Thursday, September 5, 2019

जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजित निधीनुसार विकासकामे पूर्ण करा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. 5 : अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार सर्व विकासकामे पूर्ण होतील याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.
ही बैठक आज नियोजनभवनात झाली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार रमेश बुंदिले, आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोल्हे, महापालिका आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते. 
            जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) 197 कोटी 80 लक्ष रुपये मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 34 कोटी 84 लक्ष रूपये खर्चाला प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. उर्वरित कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  सर्वसाधारण योजनेतून 118 कोटी 68 लक्ष रूपये प्राप्त निधीतून 45 कोटी 99 लक्ष रुपये खर्च झाले. प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या 96 कोटी 73 लक्ष रूपये मंजूर नियतव्ययानुसार  58 कोटी 25 लक्ष रूपये प्राप्त व 16 कोटी 87 लक्ष रूपये वितरीत झाले. त्यातील 9 कोटी 53 लक्ष रूपये रक्कम विविध विकासकामांवर खर्च झाली आहे.  अनुसूचित जाती उपयोजना नियतव्ययानुसार 98 कोटी 92 लक्ष 32 कोटी 28 लक्ष निधी तरतूद यंत्रणांना वितरीत करण्यात आली व विविध कामांसाठी खर्च झाली.
पीसीएक्स इंडेक्स मध्ये रस्त्याची निवड योग्यरीत्या न झाल्याचे मत काही सदस्यांनी मांडले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी पीसीआय इंडेक्स तपासून समसमान वाटप झाले किंवा नाही, हे तपासावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी, तसेच जलशक्ती अभियानात अधिक उपक्रम राबविण्यात यावे. नाला खोलीकरनामुळे पांदणरस्ते बाधित होऊ नये म्हणून आवश्यक ठिकाणी पूल बांधण्यात येईल. सिमेंट रस्त्यामुळे पाणी अडते व साचते. त्यामुळे शेतीचे नुकसान होते, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी कच्च्या नाल्या तयार करण्याबाबत कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

वन्य प्राण्यांपासून शेती संरक्षणासाठी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळावा. चराईक्षेत्र गावापासून दूर असता कामा नये. वन खात्याच्या अधिकारी- कर्मचा-यांनी गावातील नागरिकांशी सौजन्याने वागावे, असे निर्देश त्यांनी दिले. कर्जपुरवठ्याला गती मिळावी. ऊर्जा विकासासाठी सहा कोटी निधीतून नियोजित कामे करावीत. पालकमंत्री पांदण रस्तेविकास योजनेत कन्व्हर्जन्सनुसार निधीतून रस्ते करण्यात यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी प्रास्ताविक केले.
                                                             ०००

शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी विज्ञानाचा वापर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे










स्पर्धेत क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार

अमरावती, दि. 5 : विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असतांना त्या शिक्षणाचा उपयोग शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात संशोधन करुन नवनवीन यंत्रसामुग्री तयार करावी. विज्ञानाच्या वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होईल यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करावे, असे आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नाविण्य परिषदेच्या तसेच विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, साहचार्य मंडळ व उन्नत भारत अभियानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय स्टार्टअप बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशनच्या बक्षीस वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिध्द युवा उद्योजक सुहाज गोपीनाथ, सुकाणू समितीचे प्रमुख दिनेश सुर्यवंशी, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर,  तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. वी. जाधव, नवोक्रम संचालक डॉ. डी.टी. इंगोले, चेंबर ऑफ कॉमर्सचे असोशिएशनचे अध्यक्ष विनोद कलंत्री आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांनी स्टार्टअप स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अविष्कार-प्रकल्पांची पाहणी केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयाच्या 287 स्पर्धकांचे पालकमंत्र्यांनी सहभागी झाल्यानिमित्त अभिनंदन करुन डॉ. बोंडे म्हणाले की, आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नवनव्या कल्पनांना आकार द्यायला युवा पीढीने शिकले पाहिजे.  आपल्या संकल्पनांना वाट देऊन त्या साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी धडपड करावी. भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाची 35 टक्के लोकसंख्या ही 30 वर्षाखालील आहे. तरुणांनी अध्यासित केलेल्या तंत्रशिक्षणाचा व प्रशिक्षणाचा उपयोग समान्य जनतेचे जीवन सोयीचे होण्यासाठी उपयोग करावा. रेन वॉटर हारवेस्टींग, सोलर पॉवर, शेतीशी निगडीत यंत्रसामुग्री आदी क्षेत्रात संशोधन करुन मानवजातीच्या उपयोगाच्या यंत्रसामुग्री, प्रकल्प निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी नोकरीच्या मागे न पळता, स्वत: प्रशिक्षीत होऊन इतरांना रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने उद्योजक बनावे. बेरोजगार युवकांच्या हातांना काम देऊन त्यांना निर्भर करण्यासाठी वस्त्रोद्योग, स्टील प्रकल्प, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तुंचा प्रकल्प निर्मिती इत्यादी क्षेत्रात कामगिरी करावी. आपल्या क्षेत्रात कापूस पीक खात्रीशीर पिक आहे. कापूस पीकावर प्रक्रीया करुन उत्तम दर्जाचे वस्त्र निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी येथील आयटीआय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना खूप वाव आहे. त्यासाठी शासन सुध्दा कर्ज व भाग भांडवल उपलब्ध करुन युवा उद्योजकांना मदत करते. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी केले.
राज्याच्या ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातील मुलांपेक्षा मुलभूत व शेतीशी निगडीत चांगले ज्ञान असते. तंत्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना ओळखून कौशल्य विकासाचे व कृषी विषयाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन ग्रामीण मुलांना प्रशिक्षीत करावे. देशाचे भवितव्य घडविण्यात युवा पीढींचे महत्वपूर्ण योगदान आहे.
कार्यक्रमात शालेय संशोधक म्हणून विश्वभारती शाळेच्या भार्गवी, साची जैयस्वाल आणि आर्या या तीन मुलींचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या वेस्ट वॉटर व रेन वॉटर हारवेस्टींगच्या प्रकल्पाची निवड समितीव्दारे करण्यात आली.  
तसेच कार्यक्रमात यंग संशोधक, सीनीयर संशोधक आणि मास्टर संशोधक या तीन प्रवर्गामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शंतनु गावंडे, संदीप कुमार, मारुफ अहमद, रुपेश चौधरी यांचा यंग संशोधक या कॅटॅगिरीसाठी, रुपाली करुले रजनी चव्हाण, मनीष वालेचा यांचा सीनीयर संशोधक या कॅटॅगीरीसाठी तर सेवकराम कुंभारे यांचा मास्टर संशोधक कॅटॅगीरीसाठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून स्पर्धेचे मॉमेन्टो, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला शाळा- अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रशिक्षण महाविद्यालय, आयटीआय महाविद्यालयातील तसेच सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

मोर्शीतील पुरग्रस्त भागांची पालकमंत्र्याकडून पाहणी








नुकसानग्रस्त कुटूंबांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करावे
अमरावती, दि. 5 : बुधवारी (4 सप्टेंबर रोजी) मोर्शी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नलदमयंती नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मोईमपुरा, मालवीयपुरा, आठवडी बाजार, मेन मार्केट, आंबेडकर चौक, खोलगटपुरा या भागात आठ ते नऊ फुट पर्यंत पुराचे पाणी शिरले होते. आज राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पुरग्रस्त भागांना तातडीने भेट देऊन क्षतीग्रस्त भागांची, घरांची व परिसराची पाहणी केली. नुकसानग्रस्त कुटूंबांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी येथे सांगितले.
            यावेळी मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे मुख्याधिकारी तसेच महसूल विभगाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून पंधरा हजार रुपये प्रती कुटूंब याप्रमाणे सहायता निधी त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. पुराचे पाणी आता ओसरले असून नुकसानग्रस्त भागातील कुटूंबांचे, शेतीचे आणि क्षतीग्रस्त घरांचे, जनावरांचे सर्वेक्षण करुन पंचनाम्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. बाधितांना तातडीने प्रशासनाकडून मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ले.
            पुराच्या पाणी घरात शिरल्यामुळे कुटूंबांचे घरातील साहित्य व जनावरांची हाणी झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या कुटूंबांची प्रशासनाव्दारे नगर परिषदेच्या शाळेत निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल रात्रीच पुरग्रस्त भागांची पाहणी करुन बांधीत कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे महसूल यंत्रणाला आदेश दिलेत. तसेच त्यांच्या जेवणाची व निवासाची सुविधा नगर परिषदेच्या शाळेत केली.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात ज्याठिकाणी पुराच्या पाण्यात शेतजमिन खरडून गेली त्याठिकाणी 38 हजार रुपये प्रती हेक्टर मदतनिधी देण्यात येते. बागायती-फळबागांच्या नुकसानीसाठी 18 हजार रुपये, ओलीताच्या पिकांसाठी 13 हजार रुपये तर कोरडवाहूसाठी 6 हजार 800 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. अशाच पध्दतीने नियमानुसार मतदनिधी शेतीच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला जाईल. मोर्शी तालुक्यातील नल दमयंतीच्या काठावर असलेले खेडे चिखलसावंगी, चिंचोली गवळी, आष्टेगाव व इतर गावांत शेतीचे व शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्याक्षेत्राचे कृषी सहायकांकडून पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली असून शेतकऱ्यांना शासनाकडून मदतनिधी दिला जाणार आहे. सर्व लोकांनी शांततेने व सयंमाने राहून मदत घ्यावी प्रशासन व शासन संपूर्णत: त्यांच्या पाठीशी आहे. कुठलीही आपत्ती आली तर प्रशासनाला कळवावे.

00000

Wednesday, September 4, 2019

मोर्शी -वरुड तालुक्यातील तांडा वस्तीच्या विकासासाठी 58 लाखांचा निधी मंजूर.- तांडा वासियांनी मानले डॉ.अनिल बोंडे यांचे आभार*



 *अमरावती* :: दलित वस्ती सुधार योजनांच्या धर्तीवर भटक्या जमाती मधील बांधव तांड्या मध्ये, वाड्यात वस्त्या करून  राहतात त्यांच्या वस्त्यांची सुधारणा घडवून आणण्याच्या हेतूने या तांडा मधील विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, पक्के रस्ते,  गटारे,  शौचालय, वाचनालय इत्यादी मूलभूत सुविधा पुरवून तांड्याची सुधारणा करण्याचे अभिवचन शासनाने दिले होते. ते जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाने पूर्ण होणार असून मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 6 लक्ष रु.हिवरखेड, निंभी येथील  तांडा वस्तीच्या  विकास कामासाठी प्रत्येकी 4: लक्ष रुपये, हिवरखेड येथील पोकड पुरा कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
 वरुड तालुक्यातील ईत्तमगाव येथे 6 लक्ष रुपये, गाडेगाव टेंभणी येथील समाज मंदिर बांधकामासाठी 6 लक्ष रुपये, बेलोरा येथील सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीसाठी 6 लक्ष रुपये, धनोडी येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंती च्या बांधकामासाठी 4 लक्ष रुपये, लोणी वार्ड नंबर 2 दोन मधील रस्ता बांधकामासाठी 4 लक्ष रुपये, पुसला येथील सभागृह बांधकामासाठी 6 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर करजगाव येथील वार्ड क्रमांक दोन व वार्ड क्रमांक तीन मधील रस्ते बांधकामासाठी प्रत्येकी तीन लक्ष रुपये मंजूर करण्यात आले 
 हा विकास निधी मंजूर करण्यात आल्याने तांड्यावरील रहिवाशी नागरिक व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे आभार मानले.*

नझूल भाडेपट्टेधारकांना पट्टेवाटपाची कार्यवाही सुरु

    सर्वांसाठी घरे


अमरावती, दि. 4 : विदर्भातील नझूल जमिनी भोगवटादार वर्ग-1 (फ्री-होल्ड) करण्यास शासनाने मान्यता दिली असून, त्यानुसार दर्यापूर, अचलपूर व अमरावती शहरातील प्राप्त प्रस्तावांना जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली असून,  पट्टेवाटप करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.

  जिल्ह्यात एकूण 8 हजार 262 भाडेपट्टे असून, बहुतांश नझूल भाडेपट्टे अमरावती व अचलपूर येथे आहेत. सर्वांसाठी घरे योजनेत शासनाने या भाडेपट्ट्याच्या फ्री होल्ड रूपांतरणास मान्यता दिली. त्यानुसार तत्काळ कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. त्यानुसार प्राप्त प्रस्ताव तपासून समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार तत्काळ पट्टेवाटप करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.  अमरावती शहरातील हनुमाननगर, लालखडी व चमननगर या परिसरातील, अचलपूर व दर्यापूर येथील भाडेपट्टेधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

 नागपूर व अमरावती या महसुली विभागात तत्कालीन मध्यप्रांत आणि बेरार भागात लागू असलेल्या कायद्यान्वये मोठ्या प्रमाणात नझूल जमिनी भाडेपट्ट्याने देण्यात आल्या होत्या.  नागरिकांच्या मागणीचा विचार करून  या जमिनी फ्री- होल्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण 8 हजार 262 नझूल भाडेपट्टे असून, त्यातील 4 हजार 576 भाडेपट्टे अमरावती तालुक्यात आहेत. यापैकी 4 हजार 562 भाडेपट्टे निवासी, तर 14 भाडेपट्टे वाणिज्यिक किंवा औद्योगिक आहेत. अचलपूर येथे 3 हजार 608 भाडेपट्टे असून, त्यातील 3 हजार 122 भाडेपट्टे निवासी व 486 वाणिज्यिक किंवा औद्योगिक आहेत. दर्यापूर येथे 68 निवासी भाडेपट्टे आहेत. धारणी येथे 24 भाडेपट्टे असून, ते सर्व वाणिज्यिक किंवा औद्योगिक आहेत. हे सर्व फ्री होल्ड रुपांतरणाचा लाभ घेऊ शकणार आहेत.  
                                        ०००

पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सुसज्ज -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 मोर्शी पूरपरिस्थितीची जिल्हाधिका-यांनी केली पाहणी
१५ सदस्यांचे बचाव पथक मोर्शीला रवाना

                              




अमरावती, दि. ५ : मोर्शी येथील पूरस्थितीत नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांच्या यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मोर्शी येथे  दिले . श्री. नवाल यांनी आज सायंकाळी मोर्शी येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. १५ सदस्यांचे बचाव पथकही मोर्शीला उपस्थित आहे. 
 जिल्हाधिका-यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यानुसार प्रशासनाला निर्देश दिले. मोर्शी शहरात मध्यवस्तीत पुराचे पाणी  शिरल्यामुळे तेथील काही कुटुंबांना नगरपरिषदेच्या शाळांत हलविण्यात आले आहे. त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीत घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून संदेश प्रसारित करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी, पाटबंधारे अभियंता यांनी परस्पर समन्वय ठेवून  परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, तसेच अप्पर वर्धा धरणाचे गेट उघडण्याबाबत तेथील स्थिती पाहून व संपूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्यावा. मात्र, त्यापूर्वी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावे. नागरिकांची कुठलीही गैरसोय होता कामा नये. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा , असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 15 सदस्यांचे शोध बचाव पथक मोर्शीला उपस्थित आहे. तसेच पूर स्थितीमुळे बाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश तहसीलदारांना जिल्हाधिका-यांनी दिले.  या काळात औषधे व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.  रस्ते नादुरुस्त झाल्यास तत्काळ दुरुस्तीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.  पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महसूल प्रशासनाव्दारे आपत्ती व्यवस्थापन पथक व नियंत्रण कक्ष 24 तास सुसज्ज आहे.
                                                                        ०००

यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला शिका - जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे विद्यार्थ्यांना आवाहन





* स्टार्टअप बिझनेस प्लॅन स्पर्धेचे भव्य उद्घाटन

अमरावती, दि. ४ : नवीन कल्पना आणि नवे कौशल्य प्रगतीला सहाय्यकारी असते.  त्यामुळे ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवा पिढीने शिकले पाहिजे,  असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
           स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नाविन्यता परिषद, विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नवसंशोधन, नवोपक्रम आणि साहचर्य मंडळ आणि उन्नत भारत अभियानाच्या संयुक्त सहकार्याने आयोजित दोन दिवसीय अमरावती स्टार्टअप बिझनेस प्लॅन स्पर्धेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, राज्य नाविन्यता परिषदेचे सदस्य तसेच आयोजन सुकाणू समितीचे प्रमुख प्रा. दिनेश सूर्यवंशी, विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. डी.वी.जाधव, संगाबा अमरावती विद्यापीठाचे नवोपक्रम संचालक डॉ.डी.टी.इंगोले, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, कुलसचिव डॉ.तुषार देशमुख, तंत्र शिक्षण सहाय्यक संचालक डॉ.एम.ए. अली, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विनोद कलंत्री, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक नरेंद्र येते, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, प्राचार्य डॉ. आर.टी.मोगरे आदी उपस्थित होते. 
           जेव्हा विज्ञान व्यवहाराशी जुळते तेव्हा त्याची किंमत अधिक वाढते, असे सांगत जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी थ्री इडियट या चित्रपटाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक 'रँचो' लपलेला आहे. केवळ त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे.  कुठल्याही शॉर्ट कटचा आधार न घेता नेहमी प्रयत्नातून यश मिळवा. 
          कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले की, समाज बदलायचा असेल तर विद्यार्थ्यांसहित उद्योजकांना देखील योगदान द्यावे लागेल. रोजगार देणारे उद्योजक बनण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. या दोन दिवसीय स्पर्धेत ३२५ हून अधिक युवकांनी आपल्या कल्पनांची मांडणी केली असून त्यातून निश्चितच चांगल्या कल्पना ब्रँड म्हणून पुढे येतील. त्यामुळे युवकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून आणखी चांगल्या कल्पना येत राहाव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
         प्रा.दिनेश सूर्यवंशी प्रास्ताविकात म्हणाले की, युवकांमध्ये नवनवीन कल्पनांना साकार आणि आकार देण्याची क्षमता असून  केवळ त्यांच्या क्षमतांचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याचे कौशल्य ज्या दिवशी विद्यार्थ्यांना अवगत होईल त्या दिवशी हा देश एका वेगळ्या उंचीवर गेलेला असेल. या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअपच्या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी पुढाकार घेतला असून पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी देखील त्यासाठी पुढाकार घेऊन ही स्पर्धा युवकांसाठी आयोजित केली आहे. यावेळी शासनाच्या युवा पिढीला बळ देण्यासाठीच्या पुढाकाराची जाणीव सूर्यवंशी यांनी सर्वांना  करून दिली.

        या कार्यक्रमाचे संचालन वंदना पैकिजे यांनी केले. आभार डॉ. डी. टी. इंगोले यांनी मानले. या स्पर्धेत अमरावती विभागातील तीन विविध गटातून जवळपास ३२५ हून अधिक स्पर्धकांनी आपले मॉडेल्स सादर केले आहेत. या मॉडेल्सचे प्रदर्शन सांस्कृतिक भवनातील आर्ट गॅलरीत उद्यापर्यंत सुरू राहणार आहे.  स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उद्या दुपारी १ वाजता पालकमंत्र्यांच्या हस्त होईल.
                                                                        ०००

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...