Monday, June 8, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन


   जिल्ह्यात जलसंधारणाची कामे अधिकाधिक राबवा

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 8 : जिल्ह्यात भविष्यात कुठेही पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी सर्वदूर जलसमृद्धी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगाव जलसंधारणाची कामे अधिकाधिक राबवावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

            मृद व जलसंधारण विभागातर्फे भातकुली तालुक्यातील नाला खोलीकरण, तसेच सुमारे 50 लक्ष रूपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड. मुकद्दर खाँ पठाण यांच्यासह ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

भातकुली तालुक्यात कामनापूर व देवरी निपाणी येथे प्रत्येकी नऊ लक्ष रूपये निधीतून, तर अनकवाडी, हातखेडा, वंडली, खारतळेगाव येथे प्रत्येकी सात लक्ष रूपये निधीतून जलसंधारणाची विविध कामे राबविण्यात येत आहेत. हे प्रत्येक काम विहित मुदतीत व उत्तम दर्जा राखून पूर्ण करावे. त्यासाठी अधिकारी व संबंधितांनी वेळोवेळी पाहणी करून काम योग्यपद्धतीने होत असल्याची खातरजमा करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गावोगाव नाला खोलीकरण, पाण्याच्या जुन्या स्त्रोतांचे पुनरूज्जीवन, शेततळे आदी कामे सातत्याने आणि सर्वदूर राबवली गेली पाहिजेत. पाणीपुरवठ्यासाठी ठिकठिकाणी अधिकाधिक पूरक जलसंचय साधने उपलब्ध झाली पाहिजेत. त्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे व काम विहित मुदतीत पूर्ण होईल, यासाठी गतीने अंमलबजावणी करावी.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, पाण्याच्या नाले आदी नैसर्गिक स्त्रोतांचे पुनरूज्जीवन होणे आवश्यक आहे. अशा कामांमध्ये आवश्यक त्या सर्व ठिकाणी लोकसहभाग मिळवावा. त्यामुळे पेयजलासह शेतीला पाण्याचा प्रश्नही मिटेल. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाची उत्कृष्ट कामे झाली आहेत. जिल्ह्यात खारपाणपट्ट्यासारख्या परिसरात शेततळ्यांची संख्याही मोठी आहे. तेथील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अशा कामांवर अधिक भर द्यावा.

भविष्यात वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पाण्याचे विविध स्त्रोत सतत निर्माण करत राहून गावे जलपरिपूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारणाची गरज आहे. यादृष्टीने विभागाने जलसाक्षरता वाढविण्यासाठी लोकशिक्षणावरही भर द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.  

यावेळी पालकमंत्री श्री. ठाकूर यांनी जलसंधारणाच्या अपेक्षित कामांचा परिसर, स्थानिक भौगोलिक रचना व पाणी साठा यांची माहिती अधिका-यांकडून घेत प्रत्यक्ष स्थळांचीही पाहणी केली व काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण केले.

                                    000

Saturday, June 6, 2020

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अचलपूर तालुक्यात 14 विधवा महिलांना मदत  

        कुटुंबप्रमुखाचा अनपेक्षितपणे मृत्यू  झाल्यास एकाकी पडलेल्या महिला भगिनींवर कुटुंबाची जबाबदारी येते. या संकटात त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना लागू करण्यात आली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा, कामगार व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
         राज्यमंत्री श्री. कडू यांनी तहसील कार्यालयाच्या विविध बाबींचा आढावा घेतला असता या योजनेतून विधवा महिलांना तत्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अचलपूर तालुक्यातील 14 विधवा महिलांना शासनातर्फे प्रत्येकी 20 हजार रूपयांची मदत देण्यात आली. अचलपूरचे तहसीलदार मदत जाधव, नायब तहसीलदार एस. एम. श्रीराव, अव्वल कारकून शे. युसूफ शे. हुसेन, प्रदीप धुले यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही केली.
          अचलपूर पंचायत समिती क्षेत्रातील 9 महिलांना व नगरपरिषद अचलपूर क्षेत्रातील 5 विधवा भगिनींना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी योजनेतून दोन लाख 80 हजार रूपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्याप्रमाणे ग्रामीण क्षेत्रात एक लाख 80 हजार व नगरपालिका क्षेत्रात एक लाख रूपयाचा असा एकूण 2 लाख 80 हजार रूपये आर्थिक सहायता निधी वितरीत करण्यात आला.
            विधवा भगिनींना सन्मानाने जगता यावे, यासाठी मदत देण्याचा योजनेचा हेतू आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. कुणीही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले आहेत.

कापूस खरेदीला गती देण्यासाठी पालकमंत्र्यांचा पाठपुरावा


 दर्यापूर येथे ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार

   -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


         कापूस खरेदीला गती देण्यासाठी भारतीय कपास निगमकडून (सीसीआय) दर्यापूर येथे केंद्र सुरु करण्याच्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मागणीनुसार लवकरच हे केंद्र सुरू होणार आहे. तशी माहिती निगमचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार अग्रवाल यांनी पालकमंत्र्यांना कळवली आहे.

          निगमच्या अकोला येथील शाखा कार्यालयाला दर्यापूर येथील कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी तत्काळ हालचाली करण्याचे निर्देशही श्री. अग्रवाल यांनी दिले असल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्राची संख्या नऊवर पोहोचून खरेदीला गती मिळणार आहे. जिल्ह्यात एकूण आठ कापूस खरेदी केंद्रे आहेत. त्यातील एक सीसीएचे असून, ते धामणगाव रेल्वे आहे. उर्वरित केंद्रे सात पणन महासंघाची आहेत. 

         कोविड-19 च्या अनुषंगाने संचारबंदी लागू असल्याने कापूस खरेदी प्रक्रियेत अडचणी आल्या व कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत सापडला.  ही बाब लक्षात घेऊन कापूस खरेदीला गती देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रक्रियेला गती दिली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह वेळोवेळी चर्चा करून अडचणी जाणून घेत शासनाकडे, तसेच संबंधित यंत्रणांकडे त्याचा पाठपुरावा केला.

         त्यामुळे शासकीय हमीभाव योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील यापूर्वी नोंदणी करू न शकलेल्या शेतक-यांच्या कापूस विक्रीसाठी 3 ते 6 जून दरम्यान पुन्हा नोंदणी करण्याचाही निर्णय झाला. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

         त्याचप्रमाणे, कापूस खरेदीला वेग देण्यासाठी खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या 18 वरून 25 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 10 कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या. या सर्व पर्यवेक्षकांना ग्रेडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले. आतापर्यंत 31 हजार 547 शेतक-यांची सुमारे आठ लाख 43 हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली. आता दर्यापूर येथे सीसीआयचे केंद्र सुरु होणार असल्याने खरेदीला प्रक्रियेला अधिक गती येईल, असेही श्री. जाधव म्हणाले.

         कापूस खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, दक्षता पाळताना कामाच्या वेगही कायम ठेवावा लागेल. सर्वांची सुरक्षितता जपून प्रत्येक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. दिवसभरात केंद्रावर येणा-या सर्व गाड्यांची खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. नियोजनानुसार खरेदी झाली पाहिजे. त्यादृष्टीने सीसीआय, पणन महासंघ यांनी प्रयत्न करावे. कुठल्याही अडचणी आल्या तर  तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.


 


                                                                000

कोविड योध्दांनी सकारात्मक उर्जेच्या निर्मितीसाठी ध्यानधारणा करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी एसआरपीएफ येथे

ध्यानधारणा कार्यक्रमाचे आयोजन

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून उपक्रम


       कोरोना विषाणूचा संसर्ग जगात सर्वत्र झाला आहे. उघड्या डोळ्याने दिसू न शकणाऱ्या एवढ्याश्या विषाणूने देशात आणि राज्यात थैमान घातले आहे. मात्र, अशा संकटाच्या परिस्थितीतही कोविड योध्दा म्हणून पोलीस जवान आपले कर्तव्य चोख बजावित आहे. पोलीस जवानांनी ‘मी सुरक्षित राहणार आणि देशाचीही सुरक्षा करणार’ असा सकारात्मक विचार अंगीकारुन ध्यानधारणेच्या माध्यमातून तणावाला दूर सारावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आाज येथे केले.


       पोलीसांचा तणाव घालवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्यानधारणा प्रशिक्षणाचे आयोजन होत आहे. येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 9 च्या कॅम्प परिसरात ध्यानधारणा प्रशिक्षणाचे उद्घाटन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बलाचे समादेशक लोहीत मत्तानी, सहायक समादेशक प्रभाकर शिंदे, एम. बी. नेवारे,  प्रशिक्षक शिवाजी कुचे यांच्यासह बलाचे जवान आदी यावेळी उपस्थित होते.


        श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना विरुध्दचे युध्द जिंकण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, आरोग्य कर्मचारी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी अहोरात्र व जीवाची पर्वा न करता राबत आहेत. या कोविड योध्दांचा तणाव दूर करुन त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. या अशा संकट काळात पोलीस जवानही आपले कर्तव्य चोख बजावित असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांना सुध्दा कुटूंब आहे, त्यांच्या घरात सुध्दा लहान मुलं आहेत, पण ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्यावर आहेत. सतत बंदोबस्त, डयुटी यामुळे पोलीस जवानांवर ताण वाढला आहे. हा ताण-तणाव घालविण्यासाठी योगा, व्यायामासोबतच ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. या माध्यमातून जवानांमध्ये सकारात्मक उर्जेची निर्मिती होईल. आज आयोजित केलेले मेडिटेशन प्रशिक्षण पोलीस जवानांसाठी नियमितपणे राबवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


        समादेशक श्री. मत्तानी म्हणाले की, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 मधील 16 जवानांना बाहेरगावी बंदोबस्त दरम्यान कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यातील 15 जवान आता पूर्णपणे बरे झाले असून कर्तव्यावर आहेत, तर एक जवानावर उपचार सुरु आहे. पोलीस जवान शारिरीकरित्या फिट व त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असल्यामुळे जवांनानी कोरोनावर मात केली आहे. देशावर कुठलेही संकट येवो, पोलीस जवान हा देश सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. वर्षातील बारा महिन्यांपैकी नऊ महिने राखीव पोलीस बलाचा जवान हा कुटूंबापासून दूर असतो. कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतांना दिसून येतो. त्यांच्यातील ताण तणाव घालविण्यासाठी योगा, व्यायाम व ध्यानधारणाचे प्रशिक्षण नियमित दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


         पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वतः या सर्वांसह ध्यानधारणेत भाग घेतला. प्रशिक्षक शिवाजी कुचे यांनी यावेळी सकारात्मक विचार, साक्षीभावाचे महत्त्व व ध्यानसंगीत प्रात्यक्षिकातून ध्यानधारणेची अनुभूती सर्वांना दिली. पोलीस जवानांसह बलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्वच या प्रात्यक्षिकात मनापासून सहभागी झाले होते.


         ध्यान करताना साधली जाणारी एकाग्रता, अनुभवाला येणारी निरामय शांतता व ताण तणावाचे निरसन यातून आमचे मनोबल उंचावले. कोविड 19 आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत आम्ही बाहेर जिल्ह्यात बंदोबस्ताला गेलो होतो. या प्रशिक्षणाने मनोबल उंचावण्यासाठी मदत झाली. आम्ही पुन्हा देशसेवेसाठी नव्या दमाने सज्ज होत आहोत, असे जवानांनी यावेळी सांगितले.


0000

Friday, June 5, 2020

जिल्हा नियोजनभवनात शिक्षण परिषदेचे आयोजन


 शाळा सुरू करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही

-         शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 

मरावती, दि. 5 : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरु करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व आवश्यक संसाधनाचा उपयोग करुन शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण परिषदेच्या सूचनांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अवगत केले जाईल व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे सांगितले.

            जिल्हा नियोजनभवन येथे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणजीत पाटील, महानगरपालिकेचे शिक्षण सभापती गोपालभाऊ धर्माळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, सहायक शिक्षण संचालक तेजराव काळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलीमा टाके, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह शासकीय, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी शाळांचे संचालक व विविध शिक्षण संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

            श्री. कडू म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर झालेला आहे. या संकटकाळात विद्यार्थ्यांना कुठलाही बाधा होऊ नये म्हणून सद्य:स्थितीत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. या विषाणूने हजारो किलोमीटरचा टप्पा पार करुन देशात प्रवेश केला आहे. देशातून राज्यात व राज्यातून शहरात तसेच शहरातून गावात याचा शिरकाव झाला आहे. विषाणू प्रतिबंधासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. आरोग्य यंत्रणा रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. परंतू, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. जून महिन्यात शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक सत्रे सुरु होतात. परंतू कोरोना विषाणूचा संक्रमितांचा आकडा वाढू नये यासंदर्भात दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते.

            ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शहराच्या ठिकाणी शक्य आहे. परंतू ग्रामीण भागात शेतकरी, मजूर वर्गाच्या पाल्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान व स्मार्ट फोन आदींची अडचण आहे. त्यामुळे शैक्षणिक विषमताही निर्माण होता कामा नये. त्यामुळे शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी सर्व शाळा सुरु करण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा कशा सुरु करता येईल, कोविड आजाराबाबत सर्व प्रतिबंध, दक्षतेचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, यासाठी शिक्षण विभागाव्दारे धोरणात्मक निर्णय घेऊन प्रयत्न करण्यात येईल.  

            विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ. शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी पूरेपूर प्रयत्न केले जातील. राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला आहे. या प्रारुप आराखड्याच्या अनुषंगाने आज झालेल्या शिक्षण परिषदेत प्राप्त झालेल्या सूचनांचा उपयोग नक्कीच होईल. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना अवगत करण्यात येईल, असेही श्री. कडू यांनी सांगितले.

            परिषदेत कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे स्वरुप व कार्यपध्दती या विषयी शिक्षण क्षेत्रातील तज्झ, शासकीय व खासगी शाळांचे व्यवस्थापन, विविध शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांच्याकडून प्राप्त सूचनांचा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे स्वरुप व कार्यपध्दतीच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय होण्यासाठी उपयोग होईल, असे श्री. कडू यांनी सांगितले.

            शिक्षण परिषदेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संघटनेसह इतर विविध शिक्षण संघटनेच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून राज्यमंत्र्यांनी त्यांची मते जाणून घेतली.

0000

 

जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पंप नियमित सुरू


       जिल्ह्यात नागरिकांसाठी पेट्रोल व डिझेल पंप नियमित सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली असून, तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.
        यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोल व डिझेल पंप नागरिकांसाठी सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत सुरू होते.  त्याचप्रमाणे, केवळ अत्यावश्यक सेवा वाहतूकदारांना व शासकीय सेवा वाहतुकीसाठी पंप खुले होते. तथापि, आता टप्प्याटप्याने लॉकडाऊन उघडण्यात येत आहे. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व पेट्रोल व डिझेल पंप हे त्यांच्या वेळेत नियमितपणे सुरू राहतील. हे आदेश दि. 30 जूनपर्यंत लागू राहतील.

                                    000

Thursday, June 4, 2020

सेतू केंद्रावरील कार्यपद्धती सुलभ व सुटसुटीत जात व इतर प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


ऑनलाईन सेवांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 4 : कोरोना प्रतिबंध उपाययोजनांनुसार गर्दी टाळण्यासाठी व कामाला गती येण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांना फाटा देत सेतू केंद्रावरील कार्यपद्धती सुटसुटीत व सुलभ करण्यात आली आहे. त्यानुसार जात, नॉन क्रिमीलेयर, अधिवास व उत्पन्न प्रमाणपत्रांसाठी प्रतिज्ञापत्र देण्याची गरज राहिलेली नाही. त्याचप्रमाणे, घरबसल्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपले सरकार पोर्टल व आरटीएस महाराष्ट्र या ॲपचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याऐवजी स्वयंघोषणापत्र घ्यावे, अन्यथा केंद्रचालकावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आपले सेवा केंद्रचालकांना दिले आहेत.

सर्व केंद्रचालकांनी कार्यरत ऑपरेटरांना अर्जदारांचे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे पीडीएफ किंवा जेपीजी फॉर्मटमध्ये 75 केबी ते 100 केबी साईजमध्ये अपलोड करण्याच्या सूचना द्याव्यात. जातीच्या प्रमाणपत्राबाबत अर्जदार यांनी त्यांच्या वंशावळीबाबत स्वत:च प्रतिज्ञापत्र सादर करावे. अर्जदाराच्या वडलांचे किंवा रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्या अर्जदारास इतर कागदपत्रांची मागणी करू नये. जर असे प्रमाणपत्र नसेल तरच कोतवाल बुक व त्या अनुषंगिक कागद, पुरावा घ्यावा, तसेच प्रतिज्ञापत्राऐवजी स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरावे. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

आपले सरकार पोर्टलचा वापर करून आवश्यक तपशील दिल्यास ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली जातात. ही सोपी, सुलभ पद्धती आहे. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर आरटीएस महाराष्ट्र हे ॲपही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते वापरल्यास सेतू केंद्रातही जाण्याची आवश्यकता नाही. हे ॲप व पोर्टल वापरून घरबसल्या प्रमाणपत्र मिळवता येते. त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी केले.

त्या म्हणाल्या की, आपले सरकार पोर्टलचा पत्ता http://aaplesarkar.mahaonline.gov.inअसा आहे. यातील सेवा हक्क कायदा या टॅबवर क्लिक करून वापरकर्त्याने प्रथम नोंदणी करावी.  नोंदणी दोन प्रकारे करता येते. आधार कार्डाद्वारे नोंदणी करताना वैध आधार क्रमांक नमूद करावा. त्यानंतर वापरकर्त्याच्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी कोड पाठवला जातो. तो कोड अपेक्षित टॅबमध्ये नोंदवावा.

त्याचप्रमाणे, तपशील मॅन्युअली भरून आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करून आणि मोबाईल ओटीपी पडताळणीद्वारेदेखील नोंदणी करता येते. त्यासाठी आवश्यक माहिती भरून आणि नंतर मोबाईल ओटीपीने नागरिकांना स्वत:ची नोंदणी करून घेता येते. नोंदणी करताना ज्या जिल्ह्यात अर्ज करायचा आहे, तो निवडावा. यानुसार आयडी व पासवर्ड प्राप्त झाल्यावर लॉगिन करून अपेक्षित संबंधित जिल्ह्याचा उपविभाग निवडावा. त्यानंतर महसूल सेवा या टॅबवर क्लिक करून अपेक्षित प्रमाणपत्राच्या विषयावर क्लिक करावे. जात प्रमाणपत्र हवे असल्यास आवश्यक कागदपत्रांची यादी पाहून तपशील भरावा. अर्ज दाखल केल्यावर फोटो, सही, कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे. सेवा शुल्क भरून पोचपावती जतन करावी. अर्जाच्या स्थितीबाबत संदेश नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जातो. अर्ज मंजूर झाल्यावर लॉगिन करून आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेता येते, अशी माहिती उपजिल्हाधिकारी श्रीमती कनिचे यांनी दिली.

 

                                    00000   

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...