Tuesday, February 4, 2020

उद्योग केंद्रातर्फे ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ कार्यशाळेला मोठा प्रतिसाद






व्यवसाय सुलभतेचा उद्योजकांनी लाभ घ्यावा
-         तज्ज्ञ सल्लागार किर्ती अग्रवाल
            अमरावती, दि. 3 :  शासकीय कामकाजात विविध स्तरावर सुधारणांच्या दृष्टीने उद्योग संचालनालयातर्फे व्यवसाय सुलभता  निर्माण करण्यात आली असून उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई येथील तज्ज्ञ सल्लागार किर्ती अग्रवाल यांनी केले.
             जिल्हा उद्योग केंद्रातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या सीए भवन येथे इज ऑफ डुइंग बिझनेस कार्यशाळा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, मुंबईचे तज्ज्ञ सल्लागार कुणाल शहा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय बांगर, संस्थेचे अध्यक्ष डी.डी. खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते.
              या कार्यशाळेत व्यवसाय सुलभता व मैत्री कक्षाबाबत तज्ज्ञ व्याख्यात्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.  श्रीमती अग्रवाल म्हणाल्या की, व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने जागतिक बँकेच्या परिमाणानुसार अनेकविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उद्योगासाठी परवानग्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. वीज, पाणी आदी मिळण्याबाबत प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे देशाची जागतिक क्रमवारीतील क्रम सुधारला असून आता तो 63 वर आहे. महाराष्ट्र शासनाकडून भरीव प्रयत्न करण्यात आले असून ते गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम स्थान बनले आहे. या परिवर्तनाचा लाभ उद्योजकांनी घ्यावा.
मैत्री हे एक खिडकी योजना असलेले सुलभ परवानगी प्रक्रियेसाठीचे पोर्टल आहे. त्याचा लाभ उद्योजकांनी घेण्याचे आवाहन श्री. शहा यांनी केले. 
00000

ग्रामपरिवर्तन अभियानातून गावांचा शाश्वत विकास साधावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 4 : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे राज्यातील सुमारे एक हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी गावातील मुलभूत गरजा ओळखून त्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानांतर्गत झालेल्या विकास कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. खोज स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी पुर्निमा उपाध्याय यांचेसह गावचे ग्रामपरिवर्तक व इतर शासकीय यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, अभियानाच्या अनुषंगाने गावात झालेली विधायक कामे व त्याविषयीची माहिती प्राथम्याने ‘परिवेश’ पोर्टलवर अपलोड करावी. गावातील नादुरुस्त रस्त्यांची दूरुस्ती मनरेगातून करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजने अंतर्गत मंजूर लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा. मेळघाटातील गावांत वीज जोडणी, पाणी पुरवठा योजना, आरोग्य सुविधा, शाळा, अंगणवाडी आदी संदर्भातील मुलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. गावात पाण्याची मुबलकता राहण्यासाठी वनतलावांची निर्मिती शास्त्रोत्क पध्दतीने करण्यात यावी.
फेब्रुवारी अखेरपर्यंत अभियानांतर्गत असणाऱ्या प्रलंबित मागण्या व विकास कामे पूर्ण करण्यात यावीत. वीज चोरी रोखण्यासाठी सौर दिव्यांची उपलब्धता करुन देण्यात यावी. तसेच ग्रामस्थांचे मन परिवर्तन करुन प्रबोधन करावे. आदिवासीबहूल गावांचा विकास करण्यासाठी पाच टक्के आदिवासी उपयोजनातून तसेच चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. विकास कामे करतांना सर्व योजनेच्या निधीच्या अभिसरणातून कामे पूर्ण करण्यात यावीत, असेही श्री. नवाल यांनी सांगितले.
00000

Monday, February 3, 2020

कुरळपूर्णा- हिरूळपूर्णा येथे राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद









       सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी राहुटी उपक्रम
                                              -जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 

अमरावती, दि. 3 : सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे वेळेत पूर्ण व्हावी, जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राहुटी उपक्रम जिल्ह्यात विविध गावांत राबविण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात हा पहिला उपक्रम सेवा हमी कायद्यांतर्गत राबविण्यात येत असून, आज चांदूर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा व त्यानंतर हिरुळ पूर्णा येथे आयोजित राहुटी उपक्रमाचा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने स्वीकारून त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत:  शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पावसामुळे घर पडझड झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप व अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन,  आरोग्य, कामगार कल्याण आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
                                    लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा                               
दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्डाबाबत अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला. 
राहुटीत नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्ज वाटप कक्ष यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे नागरिकांना योग्य मार्गदर्शनासह त्यांच्या प्रश्नांचा तत्काळ निपटाराही होत आहे.  

     ०००

Saturday, February 1, 2020

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून चांदूरबाजार व अचलपूर एमआयडीसी जागेची पाहणी









अमरावती, दि. 1 : ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी तालुक्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांचा विकास होणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध्‍ होण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सांगितले.
चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील एमआयडीसी जागेची पाहणी राज्यमंत्री श्री. कडू यांनी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांच्यासह भूमि अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व नागरिकांना कुशल, अकुशल कर्मचारी म्हणून रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने तालुकास्तरावरील औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडावर उद्योग उभारणे आवश्यक आहे. तेथील जागेवर सर्व सोयी सुविधांची उपलब्धता करुन संपूर्ण विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योजक त्याठिकाणी उद्योग, कारखाने उभारण्यासाठी पुढे येतील.
चांदूर बाजार तालुक्यातील मोर्शी- चांदुर बाजार- अचलपूर या राष्ट्रीय महामार्ग तसेच नगर परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या नागरी सुविधांची पाहणी राज्यमंत्र्यांनी दौरा प्रसंगी केली. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेऊन रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे. नागरी वस्तीतील विजेचे पोल, नाल्या व दुकाने आदी सुनियोजित ठिकाणी बसविण्यात यावे, अशा सूचना श्री. कडू यांनी दिल्या.
शिरजगाव बंड येथील उरुजे मिल्लत उर्दु हायस्कुलला भेट
शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी पाच लाख रुपये निधी देणार – बच्चूभाऊ कडू
शिरजगाव बंड येथील उरुजे मिल्लत उर्दु हायस्कुलला  शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सदिच्छा भेट दिली. तेथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मुला-मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी शाळेचे अनन्यसाधारण महत्व आहे. शाळेत शिकल्याने मुलांमध्ये लहानपणापासून चांगले संस्कार घडतात. त्यांच्यातूनच उद्याची पिढी घडली जाते. खासगी शाळेसोबतच शासकीय शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे.
शिक्षकांनी मुलांना घडविण्यासाठी शिक्षणावर भर दिला पाहिजे. स्वयं अर्थ सहाय्य योजनेतून उर्दु शाळा चालविली जात आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. याबद्दल शाळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांचे कौतुक त्यांनी केले. सदर शाळेचा सर्वांगिण विकास व्हावा, शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी पाच लाख रुपयाचा निधी आमदार निधीतून देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. शालेय विद्यार्थ्यांव्दारे बहारदार कव्वालीचे सादरीकरण करण्यात आले. शाळेच्या वतीने राज्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अलफलाह मायनोरिटी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शे. अफजल शे. मुस्तफा, सरपंच अरुणाताई मानापुरे, उपसरपंच किशोर खवले यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
00000


Friday, January 31, 2020

राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद

गोरगरीबांना दिलासा देणारा उपक्रम
     





-         जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 31 : नागरिकांच्या विविध समस्यांचे एकाच ठिकाणी निराकरण राहुटीच्या माध्यमातून होत आहे.  राहुटी हा गोर गरिबांना दिलासा देणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज केले.

चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे आज राहुटी उपक्रमांतर्गत विविध योजनांच्या अनेक लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले.  या अर्जांवर तात्काळ कार्यवाही होऊन सर्व नागरिकांना लवकरच प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांचे वाटप ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार उमेश खोडके यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेचे काम एकाच ठिकाणी गतीने होण्यासाठी ग्रामीण स्तरावर राहुटी हा उपक्रम राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. आज उपक्रमाचा दुसरा दिवस होता.  
ब्राम्हणवाडा थडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राहुटीचे आयोजन करण्यात आले होते.
लाभार्थी प्रमाणापत्र, महसूल दाखले, जमिनीचा फेरफार, नवीन शिधापत्रिका, मातृवंदन योजना, बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विद्युत जोडणी, घरकुल योजना, आरोग्य योजना, अपंग प्रमाणपत्र आदी विविध बाबींसंदर्भात प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल.
            जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनीही यावेळी नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. राहुटी उपक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
                                                                        000    

Thursday, January 30, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली


 

               देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हुतात्मा दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनीटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, January 28, 2020

अमरावती येथे विभागीय कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती - उपमुख्यमंत्री अजित पवार






*पोलिसांच्या वाहनासाठी तरतूद
*निकषानुसार वार्षिक नियोजनचा निधी
*उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या सूचना
अमरावती, दि. 28 : अमरावती येथे विभागीय प्रशासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विशेष पोलिस महानिरीक्षक आदी कार्यालये जुन्याच इमारतीमध्ये आहेत. या कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षांच्या प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी येथील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, अमरावतीसह अकोला, बुलडाणा येथील शासकीय कार्यालये जुन्या इमारतींमध्ये आहेत. अमरावती येथील विभागीय कार्यालये विविध ठिकाणी तसेच जुन्या जागेत आहेत. त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलिस विभागातील विभागीय कार्यालयांच्या स्वतंत्र इमारतींसाठीही निधी देण्यात येतील.
राज्यातील सर्व जिल्ह्यांना लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या, जिल्ह्याचे क्षेत्रफळ, मानव विकास निर्देशांक आदी निकषांनुसार जिल्हा वार्षिक योजनेंत देण्यात येणारा निधी कळविण्यात आला आहे. या निधीच्या मर्यादेतच आराखडा तयार करण्यात यावा, जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या एकत्रित निधीपैकी वीस टक्के निधी शाळांच्या बांधकामासाठी द्यावा लागणार आहे. अमरावती आणि अकोला येथील विमानतळाचा विकास जलदगतीने होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. मनरेगामधून शाळा खोल्या बांधकाम करण्यासाठी येत्या काळात परवानगी देण्यात येणार आहे. शाळांच्या बांधकामासाठी काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या संस्थांची विश्वासार्हता तपासावी, त्यानंतरच त्यांना बांधकामाची परवानगी देण्यात यावी.
वन विभागाच्या आक्षेपामुळे रस्ते आणि विजेची कामे करण्यात येत असलेली अडचण दूर करण्यासाठी नागपूर येथे सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी काढण्यात येतील. विभागातील लोणार, सिंदखेड आणि शेगाव विकास आराखड्यांची कामे योग्य पद्धतीने व्हावीत. लोणार सरोवराजवळील अतिक्रमण हटविण्यासोबतच सांडपाण्यास पायबंद घालावा, ही कामे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात करण्यात यावीत. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यानुसारच हा प्रकल्प पूर्णत्वास येईल.
जलसंधारणाची कामे करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आवश्यक असलेली इंधनाची सुविधा जिल्हा योजनेतून करण्यात यावी. कमी खर्चात पांदन रस्ते तयार करण्यासाठी अकोला जिल्ह्याला प्रायोगिक तत्वावर 15 कोटी रूपये देण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील इतर भागातही हा उपक्रम राबविण्यात येईल. कामांवरील खर्च कमी करण्याबरोबरच राज्याचे उत्पन्न वाढविण्याचे स्त्रोत लोकप्रतिनिधींनी सूचवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावरील सर्वच ठिकाणी पोलिस विभागातील वाहने जुनी झालेली आहे. त्या सर्वांना नवीन वाहनांसाठी निधी देण्यात येतील. जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग योग्यरित्या करावा. या निधीचा उपयोग आकांक्षित जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी व्हावा, यासाठी चालू वर्षातील संपूर्ण नियतव्यय उपलब्ध करून देण्यात येतील. अधिकारी यांनी सकारात्मकतेने कार्य करावे. या निधीचा संपूर्ण विनियोग करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...