कला महिला महाविद्यालय आणि भातकुली येथील महात्मा फुले महाविद्यालयात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.


            रोजगार संधीच्या शोधात असलेल्या व या मेळाव्यामध्ये  सहभागी होऊ इच्छिनाऱ्या  उमेदवारांना https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7  लिंकद्वारे तर या मेळाव्यात उपस्थित राहून आपल्या उद्योग समुहातील रिक्त पदावर उमेदवरांची निवड करून इच्छिणारे उद्योग समूह,एमएसएमई,आस्थापना व नियोक्त्यांनी https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6  अर्ज भरुन आवश्यक माहिती अचूक व पूर्णपणे सादर करण्याचे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून करण्यात आले आहे.

०००००


अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा संपन्न

 

 

अमरावती, दि. 8 (जिमाका): 'भारतीय उद्योग क्षेत्र २०४७ : भवितव्य आणि आव्हाने' या मध्यवर्ती संकल्पनेवर येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल सायन्स अँड इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये ३ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

 

            राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग-अमरावती, अमरावती विभागीय विज्ञान अध्यापक मंडळ आणि डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल सायन्स अँड इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

              अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके-गुल्हाने यांच्या हस्ते या विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय विज्ञान सल्लागार राजेश मनवर उपस्थित होते.

 

              विज्ञान मेळाव्यात सहभागी अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 'भारतीय उद्योग क्षेत्र २०४७ : भवितव्य आणि आव्हाने' विषयावर विचार मांडले व बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा उत्तीर्ण केली. या दोन्ही गुणांच्या आधारे राज्यस्तरीय मेळाव्याकरिता शेगाव येथील सेंट झेवियर हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी भारसाकडे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर परतवाडा येथील सॅक्रेड हार्ट स्कूलच्या दिव्यांशू खंडेजोड याने द्वितीय क्रमांक पटकाविला तर अमरावती येथील स्कूल ऑफ स्कॉलरशिप अवनीश बावस्कर ने उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले.

००००००

‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान

 

प्रलंबित महसुली दावे तडजोडीने मिटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

अमरावती, दि. 8 (जिमाका) : महसूल विभागातर्फे 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले जमिनीशी संबंधित महसुली दावे तडजोडीने व आपापसांतील सहमतीने कायमस्वरूपी निकाली काढले जाणार आहेत. या अभियानाचा लाभ घेऊन प्रलंबित महसुली दावे तडजोडीने मिटवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

 

महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. ही समस्या दूर करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर हे अभियान राबवले जात आहे. प्रलंबित दाव्यांमधील दोन्ही पक्षकार तडजोड योजनेअंतर्गत अर्ज सादर करू शकतील. प्राप्त अर्जांनुसार महसूल लोक अदालतीचे आयोजन करून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणांवर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि ते कायमस्वरूपी निकाली काढले जातील.

 

जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांनी आपापल्या क्षेत्रातील प्रलंबित दाव्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तडजोड करावी. नागरिकांनी संबंधित कार्यालयांशी त्वरित संपर्क साधून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...