Thursday, August 8, 2019

बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे




मुंबई, दि 08 : शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, कीटकनाशके व बी-बीयाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन नमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात बनावट खते, कीटकनाशके व बी-बियाणे यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा अधिक कडक करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
नमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम
खते व कीटकनाशकांचा पहिला नमुना पंधरा दिवसांमध्ये तपासून अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्याचबरोबर पहील्या नमुना गुणवत्तेनुसार अपात्र ठरल्यास दुसरी नमुना तपासणी व अहवाल प्रक्रिया साठ दिवसांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील. यांमध्ये दोन्ही नमुना तपासणी प्रक्रियांमध्ये निर्देशित टक्केवारीनुसार गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळून आल्यास उत्पादन व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तीवर निरीक्षकाद्वारे (इन्स्पेक्टर) गुन्हा दाखल करण्यात येईल. हा गुन्हा दाखल करण्यासाठी कृषी सहसंचालकांना पंधरा दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात येईल.  नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी व तपासणी प्रक्रिया सुलभ व जलद होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विद्यापीठांना अधिसूचित करण्याबाबत प्रस्ताव सादर करा, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
डॉ.बोंडे म्हणाले, प्रथम गुणवत्ता नमुना तपासणी शुल्क हा कंपनी परवाना नोंदणीवेळी आकारण्यात येणार आहे. खतांच्या व कीटकनाशकांच्या पाकीटावर नमूद केलेल्या व प्रत्यक्षातील वजनामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विक्रेत्यांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटा ठेवणे सक्तीचे करण्यात येणार आहे. बिगर नोंदणीकृत खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.  शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी व त्यांना गुणवत्तापूर्ण खते, कीटकनाशके व बी-बियाणे  उपलब्ध करून देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
या बैठकीस, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी सहसचिव गणेश पाटील, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक श्री घावटे, तसेच कृषी विभागाचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते
00000

Saturday, July 27, 2019

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यशाळा अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व बचत गटांचा समावेश करावा -जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. २७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे होणे आवश्यक आहे. योजनेत अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटाचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल येथे दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आयोजित पोकरा कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल इंगळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
श्री. नवाल म्हणाले की, पोकराची अंमलबजावणी भरीव पणे होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांना अधिक प्रोत्साहन द्यावे. अवजारे, शेड, रेफर वाहन, प्राथमिक प्रक्रिया एकत्रिकरण केंद्र, गोदामे, स्वच्छता प्रतवारी गृह आदींसाठी अनुदान  उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी बचत गट, शेतकरी कंपन्या यांना प्रोत्साहित करावे. महिला आर्थिक विकास महामंडळ, जीवनोन्नती अभियान याद्वारे ग्रामविकासाच्या दृष्टीने कृषी पूरक उद्योग व व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न व्हावा. 
यावेळी उपस्थित मार्गदर्शक तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह कृषी विभागाचे अनेक अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते. 


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ संपर्क साधावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



            अमरावती, दि. २७ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान योजना) योजनेत पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या (nic) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अद्यापही लाभ  न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ तलाठी, कृषी सहायक यांच्याशी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढली असून अनेक शेतकरी बांधवांना त्यामुळे लाभ मिळणार  आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गावात ही प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे. योजनेच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी प्रशासनाला दिले आहेत.
          शेतकऱ्यांना थेट मदत व्हावी यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरात राबविण्यात येत असून योजने अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये प्रमाणे तीन टप्प्यात जमा करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने व महसूल, तसेच ग्रामविकास प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी दोन हेक्टर शेतीची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी कार्य करावे. जिल्ह्यात असणाऱ्या एकूण पात्र शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी सुटू नये यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
पात्र शेतकरी बांधवांनी तात्काळ आपल्या गावातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आधारकार्ड, बँक पासबुक प्रत आदी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन श्री. नवाल यांनी केले आहे. 

00000

जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्णमधून महिलांचा विकास करणार - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे







अमरावती, दि. 27 : महिलांचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीमधील नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा विकास करणारे उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. 
वरूड येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आज वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अंजली तूमराम, सरपंच स्वाती आंडे,उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपूते, तालुका कृषी अधिकारी अजय यादवकर, जिल्हा समन्वयक खुशाल राठोड, डॉ. वसूधा बोंडे आदी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले, माविमच्या माध्यमातून महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी त्यांना माफक दरात कर्ज पूरवठा करण्यात येत आहे. महिलांवर दाखविलेला विश्वास महिलांनी कर्ज पूर्ण परतफेड करुन खरा करून दाखविला आहे. महिलांच्या या प्रतिसादामुळे वरूड येथे कापडी पिशवी बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी दोनशे महिलांना रोजगार मिळणार आहे.
बचत गटांनी केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रीत न करता विक्रीवरही लक्ष केंद्रीत करावे. आज बाजारपेठेत माल विकणे ही एक कला असल्याने काही गटांनी यासाठी पुढाकार घ्यावा. आज विविध क्षेत्र बचत गटांसाठी उपलब्ध झाले आहे. गटांनी निंबोळी अर्क, जैविक खत आदी क्षेत्रातही कार्य करावे. यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. बोंडे म्हणाले. 
सुरवातीला मॉ जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला. खुशाल राठोड यांनी सवित्तर मार्गदर्शन केले.
00000

जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्णमधून महिलांचा विकास करणार - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे












अमरावती, दि. 27 : महिलांचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीमधील नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा विकास करणारे उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. 
वरूड येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आज वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अंजली तूमराम, सरपंच स्वाती आंडे,उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपूते, तालुका कृषी अधिकारी अजय यादवकर, जिल्हा समन्वयक खुशाल राठोड, डॉ. वसूधा बोंडे आदी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले, माविमच्या माध्यमातून महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी त्यांना माफक दरात कर्ज पूरवठा करण्यात येत आहे. महिलांवर दाखविलेला विश्वास महिलांनी कर्ज पूर्ण परतफेड करुन खरा करून दाखविला आहे. महिलांच्या या प्रतिसादामुळे वरूड येथे कापडी पिशवी बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी दोनशे महिलांना रोजगार मिळणार आहे.
बचत गटांनी केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रीत न करता विक्रीवरही लक्ष केंद्रीत करावे. आज बाजारपेठेत माल विकणे ही एक कला असल्याने काही गटांनी यासाठी पुढाकार घ्यावा. आज विविध क्षेत्र बचत गटांसाठी उपलब्ध झाले आहे. गटांनी निंबोळी अर्क, जैविक खत आदी क्षेत्रातही कार्य करावे. यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. बोंडे म्हणाले. 
सुरवातीला मॉ जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला. खुशाल राठोड यांनी सवित्तर मार्गदर्शन केले.
00000

Friday, July 26, 2019

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शासनाचा उपक्रम मुलींना कणखर करण्यासाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण कार्यक्रम







अमरावती, दि. 26  युवतींना शारीरीक व मानसिकदृष्ट्या कणखर बनविण्यासाठी कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातून प्रारंभीच्या टप्प्यात सुमारे 80 हजार मुलींना कराटे, लाठीकाठी व मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  
पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना आज दिली. आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त संजय बाविसकर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.
उपक्रमाबाबत बोलताना डॉ. बोंडे म्हणाले की, युवतीवर हल्ला होऊन तिचा बळी जाण्याची दुर्देवी घटना जिल्ह्यात घडली. अशा घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने विविध विभागांच्या समन्वयातून स्वयंसिद्धा हा उपक्रम जिल्हाभर राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणिव निर्माण करण्याचा उपक्रमाचा हेतू आहे.
उपक्रमात 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक शाळेच्या 2 मुली व क्रीडा शिक्षक मिळून 2 हजार 250 मुलींना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी 31 मास्टर ट्रेनर्सचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 8 ते 13 ऑगस्टदरम्यान शाळांतून कराटे, ॲरोबिक्स, मार्शल आर्ट प्रशिक्षण दिले जाईल. 15 ऑगस्टला विभागीय क्रीडा संकुलात पाच हजार मुलींचे एकत्रित प्रात्यक्षिक होणार आहे.  सुरुवातीला 80 हजार मुली प्रशिक्षित करण्याचे नियोजन आहे. मात्र, हा उपक्रम पुढील काळातही सुरु राहील, असे पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, आपली मुलगी सक्षम व कणखर व्हावी ही जाणिव पालकांच्या मनात जागृत करण्याचे काम या उपक्रमाद्वारे होणार आहे. हा केवळ विशिष्ट कालावधीपुरता उपक्रम नसून, तो पुढेही कायमस्वरूपी चालविला जाईल. बेटी बचाओ, बेटी पढाओ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले मिशन आहे. त्याला उपक्रम जोडून घेतला जाईल.
पोलीस आयुक्त श्री. बाविस्कर म्हणाले की, गुन्हेगारीला आळा बसावा व महिला वर्ग, तसेच नागरिकांमध्ये विश्वास, सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून भरोसा, पोलीस काका- काकी, प्रतिसाद हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वयंसिद्धा हा उपक्रम कुमारवयीन मुली, तरूणी यांना कणखर बनविण्यास उपयुक्त ठरेल. याबाबत स्वयंसिद्धा ही माहितीपर पुस्तिकाही वितरीत करण्यात येईल.
पोलीस ठाण्यात तक्रारींची नोंद करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येतात. तथापि, केवळ प्रत्यक्षच नव्हे तर पोलिसांकडून दूरध्वनी, ई-मेल, सोशल मीडिया, एसएमएस आदी कुठल्याही माध्यमातून तक्रार आल्यास दखल घेतली जात आहे. नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन श्री. बाविस्कर यांनी केले.

पोलीस आयुक्त श्री. बालाजी म्हणाले की, मुलांमध्ये स्वसंरक्षणाची जाणिव निर्माण व्हावी म्हणून पाश्चात्य देशांत बालवयापासूनच ‘गुड टच’, ‘बॅड टच’ आदी जाणिवा निर्माण केल्या जातात व स्वसंरक्षणाच्या पद्धतींचे शिक्षण दिले जाते. आपल्या समाजातही असे शिक्षण रुजविण्याची गरज आहे. त्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरेल.
हा उपक्रम शारिरीक शिक्षणाचे अविभाज्य अंग व्हावा, असा प्रयत्न असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.  

Wednesday, July 24, 2019

500 हेक्टरवर सर्वाधिक कडुनिंबझाडांच्या लागवडीचे ध्येय शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रिय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी निम पार्क पायलेट प्रोजेक्ट - कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे



* 500 हेक्टर जागेवर जास्तीत जास्त निम वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट
* निंबोळी तेलाच्या उत्पादनासाठी पायलट प्रोजेक्ट
* 33 कोटी वृक्ष लागवडीच्या ध्येयाला मोठा हातभार

मुंबई, दि.24 :- राज्यातील शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रिय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये निम पार्क तयार करण्यात येणार असून पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 500 हेक्टर रिक्त जागेवर सर्वाधिक कडुनिंबाच्या झाडांची लागवड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या पासून बनणाऱ्या निंबोळी तेलाचा शेतकऱ्यांना  निश्चितच मोठा फायदा होईल असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज येथे केले.
मंत्रालयात निम पार्क तयार करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
कडुनिंबाच्या उत्कृष्ट वापराबाबत अधिक माहिती देताना कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, निमझाडांची रोपवाटिका तयार करून वृक्षलगवडीसाठी सर्वप्रथम जिल्हास्तरावर उपलब्ध रिक्त जागेची पाहणी करण्यात यावी. त्यासोबतच ज्या निम झाडांमधून दर्जेदार व मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल व जी प्रजाती महाराष्ट्रातील वातावरणात चांगल्या प्रकारे वाढेल अशाच प्रजातीची निवड करण्यात यावी.
500 हेक्टर जमिनीवर जास्तीत जास्त निमझाडांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून त्या झाडांची वाढ उत्तम प्रकारे होण्यासाठी आवश्यक गोष्टींचा आरखडा तयार करण्यात यावा. त्यामध्ये झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या आजूबाजूला वावडुंग सारख्या परस्पर पूरक झाडांची लागवड करणे अशा उत्तम कृषी पध्दतींचा  समावेश करण्यात यावा. व याबाबतचा अहवाल मला सात दिवसात सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

*33 कोटी वृक्ष लागवडीच्या ध्येयाला मोठा हातभार*

नवीन लागवड केलेल्या झाडांची वाढ होईपर्यंत त्या कालावधीत उपलब्ध असलेल्या निंबोळ्यांचे उत्कृष्ट तेल काढण्याच्या पद्धतीने (सुपर क्रिटिकल एक्सट्रॅक्शन पद्धत) उत्पादन सुरू करावे. व त्याचा दर्जा सुधारण्यासाठी संशोधन देखील सुरू करण्यात यावे. असे निर्देश त्यांनी यावेळी दिले . व ते पुढे म्हणाले या प्रकल्पासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. या वृक्षनलागवडीमुळे शेतकऱ्यांना फायदा होऊन राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या ध्येयाला मोठा हातभार लागणार आहे.
बैठकीस कृषी सचिव एकनाथ डवले, सह सचिव अशोक आत्राम, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक विजय घावरे, कीटक शास्त्र विभागाचे मुख्य पिक संरक्षण अधिकारी डॉ अनिल कोल्हे त्याचबरोबर कृषी विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...