Friday, February 14, 2020

राहुटी उपक्रमाद्वारे नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू









अमरावती, दि. १४ : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. अचलपूर तालुक्यात आज आयोजित राहुटी उपक्रमाचा आज शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी स्वत: यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
आज सकाळी अचलपूर तालुक्यातील कविठा बु. ग्राम पंचायतीत, त्यानंतर मेघनाथपूर बसस्टॉप येथे राहुटी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शिधापत्रिका, आधारकार्ड यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा राहुटी उपक्रमातून होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून विविध गावांत हा उपक्रम सुरू असून, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. सर्व कार्यालयांचा राहुटी उपक्रमात सहभाग असून, विविध विभागांबाबतच्या तक्रारींचे निवारण एकाच छताखाली होत आहे.
मेघनाथपूर येथे आयोजित राहुटीत वासणी प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने अर्ज भरुन घेण्यात आले.

राहुटी उपक्रमात नागरिकांना अर्ज उपलब्ध करून देणे, लेखन साहाय्य करण्यासाठी अर्ज वाटप व लेखन  कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तलाठी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, दिव्यांग कक्ष, पाणी पुरवठा विभाग, विद्युत कक्ष, सामाजिक न्याय विभाग, कामगार कल्याण, सिंचन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, महिला व बालविकास कक्ष आदी कक्षांचा उपक्रमात समावेश आहे.  या दालनांतून समस्यांच्या निराकरणासह विविध योजनांची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. उपक्रमामुळे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण आदी सर्वसामान्य नागरिकांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागत आहेत.
00000

Thursday, February 13, 2020

अचलपूर येथे उभारणार दूध संकलन-विक्री केंद्र



दूध संकलन केंद्राचा प्रकल्प अहवाल तयार करा
                                     -राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 13 : दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी अचलपूर उपविभागीय कार्यालयाच्या नजीक असलेल्या ई-क्लास भुखंडावर शेतकऱ्यांसाठी दूध संकलन केंद्र उभारण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून दूध संकलन, विक्रीसह दूध प्रकिया उद्योगाचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना दिल्या जाईल, अशा पध्दतीचे सुरळीत नियोजन करुन प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले.
            येथील सिंचन भवन विश्रामगृहात पशुसंवर्धन दुग्ध विकास व्यवसाय वाढीसाठी नियोजन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. राधेश्याम बहाद्दुरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. राऊत यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन द्यायावयाचे असल्यास दूध उत्पादन खर्च कमी होणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीक्षेत्र व अपुऱ्या सिंचनामुळे शेतकऱ्यांना पशुंसाठी लागणारा चारा निर्मितीकरीता अडचण येते. अशा स्थितीत शाश्वत सिंचन व्यवस्था होऊन उत्तम प्रतीचे चारा व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने मुरग्रास व इतर पशुखाद्य निर्मितीवर भर दिला पाहिजे.  या अनुषंगाने शासनाच्या ई क्लास जमीनीवर चारा निर्मितीसाठी जमीनी ताब्यात घेऊन त्यावर चारा निर्मिती करावी.  
दुधाळ जनावरांना पुरेसे पशुखाद्य उपलब्ध होईल यासाठी बारा महिन्याचे पशुखाद्य व औषधीचे वेळेनुसार नियोजित आराखडा तयार करावे. सर्व ऋुतूमध्ये पशुसाठी चारा उपलब्ध होईल यादृष्टीने वैरण व्यवस्था भक्कम झाली पाहिजे. पशु खाद्यानचे मासिक विवरणपत्र तयार करुन त्यानुसार चाऱ्या निर्मितीचे नियोजन करावे. दुधाळ पशुंना कुठल्या महिन्यात रोग अधिक बळवतात व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कसा करावा, याची माहिती गोळा करावी. शेतकरी आत्महत्या रोखण्यामध्ये दुग्ध उत्पादनांची वाढ प्रभावी उपाय ठरु शकते. येत्या 22 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत प्रकल्प अहवाल व अनुषंगिक बाबीचे सादरीकरणासाठी आवश्यक माहिती गोळा करावी, असेही श्री. कडू यावेळी सांगितले.
           सुरुवातीला चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यात दूध संकलन व विक्री केंद्र हा पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रकल्प राबवावा. दूध संकलन व विक्री केंद्राच्या उभारणीनंतर येणाऱ्या कमतरता, अडचणी तसेच फायदे-तोटे जाणून घेतल्यावर हा प्रयोग राज्यभरात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार. दूध विक्री तसेच प्रक्रिया उद्योग व दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांवर नफा किती मिळतो याची आकडेवारी घ्यावी. त्यानुसार शेतकऱ्यांना केंद्रात दूध विक्रीचे फायदे व तोटे आदी संदर्भात मार्गदर्शन करावे, असेही श्री. कडू यांनी सांगितले.
जिल्ह्यातून दर दिवशी 29 हजार लीटर दूध संकलीत होऊन नागपूर राष्ट्रीय दुग्ध विकास प्रक्लपाला जाते. यातून दर दिवसाला 10 लाख 15 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असल्याची माहिती पदूम उपायुक्त डॉ. गोहत्रे यांनी बैठकीत दिली. शेतकऱ्यांचे दूध उत्पादन खर्च कमी करणे, बाराही महिने दुधाळ पशुंसाठी चाऱ्याची व्यवस्था, विपणन (मार्केटींग) सुविधा, प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण आदी संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
00000

Monday, February 10, 2020

चिखलदरा रस्त्याची 15 दिवसांत सुधारणा करा





पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती, दि. 10 : परतवाडा ते चिखलदरापर्यंत डांबरी रस्त्याचे नुतनीकरण पंधरा दिवसामध्ये पूर्ण करण्याबाबत निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज चिखलदरा येथे दिले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली चिखलदरा नगर पालिका सभागृह येथे विविध विकास कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,वन विभागामार्फत आवश्यक परवानग्यांसाठी पाठपुरावा करण्यात येईल. आवश्यक रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. 

परतवाडा रस्त्याची 15 दिवसांत दुरुस्ती व्हावी.

सिडको मार्फत चिखलदरा पर्यटन करीता होत असलेल्या विकासाबाबत आढावा त्यांनी यावेळी घेतला. ही कामे गतीने व नियोजनपूर्वक पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम गावातील रस्ते व इतर दळणवळण सोयीसुविधांबाबत आढावा त्यांनी यावेळी घेतला.
चिखलदरा नगर परिषद करीत पर्यटन वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत पाठपुरावा करून निधी मिळवून देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले.या बैठकीसाठी नगराध्यक्ष श्रीमती विजयाताई सोमवंशी, उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, बांधकाम सभापती राजेश मंगलेकर, शिक्षण सभापती अरुण तायडे, राजेंद्रसिंह सोमवंशी, श्रीमती सुषमा मालवीय, श्रीमती प्रमिला कंदिलवर, श्रीमती शोभाताई तिडके, अन्वर हुसेन, प्रमोद नाईक, नगर परिषद सदस्य शैलेंद्र पाल उपस्थित होते. त्याचप्रमाणे डी एफ ओ व्ही शिवकुमार, तहसीलदार चंदनशिव, मुख्याधिकारी नगर परिषद चिखलदरा बी पिदूरकर, सा बा विभाग अभियंता पाटणकर, तसेच सिडको, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते
00000


तिवसा येथे शासकीय तूर खरेदीस सुरवात



*पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार
अमरावती, दि. 10 : तिवसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे हस्ते आज आधारभूत दराने तूर खरेदीस सुरवात करण्यात आली. पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तूर विक्रीस आणणाऱ्या पहिल्या तीन शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा बँकेचे संचालक सुरेश साबळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी दिलीप काळबांडे, मुकुंद देशमुख, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजानन अळसपुरे, बाजार समिती उपसभापती कमलाकर वाघ, सचिव श्याम देशमुख, नगराध्यक्ष वैभव वानखडे, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, बाजार समितीचे संचालक दिनेश साव, सुरेश धवणे, मिलिंद काळमेघ, रवी हांडे, राजेश राऊत, कैलाश कठाळे, सुरेंद्र साबळे, श्याम देशमुख, शरद देशमुख, बब्बू पटेल, दिलीप वानखडे, अतुल देशमुख, प्रल्हाद चव्हाण, नितीन अर्डक, रामभाऊ बोकडे, मुकुंद पुनसे, आशिष बायस्कर, सागर बोडखे, देविदास गायकवाड, किसन मुंदाने, अंकुश देशमुख, वैभव काकडे, गौरव उके, स्वप्नील गंधे, जिल्हा विपनन अधिकारी के. पी. धोपे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सचिन पतंगे, तहसीलदार वैभव फरतारे उपस्थित होते.
कार्यक्रमात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते हर्षल मालोदे, अमोल साबळे, देविदास कुबडे या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
00000

Sunday, February 9, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास महाराज यांना अभिवादन




 संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  उपस्थितांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000

Saturday, February 8, 2020

पालकमंत्र्यांची पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा





तूर खरेदीसाठी लागवडीचे पूर्ण क्षेत्र धरून उत्पादकता निश्चित करावी
- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 8 : तूर खरेदी करताना आंतरपीक म्हणून अर्धे क्षेत्र न धरता तूरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र धरून उत्पादकता निश्चित करावी व त्यानुसार खरेदी करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरून चर्चा करताना दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
तूरीचे पीक आंतरपीक म्हणून घेतले जात असले तरी तूर खरेदीसाठी तूरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरून उत्पादकता निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानुसार खरेदी व्हावी. याविषयी पाठपुरावा करण्यात येईल, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश म्हसे तसेच कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. त्यानुसार दोन दिवसात याबाबत पत्र निर्गमित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत पालकमंत्र्यांनी पाणी टंचाई उपाययोजना, पाणी पुरवठा तसेच विभागीय स्तरावरील कार्यालयांसाठी नियोजित इमारत आदी विविध बाबींच्या अनुषंगाने चर्चा केली. भविष्यात पाणी टंचाईची संभाव्यता लक्षात घेता टँकर आदी सुविधांचे परिपूर्ण नियोजन करावे. पाणी पुरवठा योजनांबाबत तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे. आवश्यक तेथे सर्व्हेक्षण करुन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
केकतपूर येथे स्थलांतरीत पक्षी येण्याचे प्रमाण मोठे आहे. याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी केकतपूर सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी असेही त्यांनी सांगितले. तिवसा येथील वनउद्यान व इतर विषयांवरही यावेळी चर्चा झाली.
00000


राहूटीतून 50 हजार अपंग प्रमाणपत्राचे वाटप









राहुटी : जनतेसाठी प्रजासत्ता दिन
                         राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 8 : गावागावात राबविण्यात येणाऱ्या राहूटीच्या माध्यमातून वर्ष 2005 पासून ते आजपर्यंत दिव्यांग बांधवांना सुमारे 50 हजार अपंग प्रमाणपत्रांचा वाटप करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज देऊरवाडा येथे दिली. प्रजा ही राजा असून लोकप्रतिनिधी व अधिकारी हे प्रजेचे सेवक आहे. गोरगरीब नागरिकांच्या हितासाठी राहूटीच्या माध्यमातून प्रजासत्ता दिन साजरा करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले
आज चांदुर बाजार तालुक्यातील नानोरी व त्यानंतर देऊरवाडा येथे राहूटीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार उमेश खोडके यांचेसह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की, गोरगरीब जनतेची कामे एकाच ठिकाणी त्यांच्या गावात व्हावी या उदात्त हेतूने राहूटी हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आज चांदूरबाजार तालुक्यातील राहूटीचा शेवटचा दिवस होता. राहुटीच्या माध्यमातून अनेकांना फायदा झाला आहे. त्यांची शिधा प्रत्रिका काढणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अतिक्रमण नियमानुकूल करुन पट्टे वाटप, वैद्यकीय मदतीचे अर्ज, दिव्यांग व्यक्तींचे अपंग प्रमाणपत्र तयार करणे, महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ, जमीनीचे फेरफार आदी शासकीय विभागाशी निगडीत कामे गावातच पूर्ण झाली आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुध्दा सहकार्य लाभले. राहुटीत सहभागी झालेल्या सर्वांचे मनपूवर्क आभार श्री. कडू यांनी यावेळी मानले.
राहूटीच्या माध्यमातून 270 कुटुंबाचे अतिक्रमण नियमानुकूल करुन त्यांना मालकी हक्क पट्टे वाटप प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. हे राज्यात सर्व प्रथम घडले आहे. देऊरवाडा व काजळी येथील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात मंजूर करुन संबंधितांना सुध्दा मालकी हक्काचे पट्टे वितरण करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या कुटूबियांना मदतीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व निवेदने स्वीकारुन त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहे. आज आयोजित दोन्ही ठिकाणच्या राहुटीत अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, कामगार कल्याण आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. राहुटीच्या ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्डाबाबत अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...