Friday, October 11, 2019

प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' ॲपवर 'विशेष निवडणूक वार्तापत्र'

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019


अमरावती,दि. 11 : प्रसारभारतीचे  'न्यूज ऑन एअर ' या ॲपवर  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  'विशेष निवडणूक वार्तापत्र'  दि. 12 ऑक्टोबर रोजी  सकाळी 7.25 ते 7. 45 या वेळेत ऐकता येणार आहे. अमरावती आकाशवाणीवरही हे वार्तापत्र प्रसारित केले जाणार आहे. 
                                                                                                                                                                        आकाशवाणीवरील 'दिलखुलास' कार्यक्रमात 'विशेष निवडणूक वार्तापत्र' शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी  सकाळी 7.25 ते 7. 45 या  वेळेत अमरावतीसह राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,‍नाशिक, जळगांव, कोल्हापूर,परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केले जाईल.

चांदूर रेल्वे येथे सोळाशे कर्मचा-यांना निवडणूक प्रशिक्षण

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
                                                      

                                   

अमरावती, दि. 11 :  धामणगाव रेल्वे मतदारसंघातील सुमारे सोळाशे कर्मचा-यांचा निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून, त्यात काल चांदूर रेल्वे येथील आयटीआय संस्था व जिल्हा परिषद विद्यालयात प्रशिक्षण वर्ग पार पडला.
निवडणूक निर्णय अधिकारी रणजीत भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र इंगळे, नायब तहसीलदार बबन राठोड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ईव्हीएम प्रात्यक्षिकासह मॉकपोल, मतदान प्रक्रिया, दस्तऐवज पूर्ण करणे आदी विविध बाबींची माहिती देण्यात आली.
                                                000

खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी यांच्याकडून लेखा तपासणी माहिती सादर न करणा-या उमेदवारांना नोटिसा काढा - खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019


अमरावती, दि. 11 :  लेखाविषयक खर्च सादर न करणा-या व अनुपस्थित राहणा-या उमेदवारांना नोटिसा काढण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी आज विविध मतदारसंघांच्या तपासणीदरम्यान दिले.
            श्री. बंडी यांनी आज अमरावती निवडणूक कार्यालय, बडनेरा मतदारसंघाचे भातकुली तहसीलस्थित कार्यालय व धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या चांदूर रेल्वे येथील कार्यालयात निवडणूक खर्चाची तपासणी केली व आढळून आलेल्या त्रुटींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
  सर्व उमेदवारांनी आपापल्या खर्चाचे लेखे तपासणीसाठी वेळेत सादर करणे आवश्यक आहे. लेखे सादर न करणा-या उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील बाब क्रमांक 77 मधील तरतूदीनुसार दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे. त्यामुळे माहिती सादर न केल्यास निवडणूक आयोगाला कळविण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
                                                पुढील तपासणी 15 तारखेला
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची पुढील तपासणी दि. 15 व 19 ऑक्टोबरला होणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक श्री. बंडी हे यावेळी विविध ठिकाणी भेट देऊन तपासणी करणार आहेत. यावेळी सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजर राहावे, तसेच नागरिकांनाही यावेळी उपस्थित राहता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.  
यावेळी मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                                000

Wednesday, October 9, 2019

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रँडमायझेशनची प्रक्रिया सरमिसळीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019


अमरावती, दि. 9 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटच्या सरमिसळीकरणाची (रँडमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात झालेल्या सरमिसळीकरणाच्या प्रक्रियेला उमेदवार किंवा त्यांच्या वतीने प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक राजीव शर्मा, अभिषेक भगोटिया, प्रेमानंद खुंटिया, महावीरप्रसाद शर्मा, जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, इटीपीबीएस व मतपत्रिका नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अजय लहाने, संगणीकीकरण प्रशिक्षण नोडल अधिकारी तथा जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, अतिरिक्त सूचना अधिकारी मनीष फुलझेले यावेळी उपस्थित होते.
  जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रासाठी 3 हजार 156 बॅलेट युनिट, 3 हजार 174 कंट्रोल युनिट व 3 हजार 622 व्हीव्हीपॅट मशीनचे स्कॅनिंग व सरमिसळीकरण झाले. तसेच आठही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राकरीता नियुक्त सुक्ष्म निरीक्षकांचे सुद्धा सरमिसळीकरणाची प्रक्रिया आज झाली. जिल्हास्तरावरील सरमिसळीकरणाचा दुसरा टप्पा आज निवडणूक निरीक्षक व प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला. सरमिसळीकरणाची संगणीकृत ऑनलाईन प्रक्रिया आहे. सरमिसळीकरणानंतर प्रक्रिया झालेली माहिती आता  ‘लॉक’ व सुरक्षित झाली आहे. त्यात कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.
निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान 21 ऑक्टोबर तर मतमोजणीचा दि. 24 ऑक्टोबर होणार आहे. तसेच 27 ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या तपासणीच्या व प्रत्यक्ष वापराच्या प्रत्येक टप्प्यात मॉकपोलव्दारे उमेदवारांना व मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. ही संपूर्ण पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया असून, अद्ययावत प्रणालीत माहिती सुरक्षित असेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले.
00000

महिला व नवमतदारांत ‘चिंगी’ बाहुली लोकप्रिय

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
                               ‘पपेट शो’च्या माध्यमातून मतदार जागृती
           






अमरावती, दि. 9 :  ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो !’ असे म्हणत दिलखुलास संवादाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देणारी ‘चिंगी’ ही बोलकी बाहुली जिल्ह्यातील महिला व नवमतदारांमध्ये लोकप्रिय होत आहे.
             शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत विषय सहायक म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली बाभुळकर या मतदान जागृतीसाठी ठिकठिकाणी बोलक्या बाहुल्यांचे खेळ सादर करत असून, त्यांची ‘चिंगी’ ही बोलकी बाहुली नागरिकांचे मन जिंकून घेत आहे. गर्दीच्या ठिकाणी, शाळा- महाविद्यालये, वेगवेगळ्या वसाहती अशा विविध ठिकाणी  श्रीमती बाभुळकर या बोलक्या बाहुल्यांचे खेळ सादर करत आहेत. त्याला नागरिकांच मोठा प्रतिसाद मिळत आहे.
             श्रीमती बाभुळकर या काही वर्षांपासून ‘दुनिया बोलक्या बाहुल्यांची’ या कार्यक्रमातून, समाजजागृतीचे विधायक कार्य करत आहेत.  विधानसभेची निवडणूक जाहीर होताच त्यांनी स्वीप मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी ‘पपेट शो’ सादर करायला सुरुवात केली.
            नागरिकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय असलेल्या पात्रांच्या प्रतिकृतींचा समावेश असलेले एक स्टेज त्यांनी तयार केले आहे. हे स्टेज गर्दीच्या ठिकाणी उभारले जाते. त्याकडे आकर्षित होऊन नागरिक गोळा होतात व लगेच खेळाला सुरुवात होते. सुमारे अर्धा तास चालणा-या या खेळात श्रीमती बाभुळकर या कळसूत्री बाहुली, ग्लव्ह पपेटस् व बोलक्या बाहुलीसह संवाद सादर करतात. विविध प्रकारचे आवाज, सहज व मजेदार  संवाद, रंगीबेरंगी पोशाखातील बाहुल्या यामुळे हे खेळ गर्दी खेचत आहेत. श्रीमती बाभुळकर यांची निर्मिती असलेली ‘चिंगी’ ही बोलकी बाहुली महिला व नवमतदारांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.
लोकशाही शासन, निवडणूक प्रक्रियेतील मतदानाचे महत्व, मतदारांचे अधिकार व कर्तव्य आदींबाबत लोकशिक्षणच या खेळांच्या माध्यमातून मिळत आहे. या कार्यक्रमाबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी श्रीमती बाभुळकर यांचे कौतुक केले आहे.
                                                000

खर्च निरीक्षकांकडून चेकनाक्यांची तपासणी


अमरावती, दि. 9 :  खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी आज चेकनाक्यावर नियुक्त पथकाची भेट घेऊन तेथील रजिस्टरची तपासणी केली.
 विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने चेकनाक्यांवर उपस्थित यंत्रणेला काटेकोर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कुठलाही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ तपासणी करावी. प्रत्येक बाबींचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे व नोंद घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
                                    000

निवडणूक सामान्य निरीक्षक राजीव शर्मा यांची बडनेरा कार्यालयाला भेट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

                                
अमरावती, दि. 9 : निवडणूक सामान्य निरीक्षक राजीव शर्मा यांनी आज बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या भातकुली तहसील कचेरी परिसरातील कार्यालयाला भेट दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल कनिचे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव आदी यावेळी उपस्थित होते. श्री. शर्मा यांनी यावेळी निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन, प्राप्त तक्रारी व त्यांचे निराकरण यासह झालेल्या कामकाजाची माहिती घेतली व अभिलेख्याची तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व कामकाज पार पाडण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर श्री. शर्मा यांनी चांदूर रेल्वे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थित स्ट्रॉंगरुमला भेट देऊन पाहणी केली. तेथील व्यवस्था व सुरक्षिततेचा आढावा त्यांनी घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी रणजीत भोसले, राजेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.
                                                000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...