Monday, April 8, 2019

क्रीडा संकुलात लोकशाहीचा जागर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा - केंद्रिय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांचे आवाहन


‘स्वीप’ला मिळाले उत्स्फूर्त लोकसहभागाचे बळ








क्रीडा संकुलात लोकशाहीचा जागर

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा
            - केंद्रिय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांचे आवाहन
·         विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिकांची उपस्थिती
·         अनेक लक्षवेधी उपक्रम
·         मानवी साखळीतून संदेश

अमरावती, दि. 8 : संकल्‍प मतदानाचा, गुढी मतदानाची……सक्षम बनवू लोकशाही भारताची’... अशी साद मतदारांना घालत मतदार जनजागृती मोहिमेत आज विभागीय क्रीडा संकुलात लोकशाहीचा जागर करण्यात आला. उत्स्फूर्त लोकसहभागाचे बळ मिळालेल्या या भव्य कार्यक्रमात शेकडो मतदारांनी मतदान करून राष्ट्राप्रती कर्तव्यनिष्ठेची शपथ घेतली.
लोकशाही मजबुत करण्यासाठी मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी सहभागा घेऊन मतदान हक्क बजावावा, असे आवाहन केंद्रिय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांनी यावेळी केले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, स्वीपच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजय निपाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक आनंद भंडारी,सहा. आयुक्त श्रीमती मंगला मून, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती निलिमा टाके, सहायक प्रकल्प अधिकारी चेतन जाधव यांचेसह पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संघटना, दिव्यांग शाळेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी आदी यावेळी उपस्थित होते.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान जागृती गुढी उभारून कार्यक्रमाचा आरंभ झाला.  जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य प्राप्त खेळाडूव्दारे चुनावी ज्योत प्रज्ज्वलित करण्यात  आली. कार्यक्रमस्थळी मतदारांच्या जागृतीसाठी रांगोळी स्‍पर्धेतून संदेश, मानवी साखळी, चुनाव भिंत रंगविणे स्‍पर्धा, सेल्‍फी बुथ, दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपीतून प्रात्यक्षिक, साईन बोर्डवर स्वाक्षरी, मतदान जनजागृती स्टिकर लावणे तसेच व्‍हीव्‍हीपॅटचे प्रात्‍यक्षिक आदी उपक्रम यावेळी घेण्यात आले.
श्री. सिंह म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मतदान केंद्रांवर सतरा सुविधांचे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारांच्या जनजागृतीसाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात आली आहे. यावेळी देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करण्यासाठी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे  व परिसरातील लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कर्तव्यनिष्ठा जपून निर्भयपणे मतदान करण्याची शपथही यावेळी सर्वांनी घेतली.
 संकल्‍प मतदानाचा, गुढी मतदानाचीया कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. आपले व पर्यायाने समाज व देशाचे भवितव्य घडविण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करणे आवश्यक आहे. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकानी मतदान करुन आपला हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी केले.

यावेळी ‘जागर मतदानाचे’ या संकल्पनेवर आधारित इन्डो-पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यातर्फे गीत, नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे पोवाडा, विद्यापीठाच्या चमूव्दारे पथनाट्य, दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपी व ऑडिओ क्लीपव्दारे संदेश प्रसारण, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
   शिक्षीका दिपाली बाभूळकर यांनी ‘दुनिया बोलक्या बाहुल्यांची’ हा सुंदर कार्यक्रम सादर करुन उपस्थितांचे मनोरंजनासह प्रबोधनही केले. मतदान कर्तव्याचा संदेश देणा-या  मानवी साखळीचे दृश्य खिळवून ठेवणारे ठरले.   
कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, पंचायत समिती कर्मचारी, आशा वर्कर, जिल्हा परिषदेचे शिक्षकवृंद, मनपा कर्मचारी, स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी व अन्य प्रशासकीय यंत्रणांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या नागरिकांची संख्या मोठी होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, दिलीप मानकर, सहायक समाजकल्याण आयुक्त सुनील वारे आदी उपस्थित होते.

0000000

Thursday, April 4, 2019

केंद्रीय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांच्या उपस्थितीत सुक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण




अमरावती, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कालावधीत मतदानाच्या कार्यात कुठलिही तांत्रिक किंवा अतांत्रिक बाधा निर्माण होवू नये म्हणून सुक्ष्म निरीक्षकांची (मायक्रो आर्ब्झरर्व्हर) नेमणूक करण्यात येते. त्याअनुषंगाने अमरावती लोकसभा मतदार संघाकरीता केंद्र सरकारच्या खात्यातील एकूण 81 अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्रीय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे झाले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अधिक्षक तथा प्रशिक्षण व्यवस्थापन नोडल अधिकारी राम लंके यांचेसह निवडणूक शाखेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्वस्थ आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूकीच्या कामासाठी नेमणूक झालेल्या प्रत्येकाने सोपविलेले काम जबाबदारीपूर्वक साभांळावे. संवेदनशील व दुर्गम भागातील मतदान केंद्रावर देखरेख, ईव्हीएम मशीन सीलबंद करणे, निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्रासाठी लागणारे साहित्याच्या नोंदी आदी कामे सुक्ष्म निरीक्षकांमार्फत करण्यात येतात, अशी माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांनी दिली. सुक्ष्म निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक हे राष्ट्रीय कार्य समजून त्यांना सोपविलेली जबाबदारी गांर्भीयाने सांभाळावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
श्री. पाटील यांनी प्रारंभी सुक्ष्म निरीक्षकांची निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सुक्ष्म निरीक्षकांची भूमिकेविषयी सांगितले. प्रशिक्षण व्यवस्थापन नोडल अधिकारी श्री. लंके यांनी मतदान प्रक्रियेमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन कसे कार्यान्वित करावे, ईव्हीएम मशीनसह संपूर्ण संच सीलबंद करणे आणि प्रत्येक यंत्राची कशाप्रकारे काळजी व सावधगिरी बाळगावी याविषयी सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना दिली. आज आयोजित सुक्ष्म निरीक्षकांच्या प्रशिक्षणाला केंद्र सरकारच्या विविध खात्यातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

Wednesday, April 3, 2019

उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशिल सादर करावा - निवडणूक खर्च निरीक्षक बसंत गढवाल



निवडणूक खर्च निरीक्षंकानी घेतला उमेदवारांच्या खर्चाचा आढावा

अमरावती, दि. 3 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कालावधीत होणाऱ्या प्रत्येक खर्चाचा तपशील देणे उमेदवारांना बंधनकारक आहे. उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशील पुराव्यानिशी (पावती) निवडणूक खर्च कक्षाला नियमित सादर करावा, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक बसंत गढवाल यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत आढावा श्री. गढवाल यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल, निवडणूक खर्च नोडल अधिकारी रविंद्रकुमार लिंगनवाड तसेच उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री. गढवाल म्हणाले की, ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत बँक खात्याची माहिती खर्च निरीक्षक कक्षाला सादर केलेली नाही त्यांनी तातडीने बँक खात्याची माहिती सादर करावी. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना प्रशासनाकडून पिवळे, गुलाबी व पांढऱ्या रंगाचे खर्च नोंदीचे रजिस्टर वितरीत करण्यात आले आहे. या रजिस्टरमध्ये दैनंदिन खर्च नोंदवून त्याच्या पावत्या निवडणूक खर्च कक्षाला सादर करणे अनिवार्य आहे. उमेदवाराला फक्त 10 हजार रुपये हातची रोकड म्हणून बाळगता येईल. निवडणूक खर्च तपासणी पथकाव्दारे उमेदवारांच्या दैनंदिन खर्चासंदर्भात खर्च निरीक्षकांना अहवाल सादर केला जातो. त्यासंदर्भातील नोंदी सत्यापीत करण्यासाठी उमेदवारांनी दैनंदिन खर्च बाबत आवश्यक दस्ताऐवज कक्षाला सादर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नवाल म्हणाले की, उमेदवारांनी सी-3 फॉर्म नुसार तीनवेळा इलेक्टॉनिक्स व प्रिंन्ट मिडियामध्ये गुन्ह्यासंदर्भात प्रसिध्दी देणे आवश्यक आहे व त्याचे पुरावे निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावे. प्रचार साहित्य प्रमाणित करुन घेण्यासाठी पॉम्पलेटस्, पोस्टर, भित्तीपत्रके, फॅ्लेक्स इ. प्रचार सहित्यावर  मुद्रणालयाचे नाव स्पष्टपणे नोंदविण्यात यावे व त्यासोबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. प्रत्येक उमेदवाराने बँक खात्याचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे. तसेच सर्व आर्थिक व्यवहार हे बँक खात्यामार्फतच व धनादेशाव्दारे करण्यात यावे, अशा सूचना श्री. नवाल यांनी बैठकीत दिल्या.
 आज आयोजित बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी दिनांक  10 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहावे, तसेच दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणूक खर्च कक्षाला नियमित सादर करण्यात यावा, असेही निवडणूक खर्च कक्षाव्दारे उपस्थितांना सूचित करण्यात आले.
00000

सोशल मिडीया सनियंत्रणासाठी ‘एमसीएमसी’कडे अद्ययावत यंत्रणा आय- गॅटच्या सहकार्याने करणार सोशल मीडियाचे सनियंत्रण




अमरावती, दि. 3 : निवडणूक काळात प्रचारात चुकीच्या बाबींना आळा घालण्यासाठी आय गॅट या अद्ययावत टुलचा वापर करून सोशल मीडियाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयातील सायबर कक्षात सोशल मीडियातून हे सनियंत्रण करण्यात येणार असून, प्रचारादरम्यान उमेदवार किंवा समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
सोशल मीडिया सनियंत्रणासाठी काटेकोर कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार आय- गॅट हे अद्ययावत टुल उपलब्ध करून घेण्याचा सायबर सेलचा प्रस्ताव समितीच्या बैठकीत सर्वानुमते मान्य करण्यात आला. उप निवडणूक निर्णय अधिकारी उदय राजपूत, आकाशवाणी केंद्रप्रमुख सुनालिनी शर्मा, संवादतज्ज्ञ कुमार बोबडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सायबर सेलचे अधिकारी कांचन पांडे, सहायक सूचना अधिकारी मनीष फुलझेले, आदर्श आचारसंहिता कक्षाचे अधिकारी सचिन पतंगे, सुभाष खोराडे आदी यावेळी उपस्थित होते.  
             समितीकडून दिल्ली स्थित ब्लॅक ट्रॉनिक्स सायबर लॅबने विकसित केलेले आय- गॅट हे टुल फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या सनियंत्रणासाठी वापरण्यात येणार आहे. निवडणूक विभाग, सायबर सेल, जिल्हा माहिती कार्यालयाकडून संयुक्तपणे सनियंत्रणाची कार्यवाही केली जाईल. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा व इतर निवडणूका लक्षात घेत हे टुल दीर्घकाळ उपयुक्त ठरणार आहे.
            भारतातील विविध कायदा व सुव्यवस्था यंत्रणांकडून या टुलचा वापर केला जात आहे. हे टुल गुप्तवार्ता, गुन्हे शोध व सायबर नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोनच्या माध्यमातून विविध प्रकारचे संदेश सोशल मीडियावर प्रसारित केले जातात. अशा कुठल्याही साधनांतून सोशल मीडियावर प्रसारित होणा-या संदेशांचे सनियंत्रण टुलमुळे शक्य होणार आहे.
फेसबुक, ट्विटर, युट्युबसह मोबाईल क्रमांक, ई-मेल हेडर विश्लेषण, गुगल इंटलिजन्स गॅदरिंग, रिझर्व्ह इमेज ट्रॅकिंग, व्हाटसअप, वायबर, लाईन, वुई चॅट, टेलिग्राम, स्काईप, वेबसाईट चेंज, झिरोइंग सेल टॉवर लोकेशन्स, इमेज ट्रॅकिंग आदींच्या माध्यम व साधनांसह इंटरनेटवरील मजकूराचे सनियंत्रण होणार आहे, अशी माहिती सायबर सेलचे अधिकारी श्री. पांडे यांनी दिली.
उमेदवारांनी वृत्तपत्रे, पोस्टर्स, माहिती पत्रिका, फलक, फ्लेक्स, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह सोशल मीडियातील फेसबुक, व्हाटस्अप, ट्विटर आदी कुठल्याही माध्यमातून जाहिराती प्रमाणित करुनच प्रसृत कराव्यात.  नैतिकता, सभ्यतेचा भंग करून समाजाच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखावणा-या किंवा वैयक्तिक चारित्र्यहनन करणा-या, धार्मिक, वांशिक, भाषिक अथवा प्रादेशिक गटांमध्ये किंवा समूहांमध्ये विसंवाद घडविण्यास पोषक ठरेल असा दृश्य किंवा मजकूर प्रसृत करू नये. तसेच, उमेदवारांच्या अथवा पक्षाच्या आलेल्या जाहिरातींच्या खर्चाचा रोजचा रिपोर्ट लेखा पथक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खर्च निरीक्षकांना पाठवावा, अशी सूचना समितीने केली आहे.
                                                      ०००  

Saturday, March 9, 2019

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ पाच लाखांहून अधिक बालकांचे पोलिओ लसीकरण



अमरावती, दि. ९ : आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते इर्विन रुग्णालयात झाला. मोहिमेत ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ८१ हजार ८११  बालकांना ही लस पाजली जाणार आहे.   
पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते गुणिशा जैन या बालिकेला पोलिओ लस पाजून मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह रुग्णालयातील आरोग्यतज्ज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पल्स पोलिओ मोहिमेत  ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना २ लाख ८१ हजार ८११ ही लस पाजली जाणार आहे. पोलिओवर मात करण्यासाठी मोहिम परिपूर्ण नियोजनातून सर्वदूर व सातत्याने राबविण्यात येत आहे, असे यावेळी श्री. पोटे पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागात 1 लाख 76 हजार 977, तर नगरपालिका क्षेत्रात 37 हजार 763 आणि महापालिका क्षेत्रात 67 हजार 71 बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती डॉ. निकम यांनी दिली. जिल्ह्यात सर्वदूर मोहिम राबविण्यात येत असून, एकही बालक वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
00000

Tuesday, March 5, 2019

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची स्थापना



अमरावती, दि. 5 : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक आज झाली. 
निवडणूक काळात विविध उमेदवारांकडून प्रसृत होणा-या जाहिरातींचे प्रमाणीकरण व पेड न्यूजबाबत तक्रारींची तपासणी हे काम समिती करणार आहे. समिती सदस्यांनी निवडणूक आयोगाने निश्चित केलेली नियमावली, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आदींबाबत जाणून घेऊन त्यानुसार काम करावे. समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी यांनी वेळोवेळी नमूद बाबी समितीच्या निदर्शनास आणून  द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी दिले.
समितीचे सदस्य तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार श्रीमती महांडुळे, आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख सुनालिनी शर्मा, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख कुमार बोबडे, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे,  सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी श्री. पवार, सहायक माहिती अधिकारी विजय राऊत, सामान्य सहायक योगेश गावंडे आदी यावेळी उपस्थित होते.
 दरम्यान, निवडणूक शाखेतर्फे आज निवडणूकीसंबंधी विविध कामकाजाला गती देण्यात आली. व्होटर व्हेरिफिकेशन अँड इन्फर्मेशन प्रोग्रॅमअंतर्गत दोन  विशेष मतदार नोंदणी मोहिमा जिल्ह्यात राबविण्यात आल्या.  मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या नागरिकांनी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

सत्तर गाव पाणीपुरवठा योजना गतीने कामे करण्याचे पाणी पुरवठा मंत्री यांचे आदेश मंत्रालयात चर्चा




अमरावती, दि. 5 : सत्तर गाव पाणीपुरवठा योजनेबाबत सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मुंबई येथे दिले.सत्तर गाव पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यासाठी आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे पाटील ,आमदार डॉ अनिल बोंडे उपस्थित होते. शासन निर्णयाप्रमाणे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात पाणी साठा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश  पालकमंत्री श्री पोटे पाटील यांनी दिले. ते म्हणाले की सत्तर गाव पाणीपुरवठा योजनेतून लवकरच  गावांना पाणी उपलब्ध होणार आहे,नागरिकांना पिण्याचे पाणी विनासायास मिळावे असे शासनाचे धोरण आहे.लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सत्तरगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लावावी. मंत्रालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...