Friday, August 30, 2019

कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत वरुडमध्ये पोळा साजरा शेतकरी-शेतमजूर बांधवांचा कृषी मंत्र्यांचा मनमोकळा संवाद


          अमरावती, दि. 30 : कृषी संस्कृतीत महन्मंगल मानला गेलेल्या पोळ्यानिमित्त आज कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी वरुडनगरीचे ग्रामदैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात आयोजित पोळा उत्सवात उपस्थित राहून शेतकरी व शेतमजूर बांधवांशी संवाद साधला व सर्वांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
          वरुड येथील पोळा उत्सवाला मोठी परंपरा आहे. श्रीमती डॉ. वसुधाताई बोंडे, केदारेश्वर मंदिराचे सचिव श्रीपाद चांगदे, नंदकिशोर पनपालीया, निळकंठ आंडे, भाजप शहराध्यक्ष राजू सुपळे, पत्रकार गिरीधर देशमुख, पोलीस ठाणेदार मगन मेहत्रे, युवराज आंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
          शंभरहून अधिक बैलजोड्यांसह शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत तोरण तोडून उत्सवाचा आरंभ झाला. शेतकरी बांधवांनी विविध प्रकारची सजावट करुन बैल आणले होते. शेतकरी बांधवांत व नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. बैल सजावटीसाठी कृष्णराव वानखडे व तुषार बेलसरे यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. दुसरे पारितोषिक पंकज खेरडे व तिसरे राजूभाऊ ढोरे यांना देण्यात आले.
          यावेळी शेतकरी व शेतमजूर बांधवांशी संवाद साधत पालकमंत्री डॉ.बोंडे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सांगली, कोल्हापूर परिसरात महापुराचे नैसर्गिक संकट उद्भवले. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविरत काम करून शेतक व नागरिकांना दिलासा दिला. कृषी विकासासह पायाभूत सुविधांची अनेक कामे जिल्ह्यात होत आहेत. सध्या पावसाची स्थिती बरी असून सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला झाल्यास धरणातील पाणी साठा निश्चित वाढेल. त्यामुळे भविष्यातही वरुण राज्याची कृपा व्हावी अशी प्रार्थनाही कृषी मंत्र्यांनी यावेळी केली.   

गोपाळनगर भुयारी मार्गाबाबत सुधारित प्रस्ताव 10 दिवसांत सादर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे रेल्वेला निर्देश


अमरावती, दि. 31: गोपाळनगराजवळील भुयारी मार्गाबाबत रेल्वे अधिका-यांनी सुधारित प्रस्ताव दहा दिवसांत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.
            महापालिकेतर्फे गोपाळनगर भुयारी मार्गाबाबत बैठक आज नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवी राणा, उपमहापौर संध्याताई टिकले, महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांच्यासह महापालिकेचे अनेक पदाधिकारी व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात स्थानिक रहिवासी यांची घरे व दुकाने प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे नकाशात बदल होण्याची मागणी आमदार श्री. राणा यांनी केली. या ठिकाणी यु टर्न मार्गाची रचना शक्य आहे. त्यानुसार स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन भुयारी मार्गाच्या नकाशात बदल करून घ्यावा व 10 दिवसांत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.   
जुनी वस्ती उड्डाणपूलानजिकच्या रेल्वे क्रॉसिंग व भुयारी मार्गाबाबत माहिती रेल्वे अधिका-यांनी सादर केली. 
                                                000

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे




          अमरावती, दि. 30 : लोकशाहीर  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवार (दि. 29 ऑगस्ट) रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडलाचे अध्यक्ष मधुकर कांबळे, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते.
          पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी साहीत्य क्षेत्रात अतुलनीय काम केले आहे. त्यांचे हे काम समाजातील नागरिकांना पर्यंत पोहचण्यासाठी आणि प्रेरणा मिळण्यासाठी स्मारक होणे आवश्यक आहे. 
          जिल्ह्यातील विद्यापीठ, तपोवन व  ए म आय डी सी च्या जागेवर स्मारक होऊ शकते, त्यामुळे या तीन जागेपैकी एक जागा कृती समितीने निश्चित करून परिपूर्ण प्रस्ताव शा सना ला सादर करावा असे डॉ. बोन्डे यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून पुनर्वसनाचा आढावा




          अमरावती, दि 30 : प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेत घराचा लाभ देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा शासनाकडे निश्चित  पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवार, (दि. 29 ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.
 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी निकषानुसार कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी दिले. ते म्हणाले की, निमन पेढी प्रकल्पात पाच गावातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पात्र कुटुंबाना घरे देण्याची कार्यवाही झाली आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेत घराचा लाभ देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा शासनाकडे निश्चित पाठपुरावा करू. त्यासाठी प्रस्ताव सादर करू. 
          निमन पेढी प्रकल्पात पुनर्वसनासाठी निकषाप्रमाणे कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले. वासनी, सापन, निमन वर्धा आदी विविध प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला. 

मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा तिर्थक्षेत्र विकासाची कामे तत्काळ पूर्ण करा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे



अमरावती : मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्यात समाविष्ट असलेली विकासकामे ज्या कंत्राटरांनी अपूर्ण ठेवलेली आहे किंवा काम पूर्ण करण्यासाठी विलंब करीत आहे, अशा कत्रांटदारांवर दंड थोटवून त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे. तसेच अपूर्ण कामे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, (29 ऑगस्ट) मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखडा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.‍ विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगावचे समन्वयक आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र मोझरी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी वलगाव या ठिकाणांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
मोझरी विकास आराखड्या अंतर्गत सन 2009 मध्ये 78 कोटी 64 लाख रुपये पंधरा कामांसाठी, वर्ष 2011 मध्ये 125 कोटी 21 कामांकरीता, वर्ष 2015 मध्ये 150 कोटी 83 लाख रुपये 24 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक यंत्रणांनाकडून विकासकामे पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 142 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, क्लब हाऊस व स्विमींग पुलाचे बांधकाम, काँक्रीट रोड व नाली बांधकाम, बाजार ओट्याचे बांधकाम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यांची निर्मिती, गुरुदेव नगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, सर्वधर्म प्रार्थना सभागृहाचे (मानव समाज मंदीर)बांधकाम, मोझरी गावातील रस्ते आदी कामांचा विकास आराखड्यात समावेश आहे. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने पूर्ण करावी.
श्रीक्षेत्र कौडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत वर्ष 2012 मध्ये 20 कोटी रुपये 14 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत 16 कोटी 41 लाख रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले असून याअंतर्गत पर्यटक विसावा, उपहारगृह , नौकानयन व सौदर्यीकरण अंतर्गत विविध कामे, घाट बांधकाम करणे, बगीचा/बालोद्यान, उद्यान परिसरात सिंचन पध्दत विकसित करणे, व्यापारी संकुल, मंदिर परिसर विकसित करणे, प्रवेशव्दार व रिंगनसोहळा आदी कामे होणार आहेत, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वलगावं येथील संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वर्ष 2012 ला 48 विकास कामांसाठी 37 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत 30 कोटी रुपये खर्चुन निर्वाणभूमीचा सर्वांगिण विकासाची कामे झाली आहेत. निर्वाणभूमीची उर्वरित अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबधित यंत्रणांना दिले.  

ग्रामविकास व व्हीएसटीएफच्या कामांबाबत आढावा बैठक गावांत शाश्वत विकास घडवून आणावा - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. ३० : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून विविध गावांत होत असलेल्या विकासकामांतून शाश्वत विकास घडून यावा. त्यादृष्टीने ग्राम परिवर्तकांनी काम करावे, असे निर्देश
कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) व ग्रामविकास विभागातर्फे नियोजन भवनात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी झा, व्यवस्थापक युवराज सासवडे, खोजचे महादेव गील्लुरकर, राहुल दभाने आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ग्राम परिवर्तकाने गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व विविध विभागांच्या समन्वयातून विविध योजनांचा मेळ घालून विकास घडवावा, हे अभियानात अपेक्षित आहे. त्यानुसार ग्राम परिवर्तकाने काम करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे उत्तम अभियान आकारास आले आहे. ग्राम परिवर्तकांनी स्थानिक जनजीवनाशी समरस होणे आवश्यक आहे. अभियानातून होणारे बदल टिपले पाहिजेत. अनेक चांगली कामे झाली आहेत. इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी यशोगाथेचे सादरीकरण केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून तशा योजना बनवाव्यात. गावातील उच्चविद्याविभूषित किंवा मोठ्या पदावर गेलेल्या नागरिकांना ग्रामविकासात सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करावे.


अभियानात ३४ गावात विकासकामे होत आहेत. यात सुरू झालेल्या 550 बचत गटांपैकी अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यात मेळघाटात प्राधान्याने कामे राबवण्यात आली. कुपोषणावर मात करण्यासाठी न्यूट्रीशन इंडिया कार्यक्रम १०५ गावात राबविण्यात येत आहे.  त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शिक्षण व आरोग्य सेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी कोरकू भाषेत जागृतीपर साहित्य वितरित करण्यात येत आहे, असे श्रीमती खत्री यांनी प्रास्ताविकात सांगितले.
     
गावात अनेक विधायक बदल घडून येत असल्याचे रानामालूर गावाच्या सरपंच चंदाताई जावरकर यांनी सांगितले. टाटा ट्रस्टच्या श्रीमती झा यांनीही मनोगत व्यक्त केले. विविध गावांच्या सरपंचांनी यावेळी अभियानाबाबत अनुभवकथन केले. वैष्णवी कायाळकर, मंगेश खराटे यांच्यासह ग्राम परिवर्तकांनी गावात राबविलेल्या कामांची माहिती दिली. अभियानाच्या यशोगाथेचे प्रकाशन यावेळी झाले.

Thursday, August 29, 2019

शेतकरी बांधवांनी कीटकनाशक फवारणीबाबत काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 29 : यंदा कपाशीचा पेरा वाढला असून, बोंडअळी नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.  कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत तालुका कृषी कार्यालयांकडून मार्गदर्शन केले जात असून, शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, तसेच फवारणी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तसेच कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात कपाशीच्या पे-यात वाढ झाली आहे. जुलै- ऑगस्टमधील पावसाने पिकांची स्थिती चांगली आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी केल्याने या अळीचे नियंत्रण ब-यापैकी यशस्वी झाले आहे. सद्यस्थितीत कपाशी फुलोरा येण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे बोंडअळी नियंत्रण आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, प्रादेशिक संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनात कार्यवाही करावी. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी पाच फेरोमॅन ट्रॅप, नीम अर्काची फवारणी, डोमकळी नष्ट करणे आदी उपाय योजावेत.
शेतकरी बांधवांनी कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदीच्या पक्क्या बिलासह करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी.  संरक्षण किटचा वापर करावा. उपाशीपोटी फवारणी करू नये. शरीराला जखम असेल किंवा आजारी असल्यास फवारणी करू नये. केवळ फवारणीचे काम करणा-या मजूर बांधवांनी आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करावी. विषबाधा झाल्याचे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत. सलग दिवस फवारणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                                000   

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...