Thursday, June 11, 2020

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि निविष्ठा पोहोचणार पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते वरखेडला शुभारंभ


 

अमरावती, दि. 11 : कोविड 19 मुळे दक्षता म्हणून व गर्दी टाळण्यासाठी शेतकरी बांधवांच्या बांधावर खते, बियाणे शेतकरी गटामार्फत वितरण व्यवस्था बाबत  शासनाच्या सूचना  आहेत. 

या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तिवसा मतदारसंघांसह अमरावती जिल्ह्यामध्ये  प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे वितरण कार्यक्रम शुभारंभ वरखेड येथे पार पडला. 

याआधी सारशी गायीची येथे प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करण्यात आला होता. आज शेंदूरजना बाजार, वणी, ममदापुर , वरखेड, तारखेड या गावासाठी या खते बियाणे च्या गाड्याना हिरवी झेंडी दाखवून पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी शुभारंभ केला.

यावेळी जि प सभापती पूजा आमले, प स सभापती शिल्पा हांडे, नगराध्यक्ष वैभव स वानखडे, उपसभापती शरद वानखडे, प स सदस्य कल्पना दिवे, प स सदस्य रोशनी पुनसे, प स सदस्य अब्दुल सत्तार,  दिलीपराव बोके, प्रदीप बोके, सुभाषराव पाचघरे, परीक्षित बोके, अमित इंगळे, चंद्रशेखर कडू, राजाभाऊ देशमुख, जीवन देशमुख, घनश्याम भोयर, बाळूभाऊ बोके, अनिल बोके, वैभव बोके, सागर भवते, बाळू हरणे,रुपराव बोके, मधुभाऊ मेश्राम, मनोहर अमदरे, राजू कांडलकर,  तहसीलदार वैभव फरतारे, कृषि अधिकारी अनिल कांबळे, प स कृषी अधिकारी गावंडे व महसूल व कृषि विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

 


रतन इंडिया’च्या कामगारांचे वेतन तत्काळ अदा करा - कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

कामगारांच्या वेतनासंदर्भात व्यवस्थापनासोबत बैठक



            अमरावती, दि. 23 : नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर कंपनीच्या कामगारांचे मासिक वेतन कंत्राटदारनिहाय तत्काळ अदा करण्याचे निर्देश कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले. तसेच जिल्ह्यातील कामगारांना इतरत्र न पाठविता सामंजस्याने त्यांना पुन्हा कामावर सामावून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहात कामगारांच्या मासिक वेतनासंबंधी राज्यमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, कामगार उपायुक्त अनिल कुटे, सहायक कामगार आयुक्त राहूल काळे, रतन इंडिया कंपनीचे व्यवस्थापक कर्नल लोकेश सिंह यांच्यासह संबंधित अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

  नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये रतन इंडिया कंपनीच्या आस्थापनेवर कामगार म्हणून कामावर असलेल्या कामगार बांधवांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना मार्च, एप्रिल, मे व जून महिन्याचे वेतन कुठलेही प्रश्न उपस्थित न करता अदा करण्याचे निर्देश कामगार राज्यमंत्र्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला दिले.  

 प्रारंभी नांदगाव पेठ स्थित मे. रतन इंडियाच्या व्यपस्थापक लोकेश सिंह यांनी लॉकडाऊनच्या काळात कारखान्याची आर्थिक स्थिती, आजमितीस विजनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल (कोळसा व इतर सामुग्री), बाजारात असलेली वीजेची मागणी व मालकाकडील व कंत्राटराकडील कामगार व कर्मचारी संख्या आदी विषयी माहिती दिली. कंत्राटदार व्हिनस कंपनी, एम.बी.पी.एल. व पॉवर मेक यांच्या अधिनस्त असणाऱ्या कामगारांना माहे मार्च, एप्रिल 2020 चे वेतन अदा करण्यात आल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले. मे व जून महिन्याच्या वेतनाचा निधी येत्या काही दिवसात प्राप्त झाल्यावर लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले.

त्याबाबत कामगार राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, कंपनीच्या काही कामगारांना एप्रिल महिन्याचे कमी वेतन दिल्याचे तसेच कामावरुन कमी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने कंपनीने किंवा कंत्राटदारांनी कोणत्याही कामगारांना कामावरुन कमी न करता, त्यांना पुन्हा कामावर सामावून घ्यावे. कंपनी व्यवस्थापनाने गोरगरीब कामगारांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊन सामंजस्याने त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा. कामगारांच्या सुविधेसाठी त्यांना आरोग्य विमा तसेच इतर योजनांचा लाभ कामगार विभागाने मिळवून द्यावा, अशा सूचना त्यांनी कामगार उपायुक्त यांना दिल्या. 

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली जिल्ह्यातील रस्तेविकासाची बैठक



पावसाळा लक्षात घेऊन रस्तेदुरुस्ती तत्काळ करावी

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 11 : पावसाळा लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी खड्डेदुरुस्तीसह जिल्ह्यातील आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. वनविभागाच्या परवानगीसह इतर कुठल्याही अडचणी आल्यास तत्काळ कळवावे. शासनाकडे आपण स्वत: पाठपुरावा करू. मात्र, जिल्ह्याच्या रस्तेविकासात अडथळा येता कामा नये , असे सुस्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यातील रस्तेविकासाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

       जिल्ह्यातील हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत व इतर विविध योजनांतील रस्त्यांचा समग्र आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. त्या म्हणाल्या की, रस्तेविकासासाठी वनविभागाची परवानगी किंवा इतर कुठलीही अडचण आल्यास तत्काळ निदर्शनास आणून दिली पाहिजे. माहितीचे परिपूर्ण सादरीकरण वेळोवेळी केले पाहिजे. आपण स्वत: मुख्यमंत्री व वन मंत्र्यांकडे पाठपुरावा करू. मात्र, जिल्ह्यातील रस्तेविकास थांबता कामा नये.

      त्यापुढे म्हणाल्या की, लॉकडाऊनमध्ये विकासकामांची गती काहीशी मंदावली असली तरीही पावसाळा लक्षात घेता प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करावीत. मेळघाटात अनेक कामे प्रलंबित आहेत. तेथील पूल, रस्तेदुरुस्ती तत्काळ करून घ्यावी. दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटता कामा नये. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात संभवतात. तसे घडता कामा नये. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डेदुरुस्ती तत्काळ करून घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

पर्यावरण सुरक्षेसह रस्तेविकास हवा

 

            अमरावती शहरात रस्ता रूंदीकरण करताना काही जुनी झाडे कापण्यात आली. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, अशी कृती करण्यापूर्वी आपल्याला, तसेच जिल्हा प्रशासनाला कल्पना द्यायला हवी होती.  वृक्षसंपदा ही अत्यंत जिव्हाळा व कष्टपूर्वक नागरिकांनी जोपासलेली असते. त्यामुळे असे होता कामा नये. आपल्याला पर्यावरण सुरक्षेसह रस्तेविकास करायचा आहे. त्यामुळे रस्ता रूंदीकरणाच्या कामात दक्षता बाळगली पाहिजे. आता त्या ठिकाणी पुन्हा विविध वृक्ष लावावेत व ते जोपासावेत. एकाच प्रकारची झाडे लावू नयेत. वृक्षसंपदेतले वैविध्य जोपासावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

            अमरावती- चांगापूर- वलगाव, अंजनगाव- दर्यापूर- म्हैसांग, वलगाव- दर्यापूर या रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करावी. अमरावती- कौंडण्यपूर रस्त्याच्या कामालाही गती द्यावी. परतवाडा- चिखलदरा रस्त्याचे वनेतर क्षेत्रातील काम सुरु झाले आहे. मात्र, वनांतर्गत कामांच्या परवानग्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करावा, अमरावती- अचलपूर या चौपदरी रस्त्याचा डीपीआर दाखल करावा. त्याचप्रमाणे, रिद्धपूर- तिवसा, चांदूर रेल्वे- तळेगाव या रस्त्यांची कामेही गतीने पूर्णत्वास नेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

            शेंडगाव विकास आराखडा, विद्यापीठातील अभ्यासिका, रुग्णालयांचे बांधकाम व सुरु असलेली इमारतींची कामे प्राधान्याने पूर्ण करावी. दर्यापूर येथे सा. बां. विभागाचे विश्रामगृह निर्माण करण्याबाबत प्रस्ताव द्यावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सुरु असलेली कामेही लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

            सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

                                                000

Wednesday, June 10, 2020

राज्यातील नेत्रदान चळवळीला नवी दृष्टी देण्याचे काम हरीना फाऊंडेशनने करावे - महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

नेत्रदान दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम



 

अमरावती, दि. 10 : नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज, अंधश्रद्धा आणि रूढी परंपरेचा पगडा असूनही जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय व हरीना फाऊंडेशनसारख्या अनेक संस्थांच्या समन्वयातून नेत्रदान चळवळीला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा नेत्रदानाच्या कार्यात महाराष्ट्रात आघाडीवर आहे. राज्यातील नेत्रदान चळवळीला नवी दृष्टी देण्याचे काम हरीना फाऊंडेशन व जिल्ह्यातील संस्थांनी करावे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिनानिमित्त हरीना नेत्रदान फाऊंडेशनतर्फे नेत्रदान रांगोळी स्पर्धा जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, हरीना फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज राठी, उपाध्यक्ष चंद्रकांत  रामप्रकाश गिल्डा,  सचिव अमित चांडक, सनी अरोरा, राजेंद्र वर्मा, सुरेंद्र पोपली, मोनिका उमक, रश्मी नावंदर  यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी व विविध संस्थांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फाऊंडेशनतर्फे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महारांगोळी काढून जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे, प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढून त्याचे छायाचित्र पाठविणा-यांना बक्षीस देण्याचा स्पर्धात्मक उपक्रमही फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यातील मृत्यूचे प्रमाण व पश्चात होणारे नेत्रसंकलन यात मोठी तफावत आहे. ही तफावत कमी करून नेत्रदान प्रक्रियेची व्याप्ती वाढविण्यासाठी समाजात जनजागृती व प्रबोधनाची आवश्यकता आहे. हरीना फाऊंडेशनसारखी संस्था गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत आत्मीयतेने हे कार्य अमरावतीत पुढे नेत आहे. त्यामुळे नेत्रदान चळवळीला बळ मिळत आहे. या अनुषंगाने गत दहा वर्षांत राबविलेले विविध उपक्रम, प्रयत्न याद्वारे राज्यातील नेत्रदान चळवळीला नवी दृष्टी देण्याचे काम फाऊंडेशन व सहयोगी संस्थांनी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

नेत्रदानाविषयीचे समाजमनात असलेले गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. अकाली अंधत्व आलेल्या नागरिकांवर शस्त्रक्रिया करून नवीन दृष्टीपटल बसवून त्याला दृष्टी मिळू शकते. मृत्यूनंतरही आपले डोळे दुस-याच्या आयुष्यात प्रकाश पेरून जग पाहू शकतात. नेत्रदानाच्या आपण घेतलेल्या निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. दृष्टीहीनांच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश निर्माण करण्याचे कार्य नेत्रदानातून होते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प आज आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिनानिमित्त करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

  अमरावती जिल्हा नेत्रदानाच्या कार्यात महाराष्ट्रात आघाडीवर आहे. मात्र, नेत्रदात्यांची संख्या वाढविण्यासाठी यापुढेही सतत प्रयत्न झाले पाहिजेत. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. त्यामुळे दृष्टीहीन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा व सौख्याचे रंग भरले जावेत, या हेतूने फाऊंडेशन उत्कृष्ट कार्य करत आहे. संस्थेतर्फे नेत्रदानदिनानिमित्तच नव्हे, तर वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जातात.  नेत्रदानाप्रमाणेच अवयवदान, देहदानाबाबतही अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

अमरावतीकर फाऊंडेशनतर्फे पाच हजार नागरिक अवयवदान व नेत्रदानाचे फॉर्म भरून देणार असल्याची माहिती श्रीमती उमक यांनी यावेळी दिली.कोरोना संकटकाळातील उत्कृष्ट कामाबद्दल यावेळी संस्थेतर्फे जिल्हाधिकारी व विविध मान्यवरांना गौरविण्यात आले.सीमेश श्रॉफ, रामप्रकाश गिल्डा, नीलेश चिठोरे, पप्पू गगलानी, प्रदीप चढ्ढा, प्रीतपालसिंग मोंगा, गिरधारीलाल बजाज, सुरेश जैन, जुगलकिशोर गट्टाणी, अजय टाके, काका राजगुरे, अविनाश राजगुरे, सुरेश वसाणी, घनश्याम वर्मा ओमप्रकाश चांडक, राजेंद्र वर्मा, मनीष सावला आदी उपस्थित होते.

 

Tuesday, June 9, 2020

दर्यापूर तालुक्यातील गायवाडी वीज उपकेंद्राची क्षमतावाढ






नागरिकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी लाभ

-    पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 9 : ‘महावितरण’च्या दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथील 33 केव्ही उपकेंद्राच्या रोहित्राची क्षमता 10 एमव्हीएपर्यंत वाढविण्यात आली असून, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन आज झाले. दर्यापूर शहर व परिसरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी या क्षमतावाढीचा फायदा होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकरराव भारसाकळे, अभिजित देवके, बबनराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील बरबट, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार योगेश देशमुख यांच्यासह महावितरणचे विविध अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून (आयपीडीएस) गायवाडी उपकेंद्राच्या रोहित्राची पाच एमव्हीएने (मेगा व्होल्ट ॲम्पिअर) क्षमतावाढ केल्यामुळे दर्यापूर शहर  व लगतच्या परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी क्षमतावाढीचा लाभ होईल.  त्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनीही वीजपुरवठ्यात इतर अडचणी येऊ नयेत यासाठी दक्षता घेतली पाहिजे. पावसाळ्याच्या काळात वीजेचे खांब कोसळणे, तारा तुटणे यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. अशा घटना घडल्या तर तत्काळ दुरुस्तीची कार्यवाही केली पाहिजे. नागरिकांची गैरसोय होता कामा नये.

ग्रामीण भागात, तसेच शेतीला वीजपुरवठा अखंडित ठेवण्यात यावा. शहरी विभागाच्या वीज विकासासाठीच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेप्रमाणे ग्रामीण वीज विकासासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतही (डीडीयुजीजेवाय) ठिकठिकाणी कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात सर्वदूर अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक त्या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याअनुषंगाने आवश्यक प्रस्ताव द्यावेत व त्यापूर्वीची मंजूर असलेली अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपकेंद्रांवरील सुविधांची पाहणीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने नवीन प्रस्ताव, अडचणी आदी बाबींचा आढावाही त्यांनी घेतला.पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज दर्यापूर दौ-यात बनोसा येथील संत गाडगेमहाराज बालगृहाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

00000

दर्यापूर तालुक्यात ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीचा शुभारंभ


नियोजनानुसार कापूस खरेदी पूर्ण करावी

-   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 



            अमरावती, दि. 9 : भारतीय कपास निगमकडून (सीसीआय) दर्यापूर तालुक्यात येवदा येथील श्री साई ॲग्रो इंडस्ट्रीज येथे कापूस हमीभाव केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला. नियोजनानुसार कापूस खरेदी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

 दर्यापूर तालुक्यात सीसीआयचे केंद्र सुरु करण्याची मागणी आमदार बळवंतराव वानखडे यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी निगमचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार तत्काळ केंद्र सुरु करण्याबाबत अकोला शाखा कार्यालयाला आदेशही प्राप्त झाले व ही सगळी प्रक्रिया एका आठवड्याच्या आत पूर्ण होऊन दर्यापूर तालुक्यात कापूस खरेदीलाही सुरुवात झाली.

 आमदार बळवंतराव वानखडे, दर्यापूर कृउबासचे सभापती बाबाराव पाटील बरबट , उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार योगेश देशमुख यांच्यासह निगमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची संख्या मोठी आहे. कोरोना संकटकाळात कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. त्यामुळे कापूस खरेदीला गती येण्यासाठी, तसेच कुणीही पात्र शेतकरी बांधव हमीभाव मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी नवे केंद्र उघडण्यासह पुनर्नोंदणीचाही निर्णय घेतला. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्राची संख्या नऊवर पोहोचली असून, खरेदीला गती मिळणार आहे.

 याच अनुषंगाने खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या 18 वरून 25 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रशासनाने 10 कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी केवळ जिल्हा प्रशासनच नव्हे, तर मंडळे, महामंडळे, बाजार समित्या, पणन महासंघ, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अडचणी दूर करून त्यांच्या कामाला वेग आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 शासनाकडून सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असली तरी कोरोनाविरुद्धची आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, कामाचा वेगही कमी होता कामा नये. दिवसभरात केंद्रावर येणा-या सर्व गाड्यांची खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी व नियोजनानुसार खरेदी पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

खरेदी केंद्रावरील सुरक्षिततेकडेही कटाक्षाने लक्ष द्यावे. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कुठल्याही अडचणी आल्या तर  तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. कुठल्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांचा यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वी जिल्ह्यात एकूण आठ कापूस खरेदी केंद्रे होती. त्यातील एक धामणगाव रेल्वे येथे सीसीएचे होते. उर्वरित केंद्रे सात पणन महासंघाची आहेत. आता येवदा येथे सीसीआयचे केंद्र सुरु झाल्याने  खरेदीला प्रक्रियेला अधिक गती येणार आहे. 

 

                                  000

 


Monday, June 8, 2020

फळ व भाजीपाला विक्रीचे स्वतंत्र दिवस निश्चित जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

     

 

अमरावती, दि. 8 : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळ यार्डात उद्यापासून (9 जून) भाज्या व फळांच्या घाऊक विक्रीसाठी मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी लॉकडाऊनमध्ये आवश्यक व्यवहारांना गती देण्यासाठी टप्प्याटप्प्याने शिथीलीकरण केले जात आहे. त्यानुसार बाजार समितीच्या आवारात घाऊक विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळ यार्डमध्ये प्रत्येक आठवड्याच्या रविवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार यादिवशी भाजीपाला बाजार सुरू राहील. फळबाजार व बटाटे- कांद्याची घाऊक विक्री ही सोमवार, बुधवार, शनिवार सुरु राहील. सर्व व्यापा-यांनी कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. यार्डात केवळ घाऊक विक्री करता येईल. किरकोळ विक्रीची परवानगी नाही.

बाजार समितीच्या आवारात एकेरी वाहतूक ठेवण्याचे निर्देश आहेत. मुख्य यार्डातील मुख्य प्रवेशद्वार आवक करण्यासाठी वापरता येईल. या मार्गाने एकेरी वाहतूक पुढे जात फळे बाजार गेटने बाहेर जाईल.

मास्क असल्याखेरीज कुणालाही बाजार समितीत प्रवेश करता येणार नाही. प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था समितीने करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सचे व इतर उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश आहेत. या नियमांचा भंग झाल्यास बाजार सुरु करण्याची परवानगी रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हे आदेश दि. 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.

                                    00000

 


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...