Tuesday, December 7, 2021

कोविड प्रतिबंधक दक्षता व लसीकरणाबाबत पालकमंत्र्यांचे आवाहन


 


कोविड प्रतिबंधक दक्षता व लसीकरणाबाबत पालकमंत्र्यांचे आवाहन

संपूर्ण लसीकरणासाठी मोहिमेत सातत्य राखा

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 7 : राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे आढळलेले रुग्णमंगळवारी जिल्ह्यात आढळलेले नवे 9 कोरोनाबाधित लक्षात घेता सर्वत्र सतर्कता बाळगण्याची गरज असून, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. प्रशासनाने मोहिमेद्वारे लसीकरणाला वेग दिला. तथापि, प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण होण्यासाठी मोहिमेचा वेग व सातत्य राखण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

                                    भीती नको; पण दक्षता बाळगावी

महाराष्ट्रात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रूग्ण आढळले. अमरावती महापालिका क्षेत्रात मंगळवारी नव्याने नऊ कोरोनाबाधित आढळले. या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, कोविड साथीचे प्रमाण घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मिशन बिगेन अगेनअंतर्गत विविध बाजारपेठा, व्यवहार यांना परवानगी देण्यात आली. तथापि, धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही. गत साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. भीती नको; पण दक्षता बाळगावी. प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे.

                        एकही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहता कामा नये

जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण झाले. मोहिमेत लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी लसीकरणाचे संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण होणे गरजेचे आहे. लसीकरणाचा वेग कायम राखला तरच संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.  लसीकरणाची दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अद्याप 35 टक्के एवढे आहे. हे कमी प्रमाण पाहता कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण व्हावे. ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतली नाही किंवा दुसरी मात्रा घेतलेली नाही, त्यांनी तत्काळ आपले लसीकरण करून घ्यावे व स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

            लसीकरणाला गावोगाव वेग देतानाच विविध माध्यमांतून प्रभावी जनजागृती व लोकशिक्षणाची जबाबदारीही विविध विभागांनी समन्वयाने पार पाडावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

            त्या पुढे म्हणाल्या की, कोरोनाकाळात विविध क्षेत्रांना अडचणींना सामोरे जावे लागले. शासन व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साथ नियंत्रणात आली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आता पुन्हा साथ वाढता कामा नये.  कोविड अनुरूप जीवनशैलीचा अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

                        000

ध्वजदिन 2021 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा निधी संकलनाचे उद्दिष्ट प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण व्हावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर



















 ध्वजदिन 2021 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

निधी संकलनाचे उद्दिष्ट प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण व्हावे
- जिल्हाधिकारी पवनीत कौर
देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणा-या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. यंदा निधी संकलनाचे उद्दिष्ट ९९ लक्ष ६० हजार रूपये आहे. या राष्ट्रीय कार्यात अमरावती जिल्ह्याने यापूर्वीही उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. आताही हे उद्दिष्ट 26 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचा निश्चय करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करताना आज सांगितले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे नियोजनभवनात हा कार्यक्रम झाला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा हे अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे, अधिक्षक दिनेश बागल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. शहिद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यपदकधारक यांचा सत्कार, तसेच दिवंगत सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही यावेळी झाले.
जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेशानंतर प्रशिक्षण घेताना आम्हाला ‘आर्मी अटॅचमेंट’ उपक्रमात अरूणाचल प्रदेशात सेनादलाचे कार्य प्रत्यक्ष जाणून घेता आले. देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत खडतर परिस्थितीत प्राणांची बाजी लावून सैनिक कार्य करत असतात. सेवानिवृत्तीनंतरही सैनिक गावांमध्ये विविध उपक्रमांत पुढाकार घेऊन योगदान देतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ध्वजदिन निधीत प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. अमरावती जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्राच्या सार्वभौमत्व, अखंडतेचे संरक्षण करतानाच आपत्तीच्या काळातही सशस्त्र सेनादले मोलाचे योगदान देतात. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने ध्वजदिन निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी केले.
ध्वजनिधीसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे श्री. खाडे व श्री. बागल यांच्या हस्ते 33 लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिका-यांना सुपूर्द करण्यात आला. संस्थेने आतापर्यंत सुमारे 2 कोटी रूपयांचे योगदान दिल्याचे श्री. खाडे यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणा-या जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी, तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी ध्वजनिधीचा उपयोग होतो. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी 99 लक्ष 60 हजार उद्दिष्टाच्या तुलनेत 1 कोटी 3 लक्ष 76 हजार रूपये निधी संकलित झाला. त्याची टक्केवारी 104.18 इतकी आहे, असे लेफ्टनंट चरडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. वैभव निमकर व डॉ. किरण दंदी यांनी सूत्रसंचालन केले.
000

Monday, December 6, 2021

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

 







भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

अमरावती, दि. 6 : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अभिवादन केले.  

            शहरातील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीकडून अभिवादन कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. 

 जगातील श्रेष्ठ राज्यघटनांमध्ये देशाच्या राज्यघटनेचा समावेश होतो. समता, बंधुभाव, न्याय अशा मानवतावादी श्रेष्ठ मूल्यांचा समावेश असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला. त्यांचे कार्य पिढ्यानुपिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.  

अभिवादन कार्यक्रमाला माजी खासदार अनंतराव गुढे, किशोर बोरकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर, रामेश्वर अभ्यंकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

000

Saturday, December 4, 2021

पशुसंवर्धन योजनांसाठी आता एकदाच अर्ज करा मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ; प्रतिक्षा यादीचीही तरतूद




ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देत ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवतानाच पुन्हा अर्जाची प्रक्रिया करावी लागू नये म्हणून प्रतीक्षा यादीची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी व पशुपालक बांधवांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

  महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर.

---------------------------

पशुसंवर्धन योजनांसाठी आता एकदाच अर्ज करा

मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ; प्रतिक्षा यादीचीही तरतूद

 - पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव खेरडे

 

अमरावती, दि. ४ : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ शेतकरी व पशुपालक बांधवांना मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येत असून, प्रतीक्षा यादीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा अर्ज करावा लागणार नाही व प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल

हे कळू शकेल व लाभार्थी हिस्सा भरणे व इतर बाबींचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे,अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव खेरडे यांनी दिली. योजनेसाठी शेतकऱ्यांना संकेतस्थळासोबतच मोबाईल ॲपद्वारेही अर्ज करता येणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी १८ डिसेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन श्री. खेरडे यांनी केले.

 

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेत गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.  एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यासाठी दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतीक्षायादी पुढील पाच वर्षांकरिता लागू राहणार आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळणार हे कळणार असल्याने लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ गायी-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनेसाठी शेतक-यांनी https://ahmahabms.com या संकेतस्थळावर किंवा मोबाइलवरून AH-MAHABMS या ऍपवरून अर्ज दाखल करावा, अधिक माहितीसाठी 1962 किवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा संबंधित पशुसंवर्धन विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खेरडे यांनी केले आहे.

00000


Wednesday, December 1, 2021

अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक

अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक       
                    
          जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेल्या गुन्ह्यांची प्रकरणे आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी त्यांच्या कक्षात आढावा घेतला. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या  बैठकीला समाज कल्याणच्या सहायुक्त आयुक्त माया केदार, अमरावती शहरचे सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण डुंबरे, अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, नागरी हक्क व संरक्षण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक केशव सुलभेवार, शासकीय अभियोक्ता आदी उपस्थित होते.  

           ऑक्टोबर अखेर शहरीव ग्रामीण हद्दीत घडलेल्या 13 प्रकरणांचा आढावा श्री बिजवल यांनी घेतला. समितीसमोर आलेल्या प्रकरणांमधील व्यक्तींना तातडीने आर्थिक सहाय्य प्रदान करावे. आर्थिक सहाय्य करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. निधी मागणीची प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
मागील महिनाअखेर शहरी व ग्रामीण भागातील 42 प्रकरणांचे 56 लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून शहरी भागातील 15 व ग्रामीण भागातील 28 प्रकरणांचा तपास सुरु असलयाची माहिती माया केदार यांनी दिली.

000000

छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाला मुदतवाढमतदार यादीत नोंद नसलेल्या व्यक्तींनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन




छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाला मुदतवाढ

मतदार यादीत नोंद नसलेल्या व्यक्तींनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा

                जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

अमरावती, दि. 1 : भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, त्याअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीला 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन नवतरूणांनी मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार, दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधी 5 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी 20 डिसेंबरपर्यंत, तर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.  

 या वाढीव मुदतीचा नवतरूणांनी अर्थात ज्यांना 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत, अशा पात्र तरूणांनी लाभ घेऊन मतदार म्हणून नोंद करावी. पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्यांनी तशी नोंद करून घ्यावी. त्याचप्रमाणे, स्थानांतरित मतदार, निधन झालेल्या मतदारांसंदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना देऊन नावे वगळण्यासाठी सहकार्य करावे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे किंवा मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे कार्यालयात जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

वलगाव येथील पाणीपुरवठा सुविधेसाठी 92 लक्ष निधीला प्रशासकीय मान्यता- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



पूर पुनर्वसित गावांतील पाणीपुरवठा योजना
पालकमंत्र्यांचा पाठपुरावा
वलगाव येथील पाणीपुरवठा सुविधेसाठी 
92 लक्ष निधीला प्रशासकीय मान्यता
-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 1 : जिल्ह्यातील पूर पुनर्वसित गावांमध्ये विविध सुविधांची उभारणी होण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून पाठपुरावा होत आहे. त्यांच्या प्रयत्नांनुसार अमरावती तालुक्यातील वलगाव या पूरग्रस्त गावांतील पाणीपुरवठा सुविधेसाठी 92 लक्ष 85 हजार पाचशे रूपये निधीला प्रशासकीय मान्यता महसूल व वन विभागातर्फे आज प्रदान करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या, पूर पुनर्वसित गावांत आवश्यक नागरी सुविधा निर्माण होण्यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्याकडून याबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार वलगावच्या पाणीपुरवठा सुविधेबाबत पालकमंत्र्यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन लवकरच हे काम गती घेणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रशासकीय मान्यतेनुसार प्रस्तावाधीन नागरी कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ सुरू करावी व ती पूर्ण करून कार्यारंभ आदेश देऊन काम पूर्ण करावे, असे आदेश महसूल व वन विभागाने दिले आहेत.

जिल्ह्यातील विविध पुनर्वसित गावांतील आवश्यक सुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा होत आहे. विकासकामांसाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. प्रशासनानेही नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक कामांचे वेळेत प्रस्ताव द्यावेत. मंजूर कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिले.

Adv. Yashomati Thakur 
Collector Office Amravati -जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...