Tuesday, December 8, 2020

ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा - पालकमंत्री ॲड. यशोमती

राज्य शासनाकडून ग्रामीण महाआवास अभियान


ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 8 : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी ग्रामीण महाआवास अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या अपूर्ण असलेली घरकुले, तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन ते गतीने पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

            राज्यात घरकुलांसाठी केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठीची योजना यांमधून ग्रामीण नागरिकांना घरे देण्यात येत आहेत.

            या सर्व योजना गतिमान करुन ग्रामीण भागात घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्थात या तीन महिन्यात जास्तीत जास्त घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत. राज्यात सुमारे नऊ लाख घरकुले या अभियानाद्वारे पूर्ण करण्यात करण्यात येणार आहेत.  अपूर्ण घरकुले अभियान कालावधीत पूर्ण करुन बेघर लाभार्थ्यांना निवारा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अभियानाच्या उद्दिष्टाप्रमाणे जिल्ह्यातील अधिकाधिक घरकुले पूर्णत्वास न्यावेत व बेघर नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

            आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात 30 हजार घरकुले निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानात अद्यापपर्यंत सुमारे 3 हजार 200 घरकुलांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे, असे सहायक प्रकल्प अधिकारी संजय झंझाड यांनी सांगितले.

शासनामार्फत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत सर्वसाधारण क्षेत्राकरिता १ लाख २० हजार रुपये व डोंगराळ, नक्षलग्रस्त क्षेत्राकरिता १ लाख ३० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. या व्यतिरिक्त मनरेगा अंतर्गत ९० दिवसांची अकुशल मजुरी १८ हजार रुपये तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रुपये अनुदान असे एकूण अनुक्रमे १.५० लाख व १.६० लाख रुपये अर्थसहाय्य घरकुल बांधकामासाठी देण्यात येते. यातून किमान २६९ चौरस फूट आकाराचे घर बांधणे अपेक्षित आहे.

  घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या राज्यातील सुमारे ७३ हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यासाठी अभियान कालावधीत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी रु. ५० हजारपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शासकीय जमिन विनामूल्य उपलब्ध करुन देणे,  ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकुल करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

 

घरकुल लाभार्थ्यांना घरासोबतच शासनाच्या विविध योजनांशी कृतीसंगम करुन अभियान कालावधीत विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मनरेगाच्या माध्यमातून ९०/९५ दिवसांचा रोजगार, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी रु.१२ हजार प्रोत्साहनपर अनुदान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी, जल जीवन अभियानांतर्गत घरकुलासाठी नळाद्वारे पाणीपुरवठा, सौभाग्य योजनेतून घरकुलासाठी मोफत वीज जोडणी या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

                                                            00000

 


Monday, December 7, 2020

अंबानगरीत अजय लालवानी यांचे जंगी स्वागत - 2010 किमी सायकल प्रवासाचा विक्रम - पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती






अंबानगरीत अजय लालवानी यांचे जंगी स्वागत

- 2010 किमी सायकल प्रवासाचा विक्रम

- पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती

 

अमरावती : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया 2010 किमी सायकल ने प्रवास करून विक्रम स्थापीत केला आहे. त्यांच्या विक्रमाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. यशोमती ताई ठाकूर, जिल्हाधीकारी शैलेश नवाल साहेब,आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंत वानखडे, राजकुमार पटेल ,जितू ठाकूर,सोसायटी अध्यक्ष यावली शहीद येथील पंकज देशमुख,सागर देशमुख, हरीषजी मोरे , आर्मी एक्स मँन व आयन बॉल चे विदर्भ प्रभारी वैभव पवार,पत्रकार राजेंद्र ठाकरे,साप्ता साधनाराज वृत्तपत्राच्या संपादिका कंचनताई मुरके,समाजसेवक विशाल पवार यांच्या उपस्थितित जंगी स्वागत  करण्यात आले.

            अजय लालवाणी एक पंचविशीतला युवक जन्मापासून अंध असून विविध क्रीडा प्रकारात आपले प्राविण्य ते दाखवीत आहेत. बृहन्मुंबई येथील महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात नोकरीला असलेल्या अजय यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या दृष्टीहीन व मूकबधीरांच्या जागतिक ज्युडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जून २०१९ मध्ये  हिमालयातील ‘फ्रेन्डशिप पीक व ऑगस्ट २०१९ मध्ये ‘माऊंट युनुम ही शिखरे पादाक्रांत केली. डिसेंबर २०१९ मध्ये मुंबई-गोवा हे १२०० किमी अंतर सायकलने सात दिवसात पार केले.  सलग दोन वर्षे जलतरण स्पर्धेत राज्य व विभागीय पातळीवर ‘फ्री स्टाईल, ‘ब्रेस्ट स्ट्रोक व ‘बटरफ्लाय प्रकारात पदके जिंकली. दिव्यांगांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, व तीन खुल्या मॅरेथॉन शर्यतीत त्यांनी भाग घेतला आहे.    दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात मागील चार वर्षापासून मल्लखांबाचा सराव करीत आहे. आता मुंबई ते गोंदिया व परत हे २०१० किमी अंतर सायकलवरून १२ दिवसात पार करण्यासाठी सिद्ध झाला आहे.

गुरुवार, दि. ३ डिसेंबर २०२० रोजी पहाटे चार वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील श्री समर्थ व्यायाम मंदिरासमोरून त्याची ही ऐतिहासिक सायकल दौड सुरु झाली होती. त्याला प्रा संदेश चव्हान रत्नागीरी आयन बॉल अंबासिटर  गोपीनाथ आरज (४१), भगवान पाटील (३५)दापोली ल,राजे स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रक्षिक्षक प्रा.संदेश चव्हाण(३२),प्रा.प्रशांत देशमुख (३५), प्रथमेश अडवडे (२०),निरंकार पगडे(१३), मंदार पाटील (१८), गणेश सोनावणे (२२), रितिक कासले (१८),  अण्णासाहेब घुमरे (४९) ही मंडळी साथ देत आहेत. दररोज सुमारे १७० किमी अंतर पार करून वाटेत नाशिक, धुळे, दाताले, अमरावती, व नागपूर या पाच ठिकाणी तो रात्रीची विश्रांती घेईल. दि. ८ डिसेंबर २०२० रोजी गोंदिया येथे पोचून दि. ९ डिसेंबर २०२० रोजी तो परत निघेल व याच मार्गाने दि. १४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी मुंबईस परत येईल. हे शिवधनुष्य उचलण्यामागचा त्याचा उद्देश स्पष्ट आहे. ‘माझ्या दिव्यांग मित्रांनीही पुढे येऊन असे उपक्रम करून बघावेत, त्यात सहभागी व्हावे , तुमची चिकाटी व तुमचे धैर्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही, उलट तुम्हाला दुप्पट सामर्थ्य देते हे, आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे.’ ‘गेले आठ महिने सतत जाणवणारी अव्यक्त भीती, अनिश्चितता व चिंता यावर मात करण्यासाठी शासनाचे सर्व निर्बंध पाळून अत्यंत जबाबदारीने आखलेली ही साहसी मोहीम करोनाच्या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी केवळ माझ्या दिव्यांग बांधवांनाच नव्हे तर इतरही सर्वांनाच एक नवी उमेद, उत्साह व उभारी देईल असा विश्वास त्यांनी सत्कारानंतर बोलतांना दिला. अजयचे पुढचे स्वप्न ऑक्टोबर २०२१ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी हे ३७०० किमी अंतर सायकलवरून २५ दिवसात पार  करण्याचे आहे. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठीही याची नोंदणी करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगीतले.

या प्रसंगी अमीत पवार, युवा संवाद प्रतिष्ठान चे समस्त पदाधिकारी मंडळींची उपस्थिती होती.

00000 

सरपंच सेवा संघाचा उपक्रम कौतुकास्पद - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर







विविध कार्यक्रमात

पालकमंत्र्यांच्या हस्ते नवदुर्गांचा गौरव


सरपंच सेवा संघाचा उपक्रम कौतुकास्पद

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ७ : ग्रामविकासाची धुरा वाहणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून राबविलेला नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

सरपंच सेवा महासंघ व सरपंच माझा चॅनल नवदुर्गा उपक्रमाद्वारे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांना पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राहुल उके, तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे, मुकुंद पुनसे, गजानन देशमुख, ज्योतीताई अवघड, भारती मोहोकार, शिल्पा तायडे, सविता आहाके, अर्चना पखाले, नंदकुमार गोडगे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राजकीय, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनीही कधीतरी राजकारणापलीकडे जाऊन एकत्र येऊन काही उपक्रम राबवणे आवश्यक असते. त्यामुळे सरपंच सेवा संघ व सरपंच माझा  वाहिनीने एकत्र येऊन राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहे.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सरपंच महिलाभगिनींचा मानपत्र देऊन गौरव  करण्यात आला.

  00000


जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 









पालकमंत्र्यांकडून पर्यटन विकासाचा आढावा

जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी

नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ७ : वनसंपदेने नटलेल्या अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. त्यानुसार वनांचे संवर्धन, स्थानिकांना रोजगार व पर्यटनाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह वन विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात वनांप्रमाणेच प्राचीन, धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक स्थळे आहेत. त्यामुळे सर्वंकष विचार करून सविस्तर आराखडा करावा.पर्यटनाला चालना देत स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा. त्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. जिल्ह्याच्या ठिकाठिकाणच्या प्रवेशस्थानी संपूर्ण पर्यटनस्थळाची व उपक्रमाची माहिती देणारे बोर्ड लावावेत. या भूमीचे पौराणिक महत्व मोठे आहे. माता रुक्मिणीचे हे माहेर आहे. अशा पौराणिक धार्मिक स्थळांच्या विकासाचाही समावेश आराखड्यात करावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

आमझरी व विविध ठिकाणी सुरू केलेली झिपलाईन ऍक्टिव्हिटी मेळघाटात लोकप्रिय झाली आहे. कोलखासमध्ये चार हत्ती एकत्र आणून हत्ती सफारी सुरु केली. बफर क्षेत्रातील बुद्ध पौर्णिमेच्या उपक्रमाप्रमाणेच जंगलात पौर्णिमेच्या दिवशी मचाणावरून अरण्यदर्शन सुरू केले आहे. हरीसालजवळून वाहणाऱ्या नदीत   बोटिंग सुरू केले. वैराट सफारी व  भ्रमंतीसाठी बस सुरू केल्या आहेत. स्थानिकांना या सगळ्या उपक्रमात सहभागी करून रोजगार दिला जात आहे, अशी माहिती वन अधिकारी श्री. बाला यांनी दिली.

00000

मेळघाटच्या मुलांचे नीट परीक्षेतील सुयश ही मेळघाट परिवर्तनाची नांदी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



















मेळघाटातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे ‘नीट’ परीक्षेत सुयश

पालकमंत्र्यांच्या हस्ते हृद्य गौरव

मेळघाटच्या मुलांचे नीट परीक्षेतील सुयश ही मेळघाट परिवर्तनाची नांदी

                             -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 7 : कुपोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून सुविधांचा अभाव असताना तेथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मेळघाटची ही लेकरे डॉक्टर होऊन पुन्हा आपल्या भूमीत सेवा बजावणार आहेत. मेळघाटातील परिवर्तनाची ही नांदी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचतभवनात आदिवासी विकास प्रकल्पातर्फे नीट परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंतांचा हृद्य सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आदिवासी अपर आयुक्त विनोद पाटील, प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, सहायक प्रकल्प अधिकारी एस. टी. खिल्लारे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित  होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट संस्थेच्या उलगुलान उपक्रमामुळे मेळघाटच्या दुर्गम गावांतील तेरा विद्यार्थी ‘नीट’ उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षणासाठी जात आहेत. हा ऐतिहासिक व आम्हा सर्वांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. सुविधांचा अभाव असतानाही दुर्दम्य इच्छा व अथक परिश्रमाची बळावर बारा- बारा तास अभ्यास करून मेळघाटच्या या मुलांनी यश संपादित केले आहे.  डॉक्टर होऊन ही मुले पुन्हा मेळघाटच्या सेवेत परतणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या भूमी व समाजाप्रती ते निश्चित बांधिलकी जपतील, असा मला विश्वास आहे.

                                    कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधा – पालकमंत्री श्रीमती ठाकूर  

विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनण्याची पहिली पायरी चढलेली आहे. यापुढेही त्यांनी दृढ निश्चय कायम ठेवून डॉक्टर बनूनच मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडावे. तुमच्यासोबत शिकण्यासाठी महानगरांतून, शहरांतून मुले येतील. त्यांच्यासोबत वावरताना आपली भाषा किंवा इतर कशाही बाबतीत कुठलाही न्यूनगंड बाळगू नका. तुमची गुणवत्ता उज्ज्वल आहे. कुठलीही अडचण आल्यास थेट मला, आमदारसाहेबांना किंवा प्रशासनाशी संपर्क साधा. आम्ही सगळे तुमच्यापाठीशी आहोत, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी  विद्यार्थ्यांना दिली.

                                      आतापर्यंतच्या सेवेतील अविस्मरणीय क्षण - जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन नवा इतिहास रचला आहे. माझ्या दहा वर्षाच्या कारकीर्दीत व प्रशासकीय अनुभवात हा क्षण माझ्यासाठी  अविस्मरणीय आहे. जिथे सुविधांचा अभाव आहे, अशा गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेली ही मुले डॉक्टर होण्यासाठी जाताहेत ही मला ख-या अर्थाने शासकीय कामाची फलश्रुती वाटते. जिथे जाल, तिथे आत्मविश्वास बाळगून काम करा. चांगला अभ्यास करा, यश तुम्हाला निश्चितच मिळेल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. 

मेळघाटची मुले शिक्षणातही ‘वस्ताद’- आमदार श्री. पटेल

आमदार श्री. पटेल म्हणाले की, मी स्वत: आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे. माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मेळघाटची मुले केवळ खेळातच तर शिक्षणातही ‘वस्ताद’ आहेत, हे सिद्ध करणारा हा क्षण आहे. मी विद्यार्थी असताना दहावीला गणिताचा शिक्षकच नव्हता. वर्षातील केवळ पंधरा दिवस अमरावतीच्या एका शिक्षकांनी येऊन तिथे सेवा दिली. त्यामुळे एकच विद्यार्थी तेव्हा पास झाला होता. अशी त्यावेळची परिस्थिती होता. आम्ही शिक्षणात चमकलो नाही तरी राजकारणात ‘मेरिट’ आलो, असे आमदार श्री. पटेल यांनी सांगताच सभागृहात खसखस पिकली.

आम्ही भूमीची बांधीलकी जोपासू- विद्यार्थ्यांचे मनोगत

आम्ही मेळघाटची मुले आहोत. डॉक्टर होऊनच परतू. आम्ही मेळघाटात परतून आमच्या बांधवांची सेवा करू, असे धारणी तालुक्यातील झापल येथील रहिवाशी व मुंबईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या शांतीलाल शालिकराम कासदेकर याने सांगितले. चिखलदरा तालुक्यातील आकी येथील शिवकुमार सावलकर व मल्हारा येथील मयुरी दारसिंबे यांनी मनोगत व्यक्त केले.

चिखलदरा तालुक्यातील साव-या येथील राहूल भय्यालाल कासदेकर, धारणी तालुक्यातील आकी येथील अंकुश सावलकर, शिवकुमार सावलकर, उकुपाटी येथील दुर्गेश कासदेकर, कारदा येथील सुधीर मावसकर, मांडवा येथील रोहित कासदेकर, टिटंबा येथील श्याम कोल्हे, राणीगाव येथील श्याम कासदेकर, बेरडाबेल्डा येथील नितेश जांभेकर, मांडवा येथील अजय जांभेकर, चिपोली येथील रेणुका पटोरकर आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी झाला.

                        00000

 


Sunday, December 6, 2020

‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

  


    ‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मानवी हक्कांप्रती जागरूकता निर्माण करण्याची गरज

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 6 : समाजात मानवी हक्कांप्रती जागरूकता आणणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक साहित्य निर्माण झाले पाहिजे. मानवी हक्कांच्या मूलभूत तत्वांवर प्रकाश टाकणारे ‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’ हे डॉ. वर्षा देशमुख यांचे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.   

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापिका डॉ. वर्षा देशमुख यांनी लिहिलेल्या ‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’ पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

          ‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’ या पुस्तकात डॉ. वर्षा देशमुख यांनी मानवी हक्कांच्या तत्वांबाबत अत्यंत सुबोध भाषेत मांडणी केली आहे. विधी अभ्यासक्रम, राज्यशास्त्र व इतर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच विविध क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक व कार्यकर्ते यांच्यासाठीही ते उपयुक्त असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले

           भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. भारतीय राज्यघटनेच्या तिस-या प्रकरणात मानवी हक्कांचा समावेश आहे, असे श्रीमती डॉ. देशमुख यांनी सांगितले.

 शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, सचिव शेषराव खाडे, डॉ. सुधाताई देशमुख, डॉ. राजेंद्र गणेरीवाल, डॉ. अश्विन देशमुख, प्रेरणा इंगोले, डॉ. विजय चौबे, डॉ. अंजली ठाकरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

00000    

जल जीवन मिशनच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

 







जल जीवन मिशनच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

सर्वदूर शुद्ध पाणीपुरवठ्याला शासनाचे प्राधान्य

प्रशासनाने ‘मिशनमोड’वर कामे करावी

 

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            अमरावती, दि. 6 : जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागात घरोघर नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात सर्वदूर शुद्ध पेयजल उपलब्ध होण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या अधिकाधिक कामांचा समावेश होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुकानिहाय गरज व लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. सर्वदूर शुद्ध पाणीपुरवठ्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘मिशनमोड’वर ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

          जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जि. प. पाणीपुरवठा अभियंता राजेंद्र सावळीकर, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. जल जीवन मिशनमध्ये घरोघर नळजोडणीद्वारे शुद्ध पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. याअनुषंगाने ग्रामीण भागात आवश्यक तिथे पाणीपुरवठ्याच्या विविध योजना निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तालुकानिहाय आवश्यकता व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावेत. पाणीपुरवठ्याच्या कामाचे प्राधान्य लक्षात घेऊन ही कामे मिशनमोडवर पूर्ण होणे आवश्यक आहे.

            याबाबत तालुकास्तरावर गटविकास अधिका-यांकडून स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव नियोजित कामांत करावा. एका आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत आठवडाभराने पुन्हा आढावा घेतला जाईल. ज्या कामांना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे, त्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. कुठेही विलंब होता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

            जल जीवन मिशनमध्ये ग्रामीण भागात 4 लाख 56 हजार 621 घरांपैकी यंदाच्या उद्दिष्टानुसार 94 हजार 415 घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे.  त्यातील 44 हजार 606 नळजोडणीची कामे झाली आहेत. 49 हजार 809 नळजोडणीची कामे पूर्ण झालेली नाहीत. गावोगाव शंभर टक्के घरगुती नळजोडणी या मिशनमधून साध्य होणार आहे.  

                                    000

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...