Sunday, November 3, 2019

शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी सरसकट मदत मिळवून देणार -कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे
















* गुरुवारपर्यंत पंचनामे पूर्ण करा
* नुकसान भरपाई संदर्भात गावागावात जनजागृती करावी
अमरावती, दि. 3 : अवकाळी पावसामुळे राज्यात सगळीकडेच शेतीचे व शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भात सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक वाया गेले आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 1 हजार 989 गावांपैकी 1 हजार 606 बाधित गावांची संख्या आहे. शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपदातून सावरण्यासाठी शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी सरसकट मदत मिळवून देणार असल्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले. याअनुषंगाने येत्या गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
            श्री. बोंडे यांनी आज अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्यासह जिल्ह्यातील मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर व भातकुली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची प्रत्यक्ष जावून पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत नुकसानी संदर्भात कृषी मंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. बोंडे यांनी मोर्शी तालुक्यातील काटसूर, चांदुरबाजार तालुक्यातील मौजा टाकरखेडा परिसरातील शेती, अचलपूर तालुक्यातील मौजा आसेगाव पूर्णा, दर्यापूर तालुक्यातील मौजा येसुर्णा, चंडीकापूर, खल्लार परिसरातील शेती, भातकुली आदी तालुक्यातील बाधित शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी केली.
अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कपाशी, ज्वारी तसेच मुंग व उडीद या खरीप पिकांचे आणि केळी, संत्रा या फळपिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सोयाबीन पूर्णत: खराब झाले असून त्याला कोंब आलेले दिसले तर कपाशीची बोंड खराब झाल्याचे दिसून आले आहेत. पाहणी दरम्यान सर्वत्र मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले. येत्या गुरुवारपर्यंत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करुन पंचनामे तयार करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.
            आढावा घेतांना डॉ. बोंडे म्हणाले की, जिल्ह्यात जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांनी पिकविमा काढल्याचे दिसून येते. पिकविमा काढलेल्या तसेच न काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम किंवा नुकसान भरपाई  मिळवून देण्यासाठी शासनाने समन्वयाची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाने सक्रियपणे काम करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून क्लेम फॉर्म भरुन घ्यावे. भरपाईसाठी विम्याची रक्कम भरल्याचा कुठलाही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. कृषी विभागाने विम्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना सहाय्य करावे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन सर्वकष मदत करणार.
            ज्या तालुक्यात ऑक्टोबर अखेर सरासरी 120 मि.मिच्यावर पाऊस पडला असेल अशा ठिकाणी किंवा क्षेत्रातील शेतकरी कापणीनंतरच्या (पोस्ट हारवेस्ट) विमा क्लेमसाठी पात्र ठरू शकतात तर 120 मिमिच्या आत सरासरी पाऊस पडला असेल तर अश्यांच्या बाबत स्थानिकीकरण क्षेत्र (लोकलाईज्ड एरिया) विमा क्लेमसाठी पात्र ठरु शकतात, असेही डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
            कोणत्याही शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान येसुर्णा येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. सदर शेतकऱ्याकडे पावणे तीन एकर जमीन असून सोयाबीन पेरले होते. त्याच्या संपूर्ण शेतीतील सोयाबीन पीक वाया गेले असून त्यानी विमा काढला असल्यामुळे नुमसान भरपाईपोटी त्याला शेतीक्षेत्रफळानुसार नुकसान भरपाई मिळवून दिली जाणार असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले
            कृषी विभागाने व महसूल विभागाने सक्रीयपणे काम करुन तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या अधिनस्त काम करणारे कृषी सहायक, कृषी मित्र तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी गावागावात मार्गदर्शन व जनजागृती करावी. कृषी विभागानी शेतकऱ्यांचे पीकविमा व नुकसान भरपाईचे अर्ज संबधित विमा कंपनीला पाठवावे. गावागावात दवंडी देऊन तसेच व्हॉटस्ॲप मॅसेज तसेच प्रसारमाध्यमांतून आवाहन करुन नुकसान भरपाई संदर्भातील संपूर्ण प्रक्रिये संदर्भात जनजागृती करावी. पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
00000

Sunday, October 20, 2019

आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आज निवडणूक

                             





















विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019


प्रशासन सज्ज ; प्रत्येकाने मतदान करण्याचे प्रशासनाकडून आवाहन
अमरावती, दि. 20 : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान उद्या दि. 21 ऑक्टोबरला 2 हजार 628 मतदान केंद्रावर होणार असून, प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राकरीता दुर्गम परिसरासह ग्रामीण भागातही मतदान पथके साहित्यासह आज रवाना करण्यात आली.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकाराचा वापर करुन 21 ऑक्टोबरला प्रत्येकाने आपल्या कुटूंब, मित्रमंडळीसह मतदान मतदान करुन लोकशाही बळकट करावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मतदार संख्या : जिल्ह्यात 12  लाख 59 हजार 644 पुरुष मतदार, 11 लाख 89 हजार 373 स्त्री मतदार तसेच इतर 43 असे एकूण 24 लाख 49 हजार 60 मतदार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान आज दि. 21 ऑक्टोंबर रोजी होणार असून दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाचा वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असा असणार.
पोलीस बंदोबस्त :  निवडणूक शांतपणे व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील 2628 मतदान केंद्रावर  सुमारे 12 हजार मनुष्यबळ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पाच अतिसंवेदनशील व 102 संवेदनशील बुथवर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूकीत कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून 4 हजार 334 पोलीस अधिकारी कर्मचारी, सीआयएसएफ, आरपीएसएफ, एमपीएसएपी च्या पाच कंपन्या, एसआरपीएफ च्या दोन कंपन्या, एक प्लाटून, 1344 होमगार्ड जवानांचा तगडा बंदोबस्त जिल्ह्यात करण्यात आला आहे.
संपर्क यंत्रणा व सुविधा : निवडणूक निर्णय अधिका-यांपासून ते मतदान केंद्राध्यक्ष अशा विविध जबाबदा-या असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांचे वेळोवेळी प्रशिक्षणही झाले आहे. मेळघाटातील 353 मतदान केंद्राकरीता तसेच इतर केंद्राकरीता अधिकारी-कर्मचारी व पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आले आहे. तसेच मेळघाटातील मतदान केंद्राकरीता बॅटरीव्दारे प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाण्याचे कॅन व आवश्यक साहित्य सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. उर्वरित मतदारसंघातील मतदान केंद्राकरीता उद्याला (दि. 20 ऑक्टोबर) मतदान केंद्राचे कर्मचारी सकाळी रवाना होणार आहे. मेळघाटातील अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रासाठी पोलीस  व वनविभागाची वायरलेस यंत्रणा आणि क्षेत्रातील 27 टॉवरच्या माध्यमातून सुरळीत मोबाईल कनेक्टीवीटी कार्यान्वित करण्यात आली आहे.
कॅमेरा वेबकॉस्टींग : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या 37, बडनेरा मतदारसंघातील 33, अमरावती मतदारसंघातील 31, तिवसा मतदारसंघातील 32, दर्यापूर मतदारसंघातील 34, मेळघाट मतदारसंघातील 35, अचलपूर मतदारसंघातील 30 व मोर्शी 31 मतदारसंघाच्या मतदार केंद्र असे एकूण 263 मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कार्यालयातून लाईव्ह वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे.
आदर्श, सखी, दिव्यांग मतदान केंद्र : जिल्ह्यात अकरा आदर्श मतदान केंद्र, दहा सखी मतदान केंद्र तसेच दोन दिव्यांग मतदान केद्र उभारण्यात आली आहेत. पर्यावरण स्नेही मतदान केंद्र या संकल्पनेचा अवलंब करुन सर्व मतदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले आहे.
सर्व्हीस व्होटर्स : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रासाठी 4 हजार 324 बॅलेट युनिट, 3 हजार 168 कंट्रोल युनिट व 3 हजार 603 व्हीव्हीपॅट मशीन याप्रमाणे इव्हीएम यंत्रणा संबंधित मतदान केंद्रासाठी राहणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 282 सर्व्हीस मतदारांना ईटीपीबीएस बॅलेट पेपर वितरीत करण्यात आले आहे.
दिव्यांग मतदार व त्यांच्यासाठी सुविधा : जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघात 9 हजार 265 दिव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी संबंधित मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या सहाय्याकरीता 2 हजार 628 स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिव्यांग मतदारांसाठी सुमारे 1 हजार 880 व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था सुध्दा प्रशासनाव्दारे करण्यात आली आहे.   
एफएसटी, एसएसटी पथक : आयोगाच्या निर्देशानुसार आज दि. 19 ऑक्टोंबरच्या सायंकाळपासून  निवडणुक प्रचार व सभांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच निवडणूक विभागाव्दारे स्थापित फ्लाईंग स्कॉड टिम व स्टॅटीक सर्व्हीलन्स टीम यांच्याकडून शेवटच्या 48 तासात बारीक नजर राहणार असून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.
 1950 टोल फ्री क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत ‘1950’ क्रमांकाचा टोल-फ्री दूरध्वनी सुरू करण्यात आला आहे. हा टोल फ्री क्रमांक 24 तास कार्यान्वित राहणार असून मतदार यादीतील नाव शोधणे, निवडणुकीविषयक नागरिकांच्या अडचणी, मतदार यादीची माहिती, मतदारांच्या तक्रारींची दखल या माध्यमातून घेण्यात येणार असून तक्रारींचे तत्काळ निवारण सुध्दा करण्यात येणार आहे. ज्या मतदारांकडे मतदानाचे व्होटर आयडी कार्ड नसेल त्यांना आयोगाच्या सूचनेनुसार अकरा ओळखपत्र मतदानाच्या दिवशी ओळखपत्राचा पुरावा म्हणून दाखवून मतदान करता येईल.  
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाही मजबुत करण्यासाठी मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात अधिकाधिक संख्येने कुटूंबासह सहभाग घेऊन मतदान हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.
00000

Wednesday, October 16, 2019

स्वीप मोहिमे अंतर्गत अमरावती विद्यापीठात मतदान जनजागृती नवमतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करुन लोकशाही बळकट करा स्वीपच्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांचे आवाहन

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

     





अमरावती, दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप (Systematic Voters Education and Electoral Participation) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. भारत देश हा तरुणांचा देश असून तरुणांनी आपल्या मतदानाचा अधिकार वापरुन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन स्वीप मोहिमेच्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांनी विद्यापीठात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात केले.
स्वीप मोहिमे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व विद्यापीठ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर, राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. राजेश बुरंगे, स्वीपचे अधिकारी समीर चौधरी, प्रमोद ताडे यांचेसह विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.
स्वीप मोहिमेअंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालय यांच्या सहभाग घेऊन गावोगावी जागर सुरु करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांना स्वीप मोहिमच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याव्दारे जिल्हाभर मतदान जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 
येत्या 21 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान दिवशी सर्वांनी मतदान करावे. असे आवाहन प्रशासनाकडून होत असतांनाच उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’च्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांच्यातर्फे सुध्दा मतदान जनजागृती करण्यात येत आहे. जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही असलेल्या आपल्या देशातील नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकाराचा वापर करुन लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन श्रीमती ताडे यांनी यावेळी केले.
चांदुर बाजार, मोर्शी नगर परिषद व भानखेड येथे मतदान जनजागृती
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम व मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील चांदुरबाजार, मोर्शी व भानखेड येथे स्वीप मोहिमे अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले.
राज्यात सर्वत्र 21 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असून मतमोजणी 24 ऑक्टोंबरला होणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील उपलब्ध सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधांबाबत स्वीप उपक्रमातून माहिती देण्यात येत आहे. सदर गावांमध्ये नागरिकांना इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सुध्दा दाखविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘Go Vote’ चे फलक घेऊन महिला, दिव्यांग मतदारांनी व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजाविणार असल्याची शपथ घेतली. यावेळी सदर गावांतून मतदान जनजागृतीची प्रभात फेरी सुध्दा काढण्यात आली.
00000

Tuesday, October 15, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन




अमरावती, दि. 15 :  माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Sunday, October 13, 2019

महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन




अमरावती, दि.१३ : महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनीही महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000

Saturday, October 12, 2019

विभागातील निवडणूक तयारीचा निवडणूक उपायुक्तांकडून आढावा सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी - निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019



अमरावती, दिनांक 12 :  निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज येथे दिले.
            निवडणूक आयोगाच्या पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अमरावती विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आयोगातर्फे अति. मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे,  कायदा व सुव्यवस्था राज्य नोडल ऑफिसर मिलींद भारंबे, विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्यासह विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधिक्षक आदी यावेळी उपस्थित होते.
            श्री. कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणूकीपेक्षाही विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया ही स्थानिक संदर्भांमुळे अधिक संवेदनशील असते. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्षांसह प्रक्रियेतील सर्व अधिका-यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. किरकोळही चूक घडता कामा नये. अन्यथा, निवडणूक याचिका दाखल होण्याचे प्रसंग उद्भवतात. चूक आढळल्यास चौकशी प्रक्रिया, दंडाची तरतूदही आहे. याची जाणीव सर्व कर्मचा-यांना असली पाहिजे. त्यासाठी अधिक सुस्पष्ट, अचूक व पारदर्शक काम करावे. 
            आयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचा-यांना द्याव्यात. तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरुन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवावे. मतदारांना मतदान यादी घरपोच मिळेल यासाठी अगोदरच नियोजन करुन त्या पोहोचत्या कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.  
सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना प्रत्येक स्तरावर भरावयाचे विवरणपत्रे, मॉकपॉल, मतदानाचा वेळ संपल्यावर करावयाची कार्यवाही आदी संदर्भात पूर्णपणे माहिती द्यावी. आयोगाला सादर करावयाचा सर्व शासकीय यंत्रणांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व सोयीसुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात, अधिकाधिक मतदानासाठी प्रत्येक यंत्रणेने जनजागृतीवर भर द्यावा, असेही श्री. कुमार यांनी यावेळी सांगितले.
मतदान, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, केलेल्या व करावयाच्या उपाययोजना आदींबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून श्री. कुमार यांनी आढावा घेतला.
कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी श्री. भारंबे म्हणाले की,  मतदान केंद्रावर कुठलीही अनुचित घटना घडणार यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज रहावे. तक्रार प्राप्त झाल्यावर तत्काळ पोलिस प्रशासनाने स्थापन केलेल्या पथकांकडून तत्काळ कार्यवाही झाली पाहीजे. मतदारांना प्रलोभन किंवा रोख रक्कम वितरण आदी प्रकारांना आळा घालावा. प्रत्येक चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवून तपासणी करावी. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची कटाक्षाने दक्षता घेऊन कारवाई करावी.

000000

Friday, October 11, 2019

स्वीप मोहिमे अंतर्गत शिंगणापूर येथे मतदान जनजागृती

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019








अमरावती, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात सर्वांचा हिरेरिने सहभाग वाढावा, यासाठी दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर ग्राम पंचायतीमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’च्या विजेता तथा स्वीपच्या सदिच्छा दूत बबीता ताडे व नोडल अधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्याव्दारे मतदान जनजागृती आज करण्यात आली.
स्वीप मोहिमेअंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालय यांच्या सहभाग घेऊन गावोगावी जागर सुरु करण्यात आला आहे.
येत्या 21 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान दिवशी सर्वांनी मतदान करावे, यासाठी स्वीपच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्यामार्फत जिल्हाभर मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’च्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांच्यातर्फे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही असलेल्या आपल्या देशातील नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकाराचा वापर करुन लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन श्रीमती ताडे यांनी केले.
यावेळी ‘ लोकशाहीचे होईल संपूर्ण ज्ञान, सोडा सारे कामधाम, मतदान करणे पहिले काम, चला मतदानाला जाऊ... लोकशाही बळकट करु…अशा फलकांव्दारे मतदान जनजागृती करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे राज्यात 21 ऑक्टोंबर रोजी सर्वत्र मतदान होणार असून 24 ऑक्टोंबरला मतमोजणी होणार आहे.
यावेळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतदानाचे प्रात्यक्षिक विद्यार्थी, अधिकारी  व कर्मचारी आदींना दाखविण्यात आले. गटविकास अधिकारी नंदकिशोर धारगे, स्वीपचे सदस्य समीर चौधरी यांचेसह विद्यार्थी, महिला, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...