Wednesday, June 3, 2020

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर 1 हजार घरकुले साकारणार

                            -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. 3 : गोरगरीब, गरजू व्यक्तींना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतून परतवाडा-अचलपूर हे जुळे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने बीओटी तत्वावर एक हजार घरकुले साकारण्याचा निर्णय जलसंपदा, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. या दृष्टीने आवश्यक निधी व इतर प्रक्रिया तत्काळ पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

अचलपूर येथील विश्रामभवन येथे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली शहर प्रशासनाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शहराच्या नगराध्यक्षा सुनीता फिस्के, मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे, बांधकाम सभापती संजय तट्टे, बंटी कंकरानिया, प्रवीण पाटील, विजय थावानी, रुपेश लहाने, नरेंद्र फिस्के, बंटी उपाध्याय यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत परतवाडा-अचलपूर या जुळया शहरातील पाणी पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, नगरपालिका भवन, आठवडी बाजार आदींसंदर्भात आढावा राज्यमंत्री श्री. कडू यांनी घेतला. नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी सर्व नागरी पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर सर्व आवास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जुळ्या शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने एक हजार घरकुलांची उपाययोजना तत्काळ पूर्णत्वास जाईल, या दृष्टीने प्रयत्न  करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा प्रलंबित दुसरा व तिसरा हप्ता देण्यासाठी नगरपालिकेला निधीची तरतूद उपलब्ध करुन दिली जाईल. ही कामे गतीने करावी. निधीची कमतरता पडू देणार नाही. योजनेत पीआर कार्ड वडलांच्या नावाने असलेल्या व लाभार्थी अर्जदार मुलगा असलेल्या एकूण 220 घरकुलांच्या प्रकरणांना तत्काळ मंजूरी प्रदान करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. 

 

परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात पाणीपुरवठ्यासाठी पूरक जलसंचय स्त्रोत  उपलब्ध असताना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाई असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुनियोजित उपायांची तत्काळ अंमलबजावणी करावी. येत्या एक महिन्याचा पाणीटंचाईचा प्रश्न दूर होऊन पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.   

शहरातील साप्ताहिक बाजार, नगरपालिका भवन आदींबाबतही चर्चा यावेळी झाली.

                                                00000

टाकरखेडा शंभू येथील वीज उपकेंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन



वीज उपकेंद्रांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा

    -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 3 : एकीकडे कोरोना संकटाशी मुकाबला सुरु असताना दुसरीकडे विकासकामे पूर्ण करून जनसुविधांत भर घालण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबरोबरच पायाभूत सुविधा आणि इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार नियमित वीजपुरवठ्यासाठी वीज उपकेंद्राची कामे नियोजनानुसार विहित मुदतीत पूर्ण व्हावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे (महावितरण) टाकरखेडा शंभू येथे 33/11 केव्ही उपकेंद्राचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. सदस्य जयंतराव देशमुख, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, उपकार्यकारी अभियंता गोकुळ मोरे आदी यावेळी उपस्थित होते.  

एच. व्ही. डी. एस. योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये 33 के. व्ही. उपकेंद्र उभारणे व अस्तित्वात असणा-या उपकेंद्रातील क्षमता वाढ करण्याकरिता एकूण 15 कोटी 6 लक्ष रूपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला. या योजनेत अचलपूर तालुक्यातील सावळापूर, भातकुली तालुक्यातील आष्टी (टाकरखेडा शंभू), चांदूर बाजार तालुक्यातील बेलारा येथे 5 एम.व्ही. ए. क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र उभारण्याचे काम मंजूर आहे. उपकेंद्रांच्या परिसरातील अनेक गावांना त्यामुळे अखंडित वीजपुरवठा होणार आहे.

टाकरखेडा संभू (आष्टी) येथील 10 एमव्हीए क्षमतेच्या 33 के. व्ही. उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली.  हे उपकेंद्र उभारण्यासाठी अंदाजे सव्वादोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. नियोजनानुसार उपकेंद्राचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मुदतीत काम पूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

22 गावांना होणार अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ

उपकेंद्रात पाच एमव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे मंजूर असून, एकूण क्षमता 10 एमव्हीए इतकी आहे. या उपकेंद्रातून दोन 11 केव्ही गावठाण व 3 कृषी वाहिन्यांद्वारे पूर्णानगर, टाकरखेडा संभू, रामा, आष्टी, जळका या गावांसह परिसरातील 22 गावांना योग्य दाबाचा अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या उपकेंद्राच्या उभारणीमुळे अस्तित्वात असलेल्या वलगाव व आसेगाव या उपकेंद्राचा विद्युत भार कमी होऊन आष्टी परिसरातील गावांमधील ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. परिसरातील नागरिक, तसेच शेतकरी बांधवांच्या सुविधेसाठी हे उपकेंद्र लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

भूमीपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावेळी झाला. 

00000



Tuesday, June 2, 2020

पालकमंत्र्यांच्या निर्देशाने जिल्ह्यात कापूस उत्पादक नोंदणी पुन्हा सुरु


नोंदणी न झालेल्या कापूस उत्पादकांना 3 ते 6 जून दरम्यान नोंदणी करता येणार

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

  अमरावती, दि. 2 : शासकीय हमीभाव योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील यापूर्वी नोंदणी करू न शकलेल्या शेतक-यांच्या कापूस विक्रीसाठी उद्यापासून (दि. 3 जून) दि. 6 जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. तरी अद्यापही नोंदणी न झालेल्या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.  

कापूस उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर या वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कापूस खरेदी सुरु करण्यापासून ते अनेक बाबींचा निवेदन व चर्चेद्वारे पाठपुरावा पालकमंत्र्यांनी केला. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याशीही चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.  

कोविड-19 च्या अनुषंगाने संचारबंदी लागू असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत सापडला. खरेदी व नोंदणीतही अडथळे आले. अनेक शेतकरी बांधव शासकीय हमीभाव योजनेंतर्गत नोंदणी करू शकले नाहीत. हे लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी महासंघ व प्रशासनाशी चर्चा करून नोंदणीपासून वंचित शेतकरी बांधवांची तत्काळ नोंदणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून तत्काळ हालचाली होऊन उद्यापासून नऊ ठिकाणी नोंदणी सुरु होणार आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी केंद्रनिहाय कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अमरावती, भातकुली व तिवस्यासाठी अमरावती, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यासाठी नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यासाठी धामणगाव रेल्वे, वरूड तालुक्यासाठी वरूड, मोर्शी तालुक्यातील मोर्शी, दर्यापूर तालुक्यासाठी दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी अंजनगाव सुर्जी, अचलपूर व धारणीसाठी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यासाठी चांदूर बाजार येथील बाजार समितीकडे नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सन 2019-20 चा कापूस पीक पेरा असलेला सातबारा, आधारकार्डाची व बँक खात्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, यापूर्वी शासकीय हमीभाव कापूस केंद्रावर कापूस नोंदणी, तसेच कापूस विक्री केलेल्या शेतक-यांनी पुन्हा नोंदणी करू नये. एका शेतक-याने एकदाच नोंदणी करावी व कापूस पेरा असलेले सर्व सातबारा त्या टोकन क्रमांकावर नोंदविण्यात यावेत, दिनांक सहा जूनपूर्वी कार्यालयीन वेळेनंतर कापूस नोंदणी बंद करण्यात येईल. त्यानंतर कापूस नोंदणी करण्यात येणार नाही, हे लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले आहे.

कापूस नोंदणी करताना कोरोना दक्षता प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे. ही नोंदणी प्रक्रिया गतीने राबवून अधिकाधिक शेतकरी बांधवांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.  

 

                                              000


महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या प्रयत्नाने सापडला मूक महिलेचा पत्ता

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या प्रयत्नाने सापडला मूक महिलेचा पत्ता


पत्ता न सांगता येणारी मूक भगिनी स्वगृही रवाना

                                                        









आधार प्रणालीची मदत

 

अमरावती, दि. 2 : मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणा-या व येथील जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या एका भगिनीची व्यथा जाणून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. त्यांच्या सतत प्रयत्नाने आधार प्रणालीच्या साह्याने या महिलेचा मूळ पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले असून, या महिलेला स्वतंत्र वाहनाने स्वगृही पोहोचण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.  

            या भगिनीचे नाव के. मंजुळा असून, त्या आंध्रप्रदेशातील आहेत. आंध्रप्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील त्या रहिवाशी आहेत.  पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी साडीचोळी देऊन या भगिनीला निरोप दिला. तिच्या गत महिनाभरातील वास्तव्याने स्नेह निर्माण झालेल्या पारिचारिका भगिनींना व सर्वांना के. मंजुळा यांनी हात हलवून निरोप दिला. घरी परतण्याचा आनंद त्यांचा चेह-यावर झळकत होता. पालकमंत्र्यांसह सगळेच यावेळी भारावून गेले होते.

सुमारे दीड महिन्यापूर्वी ही महिला वलगाव येथे आढळली होती. एका ट्रकमधून ती वलगाव येथे उतरली. ती रस्त्याने जात असताना पोलीसांना आढळले. ती मूक असल्याने संवाद होत नव्हता. प्रशासनाने तिला क्वारंटाईन कक्षात दाखल केले. दरम्यान, या महिलेला ताप असल्याच्या कारणावरून इर्विन रूग्णालयात दि. ६ मे रोजी १०८ रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली. मात्र, ती कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर ही महिला घरी जाण्यायोग्य स्थितीत असूनही तिला बोलता येत नसल्याने तिच्याशी संवाद होऊ शकला नाही आणि मग कुटुंबियांशी संपर्क कसा साधायचा, अशी अडचण वैद्यकीय यंत्रणेपुढे उभी राहिली. ही माहिती मिळताच महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर स्वत: तज्ज्ञांच्या चमूसह येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी या महिलेची भेट घेऊन तिला कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेऊन दिलासा दिला.

दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सदर महिलेला ठेवण्यात आले होते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अधिपरिचारिका सिंधू खानंदे व इतर पारिचारिकांनी तिची काळजी घेतली.

 

                       

बोटांच्या ठस्यांच्या आधारे आधार प्रणालीतून शोध

 

या भगिनीच्या हातवा-यांच्या आधारे सांकेतिक भाषा जाणकारांकडून तिचे मूळ ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर महिलेचे फिंगर प्रिंट घेऊन ते आधार प्रणालीचा डेटा तपासून त्याआधारे शोधून काढण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार यंत्रणेकडूनही शोध मोहिम सुरूच होती. महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर रोज त्याचा पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार या अविरत प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

 

आधार प्रणालीच्या साह्याने हातांच्या ठस्याच्या आधारे या महिलेचा पत्ता सापडला. त्यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर यांच्यासह प्रशासन, जिल्हा रूग्णालयातील स्टाफ यांनी आनंद व्यक्त केला. आप्तस्वकीयांच्या आठवणीने रोज अश्रू ढाळणा-या या भगिनीपर्यंत ही पारिचारिकांनी ही माहिती सांकेतिक खुणांनी पोहोचवली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तिला पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. प्रशासनाकडून कुर्नुल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. प्रवासाच्या आवश्यक परवानग्या तत्काळ मिळविण्यात आल्या. या भगिनीसोबत तहसील कार्यालयाकडून प्रशांत पांडे सोबत निघाले. तहसीलदार संतोष काकडे, पालकमंत्र्यांचे ओएसडी रणजीत भोसले, ओएसडी प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अधिपारिचारिका सिंधु खानंदे व त्यांच्या सहकारी, दै. लोकमतचे छायाचित्रकार मनीष तसरे, नीरज तिवारी, पंकज मुदगल अशा अनेकांचा या शोध मोहिमेत सहभाग होता.    

या मूक भगिनीला तिच्या घरापर्यंत पोहोचून कुटुंबिय व आप्तांना भेटता येणार आहे, याचा मोठा आनंद आहे. कोरोना संकटकाळात अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे, बस उपलब्ध करून देणे आदी हरप्रकारचे प्रयत्न होत आहेत. सगळ्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याचे प्रयत्न होत आहेत, असे महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. के. मंजुळा यांचा पत्ता मिळेपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना जिल्हा रूग्णालयातच ठेवले होते. या काळात त्यांची व इतरही रुग्णांची अविरत सेवा करणा-या सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचा-यांचे व शोध मोहिमेला सहकार्य करणा-या प्रत्येकाचे श्रीमती ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

 

00000

 


Sunday, May 31, 2020

रूग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोविड वॉर्डाला भेट पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस


 

        



जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल सायंकाळी या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलासा दिला.

        गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी काल सायंकाळी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांची टीम अहोरात्र मेहनत जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता  काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते. आज मी स्वत:  पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोविड रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचा-यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करत असल्याची माहिती या सर्व रूग्णांनी दिली.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, अजूनही आपली लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रकार कुणीही करता कामा नये. आपल्या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 212 रूग्ण आढळून आले आहेत. त्यातले 120 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच रूग्णालयात त्यांनी उपचार घेतले आहेत.

आढळलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक रूग्णांवर याच रुग्णालयातून उपचार होऊन ते बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहेत. डॉक्टर व त्यांची टीम या रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.  आपण कोविड रुग्णालयातील प्रत्येक दाखल व्यक्तीला भेटून विचारपूस केली आहे.  प्रत्येक वॉर्डाला भेट दिली आहे. रुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणा रूग्णांसाठी व समाजासाठी देवदूत ठरली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

 

                                    000

 

 

 


Saturday, May 30, 2020

आगामी काळातील नियोजनाबाबत पालकमंत्र्यांकडून निर्देश



कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक स्थिती लक्षात घेऊन परिपूर्ण  नियोजन करावे

-     पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 30 : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व जून महिन्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्ह्यात व अमरावती शहरात स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा व पुढील काळातील नियोजन ठरविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवत असताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास मुभा देण्यात आली. 31 मे नंतरच्या काळासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून नव्याने मार्गदर्शक सूचना प्राप्त होणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात व विशेषत: अमरावती शहरात स्थानिक परिस्थिती, रुग्ण व संशयितांची संख्या, सतत सुरु असलेल्या सर्वेक्षणातून पुढे येणा-या बाबी आदींचा काटेकोर विचार करून नियोजन करण्यात यावे. परिसरनिहाय सूक्ष्म नियोजनातून अधिक अचूकपणे कार्यवाही व्हावी.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, सुरक्षित परिसरात नियमांचे पालन करून दुकाने, व्यवसाय आदी सुरु होऊन जनजीवन पूर्वपदावर येईल, असा प्रयत्नही आवश्यक आहे. मात्र, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्स या बाबी पाळल्या गेल्याच पाहिजेत. त्यादृष्टीने टप्प्याटप्प्याने उद्योग- व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणे, हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची प्रत्येकाने अंमलबजावणी केली तरच ते शक्य होईल. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसते. त्याला आळा घालण्यासाठी नियमितपणे प्रतिबंधक कारवाया करून शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयातून प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व अमरावती शहरातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत कशी करता येईल, याकडे लक्ष पुरवावे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रूग्णालये येथील यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेची व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यामुळे जून महिन्यासाठी स्थानिक स्थिती लक्षात घेऊनच विविध व्यवसायांना परवानगी आदी प्रक्रिया व्हावी. व्यवसायांना परवानगी देताना दिवस, वेळ, गर्दी टाळण्यासाठीचे उपाय आदी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. रोजगाराचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यादृष्टीने विविध उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवनात सुरळीतता आणणे गरजेचे आहे. मात्र, सुरक्षितताही जोपासली गेली पाहिजे. हे लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

अमरावती येथील ‘ब्रेनवायर आयटी’तर्फे स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन एक ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. त्याची माहिती संस्थेचे आकाश पालीवाल, समीर गांजरे यांनी दिली.  स्क्रिनिंग व नागरिकांना मार्गदर्शन यासाठी ते उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. याबाबत तिवसा नगरपंचायत स्तरावर डेमो घेऊन व उपयुक्तता तपासून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय यावेळी झाला.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...