Friday, August 30, 2019

मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा तिर्थक्षेत्र विकासाची कामे तत्काळ पूर्ण करा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे



अमरावती : मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्यात समाविष्ट असलेली विकासकामे ज्या कंत्राटरांनी अपूर्ण ठेवलेली आहे किंवा काम पूर्ण करण्यासाठी विलंब करीत आहे, अशा कत्रांटदारांवर दंड थोटवून त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे. तसेच अपूर्ण कामे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, (29 ऑगस्ट) मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखडा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.‍ विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगावचे समन्वयक आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र मोझरी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी वलगाव या ठिकाणांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
मोझरी विकास आराखड्या अंतर्गत सन 2009 मध्ये 78 कोटी 64 लाख रुपये पंधरा कामांसाठी, वर्ष 2011 मध्ये 125 कोटी 21 कामांकरीता, वर्ष 2015 मध्ये 150 कोटी 83 लाख रुपये 24 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक यंत्रणांनाकडून विकासकामे पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 142 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, क्लब हाऊस व स्विमींग पुलाचे बांधकाम, काँक्रीट रोड व नाली बांधकाम, बाजार ओट्याचे बांधकाम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यांची निर्मिती, गुरुदेव नगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, सर्वधर्म प्रार्थना सभागृहाचे (मानव समाज मंदीर)बांधकाम, मोझरी गावातील रस्ते आदी कामांचा विकास आराखड्यात समावेश आहे. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने पूर्ण करावी.
श्रीक्षेत्र कौडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत वर्ष 2012 मध्ये 20 कोटी रुपये 14 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत 16 कोटी 41 लाख रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले असून याअंतर्गत पर्यटक विसावा, उपहारगृह , नौकानयन व सौदर्यीकरण अंतर्गत विविध कामे, घाट बांधकाम करणे, बगीचा/बालोद्यान, उद्यान परिसरात सिंचन पध्दत विकसित करणे, व्यापारी संकुल, मंदिर परिसर विकसित करणे, प्रवेशव्दार व रिंगनसोहळा आदी कामे होणार आहेत, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वलगावं येथील संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वर्ष 2012 ला 48 विकास कामांसाठी 37 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत 30 कोटी रुपये खर्चुन निर्वाणभूमीचा सर्वांगिण विकासाची कामे झाली आहेत. निर्वाणभूमीची उर्वरित अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबधित यंत्रणांना दिले.  

ग्रामविकास व व्हीएसटीएफच्या कामांबाबत आढावा बैठक गावांत शाश्वत विकास घडवून आणावा - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. ३० : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून विविध गावांत होत असलेल्या विकासकामांतून शाश्वत विकास घडून यावा. त्यादृष्टीने ग्राम परिवर्तकांनी काम करावे, असे निर्देश
कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) व ग्रामविकास विभागातर्फे नियोजन भवनात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी झा, व्यवस्थापक युवराज सासवडे, खोजचे महादेव गील्लुरकर, राहुल दभाने आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ग्राम परिवर्तकाने गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व विविध विभागांच्या समन्वयातून विविध योजनांचा मेळ घालून विकास घडवावा, हे अभियानात अपेक्षित आहे. त्यानुसार ग्राम परिवर्तकाने काम करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे उत्तम अभियान आकारास आले आहे. ग्राम परिवर्तकांनी स्थानिक जनजीवनाशी समरस होणे आवश्यक आहे. अभियानातून होणारे बदल टिपले पाहिजेत. अनेक चांगली कामे झाली आहेत. इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी यशोगाथेचे सादरीकरण केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून तशा योजना बनवाव्यात. गावातील उच्चविद्याविभूषित किंवा मोठ्या पदावर गेलेल्या नागरिकांना ग्रामविकासात सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करावे.


अभियानात ३४ गावात विकासकामे होत आहेत. यात सुरू झालेल्या 550 बचत गटांपैकी अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यात मेळघाटात प्राधान्याने कामे राबवण्यात आली. कुपोषणावर मात करण्यासाठी न्यूट्रीशन इंडिया कार्यक्रम १०५ गावात राबविण्यात येत आहे.  त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शिक्षण व आरोग्य सेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी कोरकू भाषेत जागृतीपर साहित्य वितरित करण्यात येत आहे, असे श्रीमती खत्री यांनी प्रास्ताविकात सांगितले.
     
गावात अनेक विधायक बदल घडून येत असल्याचे रानामालूर गावाच्या सरपंच चंदाताई जावरकर यांनी सांगितले. टाटा ट्रस्टच्या श्रीमती झा यांनीही मनोगत व्यक्त केले. विविध गावांच्या सरपंचांनी यावेळी अभियानाबाबत अनुभवकथन केले. वैष्णवी कायाळकर, मंगेश खराटे यांच्यासह ग्राम परिवर्तकांनी गावात राबविलेल्या कामांची माहिती दिली. अभियानाच्या यशोगाथेचे प्रकाशन यावेळी झाले.

Thursday, August 29, 2019

शेतकरी बांधवांनी कीटकनाशक फवारणीबाबत काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 29 : यंदा कपाशीचा पेरा वाढला असून, बोंडअळी नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.  कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत तालुका कृषी कार्यालयांकडून मार्गदर्शन केले जात असून, शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, तसेच फवारणी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तसेच कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात कपाशीच्या पे-यात वाढ झाली आहे. जुलै- ऑगस्टमधील पावसाने पिकांची स्थिती चांगली आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी केल्याने या अळीचे नियंत्रण ब-यापैकी यशस्वी झाले आहे. सद्यस्थितीत कपाशी फुलोरा येण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे बोंडअळी नियंत्रण आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, प्रादेशिक संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनात कार्यवाही करावी. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी पाच फेरोमॅन ट्रॅप, नीम अर्काची फवारणी, डोमकळी नष्ट करणे आदी उपाय योजावेत.
शेतकरी बांधवांनी कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदीच्या पक्क्या बिलासह करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी.  संरक्षण किटचा वापर करावा. उपाशीपोटी फवारणी करू नये. शरीराला जखम असेल किंवा आजारी असल्यास फवारणी करू नये. केवळ फवारणीचे काम करणा-या मजूर बांधवांनी आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करावी. विषबाधा झाल्याचे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत. सलग दिवस फवारणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                                000   

गणपती विसर्जनासाठी शहरात 50 कृत्रिम तलाव



              पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
            अमरावती, दि. 29 : छत्री तलाव, वडाळी तलाव येथे गर्दी टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहरात प्रमुख चौकांत गणपती विसर्जनासाठी 50 कृत्रिम तलाव तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतेच दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचे कार्यकारी अभियंता एस. एन. चव्हाण, एस. ए. उमाळे डॉ. अरुण लोहकपुरे, अन्न व औषधे सहायक आयुक्त स. दे. केदारे, पोलीस निरीक्षक निलिमा आरज आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवात माती, शाडूच्या मूर्तीचा वापर होण्याबाबत महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेकडून नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन करावे. यासाठी महापालिकेच्या कचरा संकलन गाड्यांवरील ध्वनीक्षेपकांचा वापर करता येणेही शक्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचा र्‌हास होतो. त्यामुळे माती व शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत जागृती व्हावी. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणूकांच्या मार्गावरील वीजेच्या तारा लोंबकळत असतील तर तत्काळ दुरुस्ती करावी.  सर्व पथदिवे सुरु राहण्याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अतिक्रमण हटवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. कुठेही अस्वच्छता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
ते पुढे म्हणाले की, पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी. 31 ऑगस्टपूर्वी हे काम झाले पाहिजे.  नादुरुस्त रस्त्यांमुळे मिरवणुकीत अडथळा आल्यास संबंधित यंत्रणा व अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
            मद्यप्राशन करुन वाहने चालविणा-यांवर सक्त कार्यवाही करावी. त्यासाठी चौकाचौकात पथक निर्माण करावे. गणेशोत्सवात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
                                                000 

ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन शहर विकासासाठी नव्या उद्योगांना चालना - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. 29 : महापालिकेच्या ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून, अमरावती शहराच्या विकासासाठी  नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी आज येथे सांगितले.

महापालिकेच्या तारखेडा येथील ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयारपक्षनेता सुनील काळे, गोपाळ धर्माळे, प्रमिलाताई जाधव, आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ट्रक टर्मिनेस व व्यापारी संकुल शहराच्या विकासात योगदान देणारे ठरेल. शहरात टेक्सटाईल पार्कसाठी नव्याने चारशे हेक्टर जागा मिळविण्यात येत असून, नव्या उद्योगांना चालना देण्यात येईल. शहरातील स्वच्छता व आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. नागरी आरोग्य सेवेत प्रत्येक झोनमध्ये चांगली रुग्णालये हवीत. शहरात प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत चांगली राबवली जात आहे. डॉ. देशमुख यांच्या प्रयत्नामुळे अकोली बायपासचे काम होत आहे.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे विदर्भात मोठा निधी मिळाला आहे, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री श्री. सागर म्हणाले की, ट्रक टर्मिनसचे काम अभिनव व अत्यंत सुंदर झाले आहे. विकासाच्या प्रक्रियेत, अनेक सेवांमध्ये ट्रक चालकांच मोठे योगदान असते. या घटकाची जाणीव ठेवून हे काम केले, याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या प्रकारचा ट्रक टर्मिनस इतरत्र मी पाहिलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका व इतरही ठिकाणच्या अधिकाऱ्यांना इथे पाहणी करण्यासाठी आणण्यात येईल. इतर शहरातही असे टर्मिनस उभारण्यास निश्चित मदत करू, असेही ते म्हणाले.
डॉ. देशमुख म्हणाले की, एकेकाळी याठिकाणी डम्पिंग ग्राउंड व मोठे अतिक्रमण होते. शहरात ट्रकचे अनधिकृत पार्किंग होत होते. ट्रक चोरीचे प्रकार घडत होते. आज ट्रक टर्मिनस व व्यापारी संकुल उभे राहिल्यामुळे चांगली सुविधा निर्माण झाली आहे. विदर्भातील पहिले ट्रक टर्मिनस अमरावतीत आकारास आले आहे.
जिल्ह्यातील इतर शहरातही या प्रमाणे टर्मिनस व  अद्ययावत कचरा निर्मूलन प्रकल्प व्हावेत,अशी अपेक्षा खासदार श्रीमती राणा यांनी व्यक्त केली.
संकुलात 192 गाळे आहेत. वाहनतळासह चालकांसाठी उपाहारगृह, प्रसाधनगृह आदी सुविधा आहेत, असे आयुक्त श्री. निपाणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
          000. 

वरुड नप प्रशासकीय इमारत व जलतरण तलावाचे लोकार्पण जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. २९ : उत्तम पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी व वेळेत काम पूर्ण करण्यावर शासनाने भर दिल्याने जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन 
कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे केले. 
नगर परिषद वरुड कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा व जलतरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगराध्यक्ष स्वाती आंडे, वसुधाताई बोंडे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

         पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, वरुड, मोर्शी व शेंदूरजना घाट या तिन्ही नगरपालिका भविष्यात आदर्श ठराव्यात, अशी आदर्श कामे आकारास येत आहेत.  आदर्श पालिकेचे निकष पूर्ण होत आहेत. प्रशासकीय इमारती, जलतरण तलाव, पाणी पुरवठा आदी कामांसह भूमिगत वीजवाहिनीसारख्या उपक्रमाचे प्रस्ताव आहेत.

शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी महिला बचत गटांना कापडी पिशव्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. परिसरात कृषी विकासासाठी ६०० कोटी रुपयांचा संत्रा प्रकल्प आकारास येत आहे. ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेविकासासाठी मोठा निधी मिळवून दिला. त्यामुळे जिल्ह्यात अनेक रस्ते तयार होत आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे अंतर कमी होऊन संत्रा, शेतीमाल वाशीसारख्या मोठया बाजारपेठेत पोहचवणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

       श्री. सागर म्हणाले की, इमारत व जलतरण तलावाचे काम तीन वर्षात पूर्ण झाले. कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी मोठा निधी मिळवून दिला. त्यामुळे रस्ते, इमारती आदी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात अनेक कामे होत आहेत. नगरविकास विभागाने १५ कोटी रुपये वरुड शहरासाठी दिले आहेत. रस्त्यांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.
       वरूडची हद्दवाढ झाल्याने नव्या परिसरात विकासकामांसाठी १२ कोटी रुपये निधीची गरज असल्याचे श्रीमती आंडे यांनी सांगितले.
        इमारतीसाठी ५ कोटी व जलतरण तलावासाठी ३ कोटी रू. निधी मिळाला. दोन्ही प्रकल्प वरुड नगरीच्या वैभवात भर घालणारी आहेत, असे श्री. पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे, विविध बचत गटांना निधी वाटप यावेळी झाले.
        ०००

महाराष्ट्रावर बोलू काही नियोजनभवनात भरली विद्यार्थ्यांची संसद !


                                                




अमरावती, दि. 28 : अनेक विषय, शेकडो मुद्दे, तरूणांची व्यक्त होण्याची चढाओढ व ऊर्जा,  त्यातून होणारे विचारमंथन याची अनुभूती मंगळवारी उपस्थितांना आली. ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी- विद्यार्थिनींची संसदच नियोजनभवनात भरली होती.   
 क्रीडा व शालेय शिक्षण विभागातर्फे युवा सांसद व महाराष्ट्रावर बोलू काही वक्तृत्व स्पर्धा नियोजनभवनात झाली. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. देवीलाल ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता, रस्तेविकास, पीक विमा अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मत व्यक्त करून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आज उपस्थितांना जिंकून घेतले. युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी युवा छात्र सांसद उपक्रम घेण्यात आला. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम महाविद्यालय स्तरावर, नंतर तालुका स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. तालुका स्तरावर निवड झालेल्या 42 विद्यार्थ्यांनी जिल्हा स्पर्धेत भाग घेतला, असे श्री. जाधव यांनी सांगितले.
                                                गायत्री हरणे जिल्ह्यातून प्रथम
या स्पर्धेत अंजनगाव सुर्जी येथील पंचफुलाबाई दाभाडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री हरणे हिने पहिला, लोणी टाकळीच्या शाह अंजुमन उर्दू महाविद्यालयाच्या नेहा परवीन अब्दुल गफ्फार हिने दुसरा व वरुडच्या जागृती महाविद्यालयाच्या निमिषा पारेखने तिसरा क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे दहा, सात व पाच हजार रूपये बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा स्पर्धेत निवड झालेल्या या तिन्ही विद्यार्थ्यांना मुंबईत विधीमंडळात 30 व 31 रोजी होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. डॉ. पी. डब्ल्यू. पानतावणे, डॉ. सुरेश बनसोड, डॉ. एस. व्ही. पडघन यांनी परीक्षण केले. क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. उमेश बडवे, संजय कथळकर, भास्कर घटाळे, संतोष विघ्ने, अनिल बोरवार, शुभम मोहतुरे, शेख अकिल, वैभव पातुर्डे, संजय तांबे यांनी सहकार्य केले.
                                    000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...