Friday, November 19, 2021

बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित लोकसंचालित साधन केंद्र दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याकरिता सामंजस्य करार

 



 

बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित लोकसंचालित साधन केंद्र दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याकरिता सामंजस्य करार

 

            माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी देशाच्या सार्वजनिक बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बैंक असलेली बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित 13 लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) यांच्या दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गट (SHG) व संयुक्त दायित्व गट (JLG) यांना कर्जपुरवठा करण्याकारिता आर्थिक सामंजस्य करार मा. ना. अॅड. यशोमतीताई ठाकुर, मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अमरावती जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे करण्यात आला.

            महिला सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाची शिखर संस्था महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोक संचालित साधन केंद्र स्थापित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनविण्याकरीता सदैव प्रयत्नशील असते. त्यामुलेच बँकेनी पुढाकार घेऊन माविम बचत गटांच्या महिलांना उद्योगशील बनविण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार कर्ज पुरवठा त्वरित व्हावा या करीता बैंक ऑफ महाराष्ट्र व माविम अमरावती स्थापित 13 लोकसंचालित साधन केंद्र यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सावित्रीबाई फुले CMRC चांदूर बाजार, दिशा CMRC चांदूर रेल्वे, जिजाऊ CMRC, दर्यापुर, झेप CMRC मोर्शी, भरारी CMRC धामनगाव रेल्वे, परिवर्तन CMRC भातकुली, प्रेरणा CMRC जरुड, विमलाबाई देशमुख CMRC लोणी टाकली, मेलघाट CMRC धारणी, संजीवनी CMRC अंजनगाव सुर्जी, उन्नती CMRC अचलपुर, सावित्रीबाई फुले CMRC वरुड व संत तुकड़ोजी महाराज CMRC माहुली जहाँगीर या 13 लोक संचालित साधन केंद्राच्या महिला बचत गटांना या कराराचा लाभ होणार आहे. आज झालेल्या MoU  कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र चे अमरावती अंचल प्रबन्धक श्री राहुल वाघमारे, उप अंचल प्रबन्धक श्री अनिल गिरसावले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री सुनिल सोसे, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी श्री. ऋषिकेश घ्यार व CMRC व्यवस्थापक व सहयोगिनी उपस्थित होते.

 

 ०००

 

 

जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न यापुढे कायम एकोपा व शांतता राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 



संचारबंदीत सवलत

जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न

यापुढे कायम एकोपा व शांतता राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १९ : अमरावती शहरात संचारबंदीत शिथिलता आली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. स्थैर्य व शांतता विकासाला बळ देतात. परिस्थितीत तणाव निर्माण झाला की विकासाला खीळ बसते व सर्वांचेच नुकसान होते. त्यामुळे यापुढे कधीही एकोपा व शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

अमरावती शहरात कायदे व सुव्यवस्था राखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन काही वेळेसाठी संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू, कृषी सेवा केंद्र, विद्यार्थी, बँका यांना काही वेळेसाठी सवलत देण्यात आली होती.

पुढे विविध परीक्षा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना सोयीसाठी, तसेच नागरिकांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूंसाठी सवलत देणे आवश्यक होते. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी संचारबंदीत सूट देण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

त्यानुसार दि. २० नोव्हेंबरपासून रोज सकाळी ९ ते  सायंकाळी ६ दरम्यान सवलत देण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.

गत काही दिवसांपूर्वी शहरात निर्माण झालेला तणाव, काही अनुचित घटना लक्षात घेऊन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी स्वतः शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन शांततेचे आवाहन केले. अनेक मान्यवरांना सोबत घेऊन त्यांनी परिस्थितीचा सातत्यपूर्ण आढावा घेतला व  शांतता प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न केले.

अमरावती हे सांस्कृतिक महत्त्व असलेले, तसेच नवनव्या प्रकल्पांच्या उभारणीमुळे विकासाकडे झेपावणारे औद्योगिक शहर आहे. विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी शांतता व स्थैर्य कायम राहणे आवश्यक आहे. त्यामुळे

यापुढेही शहरात कायम शांतता नांदावी. यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

०००

 

 

 

 

Tuesday, November 16, 2021

अचलपुरात रात्रीची संचारबंदी

 अचलपुरात रात्रीची संचारबंदी

अमरावती, दि. १६ : अचलपूर, परतवाडा शहर, तसेच ग्रामपंचायत कांडली व देवमाळी परिसरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

तसा आदेश उपविभागीय दंडाधिकारी संदीपकुमार अपार यांनी जारी केला. त्यानुसार मंगळवार, दि. १६ नोव्हेंबरपासून रोज रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदी कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्रित गोळा होऊ नये, कोणत्याही प्रकारच्या अफवा, जातीय तणाव, धार्मिक भावना भडकवणारे व्हिडीओ, फोटो प्रसारित करू नये. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे बॅनर, पोस्टर लावू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.   

ग्रामीण भागात कलम ३७ नुसार प्रतिबंधक आदेश लागू

 ग्रामीण भागात कलम ३७ नुसार प्रतिबंधक आदेश लागू

अमरावती, दि. १६ : अमरावती शहरातील अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधक आदेश लागू करण्यात येत आहे. हा आदेश १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ डिसेंबरपर्यंत लागू राहील.

अप्पर जिल्हा दंडाधिकारी आशिष बिजवल यांनी हा आदेश जारी केला. त्यानुसार शस्त्र, तसेच तलवार, चाकू, लाठी व जिवित हानी होऊ शकणारे शस्त्र बाळगणे, विस्फोटके व तत्सम कच्च्या मालाची वाहतूक, दगड, विटा आदी क्षेपणास्त्राचा वापर करणे (गोळा करणे), जमाव एकत्रीकरण, पुतळ्याचे प्रदर्शन करण्यास, जाहीररीत्या ओरडणे, गाणे संगीत वाजवणे, बिभत्स चाळे करणे, अंगविक्षेप करणे, चित्रविचित्र हालचाली, तसेच कोणत्याही मेळाव्यास, मिरवणुकीस कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदी घालण्यात आली आहे.

शासकीय, निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, तमाशे, धार्मिक शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना हा आदेश लागू होणार नाही. अंत्ययात्रेच्या व्यतिरिक्त कोणत्याही मिरवणुकांसाठी पोलीस ठाणे अधिका-यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.

                        ०००

Monday, November 15, 2021

बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 




बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा

-   जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 15 : कायदा हातात न घेता बंधूभाव ठेवून शांतता प्रस्थापित करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सलोख्यासाठी अनेक नागरिक योगदान देत आहेत. यापुढेही असाच बंधुभाव कायम राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी परतवाड्यात केले.

    

जिल्हाधिकारी  पवनीत कौर यांच्या उपस्थितीत परतवाडा पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय राजस्व अधिकारी संदीपकुमार अपार, ठाणेदार संतोष टाले, नायब तहसीलदार अक्षय मांडवे, माजी नगराध्यक्ष रफिक सेठ, रुपेश ढेपे,सल्लुभाई आदी उपस्थित होते.

 

            जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या काही घटनांबाबत समाजमाध्यमांद्वारे प्रसृत होणारे संदेश विश्वासार्ह नसतात. अनेकवेळा असे संदेश समाजकंटकांकडून द्वेष वाढविण्यासाठी प्रसारित केले जातात. त्यामुळे जागरूक राहून बंधुभाव कायम ठेवावा.

 

 त्या पुढे म्हणाल्या की, समाजात अनेक चांगल्या गोष्टीही घडत असतात. मात्र, समाजकंटकांकडून त्या कधीही पुढे आणल्या जात नाहीत. त्यामुळे आपण त्या चांगल्या गोष्टींचा प्रसार केला पाहिजे. लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाच्या भावना आहेत. अमरावती शहरातील काही अनुचित घटनांनंतर ग्रामीण भागात व इतर ठिकाणी लोकांनी व प्रशासनाने शांतता राखली हे प्रशंसनीय आहे. सर्व धर्मांच्या नागरिकांमध्ये सलोखा आहे. मुस्लीमांनी शिवमंदिर तर हिंदुनी मशिदीचे संरक्षण केल्याच्या घटना सर्वधर्म समभावाच्या संदेश देणाऱ्या आहेत. गावात कुठलीही अनुचित घटना होण्याआधी आपण प्रत्येकाने समाजापर्यत एकतेचा संदेश देत अनुचित बाबी  टाळाव्यात. कुणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.  यावेळी जिल्हाधिका-यांनी धावत्या दौ-यातून परतवाडा -अचलपूर शहरातील विविध ठिकाणांना भेट दिली व विविध मान्यवरांशी संवाद साधला. 

 

00000

 

 

जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण करावी - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 





जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी

पुरवठा योजनेची कामे पुर्ण करावी       

                                                                                                   पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 

               अमरावती, दि. 15 : येत्या जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्पाची कामे व पाणी पूरवठा योजनेअंतर्गत सर्व कामे नियोजनबद्धरित्या व गतीने पूर्ण करावी. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जास्तीत पाणी वापर योजनांचा समावेश करावा. प्रत्येक घरी नळ जोडणी करुन सर्वाना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

               आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी आरक्षणबाबत योजनांच्या आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता       सु.पा.आडे, उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.अं.सावंत, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

            पालकमंत्री म्हणाल्या, पाणी वापर संस्था सक्षम होणे गरजेचे आहे. पाणी वाटपाचे नियोजन योग्य पद्धतीने करता येण्यासाठी  अपर वर्धा प्रकल्पाअंतर्गत येणारे सिंचनाचे पूर्ण क्षेत्रफळ पाणी वापर संस्थाना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आवश्यक ती कार्यवाही करून पूर्ण करावी. असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या गहू, कापूस, हरभरा इत्यादी पिकांकरिता मागणीनुसार पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. रब्बी हंगामाचे सिंचन सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निम्न पेढी प्रकल्प अंतर्गत प्राप्त निधी मधून कालवे, बंधारे निर्मितीची नियोजित  सर्व कामे  गतीने पूर्ण करण्यात यावी असे सांगितले.

 

0000000

 

 

 

पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 





पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा

सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 15 : अमरावती शहरात शांतता निर्माण झाली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 2 ते 4 वाजेदरम्यान खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न पोलीस व प्रशासनाकडून सातत्याने होत असून, लवकरच सर्व व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

शहरातील स्थितीच्या अनुषंगाने चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंटस् अँड इंडस्ट्रीज संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, अतुल कळमकर, गौरीशंकर हेडा, मगनभाई बांठिया, राजेंद्र भन्साली, अनिल खरपे, बकुल कक्कड, ओमप्रकाश चांडक, संतोष बल्दुआ, संजय चोपडा, मोरंदमल बुधवाणी, आशुतोष वाडेकर, शरणपालसिंह अरोरा, सुरेंद्र पोपली, संजय कुकरेजा, पप्पू गगलाणी, मनोज खंडेलवाल, गोविंद सोमाणी, महेश पिंजाणी, सुरेश केवलरामाणी, अर्जुन चांदवाणी, रंजन महाजन, अशोक राठी आदी उपस्थित होते.

            यावेळी पालकमंत्र्यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानुसार सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी संचारबंदीत क्रमाक्रमाने  शिथीलता आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली की व्यापार क्षेत्रासह सर्वच घटकांचे नुकसान होते. गत दोन दिवसांत सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शांतता निर्माण झाली. जनजीवन पूर्वपदावर येऊन सर्व व्यवहार, सोयीसुविधा पूर्ववत सुरू व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास दोन तासांची शिथीलता आणण्यात आली आहे. त्यानंतरही इतर सेवाही पूर्ववत करण्यात येत आहेत. व्यापारी बांधव, विविध क्षेत्रांतील नागरिक यांच्या माहितीसाठी प्रशासनाकडून होणा-या निर्णयांची माहिती पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे प्रसारित केली जाईल.

00000

 

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...