Friday, January 5, 2018


 राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे शानदार समारंभात वितरण
जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्याबद्दल अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा गौरव

अमरावती, दि. 5 : सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अभियानाच्या उत्कृष्ट वृत्तांकनाबद्दल एबीपी माझा वृत्तवाहिनीचे अमरावती येथील प्रतिनिधी शशांक चवरे यांना यावेळी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात काल झालेल्या सोहळ्यात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम झालेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ति,संस्था, अधिकारी व पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर,जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, मृद व जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.  
  गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून या वर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असून या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात  753 गावात 18 हजार 524 कामे करण्यात आली असून, 1 लाख हेक्टरहून अधिक सिंचन क्षमता निर्माण झाली. अभियानाच्या सुरुवातीपासूनच अमरावती जिल्ह्याने विभागात आघाडी घेतली.  तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी जिल्ह्यातील अनेक गावांत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली, तसेच वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून  लोकसहभाग मिळवत कामांना गती देण्यात आली. त्यामुळे विभागातून पुरस्कारासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात आली.
 पत्रकारांसाठीचा प्रथम पुरस्कार अविनाश अंकुशराव कदम, दै.पुण्यनगरी, पुणे; द्वितीय पुरस्कार संदीप दत्तू नवले, ॲग्रोवन,अहमदनगर; तृतीय पुरस्कार श्रीमती संगिता हनुमंतराव भापकर, दै.सकाळ यांना, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रथम पुरस्कार रवींद्र शिवाजी कांबळे, सांगली; द्वितीय पुरस्कार शशांक रमेश चवरे, अमरावती;तृतीय पुरस्कार शशिकांत पाटील, लातूर यांना देण्यात आला.  

00000



Friday, December 29, 2017

‘बेटी पढाओ’च्या नावाखाली फसवणूकीच्या घटना
नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे आवाहन

अमरावती, दि. 29 : अस्तित्वात नसलेल्या ‘बेढी पढाओ’ योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी नागरिकांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे.
वरुड परिसरात बेटी पढाओ  योजना अस्तित्वात असल्याचे दाखवून त्याचा फॉर्म भरुन शुल्क वसूल करण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. केंद्र व राज्य शासनाची अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. चुकीची माहिती देऊन काही लोकांकडून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणारी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. नागरिकांनी याप्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे.
00000

Thursday, December 28, 2017

दाजीसाहेब पटवर्धनांचे कार्य समाजासाठी सतत प्रेरणादायी
-  पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती, दि. 28 : शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. तपोवन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेली रुग्णसेवा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे  प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.
डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या डाक तिकीट अनावरणाचा समारंभ तपोवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी अध्यक्षस्थानी होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिष अगरवाल,  नागपूर विभागाच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती मरियम्मा तोमस, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष गवई, झुबीन दोटीवाला, डॉ. नितीन धांडे व विवेक मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
            श्री. पोटे- पाटील म्हणाले की, दाजीसाहेबांचे कणखर व नि:स्पृह व्यक्तिमत्व पुरस्कारांच्या पलीकडे जाणारे होते. त्यांची कार्यावरील निष्ठा अविचल होती. त्यांच्या या त्यागातून विदर्भ महारोगी सेवा मंडळ- तपोवनसारखी भव्य सेवाभावी संस्था उभी राहिली. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना स्फूर्ती देत राहील.
श्री. अडसूळ म्हणाले की, चांगल्या कार्याची समाज सतत नोंद घेत असतो. कालांतराने सरकारलाही ही नोंद घ्यावी लागते. आज दाजीसाहेबांच्या जीवनकार्याचे डाक तिकीट अनावरण ही आनंददायी घटना आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या आग्रहास्तव दाजीसाहेबांनी पद्मश्री स्वीकारली खरे; पण तपोवनातील एक मुलगी दत्तक घेण्याची अटही त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींना घातली. त्यांची ध्येयनिष्ठा त्यातून दिसून येते.
डॉ. बोंडे, श्री. राणा, श्री. अगरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.  यावेळी अनेक मान्यवरांनी  डॉ. पटवर्धनांच्या जिवनावर प्रकाश टाकला. डॉ. गवई यांनी प्रास्ताविकातून दाजीसाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अब्दुल रशीद यांनी सूत्रसंचालन केले. वसंत बुटके यांनी आभार मानले.
                                                                        00000



Wednesday, December 27, 2017

खेळातून व्यक्तिमत्व घडवा
                                        -शिक्षण मंत्री विनोद तावडे
          अमरावती, दि. 27 : खेळामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक विकास अधिक प्रभावीपणे होतो. हे लक्षात घेऊन शासनाने खेळांना प्रोत्साहनपर अनेक उपक्रम सुरु केले आहेत, असे सांगतानाच, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळांसाठीही पुरेसा वेळ द्यावा. खेळांतून व्यक्तिमत्व घडवा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज विद्यार्थ्यांना केले.
येथील अंबिकानगर शाळेच्या प्रांगणात शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सर्वश्री अनिल बोंडे, रवि राणा, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, उपमहापौर संध्याताई ठाकरे, मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी आदी उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर श्री. तावडे यांनी व्यासपीठावरुन भाषण न करता थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थी कुठले खेळ खेळतात, याची प्रत्येकाकडे विचारपूस त्यांनी केली. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी क्रिकेटसह खो-खो, कबड्डी, कुस्ती असे पारंपरिक खेळही खेळावे.  स्वत:त ‘स्पोर्टस् स्पिरीट’ निर्माण करावे. व्हिडीओ गेम, मोबाईलपेक्षा मैदानी खेळांसाठी वेळ काढावा. त्यामुळे शरीराचा व्यायाम होऊन चैतन्य निर्माण होते.व बौद्धिक क्षमताही वाढते.
खेळाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा म्हणून शिक्षण विभागाकडून खेळाडूंना वार्षिक परीक्षेत अतिरिक्त गुणांची तरतूद, तसेच उत्कृष्ट खेळाडूंना नोकरीसाठी आरक्षण दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.  क्रीडा स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. खेळामध्ये नैपुण्य मिळवणा-या संजय तिरथकर, निखील सारवान ( कुस्ती ), विजय भुयार (विदर्भ स्तरीय शरीरसौष्ठव), गोकुल येवले (धावपटू) आदी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्‍ह देऊन गौरव यावेळी करण्यात आला.
समारंभात भरतनाट्यम नृत्य सादर करणा-या मनपा शाळा क्र.17 चे विद्यार्थी, लेझीम नृत्य सादर करणा-या मनपा शाळा क्र. 14, तसेच सायकल मल्लखांब प्रात्यक्षिक सादर करणा-या एकलव्य गुरुकुल शाळेच्या (नांदगाव खंडेश्वरच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी अभिनंदन केले.
महानगरपालिका शालेय क्रीडा महोत्सव हा 27 व 28 डिसेंबर दोन दिवस चालणार आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या 80 टक्के शाळा डिजीटल झाल्या आहेत. स्काऊट गाईडद्वारा मनपा शाळेतील विद्यार्थी अमेरिकेत प्रात्यक्षिके सादर करणार आहेत, अशी माहिती शिक्षण सभापती चेतन गावंडे यांनी प्रास्ताविकातून यावेळी दिली.
00000





दर्जेदार शिक्षण सर्वदूर पोहोचविण्यासाठी 'व्हर्च्युअल सी४' उपयुक्त
                - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे
अमरावती, दि. 27: अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देऊन  शिक्षणाची गुणवत्ता वाढवत ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण  पोहोचविण्यासाठी 'व्हर्च्युअल सी४'  उपयुक्त ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात व्हर्च्युअल कॅम्पस टू काॅलेज अँड कम्युनिटी सेंटर (व्हर्च्युअल-सी४), तसेच विद्यापीठाच्या नव्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय  आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, महाराष्ट्राचा सम्यक विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विदर्भासह सर्व भागात नवनव्या उद्योगांच्या उभारणीसह कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी अनुकूल अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. 'व्हर्च्युअल सी४' च्या माध्यमातून विद्यापीठाशी विविध महाविद्यालये थेट जोडली जाऊन सामाजिक व विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वदूर पोहोचू शकेल.
         डॉ. चांदेकर यांनी
  'व्हर्च्युअल सी ४'बाबत माहिती दिली. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते मंत्री श्री. तावडे यांना संत गाडगेबाबांचे चरित्र भेट देण्यात आले.




00000
डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे अभिवादन कार्यक्रम

रोजगारक्षम शिक्षणातून समाजाचा विकास
                                                                   उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे
अमरावती, दि. 27: स्थानिक परिसरातील विकासप्रक्रियेशी अभ्यासक्रम जोडून रोजगारक्षम शिक्षणावर राज्य शासनाकडून भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण व रोजगारक्षम शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
         डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 119 व्या जयंती निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार अशोक उईके, जि. प. बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, माजी अध्यक्ष अरूण शेळके आदी उपस्थित होते.
 
        श्री. तावडे म्हणाले की,
 भाऊसाहेबांनी शिक्षण प्रसारासह शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठीही प्रयत्न केले. शासनाकडून शिक्षणात काळानुरुप बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या भागातील विकासप्रक्रियेत येथील मनुष्यबळ सामावून घेण्यासाठी त्यांच्यात कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम शैक्षणिक संस्थांनी सुरु केले पाहिजेत. शासनाकडून अशा रोजगारक्षम शिक्षणावर भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण व रोजगारक्षम शिक्षणातून बहुजन समाजाचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.  श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे कार्य मोठे असून, संस्थेने स्वायत्त विद्यापीठाची मान्यता घेतल्यास त्यांना स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अभ्यासक्रम सुरु करता येतील.  त्यासाठी शासनाकडून संस्थेला संपूर्ण साह्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  
       श्री. पोटे-पाटील म्हणाले की, भाऊसाहेबांनी मोठ्या त्यागातून संस्थेची उभारणी व विस्तार केला. बहुजनांसाठी ज्ञानगंगा  आणली. भारत कृषक समाजाच्या माध्यमातून शेतक-यांसाठी मोठे कार्य केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जगभरात विविध पदे मिळवून उज्ज्वल कामगिरी केली आहे व करत आहेत.
हे भाऊसाहेबांचे मोठे योगदान आहे.
       दहावी अनुत्तीर्णांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना तत्काळ पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आली. त्याचा लाभ ३५ हजार विद्यार्थ्यांना झाला. असे अनेक नवे निर्णय शिक्षण क्षेत्रात लोकाभिमुख बदल घडवत आहेत, असेही ते म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले की, भाऊसाहेबांनी त्याग, कष्ट व तळमळीतून बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविले. त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधीलकीतून संस्था वाटचाल करत आहे.
संस्थेतर्फे डिजिटलायझेशन आदी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
वीर उत्तमराव मोहिते यांनी लिहिलेल्या भाऊसाहेबांच्या चरित्राचा इंग्रजी अनुवाद, भाऊसाहेबांच्या विविध भाषणांचा संग्रह, तसेच संस्थेच्या दैनंदिनीचे प्रकाशन यावेळी झाले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांनी आभार मानले.
00000













Tuesday, December 26, 2017

‘मागेल त्याला शेततळे’चे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करावे
-       जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 26 : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत भरीव कामे होण्यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट निश्चित करुन दिलेली आहेत. तथापि, काही तालुक्यांत पुरेशी कामे नाहीत. निश्चित उद्दिष्ट  पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आज येथे सांगितले.
शेततळे व गटशेती योजनेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. बांगर म्हणाले की, खारपाणपट्ट्यातील तालुक्यांत भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक कृषी सहायकामागे 50, तर इतर तालुक्यात 20 शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. कृषी अधिका-यांसह उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनाही या कामाबाबत निर्देश देण्यात आले आहेत. काही तालुक्यांमध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले; पण प्रत्यक्षात कामे सुरु झाली किंवा कसे, याची माहिती द्यावी व कामे तत्काळ पूर्ण करावी. 
गटशेतीचे प्रस्ताव परिपूर्ण असावेत
शेतकरी गट कंपन्यांच्या प्रकल्प विकास आराखड्यात क्षेत्र, नकाशे, खर्च, त्याची सामुदायिक व वैयक्तिक विभागणी असा सुस्पष्ट उल्लेख असावा. शेती क्षेत्र शक्यतो सलग असावे.  नकाशावर शेतीचे क्षेत्र सर्वे क्रमांकासह स्पष्ट असावे. आराखडा मंजूर झाल्यानंतरच काम सुरु करावे. अनुदानाच्या मर्यादेत सहली आ‍दी अतिरिक्त खर्च करावा. प्रशिक्षणही उत्पादनवाढ, विपणन आदींसाठी उपयुक्त असले पाहिजे.
या बैठकीला जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उदय काथोडे, आत्माचे प्रकल्प संचालक ए.के. मिसाळ व अनेक तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...