Friday, July 9, 2021

पर्यटन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात रिध्दपूरचा समावेश - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 






'कौंडण्यपूर, ‘माताखिडकीला ब दर्जासाठी एकत्रित प्रस्ताव देण्याचे निर्देश

पर्यटन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात रिध्दपूरचा समावेश

-    पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 

                 अमरावती,दि.9: महानुभाव पंथाची काशी श्री क्षेत्र रिध्दपूरचा जिल्ह्याच्या पर्यटन  विकास आराखडयाच्या पहिल्या टप्प्यात समावेश करुन  आवश्यक मुलभूत सुविधा तिथे प्राधान्याने पूर्ण कराव्यात. त्याचप्रमाणे,  कौंडण्यपूर आणि अमरावती शहरातील माताखिडकी देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावे,  असे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हयाची पर्यटन विकास आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. वरुड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार, दर्यापुरचे आमदार बळवंतराव वानखेडे, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रतापराव अडसड, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पियुष सिंह, उपायुक्त किरण जोशी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पर्यटन विकास महामंडळाचे विवेकानंद काळकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे, कार्यकारी अभियंता शरद थोटांगे, विभावरी वैद्य आदी उपस्थित होते.

रिध्दपूर येथे पर्यटन विकासासाठी मुलभूत सुविधांचा प्रस्तावात प्राधान्याने समावेश असावा. ज्यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, स्मशानभूमी, कब्रस्तान, अत्याधुनिक बसस्थानक, कवायतींची मैदाने, ग्रंथालये, रस्ते यांचा समावेश असावा. रिध्दपूर येथील थिम पार्क, विद्युत रोषणाई, बहुउद्देशिय सभागृहाची निर्मिती इत्यादी सर्व विकासकामांसाठी    22 कोटी 32 लक्ष निधीला प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. अंदाजे 10 कोटी निधीतून प्रसाधन गृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्मितीची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. धाबेरी, पाळा, माताखिडकी, काटसुर आणि मातृग्राम या स्थळांचा रिध्दपूर प्रस्तावात समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

सासु सुनेच्या विहीरीचे सौंदर्यीकरण

याच परिसरात सासु-सुनेची विहीर हे प्रसिध्द स्थळ आहे. महानुभाव पंथात आख्यायिका लाभलेल्या या विहीरीचे जतन करण्याच्या उद्देशाने या विहीरीची देखभाल व आसपासच्या परिसराचे सौंदर्यीकरण व विहीरीकडील प्रवेशद्वार सुशोभित करण्यात यावे, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. सालबर्डी, अंबाडा, गव्हाणकुंड, बेडापुर क्षेत्र विकसीत करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

शेंडगाव विकास आराखड्यातील कामे पूर्ण करा

संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ शेंडगावचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी 18 कोटी 63 लक्ष एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत तेथे गाडगेबाबांचे जीवनपट उलगडणारे कलादालन, ग्रामसफाई अभियान प्रशिक्षण केंद्र आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे. गाडगेबाबांचे जन्मगाव शेंडगाव व कर्मभूमी आमला या स्थळांचा एकत्रित विकास करताना तेथील कामांची सांगड घालून ही स्थळे विकसित करावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.   

0000000

 

Thursday, July 8, 2021

युवकांनी कौशल्य मिळवून रुग्णसेवेसाठी योगदान द्यावे -जिल्हाधिकारी शैलेश नवाल






मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

युवकांनी कौशल्य मिळवून रुग्णसेवेसाठी योगदान द्यावे

-जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 8 : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा तरुणांनी लाभ घेऊन रुग्णसेवेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत निवड झालेल्या 20 युवक-युवती उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे भेट घेऊन मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

श्री. नवाल म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ व तांत्रिक कौशल्यप्राप्त व्यक्तींची आवश्यकता वेळोवेळी भासली व यापुढेही तशी टीम उपलब्ध असणे आवश्यक आहे. सुशिक्षित तरुण-तरुणींनी पारंपारिक अभ्यासक्रमासह कौशल्याधारित ज्ञान आत्मसात करुन तश्या पध्दतीने तंत्रकुशल होणे फार गरजेचे आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असून त्यादृष्टीने तरुणांनी प्रयत्न करावे. वैद्यकीय क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लॉटची देखभाल व दुरुस्ती, उपचार यंत्रणा आदींबाबत शास्त्रीय माहितीसह ज्ञान प्राप्त करावे, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णालयात आपत्कालीन किंवा आणीबाणीची परिस्थिती उद्भल्यास प्रसंगावधान राखून परिस्थिती कशी हाताळावी यासंबंधीचे प्रशिक्षण व कौशल्य आत्मसात करावे. रुग्णाचा आजार हा औषधाने पन्नास टक्के बरा होतो तर त्यांचे मानसिक समुपदेशन केल्याने पन्नास टक्के आराम पडतो. म्हणून संयमाने रुग्ण व त्याच्या कुटूंबियांचे समुपदेशन करता आले पाहिजे. कोविडमुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ऑक्सिजन प्लाँट हॅन्डलींग, फायर मॅनेजमेंट , बायोमेडिकल इंजीनिअरींग, टेक्निशियन आदी क्षेत्राशी निगडीत प्रशिक्षण आत्मसात करुन रोजगार  प्राप्त करावा, असे आवाहन श्री नवाल यांनी प्रशिक्षणार्थींना केले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन किटचे वितरण करण्यात आले.

0000


वझ्झर आश्रमातील मुलांचे कोविड लसीकरण जिल्हाधिकारी यांच्याकडून आस्थेने विचारपूस







वझ्झर आश्रमातील मुलांचे कोविड लसीकरण

जिल्हाधिकारी यांच्याकडून आस्थेने विचारपूस

 

            अमरावती, दि. ८ : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधीर, बेवारस बालगृहातील पंधरा मतिमंद मुलांचे आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन लसीकरण सेंटर येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यावेळी उपस्थित होते.

 

          यावेळी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या हस्ते वझ्झर आश्रमातील मुलांना टी शर्ट व पादत्राणांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण भासल्यास मला सांगावे, जिल्हा प्रशासनाव्दारे तुम्हाला आवश्यक मदत पुरवली जाईल, असे आश्वासन श्री. नवाल यांनी यावेळी दिले.

 

            वझ्झर येथील आश्रमात 123 मुले आहेत. त्यातील बहुतेकांचे लसीकरण यापूर्वीच झाले. 15 मुलांना मिरगीचा आजार असल्याने तज्ज्ञांच्या निगराणीतच लसीकरण करणे आवश्यक होते. त्यामुळे आज अमरावतीत येऊन इर्विनच्या सेंटरमध्ये लसीकरण करण्यात आले. या सर्व मुलांना लसीकरणानंतर सहा तास निगराणीत ठेवण्यात आले. सर्वांची प्रकृती चांगली आहे. जिल्हाधिकारी श्री. नवाल व सीएस डॉ. निकम यांनी आस्थापूर्वक सहकार्य केले. मुलांना भोजनासह कपडे, पादत्राणे देण्यात आली, असे आश्रमाचे शंकरबाबा पापळकर यांनी सांगितले.

 

       यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह लसीकरण केंद्राचे व एनसीडी सेंटरचे अधिकारी डॉ. प्रीती मोरे, डॉ. तृप्ती जवादे, डॉ. रामदास देवघरे, डॉ. मंगेश गुजर, मानसोपचार तज्ज्ञ प्रमोद भापके, परिचारिका सुषमा मोहिते, कविता देशमुख, पल्लवी पेठे, आहारतज्ज्ञ स्वाती गोफणे, साधना गिरी आदी उपस्थित होते.

 

0000


Saturday, July 3, 2021

आणि नेहाला मिळाला पुनर्जन्म….

 


कोरोना व मेंदूज्वर झालेली विद्यार्थिनी कोमातून परतली

आणि नेहाला मिळाला पुनर्जन्म….

 वैद्यकीय सेवा ठरली देवदूत

            अमरावती, दि. 3 : कोविड पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यावर मेंदूज्वर व इतर आजारांचे लक्षणे आढळून आलेल्या विद्यार्थिनीवर आरोग्य विभागाच्या कार्यतत्पर उपचारामुळे तिला पुनर्जन्म मिळाला आहे.

उपचारादरम्यान ही विद्यार्थिनी पंधरा दिवस कोमात होती. डॉक्टरांच्या देखरेखीत ऑक्सिजन पुरवठा, प्रयोगशाळेत विविध तपासण्या व त्यानुसार तत्पर औषधोपचारामुळे आज ती पूर्णत: बरी होऊन स्वत:च्या घरी परतली. आपल्या लेकीला पुनर्जन्म मिळाल्याने वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबिय व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अमरावती येथील रहिवासी इयत्ता दहावीची नेहा ही विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी घरी अचानक भोवळ येऊन कोसळली. कुटुंबियांनी तिला तातडीने उपचारार्थ डॉक्टरांकडे आणले. त्यावेळी तिला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या स्टाफने तिला दाखल करून घेत तत्काळ उपचार सुरू केले. नेहाला कोविड-19ची बाधा झाल्याचे आढळल्याने प्रथमत: तिच्यावर त्यानुसार उपचार करण्यात आले.

दरम्यान, तिचा ताप वाढू लागला होता. शरीराचे तापमान 104 पर्यंत पोहोचले होते. हे लक्षात घेऊन मेंदूचा सिटी स्कॅन, तसेच मेंदू व पाठीतील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तपासणी अंती मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले आणि त्यानुसार उपचार करण्यात आले. नेहा सलग पंधरा दिवस कोमात होती. अशा स्थितीतही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन तिला कोमातून बाहेर काढले.

आज तिची प्रकृती सुधारली असून, तिला आज तिला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून घरी परतण्याची परवानगी मिळाली.  सुपर स्पेशालिटीच्या स्टाफने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत तिला आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात डॉ. रवी भूषण, डॉ. निलेश पाटील, डॉ. पुनम सोलंकी, डॉ. श्रेया चेरडे, डॉ. करिश्मा जयस्वाल व डॉ. स्नेहल अतकरी या डॉक्टरांच्या टीमने नेहावर यशस्वी वैद्यकीय उपचार केले.

कोविडबाधित व मेंदूज्वरासह इतर आजारांची लक्षणे असलेल्या कोमात गेलेली बालिका पूर्णत: बरी झाली  आहे. डॉक्टर, पारिचारिका व इतर स्टाफच्या एकत्रित प्रयत्नांतून तिला पुनर्जन्म मिळाला आहे. तिची प्रकृती गंभीर होती. अशा रुग्णांच्या केसेस गुंतागुंतीच्या असतात. तथापि, सर्वांच्या प्रयत्नांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तिला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य मिळो, अशी भावना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी यावेळी व्यक्त केली.

 

0000


Friday, July 2, 2021

प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 












बोर्डी नाला प्रकल्पाच्या अपूर्ण कामांबाबत जलसंपदा राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त

 प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी

-         जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

चांदूर बाजार, ता. 2 : बोर्डी नाला मध्यम प्रकल्प चांदूर बाजार तालुक्यातील 13 व अचलपूर तालुक्यातील 3 अशा 16 गावांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र, प्रकल्पाचे काम असमाधानकारक असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आज दिले.  

 

जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी बोर्डी नाला प्रकल्पातील सांडवा, धरण, घळभरणी, धरणात झालेल्या अंशतः जलसाठ्याची पाहणी आज केली. या पाहणीदरम्यान बोरगांव मोहना, तुळजापूर गढी रस्त्यावरील पुच्छ कालव्याच्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही अपूर्ण असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

                         

 या प्रकल्पाची क्षमता 18.49 दलघमी इतकी आहे. जून 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर 4 हजार 126 हेक्टर जमिनीला थेट सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता हे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. ते तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.

                        तुळजापूर गढी येथे शेतीसाठी तत्काळ रस्ता द्यावा  

 तुळजापूर गढी येथील शेतात जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला, अशी शेतकरी बांधवांची तक्रार होती. त्याचे गांभीर्य जाणून राज्यमंत्री श्री.कडू यांनी प्रत्यक्ष रस्ता व पांदणरस्त्यांची पाहणी केली. तुळजापूर गढी गावातील शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे सुमारे 300 एकर जमिन पिकांपासून वंचित राहून नुकसान शेतकऱ्यांनाच भोगावे लागणार आहे. त्याबद्दल राज्यमंत्री श्री. कडू यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकरी बांधवांना तत्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कंत्राटदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या कंत्राटदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई तत्काळ करावी, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. या पाहणी दरम्यान जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता सुनील राठी,सांबाविचे अचलपूर विभागाचे कार्यकारी अभियंता सी. यु. मेहेत्रे, उपअभियंता एम.पी.भेंडे, सहाय्यक अभियंता  श्रेणी 1 -निरज माळवे, प्रहारचे  पदाधिकारी दिपक भोगाडे आदी उपस्थित होते.

                        000

इनायतपूर येथील अनाथ भावंडांच्या घरी जलसंपदा राज्यमंत्र्यांची भेट





इनायतपूर येथील अनाथ भावंडांच्या घरी जलसंपदा राज्यमंत्र्यांची भेट

अनाथ भावंडांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार

- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

इनायतपूर, दि. २ : चांदुर बाजार तालुक्यातील इनायतपूर येथील  अनाथ बहिणभावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास,  जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडू यांनी आज सांगितले.

 

राज्यमंत्री श्री. कडू यांनी इनायतपूर येथे अनाथ भावंडांच्या घरी भेट दिली व त्यांच्याशी संवाद  साधला. इनायतपूर येथील राजेश सुधाकर धोंडे यांचे २०११ मध्ये आजाराने निधन झाले.त्यानंतर त्यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या आई श्रीमती वैशाली राजेश धोंडे यांचे 16 मै 2021 रोजी कोरोना आजाराने निधन झाले.त्यामुळे जागृती राजेश धोंडे व सुशांत राजेश धोंडे ही बालके अनाथ झाले.या दोन्ही मुलांचा आजी व आजोबा सांभाळ करीत आहेत. तथापि, त्यांचे वय व परिस्थिती पाहता या भावंडांच्या संगोपनासाठी सर्व मदत केली जाईल, तसेच त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचे राज्यमंत्री श्री. कडू यांनी जाहीर केले.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांसाठी संगोपन योजनाही राबविण्यात येत आहे. त्याचा गरजू बालकांना लाभ मिळवून द्यावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

          यावेळी प्रहारचे पदाधिकारी दिपक भोंगाडे,राहुल धोंडे,विष्णु घोम, पोलिस पाटील अमोल घोम,पोलिस पाटील जयश्री धोंडे,ग्रापं सदस्य उज्ज्वल धोंडे आदी उपस्थित होते.

 

00000

 

 

 

 


Thursday, July 1, 2021

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने मार्गी लावा - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आदेश


 

जलसंपदा राज्यमंत्र्यांकडून सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने मार्गी लावा

- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आदेश

 

अमरावती, दि. १  : जिल्ह्यातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची तसेच कालव्यांची रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी कार्यवाहीला वेग द्यावा. आवश्यक बाबींसाठी प्रस्ताव आदींचा शासनस्तरावर पाठपुरावा करावा. मात्र, कुठल्याही परिस्थितीत कामे रखडता कामा नयेत, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडू यांनी आज येथे दिले.

 

जलसंपदा विभागातील कामांचा आढावा राज्यमंत्री श्री. कडू यांनी घेतला. यावेळी झुम ऍपवरून आमदार देवेंद्र भुयार हेही सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी मोर्शी व वरूड तालुक्यातील प्रश्न मांडले. जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

 

निम्न चारगडच्या कामांना गती द्या

 

निम्न चारगड प्रकल्पाची काही कामे रखडली आहेत. यासंबंधी प्रकल्पाच्या एसएलडीसीचा प्रस्ताव त्रिसदस्यीय समितीकडे तत्काळ पाठवावा.कोपरा व बोडणा प्रकल्पाच्या कामांबाबत परिपूर्ण माहिती सादर करावी, तसेच दुरुस्तीची आवश्यकता असलेली बांधकामे तातडीने दुरूस्त करण्यात यावीत, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी जलसंपदा प्रशासनाला दिले.

 

पर्यटन केंद्राबाबत प्रस्ताव द्यावा

 

मोर्शीतील अप्पर वर्धा व शेकदरी प्रकल्पावर पर्यटन केंद्र उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल. त्यासाठी या दोन्ही ठिकाणी पर्यटन केंद्राबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

 

कालव्यांची स्वच्छता करा

अप्पर वर्धा धरणातून पाणी मागणीचे एकत्रित प्रस्ताव तयार करावेत. कालव्यांची स्वच्छता व्हावी. कालव्याच्या बाजुला खडीकरण करण्यासह कालव्याच्या दोन्ही बाजुला आंबा किंवा संत्र्याची झाडे लावून ती शेतकऱ्यांकडे हस्तांतरित करावी. यासाठी २८० शेतकऱ्यांचा गट तयार करण्याचे निर्देश श्री.कडू यांनी यावेळी दिले.

 

बैठकीला जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

०००

 


भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...