Saturday, November 16, 2019

अतिक्रमण नियमानुकूलची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


प्रधानमंत्री आवास योजना


अमरावती, दि. 16 : नगर पालिका अंतर्गत येणारे नझूल पट्टयाचे वाटप व अतिक्रमण नियमानुकूल संदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करुन प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजूंना द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रलंबित कामांचा  आढावा जिल्हयाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.  
            श्री नवाल म्हणाले की, अतिक्रमण नियमानुकुल करण्यासंदर्भात नगर पालिकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यासाठी नगर पालिका प्रशासनाने व भूमी अभिलेख विभागाने  सर्वप्रथम नझुल शिटप्रमाणे संयुक्त पाहणी करावी. त्यानंतर नझुल पटृटे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी तसेच अतिक्रमण नियमानुकुल करण्याची कार्यवाहीसुध्दा पूर्ण करावी.
            प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रस्तावित घरकुलासाठी नवीन सविस्तर प्रकल्प नियोजन अहवाल तयार करुन राज्य शासनाच्या मंजूरीकरिता जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात यावा. या कामासाठी निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नगरपालिका क्षेत्रात जलपुनर्भरण योजना व स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविण्यात यावे. या योजने अंतर्गत नगरपालिकेची इमारतीत मॉडेल स्वरुपात जलपुनर्भरण (रेन वॉटर हारवेस्टींग) यंत्रणा कार्यन्वित करावी. तसेच शहरातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये व रहीवासी घरांना सुध्दा रेन वॉटर हारवेस्टींग यंत्रणा बसविण्याचे बंधनकारक करण्यात यावे. जेणेकरुन त्या त्या शहरात जलपुनर्भरण सुरळीत होऊन भूजल पातळीत वाढ होणार. नगरपालिकेने पाण्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करावी. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
00000

Friday, November 15, 2019

बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



 अमरावतीदि. : 15- भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतरही अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करुन भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.  

जिल्हा रुग्णालयांत आवश्यक सुधारणांसाठी प्रस्ताव द्यावेत - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

जिल्हाधिका-यांनी केली इर्विनची पाहणी




            अमरावतीदि.  15 – जिल्हा रूग्णालयात आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने  सर्व आवश्यक सुधारणांबाबत प्रस्ताव सादर करावा. रूग्णालयाच्या सुधारणेसाठी वेळेत निधी मिळवून दिला जाईलअसे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज इर्विन रूग्णालयाला भेट देऊन तेथील सोयी- सुविधांची पाहणी केली. यावेळी श्री. नवाल यांनी विविध वॉर्डात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केलीतसेच राष्ट्रीय पोषण पुनर्वसन केंद्रालाही भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रानमळेजिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह  महापालिकासार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.   
श्री. नवाल म्हणाले कीरुग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने अद्ययावत यंत्रणा असणे आवश्यक आहे. सफाईची अद्ययावत  यंत्रेवॉर्डात आवश्यक त्या सर्व सुविधा यासाठी प्रस्ताव सादर करावा. यावेळी श्री. नवाल यांनी राष्ट्रीय पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. मेळघाटातील केंद्रात आवश्यक सुविधांसाठी प्रस्ताव देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठकही यावेळी झाली. एड्सविषयी जनजागृतीसाठी गावोगाव रेड रिबन क्लब स्थापण्यात आले आहेत. जिल्ह्यात  १०० गावांत क्लब स्थापण्यात आले आहेत. त्याचप्रमाणेमहाविद्यालयीन स्तरावर ८४ क्लब स्थापण्यात आले आहेत. या क्लबचा सदस्यांचा जागृतीविषयक कार्यात सहभाग वाढवावाअसे निर्देश श्री. नवाल यांनी यावेळी दिले. रुग्णांना सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेतअसेही निर्देश त्यांनी दिले. दि. १ डिसेंबर रोजी एड्सविषयक जनजागृतीच्या अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
   आरोग्य विभागातील अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

Thursday, November 14, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात पं.नेहरू यांना अभिवादन


 पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन अर्थात बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शरद पाटील यांनी पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचेविधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचा-यांनी यावेळी पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.



    

Friday, November 8, 2019

प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी - प्र. जिल्हाधिकारी संजय पवार





अमरावती, दि. 8 :  जनावराची अवैध वाहतूक आदी नियमभंग करणा-या बाबी निदर्शनास येताच तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी आज येथे दिले.
                        जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीचे अशासकीय सदस्य राघवेंद्र नांदे, नंदकिशोर गांधी, चंद्रशेखर कडू, डॉ. सुनील सूर्यवंशी, महेश देवळे, विजय शर्मा, अजित जोशी, अमोल कथलकर, विजय गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राधेश्याम बहादुरे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,  पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख, डॉ. सचिन बोंद्रे आदी उपस्थित होते.  
            जनावरांची खरेदी- विक्री होताना आधारकार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून तसे पत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांत अपेक्षित तपास आदी कार्यवाही न करणा-यांवर कारवाई करण्याबाबत निर्देश यावेळी देण्यात आले. प्राणीदया आदींच्या अनुषंगाने मुलांमध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी शाळांतून काही उपक्रम राबविता येतील किंवा कसे, याचा विचार व्हावा, असेही प्र. जिल्हाधिकारी श्री. पवार यांनी सांगितले. समितीच्या बैठकांत झालेल्या चर्चेनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
  प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया व्हाव्यात जेणेकरून गैरप्रकार करणा-यांना आळा बसेल व जागृतीही होईल. पोलीसांनी यात अधिक काटेकोर होत कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत सदस्यांनी मांडले. याविषयी पोलीस अधिक्षकांसह स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.
 जिल्ह्यातील डॉग ब्रिडिंग सेंटर, बर्ड शॉप येथे नियमांचे पालन होते किंवा कसे, याबाबत नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
00000                                     

Thursday, November 7, 2019

दक्षता व आवश्यक उपचारांबाबत वैद्यकीय अधिका-यांनी सजग राहावे - प्र. जिल्हाधिकारी संजय पवार

कीटकनाशक दुष्परिणामांवर योग्य उपचारासाठी वैद्यकीय अधिका-यांची कार्यशाळा






अमरावती, दि. 7 : आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांकडून होणा-या कीटकनाशकांचा वापर, तसेच त्याचे दुष्परिणाम व आवश्यक उपचार याबाबत वैद्यकीय अधिका-यांनी सजग राहावे जेणेकरून कीटकनाशकांपासून विषबाधेच्या दुर्घटना टळू शकतील, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी आज येथे दिले.
सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रॉपलाईफ इंडियातर्फे कीटकनाशकांपासून दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता, उपचार व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिका-यांची कार्यशाळा नियोजनभवनात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, कार्यशाळेचे मार्गदर्शक तथा केंद्र शासनाचे माजी आरोग्य अतिरिक्त महासंचालक डॉ. देवव्रत कानुंगो, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रानमळे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, क्रॉप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तित्व सेन, सुशील देसाई, शिवार फौंडेशनचे विनायक हेगाणा आदी उपस्थित होते.  
प्र. जिल्हाधिकारी श्री. पवार म्हणाले की, शेतीत उत्पादनवाढीसाठी रसायनांचा वापर केला जातो. या रसायनांबाबत व त्यांच्या दुष्परिणाम व उपचारांबाबत वैद्यकीय अधिका-यांना परिपूर्ण माहिती असली पाहिजे. त्यासाठी कार्यशाळेतील सूचना व उपलब्ध साहित्यातील मार्गदर्शन यांचा निश्चित उपयोग होईल.
श्री. ठमके म्हणाले की, अनेकदा शेतकरी बांधवांकडून फवारणीसाठी दोन किंवा त्याहून अधिक रसायने एकत्र केली जातात. त्यातून एक तिसरे रसायन तयार होते. त्याची फवारणी केली जाते. असे रसायन मूळ रसायनांहून अधिक घातक असू शकते. अशा घटनांबाबत आवश्यक दक्षता, उपचारांची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी ठेवावी. कार्यशाळेतून आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा लाभ शेतकरी बांधवांनाही होणार आहे.
श्री. चवाळे म्हणाले की, जिल्ह्यात दशकापूर्वी कीटकनाशक विक्रीचे प्रमाण कमी होते. नंतर 2012 पासून कीटकनाशकांची विक्री साडेचार लाख लीटरवर गेली. आता ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकदा कृषी विभागाची शिफारस असो किंवा नसो; शेतकरी बांधवांकडून अनेक उत्पादने एकत्र करुन रसायन तयार होते. अशावेळी दुष्परिणाम घडल्यास कुठला अँटी- डोस द्यायचा याविषयी अद्यायवत माहिती असावी. कृषी व आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात, असेही ते म्हणाले.  
कीटकनाशकांमुळे जगात दरवर्षी 2 लाख बळी : डॉ. देवव्रत कानुंगो
कीटकनाशके किंवा तत्सम विविध रसायनांच्या वापरामुळे जगात दरवर्षी 2 लाख मृत्यू होत असल्याची नोंद आहे, असे डॉ. देवव्रत कानुंगो यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, कीडनाशकांची सहज उपलब्धता, दोन रसायनांचे मिश्रण फवारण्याच्या घटना, फवारणीचा लांब कालावधी, संरक्षणसिद्धतेशिवाय फवारणी, सदोष फवारणी यंत्रांचा वापर व योग्य उपचार न मिळणे अशी अनेक कारणे विषबाधेने बळी जाण्यामागे असतात. कीटकनाशक तात्कालिक तसेच दीर्घकालीन दुष्परिणामही होत असतात. त्यामुळे सर्वांनीच पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे.
          विषबाधांच्या प्रकरणांत डॉक्टरांनी करावयाचे उपचार, औषधांची उपलब्धता, अद्ययावत उपचार प्रणाली याबाबत डॉ. कानुंगो यांनी वैद्यकीय अधिका-यांचे प्रशिक्षण घेतले. कार्यशाळेला सुमारे जिल्ह्यातील शंभरहून अधिक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. श्री. सेन यांनी प्रास्ताविक, तर श्री. हेगाणा यांनी आभार मानले.
00000

Sunday, November 3, 2019

शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी सरसकट मदत मिळवून देणार -कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे
















* गुरुवारपर्यंत पंचनामे पूर्ण करा
* नुकसान भरपाई संदर्भात गावागावात जनजागृती करावी
अमरावती, दि. 3 : अवकाळी पावसामुळे राज्यात सगळीकडेच शेतीचे व शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भात सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक वाया गेले आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 1 हजार 989 गावांपैकी 1 हजार 606 बाधित गावांची संख्या आहे. शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपदातून सावरण्यासाठी शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी सरसकट मदत मिळवून देणार असल्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले. याअनुषंगाने येत्या गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
            श्री. बोंडे यांनी आज अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्यासह जिल्ह्यातील मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर व भातकुली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची प्रत्यक्ष जावून पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत नुकसानी संदर्भात कृषी मंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. बोंडे यांनी मोर्शी तालुक्यातील काटसूर, चांदुरबाजार तालुक्यातील मौजा टाकरखेडा परिसरातील शेती, अचलपूर तालुक्यातील मौजा आसेगाव पूर्णा, दर्यापूर तालुक्यातील मौजा येसुर्णा, चंडीकापूर, खल्लार परिसरातील शेती, भातकुली आदी तालुक्यातील बाधित शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी केली.
अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कपाशी, ज्वारी तसेच मुंग व उडीद या खरीप पिकांचे आणि केळी, संत्रा या फळपिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सोयाबीन पूर्णत: खराब झाले असून त्याला कोंब आलेले दिसले तर कपाशीची बोंड खराब झाल्याचे दिसून आले आहेत. पाहणी दरम्यान सर्वत्र मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले. येत्या गुरुवारपर्यंत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करुन पंचनामे तयार करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.
            आढावा घेतांना डॉ. बोंडे म्हणाले की, जिल्ह्यात जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांनी पिकविमा काढल्याचे दिसून येते. पिकविमा काढलेल्या तसेच न काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम किंवा नुकसान भरपाई  मिळवून देण्यासाठी शासनाने समन्वयाची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाने सक्रियपणे काम करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून क्लेम फॉर्म भरुन घ्यावे. भरपाईसाठी विम्याची रक्कम भरल्याचा कुठलाही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. कृषी विभागाने विम्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना सहाय्य करावे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन सर्वकष मदत करणार.
            ज्या तालुक्यात ऑक्टोबर अखेर सरासरी 120 मि.मिच्यावर पाऊस पडला असेल अशा ठिकाणी किंवा क्षेत्रातील शेतकरी कापणीनंतरच्या (पोस्ट हारवेस्ट) विमा क्लेमसाठी पात्र ठरू शकतात तर 120 मिमिच्या आत सरासरी पाऊस पडला असेल तर अश्यांच्या बाबत स्थानिकीकरण क्षेत्र (लोकलाईज्ड एरिया) विमा क्लेमसाठी पात्र ठरु शकतात, असेही डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
            कोणत्याही शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान येसुर्णा येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. सदर शेतकऱ्याकडे पावणे तीन एकर जमीन असून सोयाबीन पेरले होते. त्याच्या संपूर्ण शेतीतील सोयाबीन पीक वाया गेले असून त्यानी विमा काढला असल्यामुळे नुमसान भरपाईपोटी त्याला शेतीक्षेत्रफळानुसार नुकसान भरपाई मिळवून दिली जाणार असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले
            कृषी विभागाने व महसूल विभागाने सक्रीयपणे काम करुन तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या अधिनस्त काम करणारे कृषी सहायक, कृषी मित्र तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी गावागावात मार्गदर्शन व जनजागृती करावी. कृषी विभागानी शेतकऱ्यांचे पीकविमा व नुकसान भरपाईचे अर्ज संबधित विमा कंपनीला पाठवावे. गावागावात दवंडी देऊन तसेच व्हॉटस्ॲप मॅसेज तसेच प्रसारमाध्यमांतून आवाहन करुन नुकसान भरपाई संदर्भातील संपूर्ण प्रक्रिये संदर्भात जनजागृती करावी. पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...