Saturday, December 5, 2020

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे













महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

अमरावती, दि. ५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज अमरावती जिल्हयातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजिक समृद्धी महामार्गाची पाहणी  केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड,  माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज  सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.

नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती   महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे ७४ कि. मी. असून, मुख्यमंत्री  ठाकरे यांनी पूर्ण झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच सहा किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून पाहणी केली व कामाचा दर्जा, गुणवत्ता व वेग याबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट मार्ग ठरेल. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या १ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल.

राज्यातील इतर रस्त्यांच्या बांधकामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रकल्प संचालक संगीता जैस्वाल यांनी प्रास्ताविक केले.

समृद्धी महामार्गावर उतरले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजिक समृद्धी महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर सकाळी साडेअकराच्या दरम्यानमुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे  हेलिकॉप्टरने आगमन झाले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. वन मंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.

00000

 

 


Wednesday, December 2, 2020

 









शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

विलासनगरातील गोदामात मतमोजणी

अधिकारी व कर्मचारी याना आज पुन्हा प्रशिक्षण

 

अमरावती, दि. 2 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे. येथील विलासनगरातील शासकीय गोदामात ही मतमोजणी होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेचे संपूर्ण प्रशिक्षण व विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.

शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी विलासनगरातील गोदामात होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 14 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. यासाठी कर्मचारी-अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतमोजणीची सुरवात सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे. सुरवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येतील. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, माध्यम कक्ष, भोजन कक्ष, सुरक्षा कक्ष आदी विविध बाबींची तयारी आज पूर्ण करण्यात आली आहे.

00000

 

Tuesday, December 1, 2020

अचलपूरमध्ये कोविड रूग्णाने बजावला मतदानाचा हक्क

 

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रावर खबरदारी


अचलपूरमध्ये कोविड रूग्णाने बजावला मतदानाचा हक्क

 

अमरावती, दि. 1 : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील 77 केंद्रांवर आरोग्य तपासणी पथकांसह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होती. कोविड-19 ची लक्षणे आढळलेल्या किंवा पॉझिटिव्ह असलेल्या मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टोकन देऊन दुपारी 4 ते 5 ची वेळ मतदानासाठी देण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर विलगीकरण कक्षाचीही सोय करण्यात आली होती. त्यानुसार विभागात एकूण कोविड-19 संशयित आढळलेल्या आठ मतदारांनी दुपारी चार ते पाच या वेळेत मतदानाचा हक्क बजावला. आरोग्य पथकाकडून पुरेशी काळजी घेऊन या मतदारांना त्यांचे मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यात आले. आवश्यक तिथे पीपीईही कीटही उपलब्ध करून देण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील मतदान केंद्रावर मतदार असलेल‌्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णालाही टोकन प्राप्त करून देण्यात आले व दुपारच्या निर्धारित वेळेत येऊन या मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. आरोग्य व मतदान पथकांनी पुरेशी खबरदारी घेऊन ही प्रक्रिया पार पाडली, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.

                                   00000

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 82.91 टक्के मतदान

 












शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 82.91 टक्के मतदान

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी 82.91 टक्के अशी आहे. त्यानुसार सायंकाळी पाचपर्यंत  एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी 29 हजार 534 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर मतदान झाले. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रावर आरोग्य तपासणी पथके नियुक्त करण्यात आली होती. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर व आवश्यकता पडल्यास पीपीई कीट आणि  विलगीकरण कक्षाची व्यवस्थाही सर्व केंद्रांवर करण्यात आली होती.

विभागातील पाचही जिल्ह्यात 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लावायला सुरुवात केली होती. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या रांगांत व्यक्ती-व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी मार्किंग करण्यात आले होते.

मतदान आकडेवारीनुसार, सकाळी दहा वाजेपर्यंत 10.11 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 25.11 टक्के, दोन वाजेपर्यंत 46.71 टक्के, तर सायंकाळी चार वाजेपर्यंत 68.65 टक्के मतदान झाले. अमरावती विभागात एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी 26 हजार 60 पुरूष तर 9 हजार 562 स्त्री मतदार आहेत. त्यातील 21 हजार 865 पुरूष, तर 7 हजार 669 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सायंकाळी पाचपर्यंत अमरावती जिल्ह्यातील 10 हजार 386 मतदारापैकी 5 हजार 813 पुरूष आणि 2 हजार 601 स्त्री अशा 8 हजार 414 मतदारांनी मतदान केले. अकोला जिल्ह्यातील 6 हजार 480 मतदारांपैकी 3 हजार 625 पुरूष आणि 1 हजार 751 स्त्री अशा 5 हजार 346 मतदारांनी मतदान केले. वाशिम जिल्ह्यातील 3 हजार 813 मतदारांपैकी 2 हजार 755 पुरूष आणि 560 स्त्री अशा 3 हजार 315 मतदारांनी मतदान केले. बुलडाणा जिल्ह्यातील 7 हजार 484 मतदारांपैकी 4 हजार 801 पुरूष आणि 1 हजार 286 स्त्री अशा 6 हजार 87 मतदारांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील 7 हजार 459 मतदारांपैकी 4 हजार 871 पुरूष आणि 1 हजार 501 महिला अशा 6 हजार 372 मतदारांनी मतदान केले.

 

सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी  पुढीलप्रमाणे आहे.    अमरावती – 81.01 टक्के, अकोला - 82.50 टक्के, वाशिम – 86.94 टक्के, बुलडाणा – 81.33 टक्के, यवतमाळ – 85.43 टक्के.

 

00000

नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

कुष्ठरूग्ण शोध व सक्रिय क्षयरूग्ण शोध अभियानाला प्रारंभ


नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे

-   जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 1 : कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती, रुग्णांचा शोध व उपचार यासाठी संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरूग्ण शोध अभियानाचा प्रारंभ आजपासून झाला. जिल्ह्यात हे अभियान 16 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असून, साडेचार लाखांहून अधिक गृहभेटी देण्यात येणार आहेत.

            समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी या संयुक्त अभियानात आरोग्य पथकांकडून घरोघर जाऊन कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पथकाला आवश्यक ती पूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी केले आहे.

           जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण यांना लवकरात लवकर शोधून त्वरित उपचार देणे, संसर्गाची साखळी खंडित करणे, जनजागृती करणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत. अभियानात घरोघर जाऊन 22 लाख 62 हजार 7  नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी एक महिला व एक पुरूष कर्मचारी असलेल्या 1 हजार 551 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांचे पर्यवेक्षण 310 पर्यवेक्षक करतील. या सर्वांनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश श्री. येडगे यांनी दिले.

            आरोग्य उपसंचालक एम. एस. फारूखी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. के. एस. वासनिक, डॉ. दिलीप निकोसे, डॉ. रेवती साबळे, डॉ. दीपक च-हाटे, विनोद प्रधान, दीपक गडलिंग आदी उपस्थित होते.

 

          000

Monday, November 30, 2020

आज मतदान, यंत्रणा सुसज्ज मतदानासाठी पथके केंद्रावर रवाना

 












आज मतदान, यंत्रणा सुसज्ज

मतदानासाठी पथके केंद्रावर रवाना

अमरावती, दि. 30 :  शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान उद्या (दि. 1) होणार असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी पथके आज रवाना झाली. सर्व पथकांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले.शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून, त्यात 26 हजार 60 पुरूष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे. मतदानासाठी जिल्ह्यातील नियुक्त पथकांना निवडणूक साहित्याचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बॅडमिंटन हॉल येथून करण्यात आले.  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.

निवडणूक साहित्य संच अमरावती जिल्हाधिकारी स्तरावर तयार करण्यात आले. त्यांचे विकेंद्रीकृत पद्धतीने वितरण आज करण्यात आले. याचठिकाणी मतदान पथकाला मतदान प्रक्रियेविषयी पुन्हा माहिती देण्यात आली व त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पथके मतदान केंद्रांवर रवाना झाली. जिल्ह्यात पंचवीस मतदान केंद्रे आहेत.

मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे : धारणी- तहसील कार्यालय, चिखलदरा- तहसील कार्यालय, दर्यापूर-तहसील कार्यालय, अंजनगाव सुर्जी- तहसील कार्यालय, अचलपूर- तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय, चांदूर बाजार- तहसील कार्यालय, भातकूली- उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय, अमरावती (ग्रामीण)- गणेशदास राठी हायस्कुल कक्ष क्रमांक 4, अमरावती (शहर)- जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 2, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 3, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 4, जि.प. मुलींची शाळा (कॅम्प) येथील कक्ष क्रमांक 2, 3 व 4, गोल्डन किड्स इंग्लीश स्कूल कक्ष क्रमांक 6, 7 व 8, मोर्शी- तहसील कार्यालय, वरुड- तहसील कार्यालय (2), तिवसा- तहसील कार्यालय, नांदगाव खंडेश्वर- तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे- तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे- तहसील कार्यालय.

उद्या मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक साहित्याचे संकलनही विकेंद्रीकृत पद्धतीने होणार आहे. मतदान केंद्रावरील साहित्य सर्वप्रथम जिल्हास्तरावरील सुरक्षा कक्षामध्ये जमा केले जाईल. सर्व मतदान केंद्राकडून साहित्य जिल्हास्तरावर संकलित झाल्यानंतर ते साहित्य विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल. त्यानुसार सर्व सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी करत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टिंग करण्यात येणार असून, तशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मतदारांच्या माहिती देण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मतदार सहायता कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांना मतदान यादीत नाव शोधण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, कोरोना संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांच्यासाठी विलगीकरण कक्षही स्थापण्यात आला आहे.

00000

Sunday, November 29, 2020

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा - निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

 


मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा

-         निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

 

अमरावती, दि. 29 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी (एक डिसेंबर) शिक्षकांना विशेष नैमेत्तिक रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील यंत्रणांना दिले आहेत.

त्यानुसार शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिका-यांना जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ही रजा कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.  

                                    मतमोजणी कक्षाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध

                        मतमोजणी कक्ष व सुरक्षा कक्षाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणी अधिकारी, कर्मचारी व निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील ओळखपत्र असणा-या व्यक्तींव्यतिरिक्त दि. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी आठपासून ते दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विलासनगर येथील शासकीय धान्य गोदाम येथील मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध  करण्यात आला आहे. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना अधिकृत पासआधारे प्रवेश मिळेल.

                                    मतमोजणीच्या ठिकाणी संपर्क साधनांवर प्रतिबंध

मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशिन, ई- मेल किंवा इतर संपर्क साधनांच्या गैरवापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मतमोजणी ठिकाणाच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्युलेटर आदी साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि, वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधवांना मतमोजणी स्थळाच्या परिसरात असलेल्या मीडिया कक्षातच मोबाईल वापरण्याची मुभा असेल.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...