Thursday, June 4, 2020

अमरावतीत अडकलेल्या मंजूळाताई अखेर स्वजिल्ह्यात पोहोचल्या पालकमंत्र्यांसह प्रशासनाच्या प्रयत्नांना यश



 

सर्व स्तरांतून समाधान व्यक्त

 

अमरावती, दि. 4 : मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणा-या व महिन्याहून अधिक काळ जिल्ह्यात अडकून राहिलेल्या के. मंजुळा या महिला अखेरीस आंध्रप्रदेशातील आपल्या स्वत:च्या कुर्नुल जिल्ह्यात जाऊन पोहोचल्या आहेत. महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर व प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त करून या भगिनीला सुरक्षितपणे घरी पोहोचविले याबद्दल कुर्नुल प्रशासनाने आभार मानले आहेत.

          अमरावती येथून सुमारे साडेआठशे किलोमीटर असलेल्या कुर्नुलला जाण्यासाठी मंजुळाताई मंगळवारी (दि. 2) दुपारी रवाना झाल्या होत्या. त्यांना परतण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वतंत्र वाहन देऊन सन्मानपूर्वक स्वजिल्ह्याकडे रवाना केले. या भगिनीसोबत तहसील कार्यालयाकडून प्रशांत पांडे सोबत निघाले होते. ते काल (दि. 3) सकाळी कुर्नुल येथे जाऊन पोहोचले. कुर्नुल जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पाळावयाच्या नियमांनुसार, काही दिवस मंजुळाताईंना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. त्यानंतर त्या आपल्या कुटुंबात परततील. त्याबाबत लेखी पत्रही कुर्नुल जिल्हा प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डी. टी. नायक यांनी अमरावती जिल्हा प्रशासनाला दिले आहे व या भगिनीला सुरक्षितपणे घरी पोहोचविल्याबद्दल आभार मानले आहेत.

मंजुळा या आंध्रप्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील रहिवाशी आहेत. सुमारे दीड महिन्यापूर्वी त्या जिल्ह्यातील वलगाव येथे आढळल्या होत्या. त्या मूक असल्याने संवाद होत नव्हता. त्यामुळे प्रशासनाने त्यांना क्वारंटाईन कक्षात दाखल केले. दरम्यान, त्यांना ताप आल्याने दि. 6 मे रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली. मात्र, त्या कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर त्या घरी जाण्यायोग्य स्थितीत असूनही बोलता येत नसल्याने त्यांचा पत्ता व संपर्क शोधण्याचे आव्हान वैद्यकीय यंत्रणेपुढे उभे राहिले.

महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: ही जबाबदारी स्वीकारून मूकबधीर भाषातज्ज्ञ व इतरांना सहभागी करून घेत पथक तयार करून शोध मोहिम हाती घेतली व स्वत: प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा केला. आधार प्रणालीच्या आधारे मूळ ठिकाण शोधण्यासाठी मंजुळाताईंच्या बोटाचे ठसे घेण्यात आले. या सतत प्रयत्नांनी व आधार प्रणालीच्या साह्याने या महिलेचा मूळ पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंजुळाताईंना जिल्हा रूग्णालयातच ठेवण्यात आले होते.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नितीन व्यवहारे,तहसीलदार संतोष काकडे, पालकमंत्र्यांचे ओएसडी रणजीत भोसले, ओएसडी प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अधिपारिचारिका सिंधु खानंदे व त्यांच्या सहकारी, दै. लोकमतचे छायाचित्रकार मनीष तसरे, नीरज तिवारी, पंकज मुदगल अशा अनेकांचा या शोध मोहिमेत सहभाग होता.    

मूक असल्याने पत्ता न सांगता येणारी एक भगिनी सर्वांच्या प्रयत्नाने आपल्या भूमीत सुखरूप जाऊन पोहोचली, याचे समाधान आहे. कोरोना संकटकाळात अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे, बस उपलब्ध करून देणे आदी हरप्रकारचे प्रयत्न होत आहेत. सगळ्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याचे प्रयत्न होत आहेत. के. मंजुळा यांचा पत्ता मिळेपर्यंत त्यांची काळजी घेणा-या डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचा-यांचे व शोध मोहिमेला सहकार्य करणा-या प्रत्येकाचे श्रीमती ठाकूर यांनी अभिनंदन करून आभार मानले आहेत.  

 

00000

Wednesday, June 3, 2020

फेम इंडिया’ व ‘एशिया पोस्ट’च्या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची निवड

अमरावती, दि. 3 : ‘फेम इंडिया’ व ‘एशिया पोस्ट’च्या वतीने देशभर 724 जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरीसाठी 50 जिल्हाधिका-यांची निवड करण्यात आली असून, त्यात अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा समावेश आहे.     

याबाबत ‘फेम इंडिया’ या नियतकालिकाने निवड केलेल्या 50 जिल्हाधिका-यांची सूची प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, विकासासाठी योजनांच्या रचनेपासून ते अंमलबजावणीपर्यंत विविध कामांमध्ये जिल्हाधिका-यांचा सहभाग असतो. जिल्ह्यातील उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ, शासन निर्णय, विविध भागांची गरज आदींचा विचार अंमलबजावणी करताना केला जातो. सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही योजनेच्या क्रियान्वयनात जिल्हाधिका-यांची भूमिका व योगदान महत्वपूर्ण असते.

 प्रशासकीय कामांमध्ये अनेकदा अडचणीही येऊ शकतात. मात्र, त्यावर मात करत समग्र जिल्ह्याचा विचार करून, तसेच सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून विकासाला गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्या दृष्टीने प्रशासनाबद्दलची काहीशी रूढ नकारात्मकता टाळणे व सकारात्मकता निर्माण होण्याच्या हेतूने, तसेच आव्हानात्मक परिस्थितीचा सतत सामना करून विकासकार्य पुढे नेणा-या प्रशासकांना प्रोत्साहन देणे, त्यांचे मनोबल उंचावणे आवश्यक असते. याच हेतूने देशभर हे सर्वेक्षण करण्यात आले, असे ‘फेम इंडिया’ने नमूद केले आहे.

देशातील 724 जिल्ह्यात हे सर्वेक्षण करताना उत्कृष्ट प्रशासन, दूरदृष्टी, उत्कृष्ट विचारसरणी, जबाबदारीने काम पूर्णत्वास नेण्याची शैली, निर्णयक्षमता, गांभीर्य आणि कार्यकुशलता आदी निकष ठरविण्यात आले होते.  देशातील 50 उत्कृष्ट जिल्हाधिका-यांत निवड झाल्याबद्दल श्री. नवाल यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

श्री. नवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2010 च्या बॅचचे अधिकारी असून, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहेत. त्यांनी यापूर्वी डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक, अहमदनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना उत्कृष्ट काम आणि नवनवीन संकल्पना राबविल्याबद्दल 2017 -18 या वर्षांसाठी श्री. नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना विविध लघु उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करून रोजगार निर्मिती, नागरिकांच्या अडचणींच्या तत्काळ निराकरणासाठी संवाद कक्षासह विविध ऑनलाईन सेवांवर भर आदी अनेक वैविध्यपूर्ण कामे त्यांनी केली आहेत.

                                    000

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर 1 हजार घरकुले साकारणार

                            -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. 3 : गोरगरीब, गरजू व्यक्तींना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतून परतवाडा-अचलपूर हे जुळे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने बीओटी तत्वावर एक हजार घरकुले साकारण्याचा निर्णय जलसंपदा, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. या दृष्टीने आवश्यक निधी व इतर प्रक्रिया तत्काळ पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

अचलपूर येथील विश्रामभवन येथे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली शहर प्रशासनाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शहराच्या नगराध्यक्षा सुनीता फिस्के, मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे, बांधकाम सभापती संजय तट्टे, बंटी कंकरानिया, प्रवीण पाटील, विजय थावानी, रुपेश लहाने, नरेंद्र फिस्के, बंटी उपाध्याय यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत परतवाडा-अचलपूर या जुळया शहरातील पाणी पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, नगरपालिका भवन, आठवडी बाजार आदींसंदर्भात आढावा राज्यमंत्री श्री. कडू यांनी घेतला. नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी सर्व नागरी पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर सर्व आवास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जुळ्या शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने एक हजार घरकुलांची उपाययोजना तत्काळ पूर्णत्वास जाईल, या दृष्टीने प्रयत्न  करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा प्रलंबित दुसरा व तिसरा हप्ता देण्यासाठी नगरपालिकेला निधीची तरतूद उपलब्ध करुन दिली जाईल. ही कामे गतीने करावी. निधीची कमतरता पडू देणार नाही. योजनेत पीआर कार्ड वडलांच्या नावाने असलेल्या व लाभार्थी अर्जदार मुलगा असलेल्या एकूण 220 घरकुलांच्या प्रकरणांना तत्काळ मंजूरी प्रदान करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. 

 

परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात पाणीपुरवठ्यासाठी पूरक जलसंचय स्त्रोत  उपलब्ध असताना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाई असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुनियोजित उपायांची तत्काळ अंमलबजावणी करावी. येत्या एक महिन्याचा पाणीटंचाईचा प्रश्न दूर होऊन पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.   

शहरातील साप्ताहिक बाजार, नगरपालिका भवन आदींबाबतही चर्चा यावेळी झाली.

                                                00000

टाकरखेडा शंभू येथील वीज उपकेंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन



वीज उपकेंद्रांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा

    -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 3 : एकीकडे कोरोना संकटाशी मुकाबला सुरु असताना दुसरीकडे विकासकामे पूर्ण करून जनसुविधांत भर घालण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबरोबरच पायाभूत सुविधा आणि इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार नियमित वीजपुरवठ्यासाठी वीज उपकेंद्राची कामे नियोजनानुसार विहित मुदतीत पूर्ण व्हावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे (महावितरण) टाकरखेडा शंभू येथे 33/11 केव्ही उपकेंद्राचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. सदस्य जयंतराव देशमुख, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, उपकार्यकारी अभियंता गोकुळ मोरे आदी यावेळी उपस्थित होते.  

एच. व्ही. डी. एस. योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये 33 के. व्ही. उपकेंद्र उभारणे व अस्तित्वात असणा-या उपकेंद्रातील क्षमता वाढ करण्याकरिता एकूण 15 कोटी 6 लक्ष रूपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला. या योजनेत अचलपूर तालुक्यातील सावळापूर, भातकुली तालुक्यातील आष्टी (टाकरखेडा शंभू), चांदूर बाजार तालुक्यातील बेलारा येथे 5 एम.व्ही. ए. क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र उभारण्याचे काम मंजूर आहे. उपकेंद्रांच्या परिसरातील अनेक गावांना त्यामुळे अखंडित वीजपुरवठा होणार आहे.

टाकरखेडा संभू (आष्टी) येथील 10 एमव्हीए क्षमतेच्या 33 के. व्ही. उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली.  हे उपकेंद्र उभारण्यासाठी अंदाजे सव्वादोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. नियोजनानुसार उपकेंद्राचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मुदतीत काम पूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

22 गावांना होणार अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ

उपकेंद्रात पाच एमव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे मंजूर असून, एकूण क्षमता 10 एमव्हीए इतकी आहे. या उपकेंद्रातून दोन 11 केव्ही गावठाण व 3 कृषी वाहिन्यांद्वारे पूर्णानगर, टाकरखेडा संभू, रामा, आष्टी, जळका या गावांसह परिसरातील 22 गावांना योग्य दाबाचा अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या उपकेंद्राच्या उभारणीमुळे अस्तित्वात असलेल्या वलगाव व आसेगाव या उपकेंद्राचा विद्युत भार कमी होऊन आष्टी परिसरातील गावांमधील ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. परिसरातील नागरिक, तसेच शेतकरी बांधवांच्या सुविधेसाठी हे उपकेंद्र लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

भूमीपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावेळी झाला. 

00000



Tuesday, June 2, 2020

पालकमंत्र्यांच्या निर्देशाने जिल्ह्यात कापूस उत्पादक नोंदणी पुन्हा सुरु


नोंदणी न झालेल्या कापूस उत्पादकांना 3 ते 6 जून दरम्यान नोंदणी करता येणार

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

  अमरावती, दि. 2 : शासकीय हमीभाव योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील यापूर्वी नोंदणी करू न शकलेल्या शेतक-यांच्या कापूस विक्रीसाठी उद्यापासून (दि. 3 जून) दि. 6 जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. तरी अद्यापही नोंदणी न झालेल्या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.  

कापूस उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर या वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कापूस खरेदी सुरु करण्यापासून ते अनेक बाबींचा निवेदन व चर्चेद्वारे पाठपुरावा पालकमंत्र्यांनी केला. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याशीही चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.  

कोविड-19 च्या अनुषंगाने संचारबंदी लागू असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत सापडला. खरेदी व नोंदणीतही अडथळे आले. अनेक शेतकरी बांधव शासकीय हमीभाव योजनेंतर्गत नोंदणी करू शकले नाहीत. हे लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी महासंघ व प्रशासनाशी चर्चा करून नोंदणीपासून वंचित शेतकरी बांधवांची तत्काळ नोंदणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून तत्काळ हालचाली होऊन उद्यापासून नऊ ठिकाणी नोंदणी सुरु होणार आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी केंद्रनिहाय कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अमरावती, भातकुली व तिवस्यासाठी अमरावती, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यासाठी नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यासाठी धामणगाव रेल्वे, वरूड तालुक्यासाठी वरूड, मोर्शी तालुक्यातील मोर्शी, दर्यापूर तालुक्यासाठी दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी अंजनगाव सुर्जी, अचलपूर व धारणीसाठी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यासाठी चांदूर बाजार येथील बाजार समितीकडे नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सन 2019-20 चा कापूस पीक पेरा असलेला सातबारा, आधारकार्डाची व बँक खात्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, यापूर्वी शासकीय हमीभाव कापूस केंद्रावर कापूस नोंदणी, तसेच कापूस विक्री केलेल्या शेतक-यांनी पुन्हा नोंदणी करू नये. एका शेतक-याने एकदाच नोंदणी करावी व कापूस पेरा असलेले सर्व सातबारा त्या टोकन क्रमांकावर नोंदविण्यात यावेत, दिनांक सहा जूनपूर्वी कार्यालयीन वेळेनंतर कापूस नोंदणी बंद करण्यात येईल. त्यानंतर कापूस नोंदणी करण्यात येणार नाही, हे लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले आहे.

कापूस नोंदणी करताना कोरोना दक्षता प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे. ही नोंदणी प्रक्रिया गतीने राबवून अधिकाधिक शेतकरी बांधवांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.  

 

                                              000


महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या प्रयत्नाने सापडला मूक महिलेचा पत्ता

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या प्रयत्नाने सापडला मूक महिलेचा पत्ता


पत्ता न सांगता येणारी मूक भगिनी स्वगृही रवाना

                                                        









आधार प्रणालीची मदत

 

अमरावती, दि. 2 : मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणा-या व येथील जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या एका भगिनीची व्यथा जाणून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. त्यांच्या सतत प्रयत्नाने आधार प्रणालीच्या साह्याने या महिलेचा मूळ पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले असून, या महिलेला स्वतंत्र वाहनाने स्वगृही पोहोचण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.  

            या भगिनीचे नाव के. मंजुळा असून, त्या आंध्रप्रदेशातील आहेत. आंध्रप्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील त्या रहिवाशी आहेत.  पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी साडीचोळी देऊन या भगिनीला निरोप दिला. तिच्या गत महिनाभरातील वास्तव्याने स्नेह निर्माण झालेल्या पारिचारिका भगिनींना व सर्वांना के. मंजुळा यांनी हात हलवून निरोप दिला. घरी परतण्याचा आनंद त्यांचा चेह-यावर झळकत होता. पालकमंत्र्यांसह सगळेच यावेळी भारावून गेले होते.

सुमारे दीड महिन्यापूर्वी ही महिला वलगाव येथे आढळली होती. एका ट्रकमधून ती वलगाव येथे उतरली. ती रस्त्याने जात असताना पोलीसांना आढळले. ती मूक असल्याने संवाद होत नव्हता. प्रशासनाने तिला क्वारंटाईन कक्षात दाखल केले. दरम्यान, या महिलेला ताप असल्याच्या कारणावरून इर्विन रूग्णालयात दि. ६ मे रोजी १०८ रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली. मात्र, ती कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर ही महिला घरी जाण्यायोग्य स्थितीत असूनही तिला बोलता येत नसल्याने तिच्याशी संवाद होऊ शकला नाही आणि मग कुटुंबियांशी संपर्क कसा साधायचा, अशी अडचण वैद्यकीय यंत्रणेपुढे उभी राहिली. ही माहिती मिळताच महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर स्वत: तज्ज्ञांच्या चमूसह येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी या महिलेची भेट घेऊन तिला कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेऊन दिलासा दिला.

दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सदर महिलेला ठेवण्यात आले होते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अधिपरिचारिका सिंधू खानंदे व इतर पारिचारिकांनी तिची काळजी घेतली.

 

                       

बोटांच्या ठस्यांच्या आधारे आधार प्रणालीतून शोध

 

या भगिनीच्या हातवा-यांच्या आधारे सांकेतिक भाषा जाणकारांकडून तिचे मूळ ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर महिलेचे फिंगर प्रिंट घेऊन ते आधार प्रणालीचा डेटा तपासून त्याआधारे शोधून काढण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार यंत्रणेकडूनही शोध मोहिम सुरूच होती. महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर रोज त्याचा पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार या अविरत प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

 

आधार प्रणालीच्या साह्याने हातांच्या ठस्याच्या आधारे या महिलेचा पत्ता सापडला. त्यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर यांच्यासह प्रशासन, जिल्हा रूग्णालयातील स्टाफ यांनी आनंद व्यक्त केला. आप्तस्वकीयांच्या आठवणीने रोज अश्रू ढाळणा-या या भगिनीपर्यंत ही पारिचारिकांनी ही माहिती सांकेतिक खुणांनी पोहोचवली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तिला पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. प्रशासनाकडून कुर्नुल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. प्रवासाच्या आवश्यक परवानग्या तत्काळ मिळविण्यात आल्या. या भगिनीसोबत तहसील कार्यालयाकडून प्रशांत पांडे सोबत निघाले. तहसीलदार संतोष काकडे, पालकमंत्र्यांचे ओएसडी रणजीत भोसले, ओएसडी प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अधिपारिचारिका सिंधु खानंदे व त्यांच्या सहकारी, दै. लोकमतचे छायाचित्रकार मनीष तसरे, नीरज तिवारी, पंकज मुदगल अशा अनेकांचा या शोध मोहिमेत सहभाग होता.    

या मूक भगिनीला तिच्या घरापर्यंत पोहोचून कुटुंबिय व आप्तांना भेटता येणार आहे, याचा मोठा आनंद आहे. कोरोना संकटकाळात अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे, बस उपलब्ध करून देणे आदी हरप्रकारचे प्रयत्न होत आहेत. सगळ्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याचे प्रयत्न होत आहेत, असे महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. के. मंजुळा यांचा पत्ता मिळेपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना जिल्हा रूग्णालयातच ठेवले होते. या काळात त्यांची व इतरही रुग्णांची अविरत सेवा करणा-या सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचा-यांचे व शोध मोहिमेला सहकार्य करणा-या प्रत्येकाचे श्रीमती ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

 

00000

 


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...